Friday, March 1, 2013

फेब्रुवारी दिनविशेष



फेब्रुवारी 



१ फेब्रुवारी १६८९
मराठा इतिहासातील अत्यंत काळा दिवस
'स्वराज्याचा दुसरा छत्रपती, शिवरायांचा छावा आणि आऊसाहेबांचा शंभूबाळ, छत्रपति संभाजी महाराज' संगमेश्वरला संगमेश्वरला कैद झाले
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा" या ऊक्तीला सदैव जागले ते महाराज. त्यांना अजुन थोडे आयुष्य लाभता इंग्रज, पोर्तुगीज, मुगल, हशबी आणि कोण कोण यांची पार धुलाई करीत, साता समुद्रापार त्यांना पोचवले असते. त्यांच्या विषयी पुर्ण माहीती फार कमी ऊपलब्ध आहे. पण श्री. विश्वास पाटील यांची 'संभाजी' नामक कादंबरी त्यांच्या जीवनावर बर्‍यापैकी प्रकाश टाकते. बालपणी लाभलेला जिजाऊंचा सहवास, त्यांच्याकडुन घेतलेले संस्कार व शिक्षण या पायावर ही कर्तुत्वाची विशाल ईमारत ऊभी राहीली. छत्रपतींनी पुरंदरच्या तहात त्यांना राजकारणात ओढले तेव्हा त्यांची उमर ८ वर्षांची, त्या वयात दिलेरखानाशी शाब्दीक चकमक करण्याचे चातुर्य, अभ्यास आणि धाडस त्यांच्यात होते. आग्र्यात बादशहाशी चतुर संभाषण, रायगडावरुन भरधाव घोडा फेकणे, भाल्याने वाघाची शिकार करणे, वडीलांच्या आज्ञेला अनुसरुन लाखो लोकांच्या रोषाला कारणीभुत ठरणे आणि मोगलांना मिळणे, पोर्तुगीजाच्या मागावर जाऊन संगमेश्वराच्या खाडीत भर प्रवाहात घोडा घालणे, जंजिर्‍यासमोर पद्मदुर्ग बांधणे आणि तिथुन जंजिर्‍यावर मारा करणे असे अनेक रोमहर्षक प्रसंग ह्या लढवय्याने जगले.
ह्या सार्‍या धामधुमीत सुध्दा त्यांचे कवीत्व जाग्रुत होते, संस्कृत (देवबोली) चा अभ्यास अव्याहत चालु होता.
सर्जा रणमर्द छत्रपती संभाजी महाराज्यांचा विजय असो.


२ फेब्रुवारी १६६१
शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की, सरदार कारतलब खान मोठ्या फौजेनिशी नागोठणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाईस्तेखानाच्या हुकुमावरून निघत आहे. कारतलब खान उंबरखिंडीने नागोठण्याला उतरणार होता. खानाबरोबर माहूरची प्रख्यात देशमुखीण सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडिता रायबागन ही शूर स्त्री देखील होती. उंबर खिंड पुण्याच्या वायव्य सरहद्दीवर येते.
महाराज आधिच उंबर खिंडीत जावून खिंड अडवून उभे रहिले ! खान आला. पण त्याच्या फौजेला खिंडीच्याजवळ लौकर जाताच येईना. मार्गावर भयंकर आरण्य होते. मराठी फौजेसह शिवाजी राजे खिंडीतच उभे आहेत, याची खानाला कल्पनाच नव्हती ! महाराजांनी वकील पाठवून खानाला 'सुखरूप सुटायचे असेल, तर आलात तसे परत जा -' असा निरोप पाठविला. खानाने तो धुडकावला.
मग महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढविण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लंगडतोड सुरू झाली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना ! पळताही येईना ! या अरण्याचे नाव आहे 'तुंगारण्य'. अखेर खानाने रायबागनचा शरण जाण्याचा सल्ला ऐकला. खानाने आपला वकील पाठवला. महाराजांकडे वकिल आला. महाराज पांढर्‍या शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांच्या अंगावर चिलखत व पोलादी शिरस्त्राण होते. वकिला मार्फत खानाने बिनशर्त शरणागती पत्करली ! खानाचा प्रचंड पराभव झाला ! तो ज्या दिवशी झाला त्या दिवशी तारीख होती - २ फेब्रुवारी १६६१.
प्रचंड दौलत व सैन्य वाया घालवून कारतलब खान पुण्यास परतला. आता त्याला शाईस्तेखानाकडे वर मान करून बघायचिही हिंमत उरली नव्हती. कसाबसा जीव व आब्रू वाचवून तो पुण्यात परतला.

३ फेब्रुवारी १८३२
नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.
पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. गुलामीच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी संघर्ष करणा-या या आद्य क्रांतीवीराला त्रिवार मुजरा.


