Saturday, March 2, 2013

नोव्हेंबर दिनविशेष



नोव्हेंबर


१ नोव्हेंबर १६७६
संभाजी राजे हे धर्मपत्नी येसूबाईसाहेब यांच्यासह शृंगारपूरात येऊन राहिले

१ नोव्हेंबर १६९२
पन्हाळगडाला बादशहाचा नातू मुहम्मद मुईउद्दीन बेदारबख्त याचा वेढा पडला. हा पन्हाळा थोडी थोडकी नव्हे तर तब्बल ८ वर्षे मोघली फौजेशी झुंजला आणि शेवटी २४ मे १७०१ रोजी दाणागोटा-दारुगोळा संपल्यामुळे नाईलाजाने मोघलांना शरण गेला.
या किल्ल्याचे राखणकरते होते त्र्यंबकजी इंगळे.
बादशहाने हा किल्ला घेण्यसाठी पिराजी घाटगे, सुहराबखान, लुत्फ़लुल्लाखान, मुख्तारखान, राजा किशनसिंह, मरहमतखान, तरबियतखान, मंसूरखान आणि असे अनेक नामवंत मोघली मनसबदार पाठविले होते. पण यातील कुणाचीच डाळ त्र्यंबकजी इंगळे आणि त्यांच्या वीरांनी शिजू दिली नाही. मोघली सरदारांनी साम-दाम-दंड-भेद असे सर्व प्रकार पन्हाल्यावर करून पाहिले पण त्यांना यात कशातच यश आले नाही.
या लढ्यात बादशहाने प्रचंड प्रमाणात तोफेचा वापर केला. इतकेच नव्हे तर पन्हाल्याच्या बाबतीत इतिहासाची पुनरावृत्ति झाली होती, इंग्रज वकील विलियम नॉरिस इंग्रज बनावटीच्या तोफा घेउन मोघलांनच्या छावणित सामिल झाला. मोघली तोफांच्या माऱ्यामुळे किल्ल्याच्या तटा बुरुजांना खिंडारे पडली होती पण त्यात सुद्धा, मराठे पुन्हा ह्या तटा बुरुजांची दुरुस्ती करुन लढायांस सिद्ध राहित.
हा वेढा चालू असतानाच बाहेरून धनाजी जाधव आणि त्यांचे सैन्य मोघलांवर हल्ले करीत होते. अशा अनेक चकमकी होतच होत्या. त्यातच किल्ल्यावरून सुद्धा, मराठे मोघली छावणीवर हल्ले करीत आणि त्यांची रसद मारून जमेल तेवढे मोघल कापून पुन्हा गडावर पसार होत.
मराठे सुद्धा किल्ल्यावरून तोफांचा भडिमार करीत होतेच. एकदा तर मराठ्यांनी केलेल्या मारात, खुद्द बेदारबख्ताचा घोड़ा जाया झाला. मराठे रात्रीचे तर अति आक्रामक बनत असत, अशाच एका रात्री मराठे कोंकणी दरवाजातुन बाहेर पडून मंसूरखानच्या छावणीवर एल्गार केला. त्याच्या काही तोफा निकामी केल्या आणि अनेक मोघली सैनिकांस मारून ते गडावर पसार झाले.
१२ एप्रिल १७०१ रोजी, गडावरील मराठ्यांनी थेट तरबियतखानाच्या तोफखान्यावर झेप घेतली. तरबियतखान पान्हाळा व पवनगडच्या बेचक्यात उभा होता, या छाप्यात मराठ्यांनी मोघलांनचा दारुगोळा उडवून दिला आणि त्यांचे काही सैनिक कापून, पुन्हा गडावर पसार झाले.
अखेर दाणागोटा संपल्यामुळे पन्हाळा मुघलांच्या हवाली केला गेला. पन्हाळा किल्ल्यावरील त्र्यंबकजी इंगळे, बाळोजी इंगळे, कान्होजी इंगळे, पवनगडाचे विठोजी केसरकर, आणि त्यांची ८००-९०० ची शिबंदी तब्बल ८ वर्षे बादशहाच्या थोडीथोडकी नव्हे तर ३० हुन अधिक मनसबदारांना भारी पडले.
पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्याचा संदर्भ बादशाहच्या दरबारातील बातमीपत्रात मिळतो. पण दुर्दैवाने आपल्याकडे याचा काहीच उलेख नाही. म्हणुनच या पत्रात मोघलांच्या पन्हाल्याच्या रंगवलेल्या बातम्या मिळतात आणि मराठ्यांना त्यांनी कसे हरवले हे सापडते. पण या बातम्यांवर जर आपण विशवास ठेवला तर पन्हाळा काबिज करण्यासाठी त्यांना एवढी वर्षे का लागली? हां प्रश्न राहतो. पन्हाळा किल्ल्याच्या वेढ्यावर अप्पा परब यांचे एक पुस्तक सुद्धा आहे.


१ नोव्हेंबर १७१८
फसलेल्या 'विजयदुर्ग' मोहिमेनंतर इंग्रजांनी ४ महीने तयारी करून प्रचंड ताकदीने 'खांदेरी'वर आक्रमण केले.
पण ही मोहिमसुद्धा पूर्णपणे फसली आणि इंग्रजांची प्रचंड मनुष्य व शस्त्रहानी झाली. रामा कामती नामक मुंबईच्या एका व्यापाऱ्याला फितुरी करून मराठ्यांना माहिती पुरवल्याच्या आरोपावरुन इंग्रजांनी अटक केले. त्यावर खटला चालवून कारावासाची शिक्षा ठोठावली आणि कैदेत घातले. पुढे १० वर्षांनी तो कारावासामध्येच वारला.

१ नोव्हेंबर १६८३
विजरेईने फोंड्याला मोर्चे बांधले. मराठे किल्ला लढवण्यासाठी छातीचा कोट करून उभे ठाकले होते. नरवीर येसाजी आणि कृष्णाजी कंक हे पराक्रमी पिता-पुत्र, किल्ल्यावर ६०० मराठ्यांची शिबंदी होती तर २०० जन किल्ल्याबाहेरच्या झाडीत लपून बसले होते. फिरंग्यांच्या ३ तोफा रात्रंदिवस किल्ल्यावर आग ओकू लागल्या. दुसऱ्या बाजूने डोम रोड्रीगो द कोस्त हा हल्ला चढवत होता आणि दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हल्ल्यांना निधड्या छातीने तोंड देत उभा अभेद्य तटबंदीचा किल्ले फोन्डा एकही चिरा ढळत नसल्याचे पाहून विजरेईने तोफा किल्ल्याजवळ रस्त्यावर आणून मारा सुरु केला आणि अखेर फोन्ड्याची चिरेबंदी तटबंदी ढासळली! बुरुजाला भगदाड पडताच पोर्तुगीज सैन्य आत शिरू लागले आणि एकाएकी आत दाबा धरून बसलेल्या मराठ्यांनी एकाच हल्ला चढवला. सुरुवातीला माघार घेणारे पोर्तुगीज नंतर मराठ्यांच्या कुमकेवर चालून गेले. तळपत्या विजेसारखे मराठे पोर्तुगीजांवर कोसळले. सतत पाच दिवस तोफा डागूनही हाती काहीच न लागल्याने विजरेई निराश झाला होता. येणाऱ्या नव्या कुमकेची बातमी कळताच कॅप्टन व्हाइसरॉयला माघार घ्यायला विनवू लागला. पण ख्रिस्ती पाद्य्रांची रग अजूनही जिरली नव्हती. त्यांच्या तोफेतून उडालेला एक गोळा किल्ल्यात येऊन आदळला आणि ७० मराठे स्फोटामुळे हवेत उडाले.
वेढा फोडण्यासाठी खास संभाजीराजे स्वतः ८०० स्वार आणि मोठे पायदळ घेऊन निघाले. हे नुसते कळण्याचा अवकाश कि व्हाइसरॉयची भीतीने गाळण उडाली ! .

