Tuesday, May 29, 2012

वारुगड


वारुगड

                                                    
माणागंगा नदी जिथे उगम पावते त्या सीताबाईच्या डोंगरात डाव्या कुशीवर एक किल्ला आहे. त्याचे नाव आहे वारुगड.किल्ला माण तालुक्यात दहिवडीच्या ईशान्येस २० मैलांवर आहे.
इतिहास

             किल्ला शिवरायांनी बांधला असे सांगतात.या किल्ल्याचा किल्लेदार परभू जातीचा होता.२०० पहारेकरी व बरीच शिबंदी किल्ल्यावर होती.१८१८ मध्ये सातारच्या राजाच्या फडणीस विठ्ठलपंत याने २०० लोक पाठवून दुस-या बाजीरावाकडून घेतला.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
किल्ला हा दोन भागात मोडतो.एक गडाची माची तर दुसरा बालेकिल्ला.

१. वारुगड माची

           किल्ल्याच्या माचीवर गेल्यावर समजते की गडाचा घेरा केवढा मोठा आहे.किल्ल्याची माची ही संपूर्ण तटबंदीवेष्टीत आहे.आजही ती ब-याच मोठा प्रमाणावर शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा या माचीतूनच पुढे जातो.या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते.मात्र स स्थितिला दोनच शिल्लक आहे गिरवी जाधववाडी या मार्गेमाचीत प्रवेश करणारी वाट एका दरवाजातून वर येते.तर मोंगळ -घोडेवाडी माचीत प्रवेश करणारी वाट दुस-या दरवाजातून वर येते. माचीवर घरांचे ,वाडांचे अनेक अवशेष आहेत.दोन ते तीन पाण्याची टाकी,तळी सुध्दा आहेत.माचीवर भैरोबाचे जीर्णोध्दारीत मंदिर सुध्दा आहे.मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते.संपूर्ण माची फिरण्यास दोन तास लागतात.


२. बालेकिल्ला
           गिरवी जाधववाडीतून माचीवर येणारा रस्ता दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभागला जातो.उजवीकडे आणि डावीकडे जाणरा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो तर सरळ वर जाणारी वाट १५ मिनिटात बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन धडकते.दरवाजाची तटबंदी आजही शाबूत आहे.बालेकिल्यावर पोहचल्यावर समोरच एक सदरेची इमारत आहे.आज ती पूर्णपणे नव्याने बांधून काढलेली आहे.समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे.विहीर ब-याच प्रमाणात बुजलेली आहे. किल्ल्यावरून समोरचा परिसर पाहीला की आपल्याला जाणवते की किल्ला किती मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे.समोरच दिसणारा सीताबाईचा डोंगर , महादेव डोंगररांग हा परिसर दिसतो.संतोषगडवरून सीताबाईच्या डोंगरातून एक वाट वारुगडावर येते.
गडावर जाण्याच्या वाटा
            वारुगडावर जायचे असल्यास फलटण गाठावे.फलटण पासून किल्ल्यावर जाण्यास अनेक मार्ग आहेत. वारुगड मुख्यतः दोन भागात विभागला आहे.एक गडाची माची यावर घोडेवाडी नावाची वस्ती आहे. तर दुसरा वारुगडाचा बालेकिल्ला. बालेकिल्ल्यात जाण्यासाठी माचीतूच जावे लागते.माचीत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक गाडीरस्ता आहे जो थेट माचीत जातो तर दुसरा मार्ग म्हणजे पायवाट जी थेट किल्ल्यावर घेऊन जाते.


१. फलटण ते गिरवी
           फलटण ते गिरवी अशी एस टी सेवा उपलब्ध आहे.गिरवीतून ५ किमी अंतरावर असणारा जाधववाडा गाठावा.जाधववाडा हे किल्ल्याच्या पाययाचे गाव आहे.येथून वारुगड माचीवर जाण्यास २ तास लागतात.माचीतून बालेकिल्ल्यावर जाण्यास २० मिनिटे पुरतात.

२. फलटण दहीवडी 

            फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २० किमी अंतरावर मोंगळ नावचा फाटा लागतो.या फाटापासून एक कधा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडी वस्तीत घेऊन जातो.मोंगळ ते घोडेवाडी अंतर १५ कि.मी चे आहे. फलटण दहीवडी रस्त्यावर फलटण सोडल्यानंर २६ किमी अंतरावर बीजवाडी नावचे गाव लागते.या गावातून एक कधा गाडीरस्ता थेट माचीवरील घोडेवाडीत जातो.पुढे हा रस्ता वर सांगतिलेल्या रस्त्याला येऊन मिळतो.

राहण्याची सोय : वारुगडाच्या माचीवर असणा-या भैरवगडाच्या मंदिरात १०० लोंकांची सोय होते.
जेवणाची सोय : जेवणाची सोय आपणच करावी.
पाण्याची सोय : माचीवर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : जाधववाडीतून दोन तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुत जाता येते.

दुर्गाडी

 दुर्गाडी




कल्याण हे शहर मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे रेल्व स्थानक आहे. कल्याण हे मुंबई-पुणे तसेच नाशिक या महत्त्वाच्या शहरांशी रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. तसेच कल्याण हे गाडी रस्त्यानेही जोडले असल्यामुळे एसटी बसने अथवा खासगी वाहनाने कल्याणला जाता येते.

कल्याण शहर उल्हास नदी, खाडी किनारी वसलेले आहे. सातवाहनांच्या राजवटीमध्ये कल्याण बंद खूप प्रसिद्ध होते. मध्यपूर्व देशातील तसेच रोम पर्यंत चालणार्या व्यापाराचे कल्याण हे केंद्र होते. कल्याण बंदरामध्ये येणारा व्यापारी माल येथून नाणेघाटमार्गे जुन्नर तसेच प्रतिष्ठाण (पैठण) या राजधानीकडे रवाना होत असे.

बोर घाटाजवळ उगम पावणारी उल्हास नदी वसईजवळ समुद्राला मिळते. उल्हास नदीला कसारा घाटाजवळ उगम पावणारी भातसाई नदी तसेच माळशेज घाटाकडून वाहत येणारी काळ नदी येवून मिळते. त्यामुळे खाडीला पाणी भरपूर असते.

हा भाग निजामशाही (अहमदनगर) च्या अस्तानंतर आदिलशाही (विजापूर)च्या ताब्यात आला. इ.स. १६३६ नंतर आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या या प्रदेशाचा ताबा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६५४मध्ये घेतला. त्यावेळी कल्याण बरोबर भिवंडीही ताब्यात आणली.

कल्याण सारखे महत्त्वाचे बंद ताब्यात आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधण्याचा आदेश दिला. आबाजी महादेवाने येथे किल्ला बांधण्यासाठी पाया खंदत असताना या पायामध्ये अमाप द्रव्य सापडले. दुर्ग बांधत असतानाच द्रव्य मिळाही ही दुर्गेचीच कृपादृष्टी समजून किल्ल्याचे नाव दुर्गाडी ठेवण्यात आले.

दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयानेच शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभारण्यासाठी येथे गोदी निर्माण केली. येथे निर्माण झालेल्या आरमाराने पुढे मुंबईच्या इंग्रजांना, वसईच्या पोर्तुगिजांना तसेच जंजिर्याच्या सिद्धीला दहशत बसविली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने भारतीय आरमाराचा पाया घातला.

कल्याणच्या बसस्थानकापासून रिक्षाने १५ मिनिटात दुर्गाडी किल्ल्याजवळ पोहोचता येते. किल्ल्याच्या प्रवेशमार्गावर सध्या कमान उभारलेली आहे. या मार्गावर पूर्वी दरवाजा होता, याला गणेश दरवाजा म्हणून ओळखले जाता असे. येथे गणेशाची मूर्ती आहे.

