Saturday, March 2, 2013

सप्टेंबर दिनविशेष



सप्टेंबर


२ सप्टेंबर १६७९
२ सप्टें रोजी मुंबई येथे तातडीची बैठक घेवून इंग्रजांनी एनसाईन ह्युजेसयाच्या अधिपत्याखाली सैनिकांच्या ६ तुकड्या घेऊन, तोफा बसवून ३ शिबाडे खांदेरी व भूमी यांच्या दरम्यान गस्त घालण्याकरिता पाठीवली कारण बांधकाम सुरु झाल्यापासून थळच्या किनाऱ्यापासून खांदेरीला सामानाचा पुरवठा सुरु होता. इंग्रजांचे असे ठाम मत होते की हे बेट इंग्लंडच्या राजाचे आहे व यावर मराठ्यांनी हक्क सांगू नये. सकाळी ८ वाजता कॅ. एन्साईन ह्यूजेस खांदेरीजवळ पोचला, पाहतो तर काय? मराठ्यांनी खांदेरी बेटावर चढायच्या सर्व जागी ३ फ़ूट उंच भींती बांधून त्या बंद केल्या होत्या. अशाच जागी मोक्याच्या ठिकाणी त्यांनी ४-६ तोफ़ाही ठेवल्या होत्या. बेटांवर तटाचे बांधकाम जोरात चालू होते. तोफ़ांचे गाडे तयार करून ठेवले होते. या बांधकामामुळे इंग्रज जागे झाले.

४ सप्टेंबर १६७९
कॅप्टन एनसाईन ह्युजेस खांदेरी आणि मुख्य भूमी दरम्यान गस्त घालीत ३ शिबडे घेऊन सज्ज झाला.ह्या वेळच्या पोर्तुगीज पत्रांवरून असे दिसते की पोर्तुगीज ह्या प्रकरणावर विशेष नजर ठेवून होते. पोर्तुगीजांच्या वसाहतींच्या उत्तर विभागातील किल्ल्यांचा प्रमुख Juaanv De’ Mello De Sampaeyu याला तर गवर्नरचा स्पष्ट सल्ला होता की इंग्रजांनी शिवाजीच्या विरोधात सामील होण्याकरिता विचारल्यास तटस्थ राहून आमचा शिवाजीशी तह आहे असे सांगावे.
ह्युजेस ने गस्त सुरु केल्यानंतर पुढचे सुमारे १० दिवस खांदेरीला पुरवठा बंद होता. ह्याच वेळी ह्युजेस ने ९ सप्टें रोजी मुंबईला संदेश रवाना केला व कळवले की मराठे तट उभारत असून ते तोफगाडेही तयार करताना दिसत आहेत. त्यांनी बेटावर आतील बाजूस काही खोपटी बांधली आहेत व विविध ठिकाणी आडोसेही तयार केले आहेत. ह्यादरम्यान मुंबईकरांना त्यांच्या सुरतेतील मुख्यालयाकडून हा प्रयत्न मोडून काढावा व बेट ताब्यात घ्यावे असा स्पष्ट आदेश आला व त्याप्रमाणे आता मुंबईकरांनी १६ तोफा असणारी रिवेंजनामक फ्रिगेट कॅप्टन विल्यम मिन्चीनच्या अधिपत्याखाली खांदेरीस रवाना केली.


