Friday, March 1, 2013

एप्रिल दिनविशेष



एप्रिल


१ एप्रिल १७३१
श्रीमंत सरसेनापती त्रिंबकराव खंडेराव दाभाडे डभोईच्या युद्धात धारातीर्थी पडले.

१ एप्रिल १६७३
मराठ्यांनी परळीचा किल्ला जिंकला.
पुढे शिवरायांनी आपल्या सद्गुरूस अर्थात समर्थ रामदास स्वामी महाराजांना या गडावर आदरपूर्वक बोलवून घेतले व गडाचे नाव ठेवले सज्जनगड.
सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे. या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले. या गावात २ अतिशय जीर्ण अशी मंदीरे आहेत. सुरेख. पण औरंगजेबाच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झालेला आहे. मुंडी छाटलेला नंदी अजूनही मंदीरा समोर उभा आहे.
पुर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती. म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग. मग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला. मग शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड. मग औरंगजेबाने जेंव्हा किल्ला जिंकला तेंव्हा त्याने नाव ठेवले 'नवरसतारा'. पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचा 'सज्जनगड' म्हणून नामकरण विधी केला.

२ एप्रिल १६७९ जिझिया कर
आलमगीर अर्थात औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले.
आता जिझिया म्हणजे काय? असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल. कारण "अकबराने जिझिया कर बंद केला" इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे. पण हा जिझिया म्हणजे काय?
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्‍या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत. एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू. मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन "जिम्मी" म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
शेख हमदानीने लिहिलेल्या "जसीरात-ए-मुल्क" प्रमाणे जगण्यासाठी खलिफ़ा उमरने मुस्लिमेतरांना इस्लामी देशात पुढील अटी घातल्या.
१) त्यांनी नवीन मंदीर अथवा प्रार्थनास्थळ बनवू नये.
२) तोडलेल्या जुन्या इमारतीचे पुर्निर्माण करू नये.
३) मुस्लिम यात्रेकरूंना मुस्लिमेतरांच्या मंदीरात रहाण्यावर बंधन राहणार नाही.
४) कोणताही मुसलमान कोणत्याही बिगर मुस्लिम व्यक्तीच्या घरी ३ दिवस राहू शकेल. त्या काळात त्याने केलेले कोणतेही कृत्य गुन्हा मानला जाणार नाही.
५) जर मुस्लिमेतरांची सभा असेल त्या सभेत मुसलमानांना भाग घेण्यास प्रतिबंध न करणे.
६) मुस्लिमेतरांनी मुस्लिमांसारखी नावे ठेऊ नयेत.
७) त्यांनी मुस्लिमांसारखा पोषाख वापरू नये.
८) लगाम, खोगीर असलेला घोडा वापरू नये.
९) धनुष्य बाण व तलवार वापरू नये.
१०) अंगठी वापरू नये.
११) त्यांनी दारू विकू नये वा पिऊ नये.
१२) त्यांनी जुना पोषाख बदलू नये.
१३) आपले रितीरिवाज व धर्म यांचा प्रचार करू नये.
१४) आपल्या मृतांची शवे त्यांनी मुस्लिम कबस्तानाजवळ आणू नयेत.
१५) आपल्या मृत व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करू नये.
१६) त्यांनी मुस्लिम नोकर ठेऊ नये.
१७) त्यांनी हेरगिरी करू नये वा हेरांना मदत करू नये.
यातील एखाद्या जरी अटीचा भंग झाला तर भंग करणार्‍याला मृत्यूदंड व त्याची मालमत्ता एखाद्या युद्धकैद्याप्रमाणे जप्त केली जाई.