२ नोव्हेंबर १७६३
मराठे आणि निजाम यांच्यामधल्या राक्षसभुवन येथील लढाईवरुन पेशवे माधवराव यांचे पुण्यात आगमन.

३ नोव्हेंबर १६८९
मुघल सरदार एतिकादखानाचा राजधानीच्या किल्ले रायगडास वेढा.


४ नोव्हेंबर १६६७ कार्तिक वद्य त्रयोदशी
औरंगाबाद येथे संभाजी राजे व महाराजा जसवंतसिंह राठोड यांची भेट झाली.
याच दिवशी संभाजी राजांनी औरंगाबादेहून प्रयाण केले आणि राजगडी दाखल झाले. संभाजी राजांना राजगडी पोहचवून प्रतापराव आणि निराजी रावजी यांना औरंगाबादेस पुन्हा महाराजांचे मुतालिक म्हणून जायचे होते. यादरम्यान औरंगजेबाने शिवाजी महाराजांना राजा हा किताब दिला (शि.प.सं. लेख १२००). जवळ जवळ २ वर्षे महाराजांची फौज औरंगाबादेस होती यादरम्यान शिवाजी महाराजांनी मुअज्जम सोबत चांगलेच सख्या जमवले, दोघे एकमेकांना परस्परे वस्तभाव (विविध भेट वस्तू) पाठवू लागले हि बातमी औरंगजेबास समजताच त्यास शंका उत्पन्न झाली शिवाजी आणि शहजादा एक झाले तर कोणी तरी फितुरी करून आपणास दगा करेल, म्हणून औरंगजेबाने शहजादा मुअज्जम यास लिहले शिवाजी हरामी आहे तिथे त्याचे सरदार निराजी व प्रतापराव दोघे आहेत त्या दोघास कैद करणे”, मुअज्जमचा वकील औरंगजेबाजवळ होता त्याने इशारतीने मुअज्जम याला कळवले तुम्ही हुशार राहणे हे वर्तमान समजताच मुअज्जम याने निराजी पंतास एकांती बोलवून हे वर्तमान सांगितले आणि वस्त्रे अलंकार देऊन निरोप दिला.
तुम्ही उद्या रात्रीचे कुल फौजेनिशी उठून पळून जाणे तुमची बिशाद राहिली तर पावेल. दोन रोजात बादशहाचे कागद येतील मग तुम्हास कैद करावे लागेल म्हणून अगोदर निगुन जाणे”,
हे समजताच प्रतापराव आणि निराजी रावजी तयारी करून रात्री फौजेनिशी निघाले, मजल दरमजल करीत राजगडी पोचले महाराजांसोबत भेट झाली सगळे वर्तमान राजीयास सांगितले हे ऐकून राजे खुशाल झाले आणि बोलिले
“दोन वर्षे लष्कराचे पोट भरले, शहजादा मित्र जोडला हि बरी गोष्ट झाली”
(शिवकालीन पत्रसार संग्रह, शिवापूर दफ्तर यादी, सभासद बखर)

४ नोव्हेंबर १६७९
शिवाजी महाराजांनी मोगलांकडून जालना जिंकले.

७ नोव्हेंबर १७६२
राघोबादादाचा पुण्यावर हल्ला. पेशवे माधवराव यांच्याबरोबर घोडनदीची लढाई. ५ दिवसात १२ नोव्हेंबर रोजी आळेगाव येथे संपूर्ण शरणागती पत्करून पेशव्यास शरण.


१० नोव्हेंबर १६५९, गुरूवार.
६५९ - शिवप्रतापदिन. मार्गशिर्ष शु. ६ शके १५८१ रोजी शिवरायांच्या हातून प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध.

एक कहे कल्पद्रुम है, इमि पूरत है सबकी चितचाहे ।
एक कहे अवतार मनोज, की यो तनमे अति सुंदरता है ।
भुषण एक कहे महि इंदु यो, राजविराजत बाढयौ महा है ।
एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है ॥
- कविराज भुषण

भाषांतर :
यास कोणी कल्पवृक्ष म्हणतात, कारण हा सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.हा सौंदर्यसंपन्न असल्याने कोणी याला मदनाचा अवतार म्हणतात. भूषण याला पृथ्वीवरचा चंद्र म्हणतो, कारण याचे राज्य कलेकलेने वाढत आहे. कोणी याच्या युद्धातील पराक्रमामुळे यास सिंह म्हणतात तर कोणी प्रत्यक्ष नृसिंह भगवानच समजतात. कारण ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडले तद्वतच शिवरायांनी आपल्या वाघनखांनी अफजलखानाची आतडी बाहेर काढली.


१० नोव्हेंबर १६७९
सिद्दीचे आरमार मुंबईला पोचले आणि मुंबईकरांनी ही खबर खांदेरीची नाकेबंदी करणाऱ्या इंग्रज नौका दलाला कळवली. सिद्दीला खांदेरीची हकीकत कळताच त्याने सांगितले की जर इंग्रजांनी मराठ्यांना नागावच्या खाडीत अडकवून धरल्यास आपण आपले आरमार घेवून खांदेरीवर उतरू व खांदेरी सहज जिंकू. सिद्दीच्या आरमारात २ मोठ्या नौका, ५ फ्रिगेट, १ गुराब, २५ लहान गलबते आणि सुमारे ७०० शिपाई होते. मुंबईच्या इंग्रजांना सिद्दीच्या या गप्पा म्हणजे बढाया वाटत होत्या कारण सिद्दीने अजून मराठ्यांचा प्रतिकार पाहिलाच नव्हता. इंग्रजांना मराठे ही खांदेरीवर नको होते त्याप्रमाणे सिद्दी ही त्यांना नको होता आणि खांदेरीवर उतरून ते बेट बळकावण्याचा सिद्दीचा बेत आहे हे ते पुरेपूर ओळखून होते.