४ सप्टेंबर १६७८
संभाजी राजे व येसुबाई साहेब यांना शृंगारपूर येथील मुक्कामी भवानीबाई नावाचे कन्यारत्न झाले.
श्री कृष्णजन्माष्टमी मागे पडली श्रावण वद्य एकादशीचा दिवस उमटला. शिर्क्याँच्या वाड्यातील बाळंतिणीच्या दालनात बालबोल फुटला .
'कन्यारतन आलं'. येसुबाई 'मासाहेब' झाल्या ! संभाजीराजे 'आबा' झाले ! राजकुळातील लाभाचे पाहिले नातमुख जन्मास आले...
महाराजांनी शंभू राजांना समर्थांकडे सज्जनगडावर जाण्यास सांगितले. संतसहवासामुळे शंभूराजांच्या उग्र स्वभावात काही सौम्यता येईल या आशेनेच महाराजांनी समर्थ रामदासांकडे जाण्याची आज्ञा शंभूराजांना केली. या आज्ञेप्रमाणे शंभूराजे सज्जनगडावर ऑक्टो महिन्याच्या सुमारास गेले. त्यांच्या सोबत येसूबाई नव्हत्या पण त्यांची दुसरी पत्नी दुर्गाबाई (प्रथम उल्लेख इतिहासात याच प्रसंगी आढळतो) आणि एक भगिनी होत्या. शंभूराजे आले खरे पण त्यांचे दुर्दैव म्हणा, स्वराज्याचे दुर्दैव म्हणा, महाराजांचे दुर्दैव म्हणा समर्थ सज्जनगडी नव्हते! भेट झालीच नाही आणि नियतीने घाव घातला ! याच काळात दिलेरखानाने शंभूराजांसोबत संधान बांधले, खानाला हेरांकरवी शंभूराजे सज्जनगडावर असल्याचे समजले.

४ सप्टेंबर १६५६
रायरी ताब्यात घेतल्यावर (मे १६५६ मध्ये) शिवरायांनी 'रायरी' चे 'रायगड' असे नामकारण केले होते.
रायरीहा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी ६ मे १६५६ रोजी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता.

५ सप्टेंबर १६५९
सकल सौभाग्य संपन्न, वज्र चुडे मंडित सईबाई राणी साहेब यांचे राजगडावर निधन. संभाजी राजे अकाली पोरके झाले. यावेळी शिवाजी राजे अफजल खानाचा सामना करण्यासाठी प्रतापगडावरती वास्तव्यास होते. काय घालमेल उडाली असेल नाही का महाराजांची ?

७ सप्टेंबर १६६१
शिवाजी राजांना कन्यारत्न झाले. तिचे नाव सकवारबाई ठेवले. पण कोणत्या राणीसाहेबांस हे कन्यारत्न झाले हे इतिहासास ज्ञात नाही.


७ सप्टेंबर १६७९
सिद्दी आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यान्नी खांदेरी भोवती १ मी. उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

७ सप्टेंबर १८१४
दुसऱ्या बाजीरावने पांडुरंग कोल्हटकर मार्फ़त 'उंदेरी - खांदेरी'चा ताबा पुन्हा मिळवला.

९ सप्टेंबर १६७१
इंग्रजांच्या मुंबई येथील गवर्नरने त्याच्या साहेबाला शिवरायासंदर्भात पत्र लिहीले. पत्रात तो म्हणतो,"शिवाजीच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे.
"khanderi in the hands of shivaji is a dagger pointed at the heart" (Mumbai)

११ सप्टेंबर १६७९
दर्यासारंग दौलतखान कुमक घेउन इंग्रजांबरोबरच्या लढाईसाठी माईनाक भंडारीच्या मदतीला खांदेरी येथे पोचला.
इंग्रजांची 'हंटर', 'रिवेंज' आणि इतर ३ लढाउ जहाजे खांदेरीला वेढा टाकून उभी होती. दौलतखानाने इंग्रज अधिकारी 'केग्विन'चा पाडाव केला, माईनाक भंडारीला रसद पोचती केली आणि 'नागाव'ला पुन्हा रसद घेण्यासाठी परत गेला.