२ एप्रिल १६७९
दिलेरखान व संभाजी राजांचा भूपालगडावर कब्जा. ७०० मराठ्यांचे हात तुटले. 
संभाजी राजे या कालखंडात दिलेरखानास मिळाले होते. इतिहासाचा हा एक दुर्दैवी अध्याय आहे. इतिहास हा कधी कधी कडू असतो. त्यातीलच हे एक पान.
भूपालगडावर फिरंगोजी नरसाळे हे किल्लेदार होते. दिलेरने टेकडीवर तोफा चढवल्या, तोफांच्या मा-याने किल्ल्याचा बुरुज ढासळला. एका प्रहरात किल्ला मोगलांच्या हाताला लागला. मराठ्यांकडून प्रतिकार झालाच नाही कारण दिलेरखानाने शंभूराजांना पुढे केले होते.
शंभू राजानी फिरंगोजी नरसाळे यांना एक पत्र धाडले होते त्यात लिहले होते की “स्वराजाचा युवराज म्हणून किल्ला खाली करण्याची अर्जी करत आहोत.” (उल्लेख "स्वराजाचा युवराज" म्हणून केला होता दिलेरखानचा सरदार म्हणून नाही)
फिरंगोजी नरसाळे यांनी संभाजी राज्यांविरूद्ध त्यांनी तलवार उचलली नाही.
भूपालगड संभाजीराज्यांच्या ताब्यात देऊन ते महाराजांकडे रायगडावर निघून आले. याबद्दल महाराजांनी फिरंगोजींची खूप खरडपट्टी काढली. तसेच सर्व गडांवर निरोप धाडले की संभाजीराजे जातीने आले तरी तलवार चालवणे. गड ताब्यात न देणे.
इकडे, आजू बाजूच्या परगण्यातील मराठ्यांना या हल्ल्याची माहिती कळाली तर ते मदतीस येऊन पोहोचतील या भीतीने दिलेरखानने  लगेच इखलासखान, जसवंतसिंग बुंदेला व रशीदअली रोशनाई यांना रक्षणाकरिता नामजाद केले, किल्ल्यावरील सर्व मनुष्यास कैद केले गेले.
जी ७०० मावळे कैद झाले होते त्या प्रत्येकाचा एक हात कापून त्यास सोडून दिले, बरीच मनुष्ये गर्दीत ठार झाली.
यानंतर दिलेरखानाने आपला मोर्चा विजापुरकडे वळवला. त्याच्या जवळ २० हजार फौज होती. विजापूरला त्याने डिसेंबर १६७९ मधे विजापूरला वेढा घातला पण विजापूरकरांनी दिलेरखानास चांगला प्रतिकार केला

२ एप्रिल १७२०
छत्रपती शाहू महाराजांचे अत्यंत विश्वासू आणि पेशवेशाहीचे पहिले पेशवे पंतप्रधान बाळाजी विश्वनाथ यांचे सासवड येथे निधन झाले.
सरुवातीला बाळाजी विश्वनाथ यांनी रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणुन आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वत: अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. महाराष्ट्राचा छत्रपती त्याने हाल-हाल करुन मारला होता. अशाच अस्मानि-सुल्तानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होतं. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळुन सगळ अनुभवत होते. १७०५ च्या दरम्यान त्यांनी देखिल आपली समशेर गाजवली आणि बहुतेक ती जस्तच परजली असावी कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजी विश्वनाथना पुण्याची सुभेदारी मिळाली,  १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखिल मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे –
"श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"

३ एप्रिल १६६२
मोरोपंत पिंगळे हे आतापर्यंत मुजुमदारी करीत होते. त्यांची ही मुजुमदारी निळोपंत सोनदेवांस दिली. शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पेशवे पद दिले.

३ एप्रिल १६६७
आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला.
आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबाने सोडले. माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले गेले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही.

३ एप्रिल १६८० - चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १६०२
शौर्य, धैर्य, पराक्रम, नितीमत्ता, प्रजाप्रेम, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवला मुक्त करणारे आणि ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे आमचे नाही तर ह्या सकल त्रिलोकाचे पालनकर्ते,तारणहार राजमान्य राजश्री,अखंड लक्ष्मी अलंकृत,महापराक्रमी,महाप्रतापी महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज हे सर्व त्रीलोकाला पोरके करून अनंतात विलीन झाले.. ज्यांच्या उपकारांची परतफेड आपल्याला आणि येणाऱ्या हजारो पिड्या हि करू शकत नाही व आज हि ज्यांच्या जाज्वल्य स्मृती आपल्या सारख्या त्यांच्या लेकरांना ह्या अनंत अत्याचाराने व पापाने बरबटलेल्या कलियुगात जगण्याचे सामर्थ्य देतात अशा ह्या अलौकिक,अद्वितीय महामानवास आमचे कोटी कोटी शीरसाष्टांग प्रणाम..