दुर्गाडीच्या लहानशा किल्ल्यावर दुर्गामातेचे मंदिर आहे. त्यामुळे येथे भक्तांचा नेहमीच राबता असतो. मंदिरात पूर्वीचा देवीचा तांदळा असून नव्याने बसविलेली मूर्तीही आहे.

मंदिराजवळ इदग्याची भिंत आहे. गडाच्या खाडीकडील भागाकडे तटबंदी व बुरुजाचे अवशेष आहेत. गडावरील अवशेष मात्र काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. दुर्गाडीचा किल्ला लहान असल्यामुळे सर्व परिसर पाहण्यासाठी अर्धा पाऊण तास पुरेसा आहे

महिपतगड

        महिपतगड




 खेड तालुक्याच्या पूर्वेस १२ मैलांवर रसाळगड-सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. या मध्ये उत्तरेकडचा महिपतगड हा सर्वात उंच आणि विस्ताराने सुद्धा प्रचंड आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १२० एकर आहे.हे तीन किल्ले एकमेकांच्या जवळजवळ असल्यामुळे अनेक ट्रेकर्स महिपतगड-सुमारगड-रसाळगड असा ट्रेक देखील करतात. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : महिपतगड हा नावाप्रमाणेच महिपत आहे. किल्ला तसा आकाराने फार मोठा आहे. चहुबाजूंचे कडे तुटलेले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही. काही ठिकाणी जिथे कडा चढण्यास सोपा आहे तिथे तटबंदी उभारली आहे. सध्या मात्र ही तटबंदी पडून गेलेली आहे. किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्रेयेस यशवंत दरवाजा. सःस्थितीला हे दरवाजे नाममात्र उरलेले आहेत.
           हे सर्व दरवाजे होते याच्या खुणा फक्त उरलेल्या आहेत. शिवगंगा दरवाजा जवळ एक शिवाची पिंड आहे. पुसाटी दरवाजा जवळ एक शिडी आहे. कोतवाल दरवाजा जवळ मारुतीचे एक छोटेसे मंदिर आहे. पारेश्र्वराचे एक मोठे मंदिर किल्ल्यावर आहे. या मंदिरात राहण्याची सोय होते. मंदिराच्या समोरच पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या व्यतिरिक्त किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. अनेक प्रकारचे अवशेष या झाडीत लपलेले आहेत. या सर्वांचा अभ्यास होणे फार आवश्यक आहे. या किल्ल्यावर एक आगळावेगळा प्रकार दिसतो. तो म्हणजे न वापरलेल्या चुन्याचे अवशेष येथे पडलेले दिसतात.गड फिरण्यास दोन ते तीन तास पुरतात.
गडावर जाण्याच्या वाटा

१) खेड वरून पहाटेच दहिवली गावाला जाणारी बस पकडावी. खेड ते दहिवली १ तासाचे अंतर आहे. दहिवली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. ही वाट लांबची असल्याने गडमाथा गाठण्यास ४ तास लागतात. या वाटेने जातांना आपल्याला दोन खिंडी पार कराव्या लागतात.
२)  खेडवरून वाडीजैतापूरला जाणारी गाडी पकडावी. वाडीजैतापूरास उतरल्यावर मळलेल्या वाटेने वाडी बेलदार गावात यावे. वाडीजैतापूर ते वाडीबेलदार हे अंत दोन ते अडीच तासांचे आहे. वाडीबेलदारहून गडमाथा गाठण्यास १ तास पुरतो. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही.
३) रसाळगडवरून सुमारगड मार्गेसुद्धा महिपतगड गाठता येतो. हे अंतर साधारणतः: ७ तासांचे आहे. जंगल दाट असल्याने वाट चुकण्याचा फार संभव आहे.

राहण्याची सोय : पारेश्र्वर मंदिरात २० ते ३० जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : आपण स्वतः: करावी.
पाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : दहिवली गावातून - ४ तास.

रसाळगड

         
 रसाळगड


  सह्याद्रीची रांग उत्तरदक्षिण पसरलेली आहे. मुख्य रांगेपासून सुटावलेल्या अनेक रांगा पाच पंचवीस मैल लांबवर पसरलेल्या आहेत. पोलादपूर सोडून खेडवरून चिपळूणकडे जाताना रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे तीन दुर्ग आपले लक्ष वेधून घेतात. हे सर्व किल्ले जावळीच्या खोर्यातच येतात. प्रतापगड, मधुमकरंदगड, रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड हा ट्रेकही खूप प्रसिद्ध आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

             रसाळगडाचा घेरा लहानच असल्याने संपूर्ण गडफेरीस एक ते दीड तास पुरतो. रसाळवाडीतून किल्ल्यावर शिरतानाच वाटेत दोन दरवाजे लागतात. पहिले प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोरच तटातील मारुतीचे दर्शन होते. वळसा मारून आपण किल्ल्याच्या दुसर्या दरवाजात पोहचतो. या दरवाजातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटावर एक भली मोठी तोफ दिसते. तोफा हे या किल्ल्यांचे मोठे वैशिष्टच आहे. किल्ल्यावर लहानमोठा मिळून सुमारे १६ तोफा आहेत.संपूर्ण किल्ल्याचा माथा म्हणजे एक पठारच होय. समोरच झोलाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. कोनाडात अनेक सापडलेल्या मूर्त्या ठेवल्या आहेत. मंदिराच्या समोर दीपमाळ आणि तुळशी वृंदावन आहे. समोरच एक तोफ सुद्धा ठेवलेली आहे. मंदिराच्या बाजूला पाण्याचा मोठा तलाव आहे. हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला शिवाचे छोटेसे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्याच्या वरच्या भागाला थोडासा उंचवटा आहे , यालाच बालेकिल्ला म्हणतात. यात वाडांचे मोठा प्रमाणावर अवशेष आहेत. बुरूजाव तोफा आढळतात. येथून समोरच एक दगडी बांधकाम असलेली खोली आढळते. हे धान्य कोठार असावे असे वाटते. बालेकिल्ल्याच्या जवळच आणखी एक पाण्याचा तलाव आहे. या दोन्ही तलावात बारामही पाणी असते. किल्ल्याच्या नैऋत्य भागात एक नंदी आहे. मात्र येथे शिवाची पिंड आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठा प्रमाणावर आहेत. म्हणजे हा किल्ला पूर्वी मोठा प्रमाणावर नांदता असावा.

गडावर जाण्याच्या वाटा

१. खेड वरून वडगाव बिरमणी कडे जाणारी बस पकडायची आणि वाटेत असणार्या हुंबरी फाटावर उतरायचे. हुंबरी फाटापासून थेट बीड गावात जाणारी वाट पकडायची. साधारणतः बीड गावात पोहचण्यास एक तास लागतो. वाडीबीड गावातून गडावर जाण्यास मळलेली वाट आहे. या मार्गाने किल्ल्यावर पोहचण्यास दीड तास लागतो.

२. खेड वरून निमनी गावात जाण्यासाठी बसेस सुटतात. निमनी गावात उतरून एका तासात रसाळवाडी मार्गेकिल्ला गाठता येतो. वाट अत्यंत सोपी आहे.

३.खेड वरून मौजे जैतापूर गावात जाणारी एस. टी. पकडावी. मौजे जैतापूरहून - रसाळवाडी मार्गेदोन तासात रसाळगड गाठावा. वाट अत्यंत सोपी आहे.