१२ सप्टेंबर १६६६
आग्र्याहून सुटका करून घेऊन शिवाजी महाराजांचे त्यांच्या जिवलगांसहीत राजगडावर आगमन.
शिवाजी राजे व त्यांचे जिवलग हे संन्याशाच्या वेशात राजगडावर आले. प्रमूख संन्यासी होते निराजी रावजी व उर्वरीत शिष्य-गण.
या गोसाव्यांनी आऊसाहेबांना भेटण्याची इच्छा प्रगट केली. व आऊसाहेबही त्यांच्या इच्छेला मान देऊन राजगडाच्या पद्मावती माचीवरील सदरेवर 'दर्शनासाठी' आल्या. प्रत्येक महपुरूषाचे दर्शन घेत जेव्हा त्या महाराजांसमोर आल्या तेव्हा न राहावून महाराजांनी आपल्या माय माऊलीच्या पाउलांवर लोटांगण घातले व मायमाउलीच्या पाऊलांवर आश्रुंचा आभिषेक केला. आऊसाहेबांना अतिशय सुखद धक्काच होता तो !
आपण राजगडावरील सदरेवर जातो तेंव्हा या दिव्य प्रसंगाची आपल्याला कधी आठवण येते का हो ? का आपण केवळ तिथे चकाट्या पिटत बिड्या ओढतो ?
१७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी राजे व बाळ शंभूराजे पेटार्‍यासह आग्र्याहून निसटले होते. तर २० ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजीराजांनी दख्खनेमध्ये येण्यासाठी 'नरवीर घाटी' हे मुघली ठाणे खोटे दस्तक दाखवून ओलांडले होते. आग्र्याहून पसार झाल्यावर शंभूराजांना मथुरेमध्ये ठेवून अवघ्या ३ दिवसात राजांनी हे ठाणे ओलांडले.

१३ सप्टेंबर १७२०
१७१८ मधले २ हल्ले फसल्यावर इंग्रजांनी आंग्र्याँबरोबर तह केला.
पण १७२० मध्ये एका बाजूला बोलणी तर दूसरीकड़े लढाईची तयारी करत ते 'घेरिया'कड़े निघाले. मात्र आंग्र्यांची लढाईची तयारी बघून ते घेरिया सोडून देवगडावर हल्ला करायला सरकले.

१५ सप्टेंबर १६७९
कॅप्टन एनसाईन ह्युजेस आजारी पडल्याने त्याला विश्रांती देवून लेफ्टनंट फ्रांसिस थोर्पला रवाना करण्यात आले. थोर्प १७ सप्टें रोजी रिवेंज जवळ पोचला व मिन्चींच्या आदेशावरून तो खांदेरीच्या बेटाजवळ नांगर टाकून उभा राहिला. मिन्चीन ह्या वेळी बेट आणि भूमी यांच्या मध्ये वारयाची अनुकूलता पाहत रिवेंज घेवून गस्त घालीत होता. दि.१८ सप्टें च्या रात्री मिन्चीनला काही गोळाबरीचे आवाज आले व तपास करण्याकरिता तो १९ च्या सकाळी थोर्पच्या शिबाडाजवळ गेला. थोर्प त्यावेळी दारूच्या नशेत होता व त्याने आपण काळ रात्री बेटावर उतरण्याचा प्रयत्न केला परंतु काही लोकांना दिसल्यामुळे आपण परत आलोअसे मिन्चीन ला सांगितले. मिन्चीन यावर संतप्त होवून थोर्पला दिलेल्या आदेशाचे पालन कर व आततायीपणा करू नकोस असे सांगून रिवेंजवर परतला.मिन्चीन परतताच त्याला पुन्हा तोफांचे आवाज आले व त्याला दिसले की थोर्प दिवसाढवळ्या पुन्हा खांदेरीवर उतरण्याचा प्रयत्न करीत आहे.त्याने अविचारी थोर्पच्या कृत्यामुळे डोक्याला हात लावला.त्याने रिवेंजवरील सैनिकांना ताबडतोप थोर्पच्या मदतीकरिता पाठवले परंतु मदतीची होडी शिबडाजवळ पोचण्याआधीच त्याला २ शिबाडे परत फिरून येताना दिसली. परत येणाऱ्या शिबाडावरील सार्जंट Nash’ रिवेंजवर आला व त्याने घडली हकीगत सांगितली -
थोर्पने दारूच्या नशेत शिबाड खांदेरीच्या अत्यंत जवळ नेले व शिवाजीच्या माणसांशी त्याची बाचाबाची झाली व त्यांनी थोर्पच्या शिबाडावर गोळीबार सुरु केला, इतर २ शिबाडे मदतीला पोचण्यापूर्वीच थोर्पचे शिबाड खांदेरीच्या किनाऱ्याला लागले व मराठ्यांनी हल्ला करून ते शिबाड काबीज केले. या हल्ल्यामध्ये कॅप्टन थोर्प व इतर २ युरोपियन मारले गेले तसेच इतर बरेच सैनिक गंभीर जखमी झाले. खांदेरीवरील शिबंदीने शिबाड ताब्यात घेतले व त्याची डोलकाठी काढून घेतली व ते किनाऱ्याला लाऊन ठेवले आहे