अनेक जुल्मी हुकुमातिन्चा समूळ नाश करून एक झंझावत विसावा घेतोय
पण गद्दरानो ख़बरदार,हा झंझावत पुन्हा जागृत होईल,
लाखो वावटळना साथीला घेउन हा झंझावत ज्वालामुखीचा अवतार घेईल,
ह्याच ज्वालामुखीचा एक दिवस उद्रेक होऊन तुमच्या क्रूर साम्राज्याचा विनाश करेल .व पुनश्च ह्या धरतीवर स्वराज्य नांदेल..
जय शिवराय जय शिवराय जय शिवराय

४ एप्रिल १६७०
नगर मध्ये मराठे घुसलेले पाहून दाऊदखान कुरेशी हा खानदेशातून त्वरेने अहंमदनगरास ७००० स्वारांसह आलेला होता.
मग नगर मध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊद खान त्यांच्या मागे हात धूऊन पळत सुटला. जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पूरते पळून गेले. मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.
पुढे दाउद खान नगरहून औरंगाबादेस गेला आणि मराठे पुन्हा नगरमध्ये घुसले व त्यांनी तेथील ५१ गावे लुटली.

४ एप्रिल १७७२
पेशवे माधवराव यांची तब्येत खालावल्याने त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यासाठी हरिहरेश्वर येथे गेल्या.

५ एप्रिल १६६३
शास्ताखानास स्वराज्यात घुसून दोन वर्षे होऊन गेली होती. डुकराप्रमाणे स्वराज्याची नासधूस त्याने चालविली होती. बंदोबस्त आवश्यकचं होता. राजेंचा लालमहाल त्याने कब्ज्यात घेतला होता. त्यामुळे शास्ताखानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती. राजगडी विचारचक्रे सुरु झाली. त्यातच शास्ताखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजेंनी सांगितला. त्याप्रमाणे एकाअद्भूत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली.
सर्वप्रथम दिवस ठरवला गेला. शोभान नाम संवत्सर शके १५८५ ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी हल्ल्यासाठी निवडली गेली. हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्रीनंतर व्हायचा होता. त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती. ५ एप्रिल १६६३ (रात्री १२ नंतर ६ एप्रिल) मुसलमान कालगणनेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी सहावा चंद्र होता. या शिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हां दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस.
चैत्रशुद्ध अष्टमी उजाडली. सर्व योजना आखली गेली होती. हुजुरपागेतून महाराजांनी १००० निवडक धारकरी माणूस निवडले. वरकड लष्करातून २००० सडे सडे राऊत घेतले. राजगडाहून महाराज सिंहगडी आले. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. सिंहगडाच्या दिशेनेच जसवंतसिंह हा मोगली सरदार दहा हजार घोडदळासह तळ ठोकून बसलेला होता. त्याच्या नकळत छापा घालायचा होता. म्हणून रात्री आडमार्गे जायचे ठरले
महाराज पुण्याच्या अलीकडे १ मैलावर आंबीलवोढ्या जवळ येऊन थडकले. बहुधा ते डोणज्याच्या खिंडीने उतरून आले असावेत. महाराज सैनिकांच्या एका तुकडीत मिसळून होते. या तुकडीचे नेतृत्व बाबाजी व चिमणाजी या बंधूंकडे होते. चिलखत, जिरेटोप, ढाल, तरवार, अशा पूर्ण तयारीत महाराज होते. ही तुकडी चालत चालत शास्ताखानने बसवलेल्या चौकीपहाऱ्याच्या दरम्यान आली. आणि चतुराईने आत दाखल झाली सुद्धा
असेही मोगली छावणी म्हणजे प्रचंड गबाळेपणा अशी त्यांची ख्याती होती. कॉस्म द गार्द्र अशा छावन्यांचे वर्णन करताना म्हटले आहे. की, The moorish armies are like big cities, as many people follow them and come to the camp at all hours without being questioned
ऐन मध्यरात्र.
...सारी छावणी सूस्त होती. या छावणीत मराठी मंडळीही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतः बरोबर ४०० निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारांत चिणलेले चिरे उचकटून हे लोकं आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाइस्तेखान घाईने, खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला. आणी आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढाईला आला.
आता इतक्या अंधारात याच्या बापानी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरले होते काय ? तिथेच तो मरायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खान मध्ये धावला. त्यामुळे खान बचावला, पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धांवत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले. अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला.महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले.
या युद्धात महाराजांची सहा माणसे ठार झाली व चाळीस जखमी झाली. जखमी झालेल्यांमध्ये कोयाजी बांदल हे सुद्धा होते.
रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, बारा बिव्या, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते.
सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता.
दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले...

५ एप्रिल १७१८
मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला.
पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होउन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही."

