Sunday, September 16, 2012

बहिर्जी नाईक


बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नावछत्रपती   शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच नाईक होते 
.

दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.

बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं.

महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत.

असं म्हटलं जात कि, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.
शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.
अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

Friday, September 14, 2012

पाईक-अभंग १ ते ११

शिवछत्रपतींच्या सैनिकांस संत तुकाराम महाराजांनीं पाईकीचे अभंग दिलें व शिवरायास निष्ठावंत माणसें लाभलीं म्हणून स्वराज्यस्थापतां आलें. त्या निष्ठावंत माणसांनीं स्वराज्य अवनत अवस्थेंत संभाळलें.
पाईक – अभंग १ ते ११



पाईकपणें जोतिला सिध्दांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥१॥
पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥२॥
तरि व्हावें पाईक जिवाचा उदार ।सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥४॥
पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥४॥
तुका म्हणे एका क्षणांचा करार ।पाईक अपार सुख भोगी ॥५॥

पाइकीचें सुख पाइकासी ठावें । म्हणोनियां जीवें केली साटीं ॥१॥
येतां गोळया बाण साहिले भडमार ।वर्षातां अपार वृष्टि वरी ॥२॥
स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥४॥
पाइकांनीं सुख भोगिलें अपार । शुध्द आणि धीर अंतर्बाहीं ॥४॥
तुका म्हणे या सिध्दांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥५॥

पाईक जो जाणे पाइकींनीं भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥१॥
आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥२॥
येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाईक त्या जग स्वामी मानी ॥४॥
ऐसें जन केलें पाइकें पाईक । जया कोणी भीक न घलिती ॥४॥
तुका म्हणे ऐसे जयाचे पाईक । बळिया तो नाइक त्रैलोकींचा ॥५॥

पाइकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥१॥
पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥२॥
आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥४॥
सांडितां मारग मारिती पाईक । आणिकांसी शीक लागावया ॥४॥
तुका म्हणे विश्वा घेऊनि विश्वास । पाईक तयास सुख देती ॥५॥

पाईक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥१॥
तो एक पाईक पाइकां नाईक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥२॥
तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥४॥
विश्वासावांचूनि पाइकासी मोल ।नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥४॥
तुका म्हणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥५॥

धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥१॥
जिवाचे उदार शोभती पाईक । मिरवती नाईक मुगुटमणि ॥२॥
आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥४॥
कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥४॥
तुका म्हणे तरि पाइकी च भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥५॥

पाइकपणें खरा मुशारा । पाईक तो खरा पाइकीनें ॥१॥
पाईक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥२॥
एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाईक तो पणें निवडला ॥४॥
करूनि कारण स्वामी यश द्यावें ।पाइका त्या नांव खरेपण ॥४॥
तुका म्हणे ठाव पाइकां निराळा ।नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥५॥

उंच निंच कैसी पाइकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥१॥
स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबध्द ॥२॥
प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाईक तो नांव मिरवी वांयां ॥४॥
गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥४॥
तुका म्हणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाईक पाहोन मोल करी ॥५॥

एका च स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥१॥
स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥२॥
हीन कमाईचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥४॥
पाइकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढया ठाव ॥४॥
तुका म्हणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥५॥
१0
प्रजी तो पाईक ओळीचा नाईक । पोटासाटीं एकें जैशीं तैशीं ॥१॥
आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळतीमाघारीं तोडिजेती ॥२॥
पाठीवरी घाय म्हणती फटमर । धडा अंग शूर मान पावे ॥३॥
घेईल दरवडा देहा तो पाईक । मारी सकळीक सर्व हरी ॥४॥
तुका म्हणे नव्हे बोलाचें कारण । कमाईचा पण सिध्दी पावे ॥५॥
११
जातीचा पाईक ओळखे पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥१॥
धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥२॥
जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥४॥
धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥२॥
तुका म्हणे नमूं देव म्हूण जना । जालियांच्या खुणा जाणतसों ॥४॥
धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥२॥