११ नोव्हेंबर १८१८
शनिवारवाडा पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात. पेशवाईचा अंत.

११ नोव्हेंबर १६७९
मराठ्यान्नी 'खांदेरी' येथील इंग्रजांविरुद्धचे युद्ध जिंकले. 'डोव्ह' नावाचे इंग्रजी गलबत आणि अनेक देशी-विदेशी सैनिक कैदी म्हणुन ताब्यात. या युद्धामुळे इंग्रजांना मराठ्यांचे आरमारी सामर्थ्य पटले आणि २४ नोव्हेंबरला त्यांनी मराठ्यांशी तह केला.


१३ नोव्हेंबर १६६८
गोव्यात श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय बांधण्यास प्रारंभ.
श्रीसप्तकोटीश्वर हे अतिप्राचीन शिवालय गोमांतकात नारवे येथे आहे. आजुनही आहे. पोर्तुगिझांच्या गोव्यात या शिवालयाचे चर्च मध्ये बिनबोभाट रूपांतर झालेले होते. त्याचे पुन्हा हिंदु देवालयात शिवाजी महाराजांनी रूपांतर केले. समर्थांनी आनंदवनभुवनात लिहिले आहे, "मोडिली मांडिली क्षेत्रे, आनंदवनभूवनी !!" ते का लिहिले आहे आले का लक्षांत ?

१५ नोव्हेंबर १६७१
चेउल सुभ्यामधले वतनदार, देशमुख आणि देशपांडे त्या भागाच्या सुभेदारीचे काम नीट चालू देत नसत. "उत्तम सुभेदार पाठवला असतानाही तुम्ही त्याच्याशी नसते वाद घालता आणि सुभेदारीचे काम होऊ देत नाही हे चालणार नाही. तुम्ही त्या सुभेदाराचा निर्णय मान्य करा व तसे न केल्यास तुम्हाला शासन होइल. काही मुलाहिजा होणार नाही" असे राजांनी लिहिलेल्या पत्रात रोखठोकपणे म्हटले आहे.

१६ नोव्हेंबर १६७७

कर्नाटक मोहिमेवर असताना महाराजांनी व्यंकोजीराजाकडे कर्नाटकातील शहाजीराजांच्या जहागीराचा अर्धा वाटा मागितला पण वाटा न देताच त्यांनी हंबीररावांच्या सैन्यावर आक्रमण केले.
व्यंकोजीराजांकडे ४००० घोडदळ व १०००० पायदळ होते, तर हंबीररावांच्या कडे ६००० घोडदळ व ६००० पायदळ होते.दोन्ही सैन्यात जोरदार लढाई होऊन हंबीररावांच्या सेनेचा पराभव झाला. विजय मिळाल्यामुळे व्यंकोजीराजे व त्यांचे सैन्य आराम करू लागले. याप्रसंगी हंबीररावांनी व संताजी भोसले यांनी मराठी सैन्यास एकत्र करून मध्यरात्रीच व्यंकोजीराजांच्या तळावर हल्ला करून त्यांच्या फौजेची दाणादाण उडविली.
प्रचंड असा खजिना, हत्ती, घोडे मराठ्यांच्या हाती लागले. व्यंकोजीराजे सुध्दा हाती लागले होते, पण महाराजांच्या बंधूस कैद कसे करावे असा विचार करून त्यांनी व्यंकोजीराजांस सोडून दिले.

१६ नोव्हेंबर १६७९
सिद्दी १६ नोव्हेंबर रोजी खांदेरीजवळ पोचला आणि त्याने बेटाला फेरी मारली. त्याने केग्विनला सांगितले की बेटावर सुमारे ३०० सैनिक १५ तोफा व २०० कामगार आहेत तेव्हा आपण लवकरच आपले सैन्य उतरवून खांदेरी काबिज करू. सिद्दीचे आरमार आल्याचे मराठ्यांनी पहिले आणि त्या दोघांमध्ये मारा सुरु झाला. मराठ्यांनी सिद्दीची काही गलबते बुडवली आणि त्यामुळे संतप्त होवून सिद्दीने बंदुकी व तोफांची एकच सरबत्ती खांदेरीच्या दिशेने सुरु केली परंतु तो टप्प्यात नसल्याने त्याची सर्व दारू निष्कारण वाया जात होती.

१९ नोव्हेंबर १६६१
याच वेळी शिवाजी महाराजांचे सुमारे २००० स्वार जुन्नर परगण्यात खंडणी वसूल करीत आसल्याची खबर शाईस्तेखानाला पुण्यात समजली. म्हणून शाईस्तेखानाने जाधवराव, शेख हमीद, ईस्माईलखान, सैफ खान वगैरे सरदारांस जुन्नर व अंबेगाव परगण्यात रवाना केले. परंतु या सरदारांनी तिकडे जाऊन काय केले कोण जाणे ? त्यांची व मराठ्यांची गाठ पडल्याची नोंद Waqai of the Deccan मध्ये नाही.


१९ नोव्हेंबर १६६५
पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराज सरनौबत नेतोजी पालकरसह ९००० फौज घेऊन मिर्झाराजांच्या कुमकेस विजापूरस्वारी साठी रवाना.


२० नोव्हेंबर १६६६
९ वर्षाचे शंभूराजे मार्गशिर्ष शु. ५ शके १५८८ रोजी आग्र्याहून सुखरूप राजगडी परत.


२० नोव्हेंबर १६७९
संभाजी राजे दिलेरखानाच्या छावणीतून पळाले आणि त्यांनी पन्हाळा गाठला.

२० नोव्हेंबर १६६५
पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराज सरनौबत नेतोजी पालकरसह ९००० फौज घेऊन मिर्झाराजांच्या कुमकेस विजापूर स्वारीसाठी रवाना. ही मोहिम पुढे १६ जानेवारी १६६६ पर्यंत सुरू होती.

२१ नोव्हेंबर १६७९
रोजी एक चमत्कारिक प्रकार घडला. मराठ्यांनी खांदेरी बेटाच्या सर्वात उंच टेकडीवर एक पांढरा ध्वज फडकावला. इंग्रज व सिद्दी या दोघांनी ते पहिले सिद्दी थळच्या जवळ नांगरून होता तर इंग्रज नागावच्या खाडीजवळ नांगरून होते. त्यांना वाटले की ही शरणागतीची खून आहे म्हणून दोघांनी दोन छोटे मचवे वेगवेगळ्या वेळी बेटाकडे पाठवले. इंग्रजांना मराठ्यांनी काहीच उत्तर दिले नाही व त्यामाच्याकडे दुर्लक्ष केले. इंग्रजांनी मग मराठ्यांना परिचित असणारा सार्जंट कली या डच माणसाला मराठ्यांकडे पाठवले. मराठ्यांनी त्याला सांगितले की ही सांकेतिक खूण आमच्या किनाऱ्यावरील माणसांकरिता आहे तेव्हा आपण जावे. कलीने या वेळी आपण मायनाक साठी मुंबईहून एक पत्र आणले आहे व त्याने ते येऊन घेऊन जावे असा एक निरोप दिला यावर मराठ्यांनी त्याला ते आणून द्यावे असे सांगितले व मायनाकही त्याला उत्तर देईल असे सांगितले. त्यांने कलीला हे देखील सांगितले की तुम्ही बारा महिने इथे ताल देऊन राहिले तरी आम्ही इथून हलणार नाही कारण आम्हाला तसा हुकुम आहे. कली तेथून निघुन गेला. त्याने सांगितलेले पत्र कधी आलेच नाही. सिद्द्याची माणसे गेली असता मराठ्यांनी त्यांना अपमानित करून हाकलले व जाणार नसल्यास तोफ डागू असे सांगितले, तसे सिद्दी लोक निघून गेले.