६ एप्रिल १७५५
पेशव्यांनी (खरे तर इंग्रजांनी) तूळाजी आंग्रे याच्याकडून फत्तेगड आणि कनकदुर्ग जिंकुन घेतले.
२२ मार्च १७५५ रोजी झालेल्या इंग्रज - पेशवे तहाप्रमाणे इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तूळाजी आंग्रेवर (सुवर्णदुर्गावर) स्वारी करण्यासाठी मुंबईहून निघाले होते.

७ एप्रिल १८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ७ एप्रिलला देवगड विनासायास इंग्रजांच्या ताब्यात गेला.

८ एप्रिल १६५७
२७ वर्षीय शिवाजीराजे यांचा जाधवरावांच्या काशीबाई यांच्याशी विवाह.

८ एप्रिल १६६३
नबाब शाईस्तेखान पुणे सोडून औरंगाबादला बोंबलत गेला.

८ एप्रिल १६७४
चिपळूण येथे शिवाजी महाराजांनी लष्कराची पाहणी केली.
राजाभिषेकापूर्वी प्रतापराव गुजर यांच्या युद्धभूमीवरील मृत्यूमुळे सरनौबत पद हंभिरराव मोहिते यांस बहाल.

८ एप्रिल १६७८
'दक्षिण दिग्विजय' मोहिम जिंकून छत्रपति शिवाजी महाराजांचे पन्हाळगड येथे आगमन.

८ एप्रिल १७८३
आनंदराव धुळूप यांनी इंग्रज आरमाराविरुद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.

९ एप्रिल १६३३
मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला.

९ एप्रिल १६६९
उत्तर हिंदूस्थानातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेबाकडून विशेष फौज तैनात.
सूर्य ग्रहण आले यां सूर्यग्रहणाच्या मुहूर्तावर काशी विश्वेश्वराचे देवालय जमीन दोस्त करण्याच्या हुकुम बादशहाने सोडला या पाशवी हुकुमाने जणू निसर्ग थरारला होता.

९ एप्रिल १६७०
औरंगजेबास एकंदर ५ मुली होत्या. त्यापैकी तिसरी कन्या बदरुन्नीसा ही ९ एप्रिल १६७० ला वारली.

९ एप्रिल १६६०
पुण्यावर नेमलेला मोगल सरदार इह्तशामखान हा मेला; यावेळी त्याच्या जागी मिर्झाराजांनी कुबादखानाची नेमणूक केली.

१० एप्रिल १६६०
राजापूरचा प्रसंग विसरून इंग्रज पन्हाळ्याच्या वेढ्यात मिसळले व गडावर महाराजांच्या विरोधात ब्रिटिश निशाण उभारून स्वतःच्या तोफा डागायला सुरूवात केली.

१० एप्रिल १६९३
१६८९ मध्ये राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज 'जिंजी' (सध्या तामिळनाडू मध्ये) येथे गेले होते.
तेथेच त्यांनी स्वतःला राजाभिषेक करवून घेतला आणि राज्याची सूत्र काही काळासाठी त्यांनी तिकडून पाहिली. ह्या दरम्यान १० एप्रिल १६९३ रोजी त्यांनी कोल्हापुर गादीचे शहाजीराजे (दुसरे) यांची भेट घेतली.

११ एप्रिल १७३८
वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली. त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती.

१२ एप्रिल १७०३
मुघल फौजांचा सिंहगडावर तोफांचा मारा सुरु. औरंगजेब स्वतः जातीने सिंहगड जिंकून घेण्यास हजर.

१३ एप्रिल १६६३
नुकत्याच जिंकलेल्या कोकणात एक दौड मारून, पुढच्या म्हणजे पावसाळ्यानंतरच्या मोहिमेची आखणी करण्याकरीता शिवाजी महाराज राजगडावरून कोकणांत उतरले. ते पुढे तळकोकणात कुडाळ पर्यंत गेले.

१३ एप्रिल १७०४
संग्रामदूर्ग उर्फ़ चाकणचा किल्ला सोडून औरंगजेब खेड, राजगुरुनगरकड़े निघाला.

१३ एप्रिल १७३१
छत्रपति शाहू (सातारा) आणि छत्रपति संभाजी (कोल्हापुर) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद.

१३ एप्रिल १७००
राजाराम राजे जाउन महिना होउन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिल च्या पहाटे मोग्लांनि किल्ल्याच्या तटा खली दोन भुयारे खणली आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गाढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले.
गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंग्जेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली.