४ फेब्रुवारी १६६०
कोकणातील दाभोळ बंदर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले

४ फेब्रुवारी १६७५
शिवाजी महाराजांनी संभाजी राजांची रायगडावर मुंज पार पाडली.

४ फेब्रुवारी १६७० 
नरवीर तान्हाजी मालुसरे लढता लढता धारातीर्थी पडले पण सिंहगडावर भगवा फडकावूनचं.
राजानी हा किल्ला घेण्यासाठी तानाजीची निवड केली होती. तानाजीने पुरंदरचे युद्ध, प्रतापगडाचे युद्ध, राजांची कोकणातील मोहिम यावर चांगली कामगिरी केली होती. तो हजार पायदल हशमांचा सरदार होता. जानेवारी १६७० चा महिना संपत आला होता. सिंहगडाची तानाजीला चांगलीच माहिती होती. त्यासाठी तानाजीने वेळ निवडली ती म्हणजे ४ फेब्रुवारीची १६७० संध्याकाळ. या दिवशी तिथी होती माघ वद्य नवमी. चंद्रोदय रात्री २ वाजता होणार होता. त्या आधी मिट्ट अंधारच...!!
४ फेब्रुवारीच्या संध्याकाळी तानाजीने सर्व मावल्यांसह राजगड सोडला. गुंजवणी नदी ओलांडली, सर्वजन विंडसई खिंडित पोचले. तोपर्यंत अंधार पडला होता. मशाल पेटवणे महा-धोक्याचे होते. अंधारात अंदाजानेच पाऊल टाकावे लगत होते. मध्यरात्रीनंतर सारे डोणागिरिच्या कड्याच्याजवळ जमा झाले. दोन मावल्याना हा कडा त्याच्या खाचा-खोचांसकट माहित होता. कमरेला दोर बांधून हे वीर झपा-झप कडा वर चढून गेले. मात्र यावेळी कडा चढताना सहा मावले कड्यावरुन पडून मरण पावले. त्यांची नावे आजही इतिहासाला अज्ञात आहेत. कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधण्यात आले. दोराच्या आधाराने सारे मावले वर आले अन घात झाला. उदयभानुला खबर लागली की कुणीतरी दोर चढून किल्ल्यावर घुसतय. एकच गोंधळ उडाला. चंद्रोदय झाला होता व् अगदी धूसर प्रकाश होता. गड जागा होत आहे याची चाहुल लागताच मराठयानी शस्त्रे परजली आणि सैनिकांच्या वस्तीवर धावले. काही सैनिक जागे होण्याच्या आतच त्याना मराठयानी कापून काढले. थोड्याच वेळात गडावर तीनशे मराठे आणि १५०० मोगली सैनिक असा सामना जुम्पला.
मराठ्यापुढे यश किंवा मृत्यु असे दोनच पर्याय उपलब्ध होते. सहाजिकच त्यांचा आवेश विलक्षण होता.
तानाजी व् सूर्याजी सैनिकाना प्रोत्साहन देत सर्वत्र फिरत होते. उदय भानुने तानाजीला हेरले आणि तो तानाजीकडे धावला. दोघानाही जखमा होत होत्या. उदयभानुच्या जोरकस वाराला अडवन्यासाठी तानाजीने ढाल पुढे केली आणि दुर्दैवाने ती ढालच तुटली. आत तानाजी उघडा पडला आणि उदय भानु जोशात आला. मर्मस्थानी वार बसून तानाजी घायल होवून खाली पडला आणि थोड्याच वेळात वीर गतीला गेला. उदयभानुही जखमा आणि रक्तस्त्रावाने खचला होता. थोड्याच वेळात तोही गतप्राण झाला.
तानाजी पडल्यावर मराठी सैन्यात चल बिचल झाली आणि त्यांचा धीर सुटतो की काय म्हणुन सूर्याजी पुढे झाला आणि त्याने त्याना धीर देवून युद्धास परावृत्त केले.झाले ........
विलक्षण अशा जोशात सर्व मराठे लढले मोगली सैन्याचा धीर पुरता खचला आणि त्यानी शरणागती पत्करली......शेवटी काय
गड आला पण सिंह गेला......
आणि तो दिवस होता ४ फेब्रुवारी १६७० ची रात्र आणि ५ फेब्रुवारी १६७० ची पहाट