राहण्याची सोय : झोलाई देवीचे मंदिर (३० ते ४० माणसे राहू शकतात.)
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी
पाण्याची सोय : बारामही उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : रसाळवाडीतून (१५ मिनिटे)

संतोषगड

           संतोषगडाला ताथवड्याचा किल्ला असे ही म्हणतात. सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे.शंभूमहादेव रांग ,बामणोली रांग आणि म्हसोबा रांग यापैकी म्हसोबा डोंगररंगेवर संतोषगड,वारुगड,महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत.हा सर्व परिसर तसा कमी पावसाचाच मात्र ऊसाच्या शेतीमुळे सर्व परिसर सधन झालेला आहे.सर्व ठिकाणी वीज ,दूरध्वनी अशा आधुनिक सुविधा सुध्दा उपलब्ध आहेत.फलटण च्या माण तालुक्यात असणा-या या किल्ल्यांना पाहण्यासाठी दोन दिवस पुरतात.

कसे जाल?

        किल्ल्यावर जाण्यासाठी फलटण आणि सातारा दोन्ही शहरातून जाता येते.ताथवडे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.ताथवडेला अनेक मार्गांनी पोहचता येते.फलटण ते ताथवडे अशी एस टी सेवा दर अर्ध्या तासाला उपलब्ध आहे.फलटण ते ताथवडे हे साधारण १९ कि.मी चे अंतर आहे.

         सातार्याहून पुसेगाव मोळघाटमार्गे फलटणला जाणार्या बसने ताथवडे ला उतरता येते.पुसेगाव ते ताथवडे हे साधारण २३ कि.मी चे अंतर आहे.ताथवडे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित वाट आहे.या वाटेने किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो.

रचना
         गड हा तीन भागात विभागला आहे.पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुस-या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्लाचा भाग आहे.

उपयोग

          किल्ला सा छोटासाच आहे पण तटबंदी ,बुरूज असे पाहण्यासाखे बरेच काही आहे.गडावरून फार दूरच्या प्रदेशावर नजर ठेवता येत असे.पश्चिमेस मोळघाट,दक्षिणपूर्व पसरलेली डोंगररांग याच डोंगररांगेवर सीताबाईचा डोंगर व वारुगड आहे.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

          ताथवडे गावात "बालसिध्दचे जीर्णोध्दार' केलेले मंदिर आहे.मंदिराच्या पायरीवरून सन १७६२ मध्ये किल्ल्याचा जीर्णोध्दार केल्याचे समजते. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एक मठ आहे.या मठाच्याच बाजूला एक गुहा आहे.या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे.एक वाल्मिकी ऋषिंची मूर्ती आहे.मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे मात्र येथपर्यंत पोहचण्यासाठी वळसा घालून यावे लागते.मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते.पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते.येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाज्यातच घेऊन जाते.आज किल्ल्याचा दरवाजा मात्र केवळ नाममात्रच शिल्लक राहिलेला आहे.दरवाज्यामधील पहारेक-यांचा देवड्या आजही सुस्थितित आहेत.दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच हनूमानाचे टाके आहे.त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत.धान्य कोठारांच्या भिंति उभ्या आहेत पण छप्पर उडालेले आहे.याच्याच मागच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे.लांबवरून पाहिल्यास एखादी विहीरच वाटते मा त्र जवळ गेल्यावर समजते की खाली पाण्याचं टाकं आहे आणि टाक्यात उतरण्यासाठी चक्क कातळभिंतिला भोक पाडून पाय-या केलेल्या आहेत. किल्ल्याची पहिल्या टप्प्यावर असणारी संरक्षक तटबंदी , बुरुज आजही चांगल्या परिस्थित उभे आहेत.आजमितिस अनेक किल्ल्यांची तटबंदी ढासळलेल्या आढळतात पण संतोषगड याला अपवाद आहे.

महत्व
       विजापूरहून होणाऱ्या स्वाऱ्यांना पायबंद बसावा, तसेच स्वराज्याची ही बाजू मजबूत असावी, यासाठी या परिसरात शिवछत्रपतींनी संतोषगड आणि वारूगड हे शिलेदार उभे केले. आग्रा मोहिमेच्या सुमारास वारुगडाचे ठाणे राजांनी जिंकल्याचेही सांगितले जाते. पुढे पेशवाईनंतर ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. त्यांनी गडांच्या वाटा, महाद्वारांच्या कमानी पाडल्या. भग्न अवशेषांमध्ये इथला इतिहास आज विखुरला असला, तरी डोळसपणे पाहताच तो उलगडू लागतो. दोन्ही गडांवरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. दुष्काळात आजही या दोन्ही गडांवरील पाणीसाठा गावकऱ्यांना उपयुक्त ठरतो आहे. किल्ल्याचा संपूर्ण परिसर भटकण्यास दोन तास पुरतात.

Sunday, May 27, 2012

चंदन वंदन

       

चंदन वंदन 

 



कथा आणि कादंबरी मध्ये जुळ्या भावा विषयी आपण नेहमीच ऐकत असतो मात्र दुर्गविश्र्वातही अशी जुळी भावंडे आढळतात त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन. सातारच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. ऊसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर त्यामुळे रस्ते, वीज, एस्.टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावा गावा पर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्र्वर कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराट्गड, पांडवगड. एकीकडे महाबळेश्र्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत.

इतिहास :
इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६७३ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदन-वंदन येथे असणा-या मराठांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोघलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्र्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या हातात पडला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
चंदनच्या प्रवेशद्वाराजवळील रस्ता पूर्वी बराच कठीण होता. मात्र सध्या तेथे असलेल्या मशिदीमुळे हा रस्ता बराच रुंद झाला आहे. दोन अर्धवट पडलेले बुरूज आपणास प्रवेशद्वाराची जाणीव करून देतात. येथून साधारण १५ पाय-या वर गेले असता डाव्या बाजूस एक पडकी वास्तू दिसते. तिच्या वरच्या अंगास एक वडाचे झाड आहे. पाच वडांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास 'पाचवड' म्हणतात. बाजूलाच एक शंकराचे मंदिर आहे. यातील दोन्ही महादेवाच्या पिंडी या पाच लिंगांच्या आहेत. ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. श्रावणात येथे यात्रा असते. (येथून दहा एक पाय-या चढून गेल्यावर समोरच मोठा मोठा शिळा रचलेल्या दिसतात) वंदनप्रमाणेच येथेही एक दर्गा आहे. दर्ग्याच्या बाजूस एखाद्या वाड्याच्या भिंतीसारखे बांधकाम आढळते. एका अर्धवट दरवाजासारखे काहीतरी दिसते. साधारण सदरेसारखे येथील बांधकामाचे अवशेष दिसतात. याच्या मागील भागात सुद्धा अनेक उद्ध्वस्त अवशेष आपणास दिसतात. हीच गडावरील मुख्य वस्ती असावी. गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा अगदी सुस्थितीत असलेला एक बुरूज आढळतो. याच वाटेवर एक समाधी आढळते. याच्या वरील बाजूस अस्पष्ट असे शिवलिंग आहे आणि एका बाजूस मारुतीची मूर्ती आहे. गडाच्या दक्षिणेकडे तीन कोठा असलेली पण वरचे छप्पर उडालेली वास्तू आढळते. गावक-याच्या मते हे कोठार म्हणजे दारूगोळा साठवण्याची जागा होती. गडाच्या मध्यभागी प्रशस्त चौथरा आहे. यावर काय वास्तू होती याचा मात्र अंदाज लागत नाही.