२४ नोव्हेंबर १६८३
शंभूराजे केवळ ४० मराठे सैन्यासह स्टिफन उर्फ जुवे बेटावर उतरले. मराठ्यांच्या तोफांच्या आवाजाने गोव्यातले लोक आणि शस्त्र हाती धरलेले ख्रिश्चन पादरीही शहराच्या तटबंदीकडे पळत सुटले! ४०० लोकांनिशी विजरेई २५ नोव्हेंबरला जुवे बेटावर आला.
जवळच्या टेकडीवर जाईपर्यंत त्यातले ३०० लोक जिवंत राहिले होते. टेकडीवरचे  मराठे माघारी फिरले  आणि थोड्याच वेळात मराठ्यांच्या नव्या तुकडीचे घोंगावणारे  वादळ फिरंग्यांवर येऊन कोसळले. सर्वत्र अंदाधुंदी माजली. व्हाइसरॉय फक्त माघार घ्यायला सांगत होता. पण धीर खचलेले फिरंगी सैन्य सैरावैरा पळत सुटले. अक्षरशः काकुळतीला येऊन विजरेई भरल्या डोळ्यांनी त्यांना विनवत होता पण त्याचे कुणीच ऐकत नव्हते. चार मराठा घोडेस्वारांनी व्हाइसरॉय पाठलाग सुरु केला. त्यांच्या तडाख्यातून तो जखमी होऊन वाचला. कसाबसा खाडीपर्यंत पोहोचलेला रक्तबंबाळ व्हाइसरॉय आणि कॅप्टन एका मचव्यात बसून पळून चाललेला बघताच. संतापाने बेभान झालेल्या संभाजीराजांनी आपला घोडा पाण्यात घातला. खंडोबल्लाळ चिटणीस यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता उडी टाकून राजांचा घोडा तीरावर आणला.
शंभूराजांच्या या रौद्र तांडवामुळे व्हाइसरॉयचे धाबे दणाणले. हे बेट विजरेई आल्व्हारोचा पराभव करुन मराठ्यांनी काबीज केले. संपूर्ण गोव्यात मराठे धुमाकुळ घालू लागले आणि व्हाइसरॉयने थेट सेंट झेवियरचे चर्च गाठले. हताश झालेला विजरेई आणि ख्रिश्चन पाद्र्यांनी मशाली पेटवून तळघरातून सेंट झेवियरचा म्रुतदेह बाहेर काढला. ख्रिश्चन राजचिन्हे आणि धर्मदंड झेवियरच्या पायाशी ठेवण्यात आली. 
पोर्तुगालच्या राजाच्या वतीने लिहिलेला अर्ज झेवियरच्या पायाशी ठेवला.
"हे झेवियर , या राज्याचे रक्षण करण्यास आम्ही असमर्थ आहोत !सगळी सूत्रे हाती घेऊन या संभाजीच्या धर्मसंकटातून आपले व गोव्याचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून तो झेवियरची करुणा भाकू लागला ! "

२५ नोव्हेंबर १६६४
सिंधुदूर्गाच्या बांधकामाची मालवण नजिकच्या कुरटे बेटावर सुरूवात.

२५ नोव्हेंबर १६८३
छत्रपति संभाजी राजांनी पोर्तुगीज विरोधी गोवा स्वारीत कुंभारजुव्याचा किल्ला जिंकला.

२६ नोव्हेंबर १६७९

मराठ्यांचा खांदेरी बेटावरील एक मुसलमान सैनिक सिद्द्याने फितवून नेला व त्याकडून सिद्दीने बरीचशी माहिती मिळवली. सिद्द्याने ही माहिती केग्वीनला दिली व हल्ल्याची तयारी करण्याविषयी सांगितले. याबाबत केग्विनने मुंबईला कळवलेला वृत्तांत असा होता. -
सिद्दी आपले पठाण घेवून उतरल्यास आपले बेट जाईल असे म्हटल्यामुळे मराठे त्यावर चिडले आणि मराठ्यांनी त्याला कडक शिक्षा देवू असे सांगितल्यामुळे तो घाबरला आणि सिद्दीला जाऊन मिळाला असे त्या इसमाने सांगितले. त्याने दिलेल्या माहितीनुसार मराठ्यांकडे सुमारे ६ खंडी (१३६० किलो) बंदुकीची दारू, १००० तोफगोळे, १२ तोफा, ३०० तलवारबाज व २०० बंदुकधारी आहेत. खांदेरीवर ४ विहिरी असून त्यावरील पाणी अत्यंत कमी आहे, इतके की ते पाण्यात उतरून ओंजळीने पाणी भरतात. शिबंदी बेट सोडायला तयार आहे परंतु मायनाकने त्यांना दम भरला आहे की हे शिवाजी महाराजांचे काम आहे आणि किल्ला पूर्ण होण्या आधी जर कुणी बेट सोडेल तर मायनाक बायका-मुलांसह सर्वांची डोकी मारीनआणि त्यामुळे सर्व लोक भयभीत आहेत. शिबंदी बरीचशी आजारी आहे तसेच दौलतखान ८ गलबत भरून रसद तयार ठेवून असुन तो लवकरच ते सामान बेटावर पुरवणार आहे      
मराठ्यांची माहिती मिळाल्यावर सिद्दीने स्वतःचा डाव आखला आणि त्याने इंग्रजांना सांगितले की माझ्या आरमारातील बरीच गलबते अजून सुरतेहून येत असून त्यात बरीचशी लहान गलबते आहेत. मराठे खाडीतून निघून ज्यावेळी बेटाला पुरवठा करतील तेव्हा त्यांना न अडवता जाऊ द्यावे व इंग्रजांनी मोठी गलबते घेवून त्यांचा पाठलाग करावा त्यावेळी मी माझी लहान गलबते माणसांनी भरून त्वरेने दुसऱ्या बाजूने येईन आणि माणसे बेटावर उतरविन. त्यानंतर तुम्ही देखील शक्य तेवढे सैन्य बेटावर आणण्याचा प्रयत्न करा आणि दरम्यान मराठ्यांच्या नौकांना थोपवून धरा. माझे सैन्य बेटावरील शिबंदी कापून काढेल आणि बेटावर झेंडा लावेल मग आपण आपले सर्व सैन्य बेटावर आणावे. हा डाव इंग्रजांना नकोसा होता कारण याने बेट आयतेच सिद्दीला मिळणार होते आणि इंग्रजांना ज्याप्रमाणे मराठे मुंबईच्या जवळ नको होते त्याप्रमाणे त्यांना हा जंगली सिद्दी देखील नको होता. म्हणून केग्विनने मुंबईला अनुकूल तह करावा असा पाठपुरावा मुंबईला केला. यादरम्यान सिद्दीने आपली जवळ जवळ १००० माणसे उंदेरी बेटावर उतरविली आणि तिथे किल्ला बांधण्यास सुरुवात केली. २६ जानेवारी च्या पहाटे दौलतखान आपले संपूर्ण आरमार घेवून उन्देरीवर चालून आला व मोठे युद्ध सुरु झाले याच दरम्यान रसदेने भरलेल्या २० होड्या खांदेरीला गेल्या. इंग्रज आणि मराठे यांचे वकील तहासाठी बराच कथला करीत होते आणि उभाय्पाक्षांना मान्य होईल अशी तहाची कलमे करण्यात ते व्यस्त होते. शिवाजीराजांच्या वतीने चौलचा सुभेदार हे प्रकरण सांभाळीत होता. त्याच्या सोबत सुरनवीस अण्णाजी दत्तो यांना पाठवण्यात आले होते. इंग्रजातर्फे राम शेणवी दुभाषी व मध्यस्थीचे काम करीत होता व निर्णय मुंबई व सुरत दोन्हीकडील अधिकारी मिळून घेत होते. दिनांक २८ जानेवारीला उभय पक्षांना यश आले आणि तहाची कलमे ठरली.   