जय जिजाऊ
जय शिवशंभू
जय तुकोबाराय

Tuesday, September 4, 2012

महाराणी ताराबाई


ताराबाई:(? १६७५-९ डिसेंबर १७६१). कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजारामाची बायको व हंबीरराव मोहिते यांची मुलगी. १६८३-८४ च्या सुमारास तिचे राजारामाशी लग्न झाले. मोगलांचा रायगडास वेढा पडला असता, जिंजीला जाण्यासाठी ५ एप्रिल १६८९ रोजी ताराबाईने राजारामाबरोबर रायगड किल्ला सोडला. राजाराम जिंजीला गेल्या नंतर ताराबाई व तिच्या इतर सवती रामचंद्र नीलकंठाच्या योजनेप्रमाणे मोगलांचा पाठलाग चुकवीत विशालगड व इतर गडांवर काही वर्षे राहिल्या. रामचंद्रपंतांच्या सहवासात ताराबाईला मुलकी व लष्करी व्यवहाराची माहिती झाली. ताराबाई, राजसबाई आणि अंबिकाबाई १६९४ मध्ये जिंजीला पोहोचल्या. ९ जून १६९६ ला ताराबाईला मुलगा झाला. त्याचे नाव शिवाजी. राजाराम जिंजीहून निसटल्या नंतर ताराबाई आणि तिचे नातेवाईक जुल्फिकारखानाच्या तावडीत सापडले. त्यांना जुल्फिकारखानने मोगली सैन्यातील शिर्के व मोहिते या सरदारांच्या स्वाधीन केले. त्यांनी ताराबाई व तिच्या नातेवाईकांना महाराष्ट्रात सुखरूप पोहोचविले. २ मार्च १७०० रोजी राजाराम मृत्यू पावला. त्यानंतर ताराबाइंच्या राजकीय कारकीर्दीस सुरूवात झाली.
शाहू मोगलांच्या कैदेत असल्याचा फायदा घेऊन ताराबाई आपल्या मुलाचा हक्क छत्रपतीच्या गादीवर सांगू लागली. रामचंद्रपंताने शाहूची बाजू उचलून धरली, तेव्हा तिने परशुराम त्रिंबक व शंकराजी नारायण यांना आपल्या बाजूस वळवून घेतले आणि शिवाजीची मुंज करून विशाळगड येथे त्याला राज्यभिषेक करविला. ती आपल्या मुलाच्या नावाने राज्यकारभार पाहू लागली. सैन्याधिकारी नेमून तिने औरंगजेबाशी उघड सामना सुरू केला. १७०५ मध्ये मराठ्यांनी पन्हाळा मोगलांकडून जिंकून घेतल्यानंतर तिने पन्हाळा ही राजधानी केली. मध्यंतरी ताराबाईने औरंगजेबाशी बोलणी सुरू करून मुलासाठी  मनसब व दक्षिणेची देशमुखी अशा मागण्या केल्या. ही बोलणी फिसकटताच तिने जिद्दीने मोगलांशी लढा चालू ठेवला. गडागडांवर जाऊन ती जातीने पाहणी करी. सरदारांना सल्ला देई. दक्षिणेतील मोगलांच्या सैन्याचे एकत्रित बळ कमी व्हावे, म्हणून तिने उत्तरेत व पश्चिमेकडे चढाई केली. १७००—०७ पर्यंत मोगलांनी घेतलेले बहुतेक गड ताराबाईच्या सैन्याने परत मिळविले.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू मोगलांच्या कैदेतून सुटून स्वराज्यात परत आला. तो तोतया नसून खरा शाहू आहे, याची खात्री ताराबाईने करून घेतली. मग पुन्हा मोगलांकडे त्यांची जमीनदार म्हणजे अंकित राहण्यास कबूल असल्याचा अर्ज केला, पण प्रथम तो फेटाळला गेला. पुढे त्यास संमती देण्याचा प्रयत्न झाला. पण तो निरुपयोगी ठरला. शाहू सुटल्यापासून ताराबाई व शाहू यांत १२ ऑक्टोबर १७०७ रोजी खेड-कडूस येथे लढाई झाली. ताराबाईच्या ताब्यात असलेले गड शाहूने घेतले. बाळाजी विश्वनाथाने ताराबाईच्या पक्षातील चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, कान्होजी आंग्रे, खटावकर इ. मातब्बर सरदार मंडळींना आपल्या बाजूला वळवून घेतले. १७१४ मध्ये राजसबाईने आपला मुलगा संभाजी यास पन्हाळ्यास छत्रपतीच्या गादीवर बसवून ताराबाई व तिचा मुलगा शिवाजी यांना अटकेत टाकले. शिवाजी १७२७ मध्ये बंदिवासातच मेला. पेशव्यांच्या मध्यस्थीने ताराबाई व शाहू यांची भेट झाली. तेव्हा शाहूने तिला मानाने वागविले. ती पुढे साताऱ्यास रहावयास गेली. १७४९ पर्यंत तिचे आणि शाहूचे संबंध चांगले राहिले.

आपला नातू रामराजा यास दत्तक घ्यावे, म्हणून तिने शाहूचे मन वळविले. शाहूच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीरावाने रामराजाला सातारच्या गादीवर बसविले. त्याला आपल्या हातातले बाहुले करून सर्व सत्ता स्वतःच्या हाताने घेण्याचा तिने प्रयत्न केला. रामराजा पेशव्यांच्या सल्ल्याने वागतो हे पहाताच तिने तो खरा वारसदार नाही, असे जाहीर करून एक नवीनच प्रश्न उपस्थित केला, रामराजास त्रास देई. १७५० मध्ये साताऱ्यात असता तिने रामराजास कैदेत टाकले. दमाजी गायकवाड आणि नासिरजंग निजाम यांच्या साह्याने तिने साताऱ्याचा कारभार आपल्या हाती घेऊन पेशव्यांशी सामना सुरू केला. पेशव्यांनी ताराबाईशी गोडीगुलाबीने वागून रामराजाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. अखेर तिच्यावर सैन्य नेताच ती पेशव्यांना शरण गेली. १७६० मध्ये संभाजी मेल्यामुळे पुन्हा वारसाहक्काचा प्रश्न उपस्थित झाला. या प्रश्नाचा निर्णय लागण्यापूर्वी पानिपतचा पराभव (१७६१) ऐकल्यावर बरे झाले, असे पेशव्यांविषयी उद् गार काढून तारबाई मरण पावली. ताराबाई हुशार, राजकारणी व कारस्थानी होती. स्वतःचे हेर ठेऊन ती आपल्या विरूद्ध पक्षातील माहिती काढीत असे. तिचे खरे कतृत्व १७०० -०७ या निर्णायकी काळात दृष्टीस पडले. वैयक्तिक महत्वाकांक्षेपायी तिने निजामासारख्या  मराठ्यांच्या शत्रूसही जवळ करण्यास कमी केले नाही. राजारामाच्या वारसाहक्कासाठी भांडून तिने कोल्हापूरची वेगळी गादी निर्माण केली. शाही स्वराज्यात येण्यापूर्वी तिने कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व केले आणि मोगलांशी टक्कर दिली. परंतु त्यानंतर मात्र तिचे उर्वरित आयुष्य घरगुती कलहात गेले.. 


संदर्भः Kishore, Brij, Tara Bai and Her Times, Bombay, 1963.
Website Security Test