१४ एप्रिल १६६४
जसवंत सिंह राठोड याने सिंहगडावर सुलतालढवा केला. हा एकमेळाने केलेला हल्ला मराठ्यांनी उधळून लावला. जसवंत सिंहाची पाठ मराठी चित्त्यांनी फोडून काढली.

१४ एप्रिल १६६५
इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखान, फतेलष्कर, अब्दुल्ला व महेली या मोगलांनी ३ तोफांच्या सहाय्याने वज्रगड/वज्रमाळ जिंकला. वज्रगड किल्ला पुरंदर किल्ल्याशेजारीच त्याचा धाकटा भाऊ होऊन उभा आहे. ३१ मार्च रोजी पुरंदरचा वेढा सुरु झाला होता.

१४ एप्रिल १८९५
लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने रायगडावर पहिला २ दिवसीय शिवस्मरण दिन साजरा.

१५ एप्रिल १६७३
स्वराज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली.
प्रतापराव गुजरांनी बहलोल खान पठाणास धर्मवाट देऊन विजापूरच्या दिशेने परत सोडून दिले.
आणि इथूनच सुरूवात झाली एका नव्या वादळाची.
राजांनी प्रतापराव गुजरांना चांगलेच फ़ैलावर घेतले. "सरसेनापती असूनही हा कोणता न्याय केलात? हाती आलेल्या गनीमास धर्मवाट दिलीत? गनीमास धुळीस मिळवल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका".
होय, राजांचे शब्द म्हणजे अंगार होते. एखाद्या निखार्‍याप्रमाणे ते शब्द रावाच्या कानांमध्ये घुसले.प्रतापरावाचा विजयाचा उन्माद क्षणात मावळला आणि बहलोलखानाला पराभूत करण्यास नव्या जोमाने योजना आखू लागला.

१५ एप्रिल १६४५
शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या १५ एप्रिल रोजी, वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी शिवाजी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली.

१५ एप्रिल १६६७
शिवाजी राजे आणि पुतळाबाई यांचा विवाह.

१५ एप्रिल १७३९
वसई किल्ल्यावरील मराठ्यांच्या हल्यामध्ये पोर्तुगीज ऑफीसर पिंटो आणि सिलवेरा यांचा मृत्यू.

१६ एप्रिल १६४०
शके १५६२ विक्रमनाम संवत्सरी वैशाख शुद्ध पंचमीस म्हणजे गुरुवार दि. १६ एप्रिल १६४० रोजी निंबाळकर पवार घराण्याच्या सईबाईंशी शिवाजी महाराजांचे पहिले लग्न झाले.

१६ एप्रिल १७७५
आनंदीबाईसाठी फितूरी करणाऱ्या येसाजी विश्वासराव आणि रामचंद्र सावंत यांना अशेरीगडच्या किल्लेदाराने मारून टाकले.

१७ एप्रिल १६७५
फोंड्याच्या स्वारीमध्ये मराठा फौजांनी छत्रपति शिवरायांच्या उपस्थितीत किल्ल्याचा मुख्य बुरुज उडवला.

१७ एप्रिल १७२०
बाळाजी बाजीराव यांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी पेशवेपद बाजीरावास बहाल केले. हा सोहळा कर्‍हाड जवळील मसुरे गावी संपन्न झाला.

१७ एप्रिल १७३९
छत्रपती शाहू महाराज आणि नानासाहेब यांची म्हैसळ गावी भेट.

१८ एप्रिल १६७७
त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन.
आग्र्यामध्ये रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार, सोमवार २० ऑगस्ट १६६६ रोजी फुलौतखान कोतवालाने केलेल्या झाडाझडतीत सापडले सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी त्यांचे जे हाल झाले ते पाहून प्रत्यक्ष यमराजही कळवळले असतील. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून 'ब्र' ही निघाला नाही. जर बोलले असते तर संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.
या दोघांना लाकडी खोड्यात करकचून आवळण्यात आले. हे सर्व हाल शिवाजीमहाराज कसे गेले , कुठे गेले , कोणत्या मार्गांनी गेले याचा शोध घेण्यासाठी फुलादखानाने चालवले होते. या दोन्ही वकिलांच्या नाकांच्या पाळ्या चिमट्यात धरून त्यांची डोकी वर करण्यात आली. मीठ कालविलेल्या गरम पाण्याच्या पिचकाऱ्या नाकपुड्यांत घालण्यात आल्या आणि त्या पिचकाऱ्यांतील पाणी जोराने त्यांच्या नाकात मारण्यात येत होतं आणि इतर प्रकारे तर अनेक हाल , छळवणूक.
या दोघांची सुटका कशी करता येईल , याची चिंता महाराज करीत होते.
महाराजांनी आग्ऱ्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या दोन वकीलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तजुर्मा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा यात छापले आहे. त्यातील मुख्य विषय असा की ,
' मी आपली परवानगी न घेता आग्ऱ्याहून निघून आलो , याचे मला वाईट वाटते. मी पूवीर्प्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. '
औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्याने त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या दोन वकीलांची दि. ८ एप्रिल १६६७ रोजी सुटका केली.
सुमारे नऊ महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. त्यांच्या भेटीने महाराजांना आणि महाराजांच्या भेटीने त्यांना काय वाटले असेल?  येथे शब्द थबकतात. प्रेम ना ये बोलता , ना सांगता , ना दाविता , अनुभव चित्ता चित्त जाणे! १८ एप्रिल १६७७ रोजी त्र्यंबक सोनदेव डबीर यांचे निधन झाले.