२८ नोव्हेंबर १६५९
अफजल वधानंतर केवळ १८ दिवसांत शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यासहित वाई ते कोल्हापूर पर्यंतचा मुलूख स्वराज्यात सामील.

२८ नोव्हेंबर १६७०
३००० फ़ौज सोबत घेउन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची शिवरायांकडून ३ दिवस पाहणी. पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरू झाली ज्यामुळे सिद्दी आणि इंग्रज यांना चांगलीच जरब बसली.


२९ नोव्हेंबर १७२१
ठरल्याप्रमाणे इंग्रज आणि पोर्तुगीझ एकत्रितपणे मराठ्यांच्या कुलाबा किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी मुंबईहून निघाले. मोहिमेची योजना प्रत्यक्षात आणून पहिला हल्ला मात्र त्यांनी २४ डिसेंबरला केला.
आंग्र्यांच्या नेतृत्वाखालच्या मराठी आरमारापुढे इंग्रज आणि पोर्तुगीझ यांच्या संयुक्तफौजांचे सुद्धा काही चालले नाही. ४ दिवसात धूळधाण उडून इंग्रज मुंबईला परत गेले तर पोर्तुगिझान्ना पेशवे थोरले बाजीराव यांच्यासह तह करावा लागला.

ऑक्टोबर दिनविशेष



ऑक्टोबर


२ ऑक्टोबर १६७०
शिवाजी महाराज पुन्हा एकदा लुटीसाठी सुरते नजीक १५,००० फौजेनिशी धडकले.

३ ऑक्टोबर १६७०
द्वितीय सुरत लुट. प्रथम दिन.
- शिवाजी राजांनी सूरत पुन्हा एकदा लुटली. पंतप्रधान मोरोपंत पिंगळे, सरनौबत प्रतापराव गुजर यांच्या समवेत १०००० घोडदळ आणि १०००० पायदळ घेउन पहिल्या सूरत लुटीवेळी घेतलेल्या मार्गानेच राजे ३ ऑक्टोबर रोजी सूरत येथे पोचले.
सूरत येथील मुघल अधिकाऱ्याला पाठवलेल्या पत्राचे स्वैर मराठी भाषांतर -
"बादशहामुळेच मला माझ्या जनतेचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी फौज उभी करावी लागत आहे. तेंव्हा त्या फौजेचा खर्च तुम्हीच द्यायला हवा. मी तिसर्यांदा आणि शेवटचे सुरतेच्या उत्पन्नाचा चौथा भाग मागत आहे."
ह्या पत्रामध्ये शिवाजी राजांचा हेतु आणि उद्देश स्पष्ट दिसून येतो.
” I demand for the 3rd time, which I declare to be the last, chauth part of revenue under your government. As your emperor has forced me to keep an army for the defense of my people & country, that army must be paid by his subjects.”

४ ऑक्टोबर १६७
द्वितीय सुरत लुट. द्वितीय दिन.

५ ऑक्टोबर १६७०
दुसर्यांदा सूरत लुटल्यावर शिवाजी राजे वेगाने परतीच्या मार्गावर. दुसरीकडे जबरदस्त धक्का बसलेल्या मुघल फौजेची लढाईसाठी हालचाल सुरू.
शहजादा मुअज्जमने दाउदखानला शिवाजी राजांना बागलाण - नाशिक येथे अडवण्यास सांगितले. मुघलांची लढाईची पूर्ण तयारी नव्हती. मराठा फौज मात्र लढाईसाठी सज्ज झाली होती.

६ ऑक्टोबर १६७६
छत्रपति शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयास निघाले. या दिवशी दसरा होता.

८ ऑक्टोबर १६७९
कॅप्टन रिचर्ड केग्वीन खांदेरीच्या नाकेबंदीवर पोचला. १० तारखेला त्याला खबर मिळाली की दौलतखान खांदेरीच्या दिशेने येत आहे.

९ ऑक्टोबर १६६७
पुरंदर तहातील कलमानूसार व शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील पत्र व्यवहारानुसार औरंगजेबाने पुन्हा मनसबदारी बहाल केल्या नंतर संभाजी राजे शिवाजी महाराजांच्या हुकुमावरून कार्तिक वद्य द्वीतियेला ९ ऑक्टो १६६७ रोजी औरंगाबादेस शहजादा मुअज्जम यास भेटावयास गेले. (शिवापूर दफ्तर यादी) संभाजी राजानंसोबत यावेळी महाराजांनी प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी सोबत राहुजी सोमनाथ यांना सुभेदार आणि प्रल्हाद निराजी यांना लष्कराचे सबनीस म्हणून पाठवले.(सभासद बखर)

११ ऑक्टोबर १६७३
खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठविलेल्या सैन्यामुळे मुंबईतील सैन्य कमी झाले व मुंबईचा धोका वाढला. मराठे साष्टी (ठाणे) मधून मुंबई वर चालून येण्याचा प्रयत्न करीत आहेत असे इंग्रजांना कळले परंतु तेथील पोर्तुगीजांनी त्यांना अडवल्यामुळे मुंबईकर इंग्रजांच्या जीवात जीव आला व त्यांनी त्वरित ५० टोपाझ सैनिकांची भरती रक्षणार्थ केली. सुंदरजी प्रभू नामक शिवाजीराजांचा एक हेर मुंबईमध्ये गुपचूप माहिती जमा करीत असताना इंग्रजांच्या तावडीत सापडला. इंग्रजांनी त्याच्या कडून माहिती जमा करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात अपयश येऊन इंग्रजांनी त्याला कैदेत टाकले. तसेच मुंबईतील काही गरीब रहिवाश्यांना चौलच्या आस-पास टेहळणी करिता पाठवले व त्यांना आदेश दिला कि त्यांनी दर ३-४ दिवसांनी मुंबईला मराठ्यांच्या हालचालीबद्दल खबर कळवावी.