५ फेब्रुवारी १६६४ नारो बापूजी मुदगल यांचे बलिदान
६ जानेवारी - ९ जानेवारी १६६४ पर्यंत महाराजांनी मनसोक्त सूरत लुटली. बाद्शःची सुरत बतसुरत झाली. सुरतेची धनलक्ष्मी घेउन मराठे थेट लोहगडावर पोचले. शहाजी राजांच्या मृत्युची बातमी कळताच महाराज राजगडी निघून गेले.
लुटीचा माघ काढीत मोघली हेर लोहगडाच्या आसमंतात पोचले आणि तडक मागे जुन्नरहुन मुकुंदसिंह लोहगडाच्या दिशेने निघाला. मुकुंदसिंहांस अटकाव करण्यासाठी महाराजांचा बाळसवंगडी नारों बापूजी मुदगल सरसावला. नारो बापूजी हे बापूजी श्रीपत मुदगल नर्हेंकर देशपांडे यांचे पुत्र.
वडगावजवळ नारो बापुजिंच्या आणि मुकुंदसिंहाच्या सैन्याचा सामना झाला. मुघलांनकडे अनेक घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. नारो बापूजी आपली नागवी समशेर नाचवित मोघलांनवर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर नारो बापुजिंच्या छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले.

५ फेब्रुवारी ते १० मार्च १६७७
शिवाजी महाराजांचे भागानगर (हैद्राबाद) येथे आगमन. शिवाजी महाराजांची व कुतुबशाहाची भेट. एक महिना मुक्काम. (दक्षिण दिग्विजय प्रसंग)
माघ शुद्ध नवमी - दासबोध जयंती
माघ शुद्ध नवमी हा पवित्र दिवस आम्हाला खूप मोठी आणि शाश्वत देणगी देऊन गेला. आजच्या दिवशी समर्थ रामदासांनी शिष्योत्तम कल्याण स्वामींच्या शूभ हस्ते दास बोध लिखाणाचे काम पूर्ण केले. त्यामूळे हा दिवस दास बोध जयंती म्हणून ओळखला जातो. हे लिखाणाचे सत्कार्य शिवथर घळीत पूर्ण झाले. त्याची तेजस्वी आठवण म्हणून शिवथर घळीत दास बोध जयंती उत्सव दर वर्षी थाटामाटात साजरा केला जातो.

७ फेब्रुवारी १६९८
झुल्फिकार खानच्या ताब्यात जिंजी किल्ला आला.छत्रपती राजाराम महाराजांना पकडण्यासाठी जिंजीस वेढा दिला होता.

८ फेब १६६५
शिवाजी महाराजांनी पहिलीच आरमारी स्वारी गोमंतकाच्या दक्षिणेकडे, कारवारच्या दक्षिणेला असलेल्या बसनूर (वसुपूर कर्नाटक)या श्रीमंत शहराच्या रोखणे निघाली. स्वतःचे आरमार उभारल्यानंतर शिवरायांनी पहिली आरमारस्वारी कर्नाटकमधील'बिदनूर'वर काढली. या मोहिमेकरता मालवण बंदरातून ५० गलबते, ३ मोठ्या तारवा आणि ४००० सैनिकांची फौज बिदनूरकडे निघाली. राजांनी स्वतः ह्या सागरी स्वारीचे नेतृत्व केले. सिंधूसागराहून निघालेली हि पहिलीच सागरी मोहीम होती.


