Friday, March 1, 2013

जून दिनविशेष



जून


४ जून १६७४
राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांचे वैदिकविधीवत रायगडावर तुलादान झाले. यासमयी त्यांचे वजन भरले १६० पौंड. या समयी इतक्या वजनाचे तब्बल १७,००० शिवरायी सोन्याचे होन दान करण्यात आले.

५ जून १६७२
मोरोपंत पेशवे पंतप्रधान यांनी जव्हार जिंकून मुक्त केले.

६ जून १६६०
व्याघ्रगड उर्फ वासोटा मराठ्यांनी जिंकला.

६ जून १६७४ ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ - राज्याभिषेक दिन
हा दिवस हिंदुसाम्राज्य दिन म्हणून देखील गणला जातो. श्रीशिव या शुभदिवशी छत्रपति झाले. शिवभक्त गो. नी. दांडेकर यांच्या लेखणीतून साकारलेला राज्याभिषेक सोहळा "हे तो श्रींची इच्छा" या कादंबरीतून.

- शिवराज्याभिषेक हेन्री ऑक्झेंडेनच्या नजरेतून.....
हशमानं नगारखान्याखालून हेन्रीच्या तुकडीला आत नेलं. एवढ्या उंचावर, एवढ्या दुर्गम स्थळी हे असलं प्रसन्न वैभव उपस्थित असेल, अशी कल्पनाही त्यानं केली नव्हती. सगळा परिसर माणसांनी तुडुंबला होता. निराजी पंडिताचा दुय्यम यांस सामोरा आला. त्यानं यांस एक्या अंगास उभं केलं, आणि तो सगळं समजावून देऊं लागला. यांचं कुतूहल पुरवूं लागला.

- धनी आतां येण्यात आहेत. पांचदहा पळांतच ते येतील.
- अलिकडे ते घंगाळ दिसते, त्यात घटिकापात्र आहे. ते भरतांच मुहूर्तवेळा उगवेल.
- हा मंडप मुद्दाम या प्रसंगासाठी उभारला आहे. आंब्याची पाने आणि फुले यांनी तो सजवायची इकडे पद्धत आहे.
- तो जो चौथरा, तो कायमचा. त्यावर ते सिंहासन, त्यासाठी बत्तीस मण सोने खर्ची पडले.
- त्यावर झळाळताहेत, ते सर्व खडे खरेच आहेत, नकली नव्हेत.
- सिंहासनाभंवती ती मेघडंबरी, ती लांकडी आहे.
- उजवीडावीकडे जागा दिसते, ती राजस्त्रियांसाठी. त्यांचे येणे सुरू झाले आहे.
- त्या दोघीचौघींनीं हाती धरून आणल्या त्या जिजाऊसाहेब - होय, त्या बहुत थकल्या आहेत.
- ते सिंहासनाभंवताली हाती झाकलेली सोन्याची ताटे घेऊन उभे आहेत, ते अवघे राजसचिव.
- मोरोत्र्यंबक, मुख्य प्रधान
- रामचंद्र नीलकण्ठ अमात्य
- ते रावजी पंडितराव
- ते हंबीरराव मोहिते सेनापति
- ते वाकनीस
- ते डबीर
- ते सचिव
- ते निराजी पंडित न्यायाधीश -

- भवंताली तो बाह्मवृंदांचा मेळा. सिंहासनाच्या खालच्या जागी पटांगणात थेट इथवर उभे आहेत ते अवघे सरदार. शेटी, देशमुख, देशपांडे, वतनदार, पाटील, कुलकर्णी, बाकी जे अगणित आहेत, देशभरांतून आलेले मराठे.
- हां हुश्शार ! ते भालदार चोपदार बिरूदे गर्जत आले.
- त्यांच्या पाठोपाठ, मस्तकी शाल गुंडाळलेले ते गागाभट्ट.
- आणि त्यांच्यामागे ते - आम्हा सर्वांचे धनी ! स्वत: शिवाजी राजे !
- खांद्यावर धनुष्य आहे. उजव्या हाती विष्णुमूर्ति. पाठीवर बाणांचा भाता आहे.
- त्यांच्या मागोमाग पट्टराणी सोयराबाईसाहेब, आणि युवराज संभाजीराजे !
अनिमिष नेत्रांनी हेन्री बघूं लागला.