१३ ऑक्टोबर १६७३
मराठ्यांनी वाईनजिकचा पांडवगड जिंकला.
बाळाजी आवजींचा सातारा येथे पालखी देऊन महाराजांनी गौरव केला.

१५ ऑक्टोबर १६७९
खांदेरीजवळ कॅप्टन रिचर्ड केग्वीन आरमारासह नांगर टाकून सज्ज होता व ज्या गोष्टीची तो वाट पहात होता ती गोष्ट अखेर घडली. दि १५ ऑक्टोबर रोजी त्याला सुमारे ३५ नौकांचे मराठी आरमार खांदेरीच्या दिशेने येताना दिसले. ते दिसताच केग्वीन ने नांगर उचलले आणि तो युद्धाची तयारी करू लागला परंतु मराठी आरमार पुढे आलेच नाही उलट त्यांना इंग्रज आरमार दिसताच ते पुन्हा मागे फिरले आणि थळ जवळील उथळ समुद्रात नांगर टाकून थांबले. केग्वीन आता गोंधळात पडला त्याला नेमके काय करावे हे सुचेना त्यामुळे तो पुन्हा नांगर टाकून उभा राहिला. १६ तारखेला मराठ्यांच्या आरमारातील नागावच्या खाडीत शिरल्या. इंग्रज नौका काही काळ जाऊन मराठी नौकांवर गोळीबार करत असत परंतु भूमीवर गोळीच्या टप्प्यात येत नसल्या कारणे त्यांना पुन्हा मागे फिरावे लागत असत. मराठ्यांचे आरमार खांदेरीच्या आसमंतात आल्यामुळे एक गोष्ट मात्र घडली की इंग्रज नौकांना आता एकत्र राहणे भाग पडत होते कारण तसे न केल्यास मराठी आरमार एका जहाजाच्या मागे लागून ते जहाज पळवून नेऊ शकले असते. अशा रीतीने इंग्रजी नौका एकत्र आल्यामुळे खांदेरीची नाकेबंदी मात्र ढिली पडली आणि मराठ्यांच्या छोट्या होड्या त्यांना आश्चर्यकारक रित्या चकवून खांदेरीला पुरवठा करू लागल्या.

१६ ऑक्टोबर १६७०
मुघल सुभेदार दाउद खानला बाकीखान येउन मिळाला. दुसऱ्यादा सूरत लुटल्यावर शिवाजी राजे वेगाने परतीच्या मार्गावर निघाले होते. शहजादा मुअज्जमने दाउदखानला शिवाजी राजांना बागलाण - नाशिक ह्या मोघली भागात अडवण्यास सांगितले होते.
सर्वात पुढे असणाऱ्या इखलास खान मियाना याने मात्र दाउदखानाची वाट न बघता मराठ्यांच्या १५ हजाराच्या फौजेवर हल्ला चढवून मोठी घोडचुक केली. तो स्वतः त्याच्या फौजेसकट जबर जखमी झाला. काही वेळात दाउद खानच्या सोबत असलेल्या बुंदेलेंच्या फौजेने मराठ्यांना काही प्रमाणात रोखले. संपूर्ण दिवसात मराठ्यान्नी 'बेरीरगिरी' म्हणजे 'शत्रुला चोहू बाजूने घेरून केली जाणारी फिरती लढाई' या तंत्राने मुघलांना हैरान करून सोडले. संध्याकाळी मराठा फौजेने पुन्हा एकदा मुघलांवर जबर हल्ला चढवत आपली पुढची वाट मोकळी करून घेतली आणि ते सुरतेच्या लुटी सकट पुढे सटकले.


१७ ऑक्टोबर १६७०
दिंडोरी नजिक मोगलांनी (दाऊदखान) महाराजांना गाठले. लूट मार्गी लाऊन शिवाजी महाराज १०,००० फौजेसह मागे राहिले. फार मोठे युद्ध दाऊद खान व शिवाजी महाराज यांच्यात झाले. यात दाऊदखानाचा दणदणीत पराभव झाला.