१८ सप्टेंबर १६६७
शिवाजी महाराज 'स्वराज्याची पाहणी करण्याकरता' म्हणून कुडाळला गेले.
जानेवारी १६६८ मध्ये महाराजांनी गोव्यातील फिरंग्यांवर हल्ला चढविलेला आहे. याचे अवलोकन केल्यावर ते कुडाळला नेमक्या कोणत्या कारणासाठी गेले असतील याचा अंदाज बांधता येतो.

२२ सप्टेंबर १६६०
शिवाजी राजांच्या आज्ञेने पन्हाळगड सिद्दी जौहरच्या स्वाधीन.
१२ जुलै १६६६० ला पन्हाळावरुन निसटल्यावर शिवरायांना मुघलांशी लढायला वेळ हवा असल्याने आदिलशाहीकडून थोडी स्वस्थता हवी होती. योग्य राजकारण करून राजांनी पन्हाळगड सिद्दी जौहरच्या म्हणजेच आदिलशाहीच्या स्वाधीन केला.

२२ सप्टेंबर १६७९

लेफ्टनंट फ्रांसिस थोर्पने दारूच्या नशेत केलेला प्रतापाची स्थिती मिन्चीनने मुंबईला कळवली. त्याने कळवलेल्या वृतान्तानुसार तो बेटाच्या अगदी जवळ होता व त्याला आता रात्रीच्या वेळी मराठ्यांच्या एकमेकांना मारलेल्या आरोळ्या ऐकू येत होत्या. पुढे तो लिहितो की
मला तोफा डागून आता तटबंदी पाडणे अगदी शक्य आहे परंतु बेटावरील शिबंदी मात्र चकवून आडोसा घेवून लपून बसते व त्यामुळे त्यांचे काहीही नुकसान होत नाही. तट पाडून आपल्या देशबांधवांच्या मृत्यूचा बदल घेणे शक्य असले तरी याने फायदा काहीच होणार नाही कारण तट ते पुन्हा बांधतील व आपला दारूगोळा उगाचच वाया जाईल.तो कळवतो की शिवाजीराजाचे आरमार आज किंवा उद्या येईल असा विचार करून मी येथे नांगर टाकून आहे पण जर बेटावरील तोफांचा मारा उध्वस्त करायचा असेल तर मला बेटाच्या आखातात शिरावे लागेल परंतु तसे केल्यास व नेमका हल्ला झाल्यास मला केवळ दक्षिणेचा वारा अनुकूल आहे. तेव्हा मला बाहेर पडता येणार नाही व रिवेंज अलगद मराठ्यांना मिळेल त्यामुळे उगाच पुढे जाऊन अडचणीत अडकण्यापेक्षा रिवेंज लांब ठेवण्यात शहाणपण आहे, तरी पुढील योजना सुचवावी”.