गडावर जाण्याच्या वाटा :
चंदन आणि वंदन या दोन्ही किल्ल्यांवर जाणा-या सयुंक्त वाटा आहेत. पुणे-सातारा मार्गावर भुईंज गाव आहे. तेथे उतरून २० कि.मी. अंतरावर किकली गाव आहे. वाई-सातारा या दोन्ही ठिकाणाहून किकलीला येण्यासाठी बस आहे. किकलीच्या जवळच बेलमाची नावाचे गाव आहे. या बेलमाची गावाचे दोन भाग आहेत. एक आहे ती खालची बेलमाची तर दुसरी वरची बेलमाची. येथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीत पोहोचते. डावीकडे राहतो तो चंदन तर उजवीकडे वंदन. या चंदन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत :

राहण्याची सोय :
दर्ग्यात रहायचे असल्यास ३० ते ४० जणांना राहता येते.
जेवणाची सोय : नाही
पाण्याची सोय : फक्त पावसाळ्यात अन्यथा गडावर पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ : अडीच ते ३ तास

अर्नाळा

अर्नाळा
 

किल्ल्याचा प्रकार : सागर किना-यावरील किल्ले
डोंगररांगः उत्तर कोकण
जिल्हा : ठाणे
 
श्रेणी : जास्त सोपी

          अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे.उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या स र्वच प्रदेशावर या पाणकोटावरून नजर ठेवता येत असे.

इतिहास :
 
          चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा हा जलदुर्ग १५१६ मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुंगीजांनी १५३० साली हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे २०० वर्षांच्या पोर्तुंगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठांच्या ताब्यात आला. पोर्तुंगीजांप्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी १८१७ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच हा किल्ला देखील इंग्रजांच्या
ताब्यात गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
 
          अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेशद्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्ती व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे. दरवाजावरच एक शिलालेख कोरलेला आहे.
 
बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर!
पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!
 
या ओळींवरुन या किल्ल्याची पुनर्बांधणी बाजीराव पेशव्याने केली हे लक्षात येते.किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्र्वराचे व भवानी मातेचे मंदिर आहे.

          त्र्यंबकेश्र्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळ आहे. या शिवाय किल्ल्यात गोडापाण्याच्या विहिरीही आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालिकामातेचे मंदिर आहे. समुद्रकिनार्‍यावरुन किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणारा किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. याच्या आत जाण्यास एक लहानसा दरवाजा आहे. संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ल्याचे समोवार दर्शन घेत गोल फेरी मारता येते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणार्‍या उंचवटावर बसले असता पूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस पडतो.

गडावर जाण्याच्या वाटा :
 
          पश्चिम रेल्वेवरच्या विरार पासून अर्नाळा अंदाजे १० कि.मी. वर असून तेथे जायला एस्‌. टी. बस व रिक्षा यांची सुविधा आहे. अर्नाळा गावातून समुद्रकिनार्‍यापर्यंत गेल्यावर बोटीनेच किल्ल्यावर जाता येते. ही बोट सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रकिनार्‍यावरुन समोरच दिसणार्‍या अर्नाळा किल्ल्यावर बोटी जायला ५-१० मिनीटे लागतात.

राहण्याची सोय : गडावर राहण्याची सोय नसली तरी संपूर्ण गड अर्धा-पाऊण तासात बघून बोटीने किनार्‍यावर परतता येत असल्याने राहण्याची गरज नाही.
 
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय : गडावर गोडापाण्याच्या विहिरी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ : १ तास विरार पासून.

भरतगड

       भरतगड






सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे कालावलची खाडी आहे. या खाडीच्या किनार्‍यावर नारळी पोफळीच्या बागांनी समृद्ध असलेले मसुरे गाव आहे. मसुरे गाव भरतगड किल्ल्याच्या पायथ्याला आहे.

          मालवण पासून साधारण १६ कि.मी. अंतरावरील मसुरे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्ग वरील कणकवली येथूनही रामगडमार्गे मसुरे पर्यंत गाडी मार्गाने येता येते. समुद्रसपाटी पासून ७५ मीटरची उंची असलेला भरतगड चारही बाजुंनी झाडी झुडुपांनी घेरलेला आहे. झाडी झुडुपांनी झोकोळल्यामुळे भरतगडावरील तटबंदी दिसत नाही. त्यामुळे दूर अंतरावरुन एक झाडीभरला डोंगरच दृष्टीपथात येतो. मसुरे गावापर्यंत मालवणकडून एस.टी. बसेसची सोय उपलब्ध आहे.

          भरतगडाच्या पायथ्याला असलेल्या दर्ग्यापासून गडावर जाणारा मार्ग आहे. या मार्गावर सध्या पायर्‍या केलेल्या आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला रेलिंग उभारलेले असून मधून मधून विश्रांतीसाठी बसण्याची सोय केलेली आहे.

          पायथ्यापासून पंधरावीस मिनिटांमधे आपण गडाच्या तटबंदीपर्यंत पोहोचतो. समोरची तटबंदी डावीकडे ठेवीत जाणार्‍या पायवाटेने गडाच्या प्रवेशद्वाराकडे जावे लागते. तटबंदी तोडून केलेल्या मार्गाने आपण गडामधे प्रवेश करतो. लहान माथा असलेला भरतगड आयताकृती आकाराचा आहे. चारही बाजुंनी तटबंदी आणि बुरुजांनी तो परिवेष्टीत आहे.

          संरक्षणाच्या दृष्टीने विचार करुन मारा करण्यासाठी तटबंदी आणि बुरुजांची रचना केलेली आहे. सध्या गडाच्या माथ्यावर आंबा, काजूची लागवड केलेली दिसते. गडाच्या माथ्यावर अतिक्रमणकरुन ही लागवड केली गेली आहे. पण यामुळे डोंगरमाथा हा हिरव्यागर्द झाडीने फुललेला आहे. या गर्द झाडीमधे धनेश पक्ष्यांचा वावर मोठय़ाप्रमाणावर दिसतो. येथे एकावेळी १२ धनेश पक्षी पहायला मिळाले.

          गडमाथ्यावर मधे बालेकिल्ला अथवा परकोट आहे. या परकोटात जाण्यासाठी दोन बाजुंना दोन दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा बुरुजाला लागूनच आहे. दरवाजाच्या आत पहारेकर्‍यांची देवडी आहे. डावीकडील तटबंदीजवळच एक लहानसे मंदिर आहे. चौथर्‍यावर हे मंदिर देवसिद्ध महापुरुषाचे असल्याचे तेथिल फलकावरुन कळते. काही काळापुर्वीच याचा जिर्णाद्धार केल्यामुळे हे मंदिर सुस्थितीमधे आहे. मंदिरासमोरच तुळशी वृंदावन केलेले आहे.

          मंदिराच्या डावीकडे खोल विहीर आहे. मात्र याच्या पायर्‍या ढासळलेल्या असल्याने खाली उतरता येत नाही. पाणी काढण्याची काही सोय नाही. मंदिराच्या मागच्या बाजूला वाडय़ाचे भले मोठे जोते पहायला मिळते. सर्वत्र झाडीझुडपांचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे या परिसरात सावधगिरीनेच वावर करणे गरजेचे आहे.