१८ एप्रिल १७०३
महत् प्रयासाने औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. गडाची व्यवस्था लावण्यात आणि पावसाळा संपायची वाट बघत तो तिकडेच ठाण मांडून बसला. पावसाळा संपला की राजगडकडे कूच करायचा त्याचा मनसुबा होता.

१८ एप्रिल १७७४
पेशवे सवाई माधवराव यांचा किल्ले पुरंदरावर जन्म.
त्यांचा अधिकारकाळ इ.स. १७८२ - इ.स. १७९५ हा इतका होता , त्याचे पूर्ण नाव माधवराव नारायणराव भट (पेशवे) त्याचा जन्म इ.स.१७७४ १८एप्रिल रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला.
हे मराठा साम्राज्याचा पेशवा, अर्थात पंतप्रधान होते. यानी इ.स. १७८२ ते इ.स. १७९५ या काळात मराठ्यांच्या पेशवाईची सूत्रे सांभाळली. रघुनाथरावाच्या कारस्थानातून हत्या झालेल्या पेशवा नारायणरावाचा हे पुत्र होते.
सातारा दरबाराच्या संकेतांनुसार पदारूढ पेशव्याचा पुत्र पुढील वारसदार ठरत असल्यामुळे, माधवराव नारायणाचा पेशवेपदावर कायदेशीर त्याचा हक्क होता. परंतु नारायणरावाच्या हत्येनंतर पेशवाईवर हक्क सांगणाऱ्या रघुनाथरावाला पुणे दरबारातील बारभाईंनी पेशवेपदापासून दूर ठेवले व माधवराव नारायणास सातारच्या छत्रपतींकडून पेशवाईची वस्त्रे देववून पेशवेपदावर बसवले. पदारूढ होतेवेळेस माधवराव नारायण अल्पवयीन असल्यामुळे आरंभी नाना फडणवीस कारभारी म्हणून कामकाज पाहत होते.

१९ एप्रिल १८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी किल्ले आणि महत्वाची शहरे ताब्यात घेतली. त्यात १७ एप्रिल रोजी नाशिक शहराचा पूर्ण ताबा कॅप्टन ब्रिजने मिळवला.

२० एप्रिल १६६५ ची रात्र
शिवाजी महाराजांनी पुरंदरावर कुमक पाठवली. यावेळी पुरंदर मिर्झा राजे जयसिंह व दिलेर खान पठाण या दैत्यांशी झुंजत होता. कशी कुणास ठाऊक? पण केदार दरवाज्याने ही कुमक गडावर पोचली.

२० एप्रिल १७४०
रावेरखेडी (सध्या मध्यप्रदेशयेथे) मुक्कामी थोरले बाजीराव पेशवे यांची प्रकृति बिघडली.

२० एप्रिल १७७५
नारो शंकर यांचे पुत्र रघुपंत नारायण यांचा पेशव्यांतर्फे जहाँगीर देउन सत्कार. नारों शंकर यांचा जानेवारी १७७५ मध्ये मृत्यू झाला होता. त्यांनी केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या पश्चात् त्यांचा मुलाला जहाँगीर दिली गेली.