८ फेब्रुवारी १६६५ माघ वद्य नवमी (दास नवमी)
संत रामदास स्वामींनी सज्जनगडावर समाधी घेतली.
उमरठ्याचे तानाजी राव मालुसरे सुभेदार म्हणजे एक बडे प्रस्थ. शिवाजी महाराजांचा बालपणापासूनचा मैतर. तानाजीरावांचे वर्णन करावे ते शाहिरांनीच ! इतरांना नाही साधायचे ते. सेवाचाकरीत अट नाही आणी निष्ठेत कधी फट नाही. सुभेदारांचा दरारा जगात राजगडावरील बालेकिल्ल्याइतकाच भारदस्त होता.
मुलाचे लगीन ठरवल्यानिमित्त राजास निमंत्रण देण्यास गेलेल्या रावांनी राजाची बेचैनी ओळखली. आउसाहेबांचे मनोगत ताडले आणि सिंहगडाच्या लगीनघाईचा मान आपल्या ताब्यात घेतला.
रावांचा डाव म्हणजे अस्सल हनुमंती डाव. घाल झडप की कर गडप. फुकटची मोगली मिजास दिसणार नाही त्यात. तानाजी रावांनी निवडली रात्र माघ वद्य नवमीची (दि.०४ फेब्रुवारी १६७०) !
सिंहगडाच्या पश्चिमेकडील डोणागिरीच्या कड्याजवळ तानाजी राव ससैन्य प्रगटले. दोघे जण सरसर करीत तो बेताल डोणागिरीचा कडा "जैसे वानर चढोन जाताती" तसे चढून गेले. वर जाऊन त्यांनी दोर सोडले. स्वतः तानाजी राव फौजेसह गडावर दाखल झाले.
इतक्यात उदयभान राठोड या मोगली किल्लेदाराच्या पहारेकर्‍यांनी हा हल्ला हेरला. गडावर एकदम हलकल्लोळ उडाला. तानाजी रावांनी गडावर जीव खाऊन कापणी चालवली. त्यांना ठावकी होते, की हा हल्ला फसला तर पुन्हा कधीही गडावर भगवा झेंडा लागू शकणार नाही. गडावर लगीन घाई उडाली. हिलालांच्या अक्षता उडू लागल्या. मशालींच्या पदन्यासात सिंहगड डोलू लागला. राजगडावरून ही सिंहगडावरची धांदल महाराज डोळ्यांत जीव ओतून बघत होते. आता मध्य रात्र उलटून गेली होती. चंद्र आस्मानी उगवला होता.
अन् उदयभान व तानाजी राव अचानक एकमेकांसमोर आले. दोघेही कमालीचे शूर. एकाच्या अंगी इंद्राच्या ऐरावताचे बळ होते, तर एकाच्या अंगी यमराजाच्या रेड्याचे बळ होते. दात खाऊन दोघेही रणास पेटले. चित्यांसारख्या झेपा टाकून एकमेकाला ठार करण्याचा यत्न करू लागले. अन् घात झाला. तानाजी रावांची ढाल तूटली. समयास दूसरी ढाल मिळाली नाही. कुठून येणार ? तानाजी रावांनी आपले भवितव्य ओळखले. त्यांनी आपल्या डोक्याचे मुंडासे काढून ढाली सारखे धरले. व त्यावर घाव झेलू लागले. उदयभान चेकाळून उन्मादाने सुभेदारांवर वेगात घाव घालू लागला. घनगर्जन धडधडधडते, धुरा घालिती भरडत चिरडत. आणि उदयभानचा एक घाव खाडकन तानाजी रावांवर पडला. मरता मरता सुभेदारांनिही आपल्या ठेवणीतला एक अवघड वार वैर्‍यावर घातला. दोघेही धाडकन जमिनीवर पडले व गतप्राण झाले.
मराठ्यांमध्ये हाकाटी पेटली, "सुभेदार पडले, सुभेदार पडले" अन् मराठे रण सोडून पळत सुटले. सुर्याजीने ते पाहिले अन् त्याचे काळीजच मुळी थरारून गेले. मिट्ट काळोखात सुर्याने आपले तेज प्रगट केले. कडक शब्दात त्यांनी सैन्याची हजेरी घेतली. " अरे तूमचा बाप इथे मरून पडला आहे, अन् तूम्ही नामर्दासारखे पळून चालला आहात ? आऊ साहेब काय म्हणतील ? मागे फिरा ! मी तो दोर केव्हाच कापून काढला आहे. एकतर कड्या खालते उड्या मारून जीव द्या, नाही तर वैर्‍याचा जीव घ्या !"
आणी काय आश्चर्य ? सुर्याजी रावांनी फुटलेले धरण सावरले. मराठ्यांनी कडोविकरोळीचे रण मांडले आणि सिंहगड जिंकला.
महाराजांचा अन् आऊसाहेबांचा लाडका सिंहगड. जिथे उमरठ्याच्या तानाजी राव सुभेदारांनी आपले रक्त सांडले व जीव अर्पण केला. तीर्थक्षेत्र सिंहगड ! जिथे आपले अभागे हिंदू प्रेयसीच्या गळ्यात मिठ्या घालून बसतात. जिथे दारूच्या अड्याची मैफल अन् जुगाराचा फड सजतो. जिथे रेव्ह पार्टिची बदफैली साजरी होते. आमच्या अधःपतनाची सुद्धा कमाल आहे ! तीर्थक्षेत्राचे मोल आम्ही कधी जाणलेच नाही.

९ फेब्रुवारी १६८९
औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने छत्रपती संभाजीमहाराजांना कैद केल्यानंतर रायगडच्या किल्ल्यावर महाराणी येसूबाई व किल्ल्यावरील मराठे सरदारांच्या सल्ल्याने राजाराम- महाराजांनी मंचकारोहण केले. स्वराज्याचे ३ रे छत्रपती राजाराम महाराज ह्यांचा राज्याभिषेक दिन.


९ फेब्रुवारी १६६५
शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे 'बसनूर' छापा घालून लूटले. महाराजांनी बसनूरवरची स्वारी ही जलमार्गाने जाऊन केली. राजाने नौकाप्रवास करून सागर उलंघू नये ही हिंदू धर्मातील खूळचट रूढी उडवून लावली. शिवराय किंवा सावरकर काय ! दोघेही हिंदू धर्मातील परंपरांचा सन्मानपूर्वक गौरव गाणारे होते, पण धर्मातील खूळचट रूढींना दोघांनिही आपल्या चरित्रात मूळीच थारा दिला नाही.