          डावीकडील तटबंदीमधे एक लहान दरवाजा आहे. याला चोर दरवाजा असेही म्हणतात. या दरवाजाच्या बाहेरील तटबंदीचा मोठा भाग सुटा होऊन ढासळला आहे. वेळीच याची दुरुस्ती झाली नाही तर तटबंदीचा मोठा भाग नामशेष होईल. या बालेकिल्ल्यातून बाहेर पडून दक्षिण टोकावरील बुरुजावर जाता येते. उत्तम बांधणीचा बुरुज पाहून पश्चिम टोकावर आल्यावर बालावलखाडीचे दृष्य दिसते. नारळी पोफळीच्या हिरव्यागर्द झाडीमधून संथ गतीने हेलकावणारी कालावलची खाडी खिळवून ठेवते. खाडीच्या पलिकडील तीरावर गर्द झाडीने झाकलेला भंगवतगड दिसतो.

          तटाच्या कडेने परत फिरत आपण पुन्हा दरवाजा जवळ येतो. गडफेरी साधारणत: तासाभरात पूर्ण होते.

          शिवरायांनी येथे गड बांधण्याच्या दृष्टीने पहाणी केली. पण पाण्याची सोय न झाल्यामुळे त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला होता. पुढे फोंड सावंतानी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. गडावर पाणी मिळाल्यावर त्यांनी आपल्या रक्षणासाठी येथे किल्ला उभारला. पुढे १८१८ मधे इतर किल्ल्याप्रमाणे हा ही किल्ला इंग्रजाना मिळाला तेव्हा गडावर अठरा तोफा असल्याची नोंद केलेली आढळते.

Tuesday, May 15, 2012

वसंत बापट

भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा
गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा
तुमच्याअमुच्या गंगायमुना, केवळ माझी भिवरथडी
प्यार मला हे कभिन् कातळ, प्यार मला छाती निधडी
मधुगुंजन लखलाभ तुम्हाला,बोल रांगडा प्यार मला
ख्रिस्त बुध्द विश्वाचे शास्ते, बोल रांगडा प्यार मला
धिक् तुमचे स्वर्गही साती
इथली चुंबिन मी माती
या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्गकळा
कृष्णेच्या पाण्यातुन अजुनी वाहतसे लाव्हा सगळा

कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच
जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच
जनीँ जनार्दन बघणारा तो 'एका' ह्रदयीँ एकवटे
जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खुण पटे
इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी जवळीक कायमची झाली
भक्तीचा मेळा दाटे
चोख्याची पैरण फाटे
निर्गुण मानवतेची पुजा करणारे करु देत भले
माझ्यासाठी भीमाकाठीँ भावभक्तिची पेठ खुले

रामायण तर तुमचेमाझे भारत भारतवर्षाचे
छत्रपतीची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचे
रजपूतांची विक्रमगाथा तुमच्यापरि मजला रुचते
ह्रदयाच्या ह्रदयात परंतू बाजी बाजीची सुचते
अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी
दत्ताजीचे शेवटचे ते शब्द अजुनि ह्रदयामाजीं
बच जायेँ तो और लढें।
पाउल राहिल सदा पुढे
तुम्हास तुमचे रुसवे फुगवे घ्या सगळा नाजुक नखरा
माझ्यासाठी राहिल गाठीँ मरहट्ट्याचा हट्ट खरा

तुमचे माझे ख्याल तराणे, दोघेही ऐकू गझलां
होनाजीची सोनलावणी वेड लावते परि मजला
मृदंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अन् मुरली
थाप डफाची कडकडता परि बाही माझी फुरफुरली
कडाडणारा बोल खडा जो दरीदरीमधुन घुमला
उघडुनि माझा ह्रदयकवाडा तोच पवाडा दुमदुमला
तटातटा तुटती बंद।
भिवईवर चढते धुंद
औट हात देहात अचानक वादळ घुसमटुनी जाते
उचंबळे ह्रदयात पुन्हा ते इतिहासाशी दृढ नाते

कळे मला काळाचे पाउल द्रुत वेगाने पुढति पडे
कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणीं अधिकचि उघडे
दहा दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी
मीही माझे बाहू पसरुन अवघ्या विश्वातेँ कवळी
विशाल दारे माझ्या घरची खुशाल ही राहोत खुली
मज गरिबाची कांबळवाकळ सकलांसाठी आंथरली
मात्र भाबड्या ह्रदयात।
तेवत आहे जी ज्योत
ती विझवाया पहाल कोणी मुक्त करुनि झंझावात
कोटि कोटि छात्यांचा येथे कोट उभारु निमिषात
 
---वसंत बापट

Friday, May 11, 2012

हर्षगड

 हर्षगड

नाशिक जिल्हा गिरीदुर्गासाठी अतिशय समृद्ध आहे. सिलबारी, डोलबारी, सातमाळा आणि त्रंबकरांग या जिल्ह्यात आहे. हर्षगड उर्फ हरिषगड अशा नावानी ओळखला जाणारा हा दुर्गम किल्ला त्रंबक रांगेत आहे. नाशिक पुर्वेला असलेल्या त्रंबकेश्वराच्या प्रसिद्ध मंदिरामुळे आणि गोदावरी या नदीच्या उगमस्थानामुळे हा परिसर धार्मिक दृष्टीनेही प्रसिद्ध पावलेला आहे.
         पुर्वपश्चिम पसरलेली त्रंबकरांग भास्करगडापासून सुरु होवून हर्षगड, त्रंबकगड, अंजनेरी, रांजणगिरी असे किल्ले आपल्या कवेत घेवून धावते.
 
          भास्करगडाच्या पुर्वेला आणि त्रंबकगडाच्या पश्चिमेला हर्षगड आपला कातळमाथा उंचावून उभा आहे. हर्षगडाला जाण्यासाठी दोन चार मार्ग हे ट्रेकिंगच्या दृष्टीने उत्तम आहेत. पण किल्ला चढायचा असेल तर पायथ्याचे गाव गाठणेच सोयीचे आहे. हर्षगडाच्या दक्षिण पायथ्याला टाकेहर्ष म्हणून लहानसे गाव आहे. येथून तासाभरात आपण हर्षगडाचा पायथा गाठू शकतो. तसेच उत्तर बाजुला असलेल्या जांभुळपाडा या गावाकडूनही भास्करगडाच्या खिंडीत येवून भुंडी, फणी, असे डोंगर ओलांडून आपण हर्षगड गाठू शकतो. मात्र जांभुळपाडा गाठण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागतो हे लक्षात असू द्यावे.

         हर्षगडाचा उभा असलेला कातळमाथा लक्षवेधी असला तरी त्याच्या चहुअंगाचे सरळसोट कडे मात्र आपल्याला धडकी भरवतात. गडावर चढण्यासाठी उत्तरबाजु कडून वाट आहे ही एकमेव वाट पायर्‍यांची आहे. उभ्या कातळात या पायर्‍या कोरुन काढलेल्या असल्याने दमछाक करणार्‍या आहेत. टाकेहर्षकडून तासादीडतासातआपण येथ पर्यंत पोहचू शकतो.

         टाकेहर्ष हे गाव नाशिक ते खोडाळा या गाडीरस्त्यावर आहे. नाशिक कडून येताना अंजनेरीचा किल्ला ओलांडल्यावर डावीकडे इगतपुरीकडे जाणारा फाटा आहे. या फाटय़ावरुन पुढे निघाल्यावर इगतपुरीकडे जाणारा रस्ता सोडून उजवीकडे वळाल्यावर आपण खोडाळाच्या दिशेने जावू लागतो. या वाटेवर आखलीहर्ष, टाकेहर्ष अशी गावे लागतात. ठाण्याकडून येताना कसारा घाटाच्या सुरवातीलाच खोडाळा तसेच जव्हारकडे जाणारा गाडीमार्ग आहे. येथून खोडाळा कडूनही आपण टाकेहर्ष गाठू शकतो.