- राजे सिंहासनासमोर आले. शेजारी बसलेल्या आऊसाहेबांस त्यांनी वाकून प्रणिपात केला.
गागाभट्ट आणि बाळंभट्टास वंदन केलं -
घटिकापात्र बुडालं -
आणि तो धन्यतेचा क्षण येऊन उभा ठाकला -
ज्याची हा दगडाधोंड्यांचा देश गेली अनेक शतकं वाट पाहात होता.
मायबोली मराठी भाषा.
मराठी आचार विचार.
मराठी संस्कृति.
अणि महाराष्ट्र धर्म.
ही अवघी बापुडवाणी होऊन
पापण्यांच्या दारवंट्यात उत्सुकतेच्या दिवल्या तेववून ज्यासाठी ताटकळत होती.

- किती शांमुखी जाहजी फाकवील्या.
- किती सुंदरा हाल होवोनी मेल्या.

त्या सर्वांचे पुण्यलोकी जाऊं न पावलेले अतृप्त आत्मे -
किती किती सन्त महन्तांनी आपापल्या तपश्चर्या ज्यासाठी अर्पिल्या होत्या.
कित्येक आईच्या पुतांनी
आपापली तुच्छ शरिर ज्या एका मुहोर्ताच्या उगवण्यासाठी
अनेकानेक स्वातंत्र्ययोद्धयांची कबंध
तळहाती शिरं घेऊन झुंजता झुंजता
ज्यासाठी समरभूमीवर खर्ची पडली होती.

रंजल्यागांजल्यांचे आक्रोश त्यांच्या दबलेल्या कंठातून न फुटतां
ज्यासाठी इतकी वर्ष घुसमटले होते
ज्यासाठी व्रतं -
वैकल्यं -
तीर्थाटनं -
तपश्चर्या -
किंबहुना अवघ्या उत्सुकता ज्यासाठी ताणल्या गेल्या होत्या -
अवघे सत्यसंकल्प ज्यासाठी उच्चारिले गेले होते.
अवघी पुण्यं ज्यासाठी समर्पित केली गेली होती.
तो शुभमुहुर्ताचा मुकुटमणि
तो स्वातंत्र्यसूर्याचा उदयकाल
स्वर्गीच्या देवतांच्या अन् यक्षगंधर्वांच्या साक्षीनं
तो दैदीप्यमान क्षणार्ध उलटला -

आणि कृतज्ञतेच्या भारानं भारावलेली पावलं टाकीत तो मराठ्यांचा अतिशय आवडता राजा सिंहासनाजवळ पोंचला. त्याक्षणी त्याच्या मनी लक्ष लक्ष वादळं उठली आणि विझली. त्या सर्वांवर ताबा मिळवून त्या धीरगंभीरानं कृतज्ञतेच्या भारानं मस्तक पळभर लववलं. त्या सर्व जिवलगांचे स्मरण केलं, की जे या पवित्र क्षणी उपस्थित नव्हते. त्यासर्व स्वातंत्र्ययोद्धयांना वंदन केलं, की ज्यांच्या बलिदानामुळं ही अमृतवेल स्वप्नांतून प्रत्यक्षांत अवतरली होती.
आणि मग जिथून आवडता राजगड स्पष्ट दिसत होता, त्या सिंहासनास पाय न लावता त्यावर तो आरूढ झाला !

गागाभट्टांनी वैदिक मंत्र म्हणायास प्रारंभ केला -

महते क्षत्राय महते आधिपत्याय
महते जानराज्याय एष वो भरतो
राजा सोमोऽस्माकं ब्राह्मणांना राजा ॥

हातींचं रत्नजडित, रेशमी छत्र त्यांनी राजाच्या मस्तकी धरलं, आणि घनगंभीर स्वरात ते गर्जले,

क्षत्रियकुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर
राजा शिवछत्रपति की जय हो !