१० फेब्रुवारी १६७१
सिद्दी कासीमने आणि सिद्दी खैरात यांनी दंडा राजपूरी मराठ्यांकडून जिंकून घेतली. या दिवशी होळी पौर्णिमा होती. 
१६६९ च्या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता.
१६७१ च्या सुमारास महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली. जंजिरा फत्ते करणाऱ्यास त्यांनी एक मण सोन्याचे बक्षीस देण्याचे ठरवले होते. जंजिऱ्या हून तीन कोसांवर महाराजांचा तळ होता. त्याच रात्री दंड्याचा ठाण्यावरती छुपा हल्ला करण्यास सिद्दी कासीम तयारी करत होता (१० फेब्रुवारी १६७१) . हे ठाणे म्हणजे किनाऱ्या वरील किल्ला होता. मराठी फौज किल्ल्यात तैनात होती. सिद्दी कासीम समुद्रामार्गे तर सिद्दी खैर्यत जमिनी मार्गे असा दुतर्फा हल्ला करण्याची कासीम याची योजना होती. होळीचा सण असल्याने गस्तीच्या सैनिकां शिवाय किल्ल्यातली फौज बेसावध होती. कासिमच्या नावा किल्ल्याच्या तटाला लागताक्षणी खैर्यत ने किल्ल्यावर हल्ला चढवला. साहजिकच किल्ल्याची ताकद हा हमला थोपवण्या साठी गेली व त्यामुळे समुद्राच्या दिशेने होणाऱ्या हमल्या कडे दुर्लक्ष झाले. तटाला शिड्या लावून कासीमची फौज किल्ल्या वर आली आणि एकच कल्लोळ माजला. गस्तीच्या सैनिकांनी शिकस्त केली पण ताकद विभागली गेली होती. दरम्यान किल्ल्या वरील दारूगोळा कोठारात भयंकर स्फोट झाला. प्रचंड धूर उसळला. सगळे जणू ह्या स्फोटाच्या धक्क्याने स्तब्ध भारावले होते. ह्या अतीव शांततेत कासीमची ललकारी गुंजली. परत लढाईला तोंड फुटले, पण मराठ्यांच्या प्रत्युत्तरातली हवाच जणू निघून गेली होती. कासीम आणि खैर्यतची फौज भारी पडत होती, ह्या रणकंदनात मराठी फौजेचा धुव्वा उडाला आणि दंडा राजपुरी स्वराज्यातून परत सिद्दी कडे गेली.
जंजिऱ्या च्या पलीकडे असलेल्या बेटावर महाराजांनी पद्मदुर्ग वसविण्याचे दिव्य सुरु केले, किल्ल्याचा बांधकामात मोठा अडसर होता तो जंजिऱ्या वरून होणाऱ्या तोफेच्या वर्षावाचा. तरीही नेटाने काम चालू होते. दरम्यान महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. महाराजांनी परत जंजिऱ्याची मोहीम चालू केली, आरमाराचे बळ वाढविले. सिद्दीने वेंगुर्ल्यावर स्वारी करून वेंगुर्ले जाळले. मराठी आरमाराने राजापुराहून व विजयदुर्गापासून सिद्दीचा पाठलाग केला पण तो निसटून जंजिऱ्यास पोहोचला. जंजिऱ्याला मराठी आरमाराचा वेढा पडला, जंजिऱ्याच्या तटावर मराठी तोफा आग ओकू लागल्या. मोठमोठ्या तरफांवर तोफा चढवलेल्या होत्या आणि त्या तराफा जंजिऱ्याच्या सभोवती तरंगत तरत्या तोफखान्याचे काम करत होत्या. सिद्दि संबूळ जो ह्या वेढाच्या वेळेस वेंगुर्ल्याच्या बाजूस गेला होता तो आपल्या आरमारासह परतला पण मुसंडी देऊन त्याने हा वेढा मोडून काढला.