         टाकेहर्ष कडून साधारण चारपाच तासांचा अवधी हाताशी ठेवून सोबत पाणी आणि खाण्याचे साहित्य घेवून हर्षगडाकडे प्रयाण करावे.

         हर्षगडाच्या नावात जरी हर्ष असला तरी पायर्‍या चढताना मात्र तो हर्ष मावळतो. जसजश्या पायर्‍यांनी आपण वर चढतो तस तसा विस्तृत प्रदेश दिसासला लागतो. पायर्‍यांच्या माथ्यावर प्रवेशद्वार आहे. एवढे प्रवेशद्वार अडवले की हा किल्ला शत्रुला जिंकणे कठीणच आहे.

         गडाचा माथा लहान व लांबोळका आहे. चारही बाजुने ताशीव कडे असल्यामुळे तटबंदीची आवश्यकता नव्हती. पाण्याची टाकी, घरांची जोती, दारु कोठार अशा गडपणाचा खुणा किल्ल्यावर पहायला मिळतात. गडाच्या माथ्यावरुन भास्कर, उतवड, भुंडी, फणी, वाघेरा, त्रंबकगड, अंजनेरी तसेच स्वच्छ वातावरण असल्यास सिद्धगड आणि माहूलीची रांगही दिसते.

         या किल्ल्याचे नाव हर्षगड का पडले ? याची एक कथा या भागात प्रसिद्ध आहे. हर्षगड उर्फ हरिहरगड हा मराठय़ांच्या ताब्यात होता तेव्हाचीही कथा एकदा मोघलांच्या एका सरदाराने किल्ल्याला वेढा घातला. किल्ला दुर्गम असल्यामुळे तो मोघलांना जिंकता येईना. गडावर फक्त पन्नास-साठ लोकांचीच शिबंदी होती. ती शिबंदी बाहेरुन होणार्‍या मदतीच्या प्रतिक्षेत होती. तर मोगल सरदार किल्ल्याची रसद रोखण्यावर भर देत होता. किल्ल्याची कोंडी केली तर मराठय़ांना अन्नपाण्याचा तुटवडा जाणवेल आणि त्यांना गड सोडावा लागेल अशी योजना आखून गडाचा वेढा आवळला होता.

         महिन्या दोन महिन्यात बाहेरुन मदत आली नाही. येण्याची काही आशाही दिसत नव्हती. रसदीशिवाय परिस्थिती बिकट होत आली होती. गडावर एक म्हातारी होती. तिने वेढा उठवण्यासाठी एक युक्ती केली. गडावरील शिबंदीची जेवण उरकल्यावर खरकाटय़ा पत्रवळ्या गोळा केल्या. त्याबरोबर शेकडो पत्रावळ्या मिसळून त्याही खरकाटय़ा केल्या. गडावर तोफांचे बार काढण्यात आले. नगारे कर्णे वाजवण्यात आले. गडावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे गडाखाली गोळा झालेले मोघल चकीत झाले. ते वर पाहू लागले. म्हातारीने कडय़ावरुन नेहमीप्रमाणे पत्रावळ्या खाली टाकण्यास सुरवात केली. मोघलांनी विचार केला की रोज पन्नाससाठ पत्रावळ्या खाली पडतात म्हणजे गडावर पन्नास एक लोक असावेत पण आज दोन अडीचशे पत्रावळ्या खाली पडल्या म्हणजे मराठय़ांना गडावर रसद आणि सैन्याची जादा कुमक मिळाली असावी म्हणूनच गडावर आनंदोत्सव साजरा होतोय. म्हणजे आता गड जिंकणे अवघडच की? मोघल सरदार वेढा उठवून चालता झाला. म्हातारीच्या युक्तीने वेढा उठल्याचा सर्वांना हर्ष झाला म्हणून गडाचे नाव हर्षगड असे झाले. म्हतारीच्या युक्तीची गंमत आपल्यालाही हर्षेउल्हासीत करते आणि त्याच आनंदात आपण परतीच्या मार्गावर चालू लागतो.

माणिकगङ

        

माणिकगङ 

 

 मुंबई पुणे हमरस्त्यावरुन जातांना अनेक किल्ले आपल्याला दिसतात. प्रबळगड, इरशाळ, चंदेरी, माथेरान, कर्नाळा, लोहगड, विसापूर आणि यांच्या संगतीतच एक किल्ला आहे त्याचे नावं माणिकगङ. कर्नाळा,सांकशी,माणिकगड हे या रांगेतील तीन भाऊ.माणिकगडाच्या आजुबाजुचा सर्व प्रदेश सधन असला तरी येथील लोकांचे राहणीमान मात्र साधेच आहे.शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

           किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच तटबंदी दिसते ही तटबंदी अनेक ठिकाणी तुटलेली आहे. तटबंदीमधन आत शिरल्यावर समोरच देऊळ दिसते आणि पुढे दोन कोठा दिसतात.कोठांची दारे अजूनही शाबूत आहेत. तटबंदीतून पहिल्या सपाटीवर उतरण्यासाठी पाय-या आहेत.येथून थोडे पुढे गेल्यावर पाण्याची टाकी आढळतात.त्याच्या समोरच जोत्याचे अवशेष दिसतात.येथून डावीकडे फुटणा-या वाटेने पुढे गेल्यावर आणखी ४ टाक्या दिसतात यात मेंपर्यंत पाणी असते.टाक्यांच्या समोरच शंकराची पिंड आहे.पुढे गेल्यावर दोन चांगले बाधलेले बुरुज आढळतात.येथून पुन्हा गड जिथून पाहयाला सुरवात केल त्या जागेपाशी येऊन पोहचतो.किल्ल्यावरूनप्रबळगड,इरशाळगड,कर्नाळा आणि सांकशीच किल्ला हा परिसर दिसतो.संपूर्ण गडफेरीस अर्धा तास पुरतो.

गडावर जाण्याच्या वाटा
पनवेल किंवा खोपोली मार्गेयायचे झाल्यास आपटे फाटामार्गेरसायनीकडे वळावे.रसायनीमधून वाशिवली गावात यावे.वाशिवली गावातून वडगाव गावात यावे.वडगाव किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.पनवेलहून वडगाव पर्यंत येण्यास दीड तास पुरतो.वडगाव हे ब-यापैकी मोठे गाव आहे.माणिकगडाची एक सोंड गावातच उतरलेली आहे.या सोडेच्या साह्याने समोरच्या डोंगरधारेवर चढत जावे.वडगाव पासून डोंगराच्या माथ्यावर जाण्यास अर्धा तास पुरतो.या डोगराच्या माथ्याचर कातरवाडी वसलेली आहे.या वाडीतून गड समोरच दिसतो.गडाच्या दिशेने चालत निघायावर अर्ध्यातासातच आपण एका जंगलात शिरतो.येथून पुढे जाण्यासाठी दोन वाटा फुटतात.

१. माणिकची लिंगी मार्गे उजवीकडे जाणारी वाट प्रशस्त आणि मळलेली आहे.या वाटेने जातांना गड डावीकडे ठेवून आपण पुढे जातो.वाट जंगलातून पुढे गेलेली आहे.सुमारे अर्ध्या तासाने आपण गडाच्या पश्चिम टोकावर पोहचतो.येथेच गडाला चिटकून एक सूळका आहे.यालाच 'माणिकची लिंगी' म्हणतात.येथून एक वाट सरळ पुढे
पठारावर गेलेली आहे तर दुसरी वाट डावीकडे जंगलात वर चढत गेलेली आहे.ही वाट किल्ला आणि सुळका यांच्या बेचक्यातून वर जाते.हीच वाट आपण पकडायची.या वाटेने थोडे पुढे गेल्यावर एक घळ लागते.या घळीतून वर चढून जायचे पण वाट जरा दमछाक करणारी आहे.या वाटेने किल्ल्यावर पोहचण्यास एक तास लागतो.