तत्क्षणीं शिंगं, कर्णे, तूतबंबाळ, चौघडे यांचा एकच गर्दघोष झाला. ठासून ठेवलेल्या तोफांचे दुडुम दुडुम बार झाले. बरकंदाजांच्या बंदुका सुटल्या. जणूं धरणीकंप व्हावा, ती गत झाली.
न कळत हेन्रीचं मस्तक शिवछत्रपतींसमोर झुकलं.
      
७ जून १६६६
आग्र्याहून सुटका प्रकरण. शिवाजी महाराजांनी आपल्याबरोबर आणलेल्या फौजेला रजा देऊन घरी पाठवण्यासाठी औरंगजेबाकडे परवाने मागितले.

८ जून १६७०
पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवरायांनी पुन्हा जिंकून घेतला.

८ जून १७०७
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि अझमशाह ह्या त्याच्या २ मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तसाठी युद्ध झाले. ह्यात मुअज्जमने अझमशाहला ठार करून दिल्लीची गादी बळकावली.

८ जून १७१३
पंत प्रतिनिधि यांनी सिद्दी कडून रायगड किल्ला राजकारण साधून जिंकून घेतला. १६८९ साली रायगड सिद्दीने मुघलांसाठी जिंकला होता.

९ जून १६९६
छत्रपति राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडू येथील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न झाले. मुलाचे नाव 'शिवाजी' ठेविले.

९ जून १७००
दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.

९ जून १७१८
पूर्ण ताकदीनिशी इंग्रज आंग्र्याँच्या विजयदुर्ग येथील आरमारावर चालून गेले. बरेचसे आरमार आंग्र्यान्नी पावसाळ्यासाठी नांगरुन ठेवले होते. तरीसुद्धा उत्कृष्ट संरक्षण क्षमता आणि सागराचा वापर ह्यामुळे इंग्रज ९ दिवस प्रयत्न करून पराभूत होउन मुंबईला परत गेले.

१० जून १६७६
छत्रपति शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरवात.
राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते.

१० जून १६८१
औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले.

१० जून १७६८
पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांसमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.

१० जून १६६४
विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले. पण त्याने एकदम आल्लाघरीच स्वारी केली. या मोहिमेत तो एकाएकी मरण पावला.

११ जून १६७४
छत्रपति शिवाजी महाराजांनी राजाभिषेकानंतर ५ दिवसांनी इंग्रज वकील हेन्री ओक्सेद्रनला भेटण्याची परवानगी दिली.

१२ जून १७३२
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संभाजी आणि मानाजी ह्या २ मुलांमध्ये सरखेल पदासाठी झगडा सुरु होता. अखेर १२ जून १७३२ रोजी त्यांच्यात लढाई सुरु झाली.

१३ जून १६६५
शिवाजी राजे आणि मिर्झाराजे जयसिंह यांच्यात इतिहास प्रसिद्द पुरंदरचा तह.

१३ जून १७००
औरंगजेब स्वतः सज्जनगड बघण्यास गडावर पोचला. दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड ९ जून रोजी जिंकला होता.

१४ जून १७०४
मुघलांच्या कैदेत असलेल्या छत्रपति संभाजी यांच्या पुत्र शाहूचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.

१५ जून १६७०
मराठ्यांनी सिंदोळा घेतला.
मराठ्यांनी सिंदोळा विजापूरकरांकडून जिंकून घेतला. कोणा मातब्बराने ही मोहिम फत्ते केली ? ते काही समजायला मार्ग नाही. इतिहास मुका आहे..........तिथे तर्कही लंगडा पडतो. सामान्य माणसाने घडविलेला असामान्य इतिहास म्हणजे मराठ्यांचा इतिहास. लिहून ठेवायची आमच्यात पद्धत नव्हती. पराक्रम करायचा आणि मोकळे व्हायचे.