ऑगस्ट १६७६, मोरोपंत यांनी जंजिऱ्याची मोहीम आखली. ह्या वेळी सिद्दी कासीम हा सुरतेहून जंजिऱ्याकडे आरमारासह परतत होता. जंजिऱ्यावर मराठ्यांच्या तोफा पुन्हा कडाडू लागल्या. होड्या-मचव्यावर बांधलेल्या तोफांचा गराडा जंजिऱ्याला पडला. जंजिऱ्याचा तट अजस्र होता, तोफ गोळ्यांचा काही एक परिणाम होत नव्हता. मोरोपंत प्रयत्नांची शिकस्त करत होते आणि त्यांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला, जंजिऱ्याच्या तटावर शिड्या लावून चढायचे व सिद्दीची फौज कापावी. विचार अगदी घातकी होता पण अजून उपाय तरी काय होता. तरीही बरेच प्रश्न पुढ्यात होते. तटावर शिड्या कश्या लावायच्या? कुणी लावायच्या? तटाखालच्या समुद्राचे काय? तटावरच्या बंदोबस्तात शिड्या आणि माणसे कसे पोहोचवायचे?
लाय पाटील ह्याने हा मनसुबा,ही जबाबदारी स्वतः वर घेतली. लाय पाटील ह्याने तटावर शिड्या लावून द्यायच्या व मोरोपंतांनी हजार बाराशेची फौज तटावर चढवायची अशी योजना होती. मध्यरात्री नंतर लाय पाटील आपल्या साथीदारां बरोबर लहान होड्यां मधून शिड्या घेऊन गेला. तटावरच्या पहारेकऱ्यांना चुकवत अलगद जंजिऱ्याच्या तटाजवळ ते पोहोचले. अंधारात आवाज होता तो केवळ तटाला भिडणाऱ्या समुद्राच्या लाटांचा. लाय पाटील अत्यंत अधीरतेने वाट पाहत होता मोरोपंतांच्या तुकडीचा. वेळ भरभर पळत होता आणि इथे मोरोपंतांचा पत्ता नव्हता. कधी तटावरील गस्तकऱ्यांना चाहूल लागेल आणि फटाफट गोळ्या सुटतील ह्याचा नेम नव्हता. अशक्य कोटीतली कामगिरी तर लाय पाटलाने निभावली होती, पण पंतांचा पत्ता नव्हता. पहाटेची वेळ आली, शिड्यांची चाहूल लागली असती तर गस्तकरी सावध झाले असतेच पण हा बेत परत कधीही यशस्वी झाला नसता. हताश होत लाय पाटील आणि त्याचे साथीदार शिड्या काढून झपाट्याने परत निघून आला. नेमका काय घोटाळा झाला? कोणाची चूक होती? हे केवळ इतिहासालाच माहीत. मोरोपंतांनी ह्या मोहिमेच्या अपयश स्वतः स्वीकारले. माहाराजांना ही घटना कळताच त्यांनी लाय पाटलाचा सन्मान करण्यास त्याला बोलावले व त्यास पालखीचा बहुमान देऊ केला. पण त्या स्वराज्याच्या इमानी सेवकाने नम्रपणे तो बहुमान नाकारला. हे पाहून कौतुकाने महाराजांनी लाय पाटलासाठी गलबत बांधण्याचे फर्मान सोडले व त्यास "पालखी" असे नाव दिले. एका दर्यावीराचा यथोचित सत्कार महाराजांनीच करावा. थोरल्या महाराजांनंतर शंभू महाराजांनी देखिल १६८२ मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला होता.
असा हा अजेय जंजिरा, सिद्दि मुहमंदखान हा शेवटच्या सिद्दी असताना २० सिद्दी सत्ताधीश व त्याच्या राज्याच्या ३३० वर्षांनी ३ एप्रिल १९४८ रोजी भारतीय संघराज्यात विलीन झाले.