१८ ऑक्टोबर १६७९
१८ ऑक्टोबर च्या सकाळी मराठ्यांचे सुमारे ५० गुराबांचे एक पथक वेगाने वल्ही मारत इंग्रजी आरमाराच्या रोखाने येऊ लागले. समुद्राला भरती होती आणि वारा पूर्व दिशेने वाहत होता. इंग्रजी आरमार थळ आणि खांदेरीच्या मध्ये नांगर टाकून उभे होते. वाऱ्याच्या अनुकुलतेचा फायदा घेत मराठ्यांनी इंग्रजी आरमारावर तोफांची सरबत्ती सुरु केली. केग्विनला मुंबई कौन्सिलने आदेश दिला होता की मराठ्यांनी हल्ला केल्यास प्रथम त्यांना सामोपचाराने समजावून सांगावे पण या करिता केग्विनला वेळच मिळाला नाही ! त्याच्यावर थेट हल्ला झाला होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे इंग्रजी आरमार गोंधळात पडले. मराठ्यांनी केलेला हल्ला हा नावांच्या नाळेच्या दिशेने होता. जहाजावरील तोफा ह्या नाळेच्या काटकोनात असत त्यामुळे इंग्रजांना त्यांची गलबते फिरवून हल्ला करावा लागणार होता. फ्रिगेट व काही शिबाडांवर पिछाडीस असणाऱ्या एक दोन तोफांनी प्रतिहल्ला सुरु केला.हल्ल्यातून वाचण्यासाठी इंग्रजी आरमाराने नांगर कापून टाकले आणि शिडे सोडून मिळेल त्या वाऱ्याच्या दिशेने ते सैरावैरा भटकू लागले. बरीचशी जहाजे दक्षिणेच्या वळणावर लागली जाणाऱ्या जहाजांमध्ये रिव्हेंज ही फ्रिगेट आणि डव्ह ही गुराब सगळ्यात शेवटी होत्या. मराठ्यांच्या वल्हवणाऱ्या होड्यांनी आता डव्हला वेढले. डव्ह वेधली गेलीये पाहताच काही लोकांनी समुद्रात उड्या टाकल्या. डव्ह चा कर्णधार होता फ्रांसिस मोलीव्हेयार त्याने डव्ह संकटात पाहताच रिव्हेंज कडे मदत मागितली. रिव्हेन्ज्ला वारा अनुकूल नव्हता तसेच हालचाल करण्याकरिता पुरेशी जागाही नव्हती आणि त्यामुळे रिव्हेंज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता वाढली. त्यामुळे रिव्हेंज स्वतःचा बचाव करू लागली. या दरम्यान डव्ह जवळून सार्जंट डकट आणि सार्जंट फुलर यांचे मचवे गेले पण ते मदतीस आले नाहीत. मराठे जवळ येऊ लागले तसे डव्ह वरील ‘Union Jack’ आणि शिड उतरली; हे शरणागतीचे निशान होते. डव्ह चा खलाशी जॉन नेलर याचा मराठ्यांशी पूर्वी संबंध आला असे दिसते कारण त्याने इतरांना सांगितले
“शस्त्र खाली ठेवल्यास मराठी हल्ला करणार नाहीत व कैद करतील अथवा ते जहाजावर कब्जा करून सर्वांना कापून काढतील”
 आणि त्याप्रमाणे सर्वांनी शस्त्र टाकले. मराठे डव्ह वर आले आणि त्यांनी डव्ह ताब्यात घेतली. मराठे पुढे निघाले, आता त्यांनी आपला मोर्चा रिव्हेंज कडे वळवला. मराठ्यांच्या गुराबा येताना दिसताच रिव्हेंज वर असणारे कॅप्टन रिचर्ड केग्वीन आणि कॅप्टन मिन्चीन यांनी रिव्हेंजवरील शिबंदीला भरोसा दिला व सांगितले की – “ख्रिस्ती लोकांनी काफिरांचे कैदी होणे हे नामुष्कीचे असून त्यापेक्षा लढण्यात धन्यता माना”. असे सांगून त्यांनी एक डाव रचला आणि शिड पाडली. शरणागतीचे चिन्ह समजून मराठ्यांच्या गुराबा वेढू लागताच रिव्हेंज वरून जोरदार प्रतिकार झाला आणि तोफा, बंदुकी यांचा एकच मारा मराठ्यांवर झाला. मराठे आता कोंडीत अडकले. इंग्रजांचा डाव त्यांना कळला आणि ते माघार घेवून नागावच्या खाडीकडे वळू लागले. परतीच्या वाटेवर असताना इंग्रजांनी मराठ्यांच्या पिछाडीवर काही मचवे पाठवले आणि भरपूर तोफगोळे उडवले. या धुमश्चक्रीत मराठ्यांच्या काही गुराबांचे नुकसान झाले आणि अंदाजे तीन गुराबा बुडाल्या असे इंग्रज नोंदींवरून कळते. मराठ्यांच्या काही गुरबा नागावच्या खाडीत गेल्या व काही गुरबा डव्ह समवेत खांदेरीकडे गेल्या. मराठ्यांनी कप्तान फ्रान्सिस मौलीव्हेयर सह सुमारे २५ युरोपियन लोक पकडले आणि सागरगडावर कैदेत रवाना केले. केग्विनने मुंबईला रवाना केलेल्या वृत्तानुसार त्याच्या नाविक दलाने मराठ्यांचे सुमारे २०० लोक मारले व १०० जखमी केले होते. या प्रसंगादरम्यान रिव्हेंज व्यतिरिक्त इतर जहाजावरील इंग्रजांची वागणूक अत्यंत भेकड आणि पळपुटी होती. याची तक्रार केग्वीनने मुंबईला केली. मराठ्यांनी कैद केलेल्या इंग्रजांना मुंबईशी पत्रव्यवहार करण्याची मुभा देण्यात आली होती. त्याप्रमाणे पुढे काही दिवसांनी फ्रांसिस मौलीव्हेयर याने मुंबईला पत्र पाठवून काही अन्न धान्य व औषधे मागितली जी मुंबईकर इंग्रजांनी सुरतेहून परवानगी मिळताच पुरवलेली आहेत.

१९-२० ऑक्टोबर १६७९
इंग्रज नौका दल आता खांदेरी आणि मराठे यांच्या मार्गात उभे राहिले. १९-२० ऑक्टोबरच्या रात्री मराठे वारा पडला की रिव्हेंजच्या आजूबाजूला घुटमळत असत. या हालचालींमुळे केग्वीन चिंतीत झाला व जहाजावरील इतरही लोक घाबरले. केग्वीन ने मुंबईला कळवले की अश्या परिस्थितीत जर मराठ्यांनी रिव्हेंजचे नांगर कापले तर ते आपण जहाज गमावू. पुढील काही दिवस वारा अनुकूल नसल्याने काही मचव्यांनी रिव्हेंजला ओढून खांदेरी पासून जरा अंतरावर आणून ठेवले. मराठ्यांना रसद पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांनी पुन्हा खांदेरीला रसद पुरवठा सुरु केला. या दरम्यान मुंबईहून ’Fortune‘ नावाचे ३ डोलकाठ्यांचे जहाज आणि २ आणखी शिबाडे नौका दलात सामील झाली. फोर्च्युनचा कॅप्टन होता स्टीफन अडरटन. ही जहाजे इंग्रजांनी गोव्याला भाड्याने दिली होती व ती परत येताच त्यांना खांदेरीच्या मोहिमेकरिता रवाना करण्यात आले होते. मुंबईला मराठ्यांचा धोका होताच आणि मराठ्यांचे प्रयत्न पोर्तुगीज मुलुखातून मुंबईत शिरण्याचे असे सुरूच होते. मुंबईत या वेळी बंदुकीची ५३२ पिंप भरून दारू होती व यातील ३०० पिंप पोर्तुगीझाना विकून टाकावी असे पूर्वी सुरतेने मुंबईला कळवले होते. परंतु मराठ्यांचा संभाव्य धोका लक्षात ठेवून जर पोर्तुगीजांनी त्यांना मार्ग दिला तर आपली तयारी असावी म्हणून इंग्रज दारू विकण्याचे टाळत होते. तसेच नौका दलातून शक्य असल्यास २ शिबाडे मुंबईला पाठवावी अशीही त्यांनी केग्वीनकडे मागणी केली परंतु केग्विनला ते शक्य नव्हते.