१५ जून १६७५
कारवारची मोहिम आटोपून छत्रपति शिवाजी महाराज रायगडावर परत.

१६ जून १६५९
विजापुरच्या आदिलशाहने शिवाजी राजांविरुद्ध अफझलखान याला एप्रिल १६५९ मध्ये मोहिमेसाठी मुकरर केले होते. १६ जून रोजी आदिलशाहने वाई आणि तळकोकणातल्या सर्व वतनदरांना फर्मान पाठवले आणि शिवाजी राजांविरुद्ध खानाला येउन मिळण्यास सांगितले.

१६ जून १६७०
माहुली किल्ल्याची किल्लेदारी मनोहरदास गौडा याने सोडली. नविन किल्लेदार आला अलिवर्दि बेग. शिवाजी महाराजांनी छापा घालून माहुली - भंडारदुर्ग आणी पळसखोल ही दुर्गत्रयी जिंकली.

१७ जून १६७४, बुधवार, मध्यरात्र
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब पुण्यतिथी
जिजाबाई साहेब यांचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे निधन. आनंदनाम संवत्सरात ज्येष्ठाच्या वद्य नवमीला आऊसाहेबांची प्राणज्योत मालवली. थोरल्या महाराज स्वामींचे मातृछत्र उडाले. राजा पोरका झाला. दिशा शुन्य झाल्या. आधार संपला. अंधार उरला. फक्त घनदाट अंधार. आता महाराजांना "बाळ" म्हणणारे जगात कोणीही उरले नाही. महाराज एकाएकी प्रौढ झाले.

१७ जून १६३१
शाहजहानची लाडकी (?) पत्नी मुमताज़महल हीचा वयाच्या ३८व्या वर्षी १४ व्या बाळंतपणात म्रुत्यू.तिच्या स्मरणार्थ म्हणे शाहजहानने ताजमहाल बांधला. पण तरिही काही प्रश्न अनुत्तरीत राहतात.
मुमताज़ जून १६३१ मध्ये वारली बुर्‍हाणपुरात आणि ताजमहाल बांधायला घेतला तो बुर्‍हाणपूरपासून ६०० मैल अंतरावर आग्रा येथे १६३२ साली.मग सुमारे ६-८ महिने मुमताजचे प्रेत कुठे ठेवले होते? जर बुर्‍हाणपुरात पुरले तर मग काय नंतर ताज महालात पुरण्यासाठी पुन्हा उकरून काढले?
ताज आहे तो यमुना नदीच्या काठी. नदीकाठी घाट बांधणे ही काय मुसलमानी पद्धत आहे?
ठिक आहे, जरी बांधला तरी त्यात सुमारे ४००-५०० खोल्या आहेत त्या कशासाठी? प्रेतासोबत कोणी रहायला येत होते काय?
समाधी ही एक दुःखाची गोष्ट असताना त्यावर कोणी टोलेजंग इमारत बांधील काय?
जर बांधल्याच तर शाहजहानच्या जनानखान्यात सुमारे ५००० बायका होत्या. मग उरलेल्या ४९९९ जणींच्या कबरी कोठे आहेत?
मुमताजचे १४ बाळंतपण तेही वयाच्या ३८ व्या वर्षी म्हण्जे मुमताज-शाहजहानचे प्रेम म्हणजे फ़क्त शारिरिक सुखासाठी होते काय?
कारण ताजमहालच्या जागी पुरातन शिवमंदीर असण्याची शक्यता दाट आहे. आणि तो "तेजोमहालय" आहे....

१७ जून १६३३
अस्त होणाऱ्या निजामशाहीला नवसंजीवनी देण्याचे राजे शहाजी आणि मुरार जगदेवाचे अखेरचे प्रयत्न. ६ वर्षाच्या 'मुर्तिझा'ला गादीवर बसवून निजामशाही चालवण्याचे प्रयत्न.

