Tuesday, April 10, 2012

पद्मदुर्ग

पद्मदुर्ग


 
          कासा उर्फ पद्मदुर्ग हा जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला कासा किल्ला मुरुड गावा जवळील समुद्रात आहे. मुरुड हे गाव तालुक्याचे असून ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. मुरुड हे जंजिरा या जलदुर्गामुळे प्रसिध्दच आहे. या मुरुड गावाजवळ जंजिरा, सामराजगड आणि कासा उर्फ पद्मदुर्ग असे किल्ले आहेत.

          मुरुडला जाण्यासाठी अलिबाग रेवदंडा मुरुड असा एक गाडी मार्ग आहे. मुंबई-पणजी महामार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे गाठावे रोह-चणेरे बिरवाडी मार्गे मुरुडला जाता येते. तसेच मुंबई-पणजी महामार्गावरील इंदापूर येथून तळा-भालगाव मार्गेही मुरुड गाठता येते.

          मुरुड गावातून राजपुरीकडे जाणारा गाडी रस्ता आहे. या रस्त्यावरच्या खाडीलगत एकदरा गाव आहे. याच्या किनार्‍यावर अनेक मच्छीमारी नावा उभ्या असतात. या मच्छीमारी नौकावाल्याकडे चौकशी केल्यास यातील एखादी नौका आपल्याला कासा किल्ल्याकडे घेवून जावू शकते आपण संख्येने जास्त असल्यास फारसा आर्थिक भार पडत नाही. सागराची आणि हवामानाची परिस्थिती पाहूनच हे मच्छीमार कासाकडे येण्यासाठी तयार होतात. आपण आगावू चौकशी करुन किंवा आदल्या दिवशी जर नौका ठरवली तर वेळेची बचत होऊन गैरसोय टळू शकते.

          जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्दी अतिशय प्रबळ झाला होता. त्याच्या आरमारी सामर्थ्याने त्याने किनारपट्टीवर धाक जमवला होता. सामान्य रयतेची पिळवणूक होत होती. त्यामुळे सिद्दीच्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शिवाजी राजांनी मुरुडच्या सागरात असलेल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कासा उर्फ पद्मदुर्ग हा जलदुर्ग बांधला. त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले, पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या (जंजिरा) उरावरी दुसरी राजापुरी उभी केली आहे. कासा किल्ल्यामुळे जंजिर्‍याच्या सिद्दीला चांगलाच पायबंद बसला.

          एकदण्यापासून किंवा राजापूरीपासून नावेने तासाभरात आपण कासा किल्ल्याला पोहोचतो. कासा किल्ल्याचे दोन भाग आहेत. एक मुख्य किल्ला आणि त्यासमोरील पडकोट. पडकोट मोठय़ा प्रमाणावर नामशेष होत आला आहे परंतु मुख्य किल्ल्याची तटबंदी मात्र अजूनही उत्तमपैकी शाबूत आहे. मुख्य दारासमोरील मोठा बुरुज तग धरुन उभा आहे. या बुरुजाच्या चर्चा कमळाच्या पाकळ्याप्रमाणे फुललेल्या आकाराच्या आहेत. म्हणूनच याला पद्मदुर्ग असे नाव दिले गेले असावे.

          कासा उर्फ पद्मदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे एक वैशिष्ठ येथे पहावयाला मिळते. तटबंदीच्या दोन दगडांमधे सिमेंटिंग म्हणून चुना वापरलेला आह. गेल्या साडेतीनशे वर्षामधे सागराच्या लाटांच्या तडाख्याने आणि खार्‍या पाण्यामुळे तटबंदीचा दगड झिजून गेला आहे. या दगडाची झीज पाच ते दहा से.मी.एवढी झाली आहे. तरीही दोन दगडांमधला चुना अजूनही शाबूत आहे. शिवकालीन बांधकामाचे हे वैशिष्ट्य आपल्याला चकित करते. पडकोटामधील चौकोनी विहीर, तोफा, इमारतींचे अवशेष असे पाहून आपण मुख्य किल्ल्याकडे निघायचे पडकोट आणि मुख्य किल्ला या मधील खडकावर समुद्रामधून वाहून आलेल्या शंख शिंपल्यांचा ढीग साचलेला आहे.

          कासा किल्ल्याच्या महाद्वारामध्ये प्रवेश करण्यासाठी चार पाच पायर्‍या चढाव्या लागतात. दाराच्या आतल्या बाजूला पहारेकर्‍याच्यासाठी केलेल्या देवडय़ा आहेत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्गही आहे. मधल्या भागामधे नव्या जुन्या वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. काही काळ भारतातील कस्टम ऑफिसचे एक कार्यालय येथे थाटलेले होते. हे चौकीवजा कार्यालय येथून हलल्यावर या सगळ्या वास्तूचा ताबा निसर्गाकडे आला त्यामुळे सगळ्या वास्तूंची रयाच गेलेली दिसते. चारही बाजुंनी खारे पाणी असताना आतमधे गोडय़ा पाण्याची चार टाकी केलेली दिसतात.

          किल्ल्याचा दर्या दरवाजा आणि त्याचे स्थापत्य पाहून परत फिरायचे. तटबंदीवरुन जंजिरा आणि सामराजगड किल्ले दिसतात. मुरुडचा किनाराही उत्तम दिसतो

No comments:

Post a Comment

Website Security Test