२२ ऑक्टोबर १६७९
मराठ्यांना खांदेरीला रसद पुरवण्याचा मार्ग मोकळा होता. २२ ऑक्टोबर रोजी राजापूरहून आलेली मराठ्यांची आणखी ३७ गलबते नागावच्या दलात सामील झाली. मराठे सैन्य वाढवीत होते त्या अर्थी ते लवकरच निकाली लढाई करतील असे केग्विनला वाटत होते. पुढील दहा दिवस मात्र मराठ्यांचा एक वेगळाच बेत चालला होता. इंग्रज रिव्हेंज आणि फोर्च्युन घेवून मराठ्यांच्या भीतीने खांदेरीच्या आसमंतापासून दूर रहात होते. याचा फायदा घेवून मराठे आपल्या लहान नौकांच्या आधारे रोज खांदेरीला रसद पुरवीत होते. केग्विनला रोज ५-७ नौका खांदेरीला जाताना अथवा येताना दिसत, मग इंग्रज सैन्य आपले मचवे त्यांच्या पाठीमागे पाठवत असत, पण त्या होड्या त्यांना चकवत व नागावच्या खाडीत पळून जात असत. इंग्रज खाडीत शिरत नव्हते कारण तो संपूर्ण प्रदेश मराठ्यांचा होता व खाडीत शिरल्यानंतर जर खाडीच्या मुखावर मराठ्यांनी हल्ला करून मार्ग बंद केला असता, तर इंग्रजी आरमार आयतेच अलगद मराठ्यांच्या हाती लागले असते. मराठ्यांचा खांदेरीला पुरवठा, इंग्रजांचा त्यांचा पाठलाग आणि मराठ्यांनी त्यांना चुकवणे किंबहुना बऱ्याचदा तर इंग्रजांना पिच्छा करायला लावून आपल्या जाळात अडकवणे आणि दूर नेवून एखादा मचवा पकडणे हा मराठ्यांचा व्यवसाय अगदी व्यवस्थित सुरु होता. गनिमी काव्याचा हा सागरावरील केलेला बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा ! .इंग्रज या रोजच्याच उपद्व्यापामुळे जेरीस आले. केग्वीन या त्रासाने वैतागला आणि त्याने १ नोव्हेंबर १६७९ रोजी मुंबईला जे इतिहासप्रसिद्ध पत्र लिहिले त्याचा हा सारांश -
नागाव नदीच्या मुखाशी नौका ठेवण्याच्या बेताविषयी गेल्या पत्रात आपल्याला कळवले होते त्याप्रमाणे दिवसा ते शक्य नाही आणि रात्री चंद्र मावळेपर्यंत गस्त देऊनही उपयोग नाही कारण शत्रूची गलबते उशिराने येतात व वल्ही मारण्यात त्यांची शिताफी अधिक असल्यामुळे त्या आमच्या हाती लागत नाहीत. आम्ही त्रस्त आहोत. त्यांना अडविण्याच्या बाबतीत आम्ही कसलीही कसूर होऊ देत नाही याची आपण शाश्वती बाळगावी परंतु त्या लहान सरपटणाऱ्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात.आता आम्हाला असे वाटू लागले आहे की आमच्या कडेही तसल्या होड्या असतील तर आम्हाला कदाचित मदत होवू ही शकेल …”
ज्या इंग्रजांना अगोदर वाटले होती की मराठ्यांच्या लहान होड्या आपण काही मोठी गलबते नेवून आरामात बुडवून टाकू तेच इंग्रज आता वरील पत्र लिहीत होते या वरून मराठ्यांचा निग्रह, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी आणि त्यांची अनोखी युद्धनीती दिसून येते. गनिमी काव्याचा वापर करून ज्या मराठ्यांनी आजवर शत्रुसैन्याला डोंगर-दऱ्यांमधे जेरीस आणले होते त्यांनी तीच युद्धनीती सागरावर अवलंबून बलाढ्य सागरी सत्तेला जेरीस आणले होते.


२४ ऑक्टोबर १६५७
शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला.
औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच.

२३ ऑक्टोबर १६६२
छत्रपति शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये 'रोहिडखोरे - कारी' येथील देशमूख 'सर्जेराव जेधे' यांना पत्र लिहिले.
१६६१ पासून मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यात येउन बसला होता. स्वराज्यावर सारखे हल्ले करत होता. ह्यात मावळामधल्या लोकांची जीवित व वित्तहानी खुप होत असे. आपल्या प्रजेबद्दल सदैव जागरुक असणाऱ्या राजांनी रोहिडखोरे मधील कारी येथील देशमूख सर्जेराव जेधे यांना २३ ऑक्टोबर १६६२ रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,"जे बांद धरून नेतील त्याचे पाप तुमचा माथा बसेल" ह्या पत्रामधून राजांची आपल्या रयतेविषयी असणारी काळजी व तळमळ दिसून येते.

२४ ऑक्टोबर १६६२
फोंडा हा सभोवती खंदक, जाड-जुड व मजबूत तटबंदीचा अभेद्य किल्ला होता. किल्ल्याजवळच दुर्भाट हे मराठ्यांचे महत्वाचे बंदर होते. २४ ऑक्टोबर ला पोर्तुगीज व्हाइसरॉय तिथे येवून पोहोचला. स्थानिक मराठी अधिकारी दुलबा नाईक याला फोडण्यात यश आले आणि दुर्दैवाने दुर्भाट अलगद फिरंग्यांच्या हाती आले. संतापलेले ३०० पायदळ आणि ६ मराठे घोडेस्वार फिरंग्यांवर चालून गेले. पण कॅप्टन दिओगोफोजीरा याच्या तिखट प्रतिकारामुळे मराठ्यांना परत फिरावे लागले.

२४ ऑक्टोबर १६६६
आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे १९ ऑगस्ट रोजी फर्मान सोडले होते. नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. २४ ऑक्टोबर रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी पालकर यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली.

२५ ऑक्टोबर १६७०
मोरोपंत पिंगळे पेशवे पंतप्रधान यांनी शिवनेरी जिंकण्यासाठी शिकस्त केली पण त्यात त्यांना अपयश आले. पण त्यांनी पुढे घुसून नाशिकजवळील ब्रह्मगिरी जिंकला.


२७ ऑक्टोबर १६६७ कार्तिक वद्य पंचमी
औरंगाबाद येथे संभाजी राजे व शाहजादा मुअज्जमची भेट. यावेळी संभाजी राजांच्या निसबतीस प्रतापराव गुजर सरनौबत, निराजी पंत, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी सबनीस इत्यादी मंडळी होती. औरंगाबादेस पोहचल्यावर संभाजी राजांनी जसवंतसिंहाची भेट घेतली

२८ ऑक्टो १६६७
संभाजी राजांची शहजादा मुअज्जम सोबत भेट झाली, शहजाद्याने बहुत सन्माने भेट घेतली हत्ती, घोडे, जवाहीर, वस्त्रे सर्वस दिली, व-हाड देश जागा जहागीर १५ लक्षंचा होनांचा दिला टक्का पैसा लोकास बहुत पावला.
(शिवापूर दफ्तर यादी, सभासद बखर)


३१ ऑक्टोबर १६७९
संभाजी राजे व दिलेरखान यांची विजापूरला मोर्चे बांधणी. शिवाजी महाराज व मोरोपंत पिंगळे पंतप्रधान पेशवे विजापूरजवळ कुमक घेऊन पोहोचले.
Website Security Test