२० एप्रिल १७५८
तापी, नर्मदेच्या सलीलाने तहान न भागलेल्या आमच्या अभिमानी अश्वांना आता गंगा,यमुना आणि सिंधू माईचे ते तीर्थ आकंठ प्यावयाचे होते.साम्राज्य स्वप्नाची इर्ष्या मनी बाळगणारा तो सूर्य आपल्या मध्यान्ही तळपू लागला होता. दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढणाऱ्या या स्वराज्याला आता नवीन ओळख निर्माण झाली होती आणि त्याला एक नवे नाव मिळाले होते …. मराठा साम्राज्य !
शिवाजीराजांचे अहत तंजावर ते तहत पेशावरचे स्वप्न आज पूर्ण झाले होते. स्वकर्तुत्ववान अभिमानी मराठी जरीपटका अटकेवर फडकत होता आणि याची जबाबदारी सांभाळत होते अत्यंत हिशेबी आणि चाणाक्ष असणारे बाळाजी बाजीराव पेशवे उर्फ थोरले नानासाहेब पेशवे.नानासाहेब पेशव्यांनी शिवाजी राजांच्याच धोरणांचा अवलंब करून स्वराज्याला साम्राज्यात रुपांतरीत करण्याची खटपट केली, यामागे छत्रपतींचे विचार होते, बाजीराव व चिमाजीअप्पांची मेहनत होती आणि साथ होती लाल मातीत अंग घुसळणाऱ्या अन् आपल्या माथी तीच माती अभिमानाने लावणाऱ्या शूर मराठमोळ्या सरदारांची. नावे तरी किती घ्यावीत नेमाजी शिंदे, मानाजी पायगुडे, राघोबादादा, साबाजी शिंदे, दत्ताजी शिंदे, बळवंतराव मेहेंदळे, अंताजी माणकेश्वर, विठ्ठल शिवदेव, दामाजी गायकवाड, यशवंतराव पवार, समशेरबहाद्दूर, मल्हारराव होळकर, विसाजी कृष्ण बिनीवाले, रामचंद्र गणेश कानडे, अंबाजी इंगळे, इब्राहिमखान गारदी, कुठे गोविंदपंत बुन्देल्यासारखी मुरब्बी हाडे तर कुठे सदाशिवरावभाऊ, विश्वासराव, महादजी, जनकोजी, तुकोजी सारखे तरणेबांड फाकडे गडी !
हा काळ ठरला सार्थ पराक्रमाचा …. मराठा साम्राज्याचे स्वप्न साकारणारा !

ज्यांनी बाहुबले रणांत सगळे जिंकूनियां हो अरि
कीतींचे ध्वज आपुले उभविले या आर्यभूमीवरी,
त्यांचे पुत्र अम्हांस आज सहसा सोडूनिया चालतां.
खेदानें न रडे खरा कवण तो सांगा मराठा अतां?               

राणोजी परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,
मल्हारी - परिसूनि नांवच अहो ज्याचें मराठा स्फुरे,
हा ! हा ! तत्कुलदीप हे विझुनियां गेले भले आज ना !
हा! हा! तत्कुलवृक्षगुच्छ बरवे कोमेजले आज ना!             

वृत्त-शार्दूलविक्रीडित जुलै १८८६
'यथामूल आवृत्ती', १९६७, पृ.६

२१ एप्रिल १७००
अजिंक्यतारा गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनि तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला, तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल रोजी शरणागती पत्करली.
आता त्याने आपला सरदार फत्ते-उल-खान याला सज्जनगड जिंकण्यास पाठवले.

२१ एप्रिल १७७९
सवाई माधवराव पेशवे यांची पुण्यामधील पर्वती येथे मुंज संपन्न.