२४ सप्टेंबर १६७९
मिन्चीनच्या पत्राला २४ सप्टेंबर रोजी उत्तर आले व मुंबईकरांनी कळवले की दौलतखानाच्या अधिपत्याखाली शिवाजीराजांचे एक मोठे आरमार खांदेरीच्या रोखाने येत असल्याची खबर हेरांकरवी मिळाली आहे तरी तूर्त सार्जंट फुलरच्या नेतृत्वाखाली आम्ही १ मचवा व सुमार १५ सैनिक पाठवत आहोत त्यांना गस्तीचा ताबा देवून आपण त्वरीत डागडुजी व नौकांच्या देखभाली करिता परत यावे. फुलर सोबत मुंबईहून जखमींना घेवून गेलेले शिबाडही परत आले होते. सार्जंट फुलरच्या ताब्यात गस्त देवून मिन्चीन मुंबईला परतला.
मुंबईकरांना आता पक्की खबर मिळाली की दौलतखान मोठे आरमार (सुमारे २० गुराबा) घेवून खांदेरीच्या दिशेने येत आहे. तेव्हा युद्धासाठी सज्ज असे मोठे आरमार आता अनुभवी कॅप्टन रिचर्ड केग्वीन याच्या नेतृत्वाखाली खांदेरीच्या नाकेबंदिकारिता पाठवण्याचा निर्णय मुंबईकरांनी घेतला. ह्या नाविक सैन्यामध्ये रिवेंज ही १ फ्रीगेट तर होतीच शिवाय २ गुराबा (यातील एकीचे नाव डव्ह होते), ३ शिबाडे , २ मचवे होते. ह्या सर्व ताफ्यावर सुमारे २०० अधिक सैनिक तसे इतर नावाडी लोक होते. इंग्रजांना वाटत होते की हे आरमार पुरेसे आहे. तरी त्यांनी कॅप्टन केग्वीन ला आदेश दिले की दौलतखानाशी थेट झुंज करू नये अगोदर त्याला बेट इंग्रजांचे आहे हे पटवावे व त्याने न ऐकल्यास शक्तीचा प्रयोग करावा. आदेशानुसार सज्ज ताफा घेवून ८ ऑक्टोबर १६७९ रोजी केग्वीन नाकेबंदीवर पोचला. १० तारखेला त्याला खबर मिळाली की दौलतखान खांदेरीच्या दिशेने येत आहे.

२४ सप्टेंबर १६५६
सुपे गढी शिवाजी राजांकडून जप्त. पैसे खाऊन बादशाहीचे राज्य चालविणार्‍या मोहिते मामांना मुसक्या बांधून धरले व त्यांची कर्नाटक प्रांती रवानगी. हे मोहिते मामा म्हणजे शिवाजी राजांचे प्रत्यक्ष मामाच होते. पण तरिही शिवरायांनी अन्यायाविरूद्ध श्रीकृष्णाचाच कित्ता गिरवला.

२४ सप्टेंबर १६७४
छत्रपति शिवरायांनी रायगडावर 'तांत्रिक पद्धतीने' स्वतःस पुन्हा राज्याभिषेक करून घेतला. नाशिक येथील निश्चलपुरी गोसावींच्या सांगण्यावरुन त्यांनी हा राज्याभिषेक केला.

२४ सप्टेंबर १६९०
संभाजी महाराज ११ मार्च १६८९ रोजी गेले, मराठा रियासतीवर शोककळा पसरली. काही काळ मराठ्यांचा निर्घुण पाडावच झाला. मराठ्यांचे अनेक किल्ले मोगलांच्या ताब्यात गेले. अशाच वेळी राजाराम महाराजांनी सूत्रे हातात घेऊन खंबीरपणे लढा दिला. जणू मोडलेले डाव पुन्हा उभारणे हा मराठ्यांचा रक्तगुणच आणि ह्याच गुणावर संताजी धनाजी आणि कित्येक ज्ञात अज्ञात
मावळ्यांच्या भीम पराक्रमामुळे ही गोष्ट साधता आली म्हणू.



२५ सप्टेंबर १६७४
प्रतापगडावरील घोड्यांच्या पागेवर वीज कोसळून कित्येक सुंदर घोडे जळाले. यांत एक हत्तीही होता. जिजाऊसाहेबांच्या निधनानंतर (१६ जून १६७४) लगेचच काही दिवसांनंतर ही हृदयद्रावक घटना घडली.

२७ सप्टेंबर १६६५
औरंगजेबाचे शिवाजी महाराजांच्या नावाने कृपेचे फर्मान व पोशाख येऊन दाखल. मिर्झा राजांच्या हुकूमाने शिवाजी राजे तळकोकणातून येऊन मिर्झा राजे जयसिंहाच्या छावणीत दाखल. पुरंदरच्या तहाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू.

३० सप्टेंबर १६६७
औरंगजेबाचा सरदार मिर्झा राजा जयसिंगचे निधन.



No comments:

Post a Comment

Website Security Test