१८ जून १६६५
९ वर्षाचे शंभूराजे मुघल छावणीमध्ये मनसबदारी स्विकारण्यास हजर. पुरंदरच्या तहानुसार शिवाजीराजांना बाळ शंभू राजांसाठी मनसबदारी स्विकारणे भाग पडले होते.

१९ जून १६७२
मोरोपंत पेशवे पंतप्रधान यांनी रामनगर जिंकले.

१९ जून १६७६
औरंगजेबाने कंदाहारच्या मोहिमेवर असलेल्या नेताजी पालकरांना बोलवून दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले मे १६७६ रोजी पच्छाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. नेतोजी उर्फ मुहंमद कुलीखान पुनश्च हिंदू झाले. शिवाजी महाराजांनी वैदिक पद्धतीने विधीवत नेताजी पालकरांना पुनः शुद्ध करून हिंदु धर्माचे द्वार खुले केले. समर्थांनी लिहिले आहे की, "बंड पाषांड उडाले, शुद्ध अध्यात्म वाढले", हे अशा घटनेमधून उलगडते.

२१ जून १६६०
संग्रामदुर्ग – चाकणच्या भुईकोट किल्ल्याला शाईस्तेखानाचा वेढा पडला. हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला. तोफा बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शायीस्ताखानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली. आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते. ३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० रोजी मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली.
पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला. त्यावरचे मराठेही हवेत उडाले. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला.

२२ जून १६७०
मराठ्यांनी कर्नाळा किल्ला जिंकला.

२४ जून १६७०
मराठ्यांनी रोहिडा जिंकला.

२५ जून १६९३
नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी निवडक माणसे घेतली आणि ते राजमाचीवरुन निघाले. पावसाळ्याचे दिवस..त्यात अंधार अशा स्थितीत मराठे रान तुडवत सिंहगडानजिकच्या जंगलात येउन पोहोचले आणि योग्य संधीची वाट बघत ५ दिवस दबा धरुन बसले.

२६ जून १६६४
सुरतकर इंग्रजांचे कारवारकर इंग्रजांना इशारतीचे पत्र. या पत्रात इंग्रजांना शिवाजी राजांपासून सावध राहण्याविषयी इशारा दिलेला आहे.

३० जून १६९३
मध्यरात्री नावजी शिड्या व दोर बरोबर घेउन सिंहगड चढु लागले.अवघड मार्गानी खाचा-खळग्यातुन ते तटबंदीच्या खाली आले. परंतु किल्ल्यवर मोगलान्चे गस्त सुरु होती आणि पहरेकरी सावध होते, त्यमुळे मराठ्यांना तटाला शिड्या लावता आल्या नाहीत. सुर्योदय झाला...तेंव्हा किल्ल्यवरच्या गस्तवाल्यान्ची वेळ संपुन नवे लोक गस्तीसाठी आले.. या लवचिक संधीचा फ़ायदा घेउन नावजींनी शिड्या तटाला लावल्या आणि ते मावळ्यांसह सिंहगडवर आले.. मराठे सैनिकांनी त्याबाजुचे पहारेकरी गुपचुप कापुन काढले. अकस्मात हल्ला झाल्याने मोगलांची फ़ार हानी झाली.मराठे किल्ल्यावर आले आहेत अशी चाहुल जर किल्लेदाराला लागली असती तर तो सावध झाला आणि मोगल सैन्याने एकवटुन नावजींच्या लोकांवर हल्ला चढवला असता.पण नावजींनी त्यांचे काम चोख बजावले होते..
पावसाळ्यतल्या धुक्यामुळे लांब वरुन काय चालले आहे ते दिसत नव्हते. नावजींचे धैर्य बघुन विठोजी कारकेंना हुरुप आला. ते यावेळी तटाखाली योग्य संधीची वाट बघत थांबले होते. ते ही शिड्या लाऊन वर आले.. आत मराठ्यांचे सर्व सैन्य गडावर पोहोचले होते.. हर हर महादेव च्या गजरात सिंहगडाने परत एकदा स्वराज्याचा उंबरा ओलांडला...



No comments:

Post a Comment

Website Security Test