२४ फेब्रुवारी १६७४ महाशिवरात्र - प्रतापराव गुजर पुण्यतिथी
मराठ्यांच्या गनिमी काव्याने स्वराज्यावर चालून आलेला बहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मरठयांना शरण आला. आता शरण आलेल्याला मारु नये असा हिंदु धर्म सांगतो; त्यामुळे प्रतापराव गुजर या तत्वनीष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली व तो गनीम जिव वाचवून गेला.
पण नंतर दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला आणि शिवरायांनी रयतेला त्रास देणाऱ्या बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांची पत्र पाठवून कानऊघडणी केली.
"बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका.
भावनेत बाव भरून केल्या वर्तनावर दिखाऊ दिलदारीचा वर्ख लावू नका.
सेनापती विवेकशून्य असेल तर तो शेवटी रांगडा शिपाईच ठरतो राव !
शिपाईगिरीच्या दांडगाईवर फसव्या मुत्सद्देगिरीचा मुखवटा चढवू नका
बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका."

तोच सल मस्तकात घेउन सरनौबत प्रतापराव गुजर जगत होते, महाशिवरात्रीचा दिवस उगवला. प्रतापराव गुजर हे विसाजी बल्लाळ, दीपोजी राउतराव, विट्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धि हिलाल, विठोजी शिंदे या ६ शिलेदारांनिशी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते. मुख्य छावणी पासून पुष्कळ दूर असताना त्यांना बातमी समजली की बहलोल खान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतोय.
काही दिवसांनी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक होणार होता. तेव्हा महाराजांना अष्टप्रधानांपैकी ७ प्रधानांचा मुजरा झडणार होता. मात्र सरसेनापतीचा मुजरा झडणार नव्हता, का  तर "बहलोल खानास गर्दीस मेळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका." असा प्रत्यक्ष महाराजांचाच हुकूम होता.
बहलोलखानाच नाव ऐकून अंतरात धुमसत असलेल्या सुरूंगावर जणू शिलगावणीच पडली. डोळ्यातून संतापाच्या ठिणग्या उडू लागल्या, विजेच्या चपळाईने प्रताप रावांनी घोड्यावर मांड टाकून टाच मारली. ते सहा शिलेदारही प्रतापरावांच्या मागे सुसाट दौडत निघाले.
फक्त सात. हो फक्त सात! सात घोडेस्वारांची मात चालली होती काळावर. जणू सुर्यरथाचे सात अश्वच पृथ्वी गिळंकृत करण्या करता सुसाट वेगाने निघालेले होते.
बहलोल खानाने घटप्रभा नदी ओलांडली. नदी ओलांडल्यावर त्याला व त्याच्या फौजेला अपरंपार आनंद झाला. कारण ते आता शिवाजीच्या मुलखात घुसत होते. शिवाजीच्या मुलखात त्यांच्या घोड्याची टाप पडत होती. त्याचे नगारे वाजत होते. कर्णे थरारत होते. बारा ईमामांचे झेंडे आघाडीला फडकत होते. उंटांचा व घोड्यांचा रिसाला दोन बाजूंनी दौडत सुटला होता. स्वतः बहलोल खान हत्तीवर बसला होता. आपल्या फौजेला जोश देत होता.

अन् अचानक प्रतापराव बहलोल खानावर तुटून पडले, विसाजी बल्लाळ, दीपोजी राउतराव, विट्ठल पिलाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धि हिलाल, विठोजी शिंदे.. या आपल्या ६ जणांच्या "प्रचंड सैन्यानिशी" आणी प्राणार्पण केले. स्वराज्यातील अजून एक खिंड पावन झाली. नेसरीचे तीर्थ क्षेत्रात रूपांतर झाले.

१३ फेब्रुवारी १६६०
शिवाजी राजांचा सरदार दारोजी याने राजापूर येथे अफजलखानाच्या गलबती राजकारणाच्या निमित्ताने इंग्रजांकडून जंजिर्‍याविरूद्ध लढाईसाठी मदत मागितली. या मदतीच्या मोबदल्यात त्याने इंग्रजांचा माणूस 'गिफर्ड' व त्याचा माल सोडून दिला.

१७ फेब्रुवारी १७७३ 
कोल्हापूरच्या कर्तबगार महाराणी जिजाबाई (करवीर)यांचे पन्हाळा (जिल्हा कोल्हापूर)येथे निधन

१७ फेब्रुवारी १७७४ 
नारायणराव पेशव्यांच्या वधानंतर रघुनाथराव हे पेशवे झाले

१९ फेब्रुवारी १६३० फाल्गुन वद्य तृतीय, शुक्रवार
राजमाता जिजाऊ आणि शाहजीराजे यांच्या पोटी किल्ले शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला.
शिवरायानी आपल्या आतुलनीय पराक्रमाद्वारे आणि बुद्धिकौशल्याचा बलावर प्रस्थापित सर्व पातशाह्याना उपडे करत, यवनांचा जुल्मी राजवटीला चोख उत्तर देत, सुल्तानांचा छाताडावर स्वराज्याचा भगवा झेंडा रोवला. या साम्राज्याचा पाया इतका मजबूत होता की नंतर संपूर्ण भारतभर याला कोणी आव्हान देवू शकले नाही. ज्या दिल्ली दरबारात महाराजांचा अपमान झाला होता, त्याच दरबाराला पुढे या सम्राज्यासमोर झुकावे लागले. जो दरबार महाराजांचा जिवावर उठला होता, त्याच दरबाराला पुढे स्वतःच्या प्राणंचा रक्षनासाठी या साम्राज्यसमोर गुडघे टेकावे लागले. इस्लामी आक्रमण स्वराज्याने नुसते पचवलेच नाही तर कटक ( दक्षिण भारत ) पासून अटकेपर्यन्त (पाकिस्तान ) या साम्राज्याचा विस्तार झाला. स्वराज्यमंदिराचा पाया शिवाशाहित घातला गेला तर पेशवाईत त्यावर कलस चढविला गेला.
शिवरायांचा युद्ध कौशल्याचा सर्वात महत्वाच गुण म्हणजे उपलब्द्ध साधनांचा पुरेपुर उपयोग, कोणतेही युद्ध खेलताना पुरेपुर नियोजन, सुसुत्रता, शत्रुचा कच्चेदुवे-बलस्थानाची संपूर्ण माहिती, धाडस, आणि परिस्थितीनूसार स्वतः नेत्तृत्व करुन कमीतकमी स्वताची हनी करुन जास्तीतजास्त शत्रु सैन्याचे नुकसान करणे.
शिवाय, धोरणी व मुत्सद्दी राजनीतीतज्ञ, संघटनकुशल, उत्तम प्रशासक, दूरदर्शीपणा व त्याला आभ्यासाची जोड़ हे सारे गुण त्यांच्या व्यक्तीमत्वात एकवटले होते. आपल्या याच अलौकिक व्यक्तिमत्वाने त्यानी उत्तम स्वामीनिष्ठ / स्वराज्यनिष्ठ सेवकांची संघटना बांधली.