२.
खिंडीतुन उजवीकडच्या वाटेचा नाद सोडून ायचा आणि समोर असणा-या झाडीत शिरायचे.या वाटेने आपण समोरची डोंगरसोंड चढत जातो.पुढे दोन उंचवटे पार केले की आपण एका खिंडीत पोहचतो.येथेच एक छोटासा सुळका आहे. सुळका आणि डोंगर यांच्या खिंडीतून वर चढले की आपण पुन्हा एका घळीत पोहचतो.या घळीतून सोपे प्रस्तरारोहण करून वर चढले की आपण एका पठारावर येऊन पोहचतो आणि या पठारावर क्रं १ ची वाट आपल्या वाटेला येऊन मिळते.या दोन्ही वाटा एकत्र येऊन पुढे एक वाट तयार होते आणि आपण किल्ल्यात प्रवेश करतो.

Thursday, May 10, 2012

यशवंतगड


 यशवंतगड

सागर किनार्‍याचा वरदहस्त लाभलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुका आहे. वेंगुर्ल्याच्या दक्षिणेकडे रेडी नावाचे गाव आहे. हे रेडीगाव येथिल गणपतीच्या मंदिरामुळे सर्वत्र प्रसिद्ध पावलेले आहे. हे जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांचा मोठा ओघ रेडीला येत असतो. तसाच येथे असलेल्या मॅगेनिजच्या खाणीमुळेही हा परिसर प्रसिद्ध आहे.

          रेडीच्या या प्रसिद्धीमुळे येणार्‍या अनेक भाविकांना आणि पर्यटकांना या रेडी गावात सागरकिनार्‍यावर असलेला वेशिष्ठपूर्ण अशा यशवंतगडाची दुदैवाने कल्पना नसते. त्यामुळे पर्यटकांचे पाय यशवंतगडाकडे वळतच नाहीत.

          हा किल्ला रेडीचा यशवंतगड म्हणून ओळखला जातो. रेडीला येण्यासाठी वेंगुर्ल्याहून बसेसची सोय आहे. तसेच सावंतवाडी कडूनही आपल्याला शिरोडा गावामध्ये रहाण्याची तसेच जेवणाची सोय होवू शकते. रेडीपासून मालवण पर्यंत गाडीरस्ताही उत्तम आहे.

          रेडीगावातून एक दीड किलोमीटर अंतरावार यशवंतगड आहे. रेडीच्या खाडीच्या किनार्‍यालाच लागून असलेल्या लहानशा टेकडावर यशवंतगड बांधलेला आहे. समुद्र सपाटापासून ५० मीटरची साधारण उंची आहे. गावातल्या नारळी पोफळीच्या जागा आणि त्यात असलेली कोकणी पध्दतीची वैशिष्ठपूर्ण घरे ओलांडून आपण यशवंतगडाजवळ पोहोचतो. येथ्नू एक वाट खाली पुळणीकडे जाते. उजव्या हाताला जाणारी पायवाट झाडीत शिरते. या झाडीत शिरल्यावर दोन मिनिटांमधे आपण एका बुरुजाजवळ पोहोचतो. बुरुजाला वळसा घातल्यावर गडाचे प्रवेशव्दार नजरेत भरते. हे कमानयुक्त प्रवेशव्दार आहे. किल्ल्याचे बांधकाम जांभ्या दगडामधे केलेले असल्यामुळे प्रवेशव्दारही जांभ्यादगडामधे बांधलेले आहे.

          प्रवेशव्दारामधून आत गेल्यावर पहारेकर्‍याच्या रहाण्याच्या जागांचे अवशेष दिसतात. गडाच्या आत बाहेर मोठय़ाप्रमाणावर झाडी झुडपे वाढलेली असल्यामुळे आतिल सर्व भाग झोकाळून गेलेला आहे. या प्रवेशव्दाराच्या आत शिरल्यावर डावीकडे बालेकिल्ल्याकडे जाणारी पायवाट आहे. ही पायवाट जाभ्यांदगडात बांधून काढलेली आहे. बालेकिल्ल्याच्या बाहेर बुजत चाललेला खंदकही दिसतो. येथेही एक प्रवेशव्दार आहे. त्याला काही पायर्‍याही आहेत. येथूनआत शिरल्यावर डावीकडे भक्कम बांधणीचा दरवाजा आहे.

          हा दरवाजा वैशिष्ठपूर्ण आहे. दरवाजा बंद असल्यास बाजूला दिंडी दरवाजा केलेला आहे. हा वळणदार मार्ग दरवाजाच्या आत निघतो. अशा प्रकारच्या रचना महाराष्ट्रामधे दुर्मीळ आहे. कर्नाटकातील पारसगडाला अशा प्रकारची रचना केलेली आढळते. दरवाजाच्या आत पहारेकर्‍यांसाठी असलेली जागा आहे. ही कमानयुक्त बांधणीची जागा बांधून सरंक्षणाच्या दृष्टीने तिची रचना केलेली आहे.

          येथे समोरच दोन गोलाकार बुरुजांच्या मधे बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजा आहे. गोलाकार बुरुजांमुळे त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. या बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्या आत देवडय़ा असून पुढील मार्ग कातळ कोरुन तयार केलेला आहे. बालेकिल्ल्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दरवाजाच्या मधील जागेत बंदिस्त चौक आहे. या चौकापर्यंत परवानगी शिवाय कोणी पोहोचू शकणार नाही अशी सर्व व्यवस्था जाणीवपूर्वक केलेली आहे.

          बालेकिल्ल्याच्या तिसर्‍या प्रवेशव्दारातून आत गेल्यावर डावीकडे मोठी इमारत आहे. सरळ जाणारी वाट तटबंदी कडे जाते. तटबंदीवर झाडी खूप वाढल्यामुळे तटबंदीवर फरी मारता येत नाही. या तटबंदीवरुन फेरी मारताना काही ठिकाणी पंचविस ते तीस फुट उंचीची तटबंदी आहे. शत्रुवर मारा करण्यासाठी जागोजाग जंग्या केलेल्या दिसतात तसेच मजबूत बुरुजही दिसतात. तटबंदीवर वाढलेल्या झाडीमुळे मात्र त्यांची पार रया गेलेली आहे.

          मधल्या भागामधे भव्य वाडा त्याच्या काही भिंतीसकट उभा असलेला दिसतो. त्याचे दरवाजे, तुळ्या कालौघात नामशेष झालेले असले तरी वाडय़ाची भव्यता लक्षवेधक आहे.

          बालेकिल्ल्याची भक्कम सुरक्षा व्यवस्था स्मरणात ठेवीतच आपण पुन्हा माघारी निघतो. खरे तर कोकणातील काही किल्ले हे एप्रिल - मे मधे गवत आणि झुडुपे कमी झालेली असताना पहाण्यात मजा आहे.
 

विशाळगड

                              विशाळगड 



शिवकालीन इतिहासामधे विशाळगडाला महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. इतिहासामधे विशाळगड, खेळणा, खिलगिला, खिलकिला, सक्करलाना अशी वेगवेगळी नावे या किल्ल्याला मिळालेली आहेत. देश आणि कोकण यांना जोडणार्‍या आंबा घाटा जवळ असलेला विशाळगड सह्रयाद्रीच्या मुख्य रांगेला लागूनच आहे.

          कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामधे विशाळगड आहे. मलकापूरकडून अथवा आंबा गावा कडून असे दोन गाडीमार्ग गजापूर मार्गे विशाळगडाला जातात. आंबा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या साखरपा गावाकडून तीन तासाच्या चढाईने माचाळच्या गुहेकडून आपण विशाळगडावर पोहोचू शकतो.

          सह्याद्रीच्या रांगेशी लहानशा खिंडीने जोडलेला विशाळगड समुद्र सपाटीपासून १०२१ मीटर उंचीचा आहे. या खिंडीपर्यंत गाडीरस्ता असल्यामुळे अर्ध्यातासात विशाळगडावर पोहोचता येते. विस्तृतमाथा असलेला विशाळगड सह्याद्रीच्या पाताळवेरी दर्‍यांनी वेढलेला असल्यामुळे बेलाग झालेला आहे.

          विशाळगडाच्या बेलागपणाचे येथिल दर्‍याखोर्‍यांचे निबीड अरण्याचे सुरेख वर्णन फेरीस्ता या इतिहासकाराने केलेले आहे. तो म्हणजो या घाटामधील वाटा अतिशय वाकडय़ा-तिकडय़ा आहेत. याची तुलना कुरळ्या केसांशी केली तरी यांची बरोबरी होणार नाही. या पर्वतांचे देखावेही अतिशय भयंकर असून याच्या कडय़ावर आणि गुहांजवळ आल्यावर प्रत्यक्षात भुते आणि राक्षस देखील दचकतील. या रानात सूर्याचा कवडसाही पडायचा नाही. इथे वाढलेले गवत सर्पाच्या सुळ्याप्रमाणे चिवट, तिक्ष्ण ! हवा अजगराच्या श्वासो श्वासासारखी दुर्गंधमय. इथल्या पाण्यामधे मूतिमंत मृतयूचेच वास्तव्य. वार्‍याची प्रत्येक झुळूक विषाने माखलेली अशा या वाकडय़ातिकडय़ा वाटांनी चालून मुसलमानी सैन्य अगदी भिऊन आणि थकून गेले!

          विशाळगडाच्या परिसरात भटकंती केल्यास आजही याचा प्रत्यय आल्याशिवाय रहात नाही. विशाळगडाच्या या दुर्गमतेचा वापर करुन शत्रूला नामोहरण केल्याचा एक दाखलाही इतिहासात आहे. साधारण इ.स.१४५० च्या सुमारास बहमणी राज्याचा एक सुभेदार हा प्रांत काबीज करण्यासाठी आला. हा सरदार म्हणजे मलीक उत्तुजार होय त्याने प्रथम पन्हाळ्या किल्ल्यावरील शिर्क्यांना जेरीस आणले. शिर्क्यांनी मलीक उत्तुजाराला विशाळगडाचे आमिष दाखवले. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली मलीक उत्तुजारची सात हजाराची फौज विशाळगडाच्या निबिड अरण्यात येऊन दाखल झाली. अतिशय अडचणीच्या जागेवर सैन्यासकट मलीक उत्तुजारला आणल्यावर विशाळगडावरील शंकरराव मोरे यांनी जोरदार हल्ला केला. शिर्के आणि मोरे यांनी कात्रीत सापडलेल्या मलीक उत्तुजारला सात हजार सैन्यासकट त्यांच्या आक्रमणापासून मुक्त केला. यासैन्यातील एक सरदार मलीक रैहान होता. त्याचीच कबर विशाळगडावर आहे असे जाणकारांचे मत आहे.

          इ.स. १६६० मधे आदिलशाही सरदार सिद्धी जैहर याने शिवरायांना पन्हाळगडावर कोंडले होते. या कोंडीतून शिवराय चतुराईने निसटले. त्याचा पाठलाग करीत सिद्धी मसूद आला. त्या सिद्धी मसूदला थोपवण्याचा महान पराक्रम बाजीप्रभु यांनी केला. महाराज विशाळगडावर सुखरुप पोहोचले. या आणि अशा अनेक रोमहर्षक घटनांचा साक्षीदार विशाळगडाचा किल्ला आहे.

          एस.टी.च्या थांब्यापासून अध्यातासात आपण विशाळगडावर पोहोचतो. गडावर मुंढा दरवाजा, रणमंडळ मलीक रैहानचा दर्गा, अमृतेश्वर मंदिर, दगडी कुंउ, पंतप्रतिनिधीचा वाडा अशा अनेक वास्तु गडावर पहायला मिळतात.

          या शिवाय छत्रपती राजाराम महाराज यांच्या तृतीय पत्नी अंबीकाबाई यांचे स्मारक आणि इतिहासामधे आपल्या पराक्रमाने अजरामर झालेले वीर बाजीप्रभु आणि फुलाजी प्रभु यांच्या समाध्या आज उपेक्षीत असल्या तरी नमन करण्यायोग्य आहेत.

          विशाळगड आणि त्याचा परिसर मुक्तपणे पहाण्यासाठी पुर्ण दिवसाचा वेळ हाताशी असायला हवा. येथे जेवणाची तसेच रहाण्याचीही व्यवस्था होऊ शकते.

बाजी पासलकर


बाजी पासलकर


 बाजी लढताना एक घाव त्यांच्या पाठून त्यांच्या फिरंग समशेरधारी उजव्या हातावर झाला.वेदनेने कळवळलेले बाजी त्या भ्याडाचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिश्तितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली.पासष्ठ वर्षांचा तरणाबांड योध्दा-बाजी पडले ! आपल्या मागे वळण्याची इतिकर्तव्यता झाली हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत वळून पळून गेला.कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला.आपल्या धन्याचं जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती ! पुरंदर येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या विजयी राजाला - शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती.गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटतं तसे राजे पालखीकडे धावले ! पालखी उतरुन त्यांनी बाजींचं जखमांनी छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर तोललं आणि त्यांची मान आपल्या मांडीवर घेत टाहो फोडला,"बाजी,आम्हाला असं पोरकं करून कुठे चाललात?" राजांचे अश्रू बाजींच्या जखमांवर पडले.खारट पाण्याने जखमा चुरचुरल्या पण आपलं बलिदान जणू राजाने अभिषेकाने पावन केलं या जाणिवेनं मरणाच्या दारात असलेल्या बाजींच्या गलमिश्या थरथरल्या! क्षीण पण करारी आवाजात ते बोलले,"आरं मांज्या राजा,तुला भेटलो,औक्षाचं सोनं जालं रं मांज्या ल्येकरा ! मला ल्योक न्हाई पर मरताना तुंजी मांडी गावली.त्या फत्याचं मुंडकं आननार व्हतो रं , पर डांव चुकला आन् त्यो पळाला.थोरल्या रांजास्नी पकडून नेणाऱ्या त्या नामर्द बाजी घोरपड्याला नागवनार व्हतो पर त्ये बी र्‍हाईलं ! पर तू नगं चिंता करू!, ह्यो मांजा नातु सर्जेराव बाजी जेधे आन् त्येचा बा कान्होजी जेधे हाईती तुंज्या सांगाती.येक डाव माफी कर राजा, म्होरला जलम घिऊन यी न पुन्यांदा सवराज्यासाटी लडाया!तुज्यासाटी द्याया येकलाच जीव गावला ह्ये वंगाळ बंग ! म्या चाललू रांजा, आपलं सवताचं सवराज्य व्हनार, जय काळकाई !....." राजांच्या मांडीवर प्राण सोडलेल्या बाजींचे डोळे उघडेच होते, ते शिवबांनी मिटले आणि दाबून ठेवलेल्या हुंदक्यांना वाट करून दिली....
Website Security Test