२२ एप्रिल १६६७
महाराज आग्र्याहून अकस्मातपणे पळून गेल्यामुळे औरंजेबाची नाच्चकी झाली, संशयापोटी त्याने मिर्झा राजांना दक्षिणेतून परत बोलवण्याचा हुकुम सोडला आणि औरंगाबादेस शहजादा मुअज्जम याला सुभेदार म्हणून नियुक्त केले, याच संधीचा फायदा घायचे शिवाजी महाराजांनी ठरवले आणि नरमाईचे धोरण स्वीकारून मुअज्जम सोबत बोलणी सुरु केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास २२ एप्रिल १६६७ रोजी एक पत्र लिहिले
“हा बंदा गुलाम आपली नोकरी करून हुकुम पाळण्यात मोठे भूषण मनात आहे हिंदुस्तानच्या बादशहाची फौज मजवर चालून येत आहे त्यास टक्कर देण्याचे सामर्थ्य कोणात तरी आहे काय ? म्हणून माझी विनंती आहे कि माझा मुलगा संभाजी यास ४ हजाराची मनसब मिळावी माझ्याकडे जे किल्ले होते ते मी अगोदरच बादशाहाला दिले आहेत आणि माझी सर्व जिंदगी आपल्या सेवेस अर्पण आहे” (शि.प.सा.सं.ले ११५८)
हे पत्र वाचून औरंगजेबाने महाराजांच्या वकिलास बोलावले आणि म्हणाला - “तुझ्या मालकास जाऊन त्यास कळव कि तुझे अपराध आम्ही माफ केले आहेत, आणि तुझ्या मुलास चाकर ठेवून घेतले आहे जो विजापुरी मुलुख तू काबीज करशील तो तुला देऊ, स्वताच्या मुलखातच कायम रहावे, तुझ्याकडे असलेला प्रत्येक महाल शहजाद्याकडे रुजू कर” (ए.फा.सा.खं-६-ले-५०)
अश्या प्रकारे संभाजी राजे पुन्हा मुगली मनसबदार झाले. औरंगजेबाने पुन्हा मनसबदारी बहाल केल्या नंतर संभाजी राजे कार्तिक वद्य द्वीतियेला ९ ऑक्टो १६६७ रोजी औरंगाबादेस शहजादा मुअज्जम यास भेटावयास गेले.

२२ एप्रिल १८१८
कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले.

२३ एप्रिल १६५७
रघुनाथ बल्लाळ अत्रे यांनी दाभोळ व आसपासची ठाणी जिंकली.

२४ एप्रिल १६७४
शिवाजी महाराजांनी केंजळगड स्वतः छापा घालून काबीज केला. वास्तविक पाहता शिवरायांचा दोन महिन्यांनी राज्याभिषेक होणार होता. त्यांनी स्वतः या छाप्यात सहभागी होणे टाळता आले नसते का ? पण महाराजांनी तसे केले नाही व जिजाबाई साहेबांनीही त्याला विरोध केला नाही. स्वतः महाराजांनी या हल्ल्याचे यशस्वी नेतृत्व केले.

२४ एप्रिल १८१८ 
कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात यश, २२ एप्रिल १८१८ मात्र कर्नल मॅक्डोवेल याला त्र्यंबकगड घेण्यात अपयश आले होते.

२८ एप्रिल १७३१
नारायण जोशी या पेशव्यांच्या पराक्रमी सेनापतीने बेलापूर किल्ल्यावर साहसी चढाई केली तेव्हा घनघोर लढाई झाली. ३१ मार्च १७३१ रोजी झालेल्या या लढाईत पेशव्यांनी चिवट पोर्तुगीजांना होणारा पाणीपुरवठा आणि रसद पुरवठा बंद केल्यामुळे मराठ्यांपुढे हतबल झालेला पोर्तुगीज किल्लेदार २८ एप्रिल रोजी कुटुंबासह गलबतात बसून निघून गेला आणि पेशव्यांनी या किल्ल्यावर जरीपटक्याचे निशाण फडकवले.

२९ एप्रिल १६६१
शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली.
शिवाजी राजांनी फेब. ते मे १६६१ मध्ये ४ महिन्यांची कोकणात मोहिम काढली. त्यात त्यांनी श्रृंगारपुर २९ मे ला जिंकून घेतले.

३० एप्रिल १६५७
शिवाजी महाराजांनी जुन्नर हे मोगली ठाणे लुटले.
काही दिवसांपूर्वीच शिवाजी राजांनी औरंगजेबाला दक्षिणेतील सुभेदार या नात्याने पत्र पाठवले होते. औरंगजेबानेही महाराजांना आपला "प्रेमाचा" खलीता पाठविलेला होता. त्या खलित्यात शिवाजी महाराजांनी "मोगलांचे अधिकारी" या नात्याने विजापूरकरांचा जो प्रदेश जिंकलेला आहे त्याला संमती दिलेली होती. या संमती पत्राची तारीख आहे २३ एप्रिल १६५७.
जुन्नर येथील मोगली अंमलदारांना वाटले की ज्या अर्थी शहाजादाचे पत्र मिळाले त्या अर्थी शिवाजी नक्की दिल्ली दरबाराचा निष्ठावान झाला. पण या गैरसावधपणाचा पुरेपूर फायदा घेऊन महाराजांनी स्वतः जुन्नरला छापा घातला व लक्षावधी रूपयाची खंडणी गोळा केली. दात कोरायला काडीही शिल्लक ठेवली नाही.



No comments:

Post a Comment

Website Security Test