२१ फेब्रुवारी १६६५ (रात्री)
कारवार येथील इंग्रजांच्या वखारीत शिवाजी महाराज छापा घालणार असल्याची खबर. इंग्रजांच्या हेरांनी बातमी कळवली की, खुद्द शिवाजी राजा ४००० मराठ्यांसह अंकोल्यात आला असून उद्या (दि.२२ फेब्रुवारी) तो कारवारवर येणार आहे.
त्याच रात्री सुभेदार बहलोल खानाचा एक नायब सरदार शेरखान (खान महंमदाचा मुलगा. या खान महंमदाचा अफजलखानाच्या कागाळीवरून बड्या साहेबिणीने विजापूरच्या मक्का दरवाज्यात दि.१०/११/१६५७ला भर रस्त्यावर ठार मारले होते कारण त्याने औरंगजेबाला वेढ्यातून सोडून दिले होते. यात खान महंमदाने विजापूरच्या रक्षणाचा विचार केला होता.) हा कारवारात येऊन पोहोचला. त्याच्या जवळ फौजही नव्हती. तो बहलोलखानाच्या आईला मक्केस जाण्यासाठी गलबत ठरवून देण्याकरीता कारवारला आला होता. अन् त्याला शिवाजी महाराजांच्या छाप्याची खबर मिळाली.

२१ फेब्रुवरी १७०७
औरंगजेबाचा नगरला दुपारी साधारण १२ वाजता मृत्यू. खुल्दाबाद येथे कबर.
श्री शिवछत्रपतिंच्या मृत्यूनंतर दख्खनेमध्ये उतरलेला मुघल पादशहा अखेर २७ वर्षे झूंझुन महाराष्ट्राच्या माती मध्येच दफ़न झाला.

२२ व २३ फेब्रुवारी १६६५
शिवाजी महाराजांचा कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता. येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापार्‍यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांकडे रूजू केली.

२३ फेब. १७३९
चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला.
चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.

२४ फेब्रुवारी १६६५
मग मात्र शिवाजी महाराजांनी कारवारला जराही तोशीस न देता कारवार सोडले. पण इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. ते जाता जाता म्हणाले, " आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली !"
नुकतीच होळी व शिवरायांचा ३६ वा वाढदिवस "तिथीने" साजरा झालेला होता.

२४ फेब्रुवारी १६७०
छत्रपति शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी "सकल सौभाग्य संपन्न सोयरा बाई साहेब" यांना पुत्र लाभ झाला,"रामराजे" नाव ठेवण्यात आले,रामराजे पालथे उपजले,राजियासी हे वर्तमान कळविण्यात आले...
राजियासी हे वर्तमान समजल्यावरी त्यांच्या मुखातून उदगार निघाले.
"रामराजे पालथे उपजले मग दिल्लीची पात-शाही पालथी घालतील."

२४ फ़ेब्रुवारी १६७०
राजगड येथे शिवबा राजेंच्या दुसऱ्या राणीसाहेब सोयराबाई यांच्या पोटी राजाराम यांचा जन्म .
पालथे जन्मल्यामुळे राजांनी "पुत्र पालथा जन्माला आला? चांगले झाले ...! दिल्लीची पातशाही तो पालथी घालील ... !" असे उद्गार काढून अशुभ शंकेचे सावट दूर केले.
पुढे १६८९ मध्ये श्री शंभू छत्रपति महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज मराठ्यांचे ३ रे छत्रपति झाले.

२४ फ़ेब्रुवारी १८१२
पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग

२४ फ़ेब्रुवारी १६७४
कुड्तोजी म्हणजेच मराठ्यांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना नेसरी येथे वीरमरण आले आणि पुन्हा एकदा मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हाच संदेश जगाला दिला..!!  बेहलोल खान नावाच्या बांडगुळाला पुन्हा पुन्हा माफ करून सुधा परत स्वराज्यावर चालून आल्यामुळे सातच मराठ्यांनी त्यावर हल्ला केला..!!
याच पराक्रमाचे वर्णन करताना कुसुमाग्रज म्हणतात "वेडात मराठे वीर दौडले सात"


२५ फ़ेब्रुवारी १८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली . त्यात २५ फेब. ला चाकणचा किल्ला ले. कर्नल डिफनने उद्धवस्त केला.

२७ फ़ेब्रुवारी १७३१
शाहू महाराज (सातारा गादी) आणि संभाजी महाराज (कोल्हापुर गादी ) यांनी कर्‍हाड येथे एकमेकांची भेट घेतली.

No comments:

Post a Comment

Website Security Test