रत्नागिरी म्हणजे कोकणामधील
महत्त्वाचे शहर आहे. या शहराची ओळख धार्मिक, सांस्कृतीक तसेच ऐतिहासीक
वारसा असलेली आहे. या शहराजवळच असलेला रत्नदुर्ग हा किल्ला याची साक्षच
आहे. या रत्नदुर्ग किल्ल्याला काहीजण भगवतीचा किल्ला असेही संबोधतात.
रत्नागिरी शहराच्या पश्चिम अंगाला असलेल्या सागर किनार्यावर हा दुर्ग आहे.
मुंबई पणजी महामार्गावर
हातखांबा फाटा आहे. या फाटय़ापासून रत्नागिरी कडे जाता येते. तसेच
रत्नागिरी रेल्वेमार्गानेही जोडले गेलेले असल्यामुळे रत्नागिरीपर्यंत
पोहोचणे अतिशय सोयीचे झालेले आहे. रत्नागिरी बस स्थानकापासून
किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी रिक्षांची सोय आहे. स्थानकापासून किल्ल्यापर्यंत
चालत २० मिनिटांमधे पोहचता येते. किल्ल्याचा तट फोडून गाडीरस्ता आत गेलेला
आहे हा गाडीरस्ता थेट बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारा पर्यंत जातो.
रत्नदुर्ग किल्ल्याची
रचना काहीशी वेगळ्या घाटणीची आहे. शहराच्या पश्चिम अंगाला असलेल्या
सागरामध्ये एक भूशीर शिरलेले आहे. या भूशीरावर तीन टेकडय़ा आहेत. या
भूशीराच्या तिन्ही बाजुला सागराचे पाणी पसरलेले आहे. भुशीरावरील तीन
टेकडय़ा पैकी दोन टेकडय़ा पुर्वेकडे असून एक पश्चिमेकडे आहे. पश्चिमेकडील
टेकडी सागरालगत असून ती बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. रत्नदुर्गाच्या
पुर्वबाजुच्या दोन्ही टेकडय़ांच्या माथ्यावर तटबंदी बांधलेली असून ती
बुरुजांनी युक्त आहे. या दोन टेकडय़ांच्या मधील खिंडीसारख्या भागातील
तटबंदी फोडून रस्ता आत गेला आहे. या रस्त्यानेच जाण्याची वहीवाट पडून गेली
आहे. त्यामुळे गडाच्या मुख्य दरवाजाची वाट मोडली गेली ती वाट वापरात
नसल्याने या वाटेने प्रवेशद्वारा पर्यंत जाता येत नाही.
गाडीरस्त्याने ही लहानशी
खिंड ओलांडली की उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता टेकडीवर चढतो. या कच्च्या
रस्त्याने पाचदहा मिनिटांमधे चढून माथ्यावरच्या निमुळत्या भागात पोहोचता
येते. येथे मुख्यप्रवेशद्वाराची आतली बाजू आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेरील
भागही उत्तमपैकी बंदिस्त केलेला असून तेथे लहान दरवाजाही ठेवलेला आहे.
मात्र हा सर्व भाग झाडीझाडोर्यामुळे गच्च भरलेला असल्यामुळे मनसोक्त फिरता
येत नाही.
या प्रवेशद्वाराच्या आत
मारुतीचे लहानसे मंदिर आहे. मंदिराचा दरवाजा दक्षिणेकडे असून मुर्ती मात्र
पश्चिमेकडे तोंड करुन आहे. किल्ल्यामधे असणार्या वस्तीमधील अनेक भाविक
शनिवारी मारुतीच्या दर्शनाला येत असतात. मंदिराच्या मागील बाजूने
दरवाजाच्यावर जाण्यासाठी पायर्यांचा मार्ग आहे. दरवाजाच्या वर गेल्यावर
मोठा आणि लहान असे दोन्ही दरवाजे तसेच त्याच्या भोवतालची तटबंदी पहायला
मिळते.
या तटबंदीवरुन उत्तरेकडे
चालत जाता येते. ही पायवाट रुंद असून ती दुरुस्त केलेली असल्यामुळे
फिरण्यास सोयीची आहे. या भागातून पुर्वेकडील रत्नागिरी शहराचे तसेच
सागराचेही दर्शन होते. येथून बालेकिल्लाही उत्तम दिसतो. भगवती बंदराचे
दर्शन मोहवून टाकते. या तटबंदीवर फिरुन आपण पुन्हा प्रवेशव्दाराजवळून खाली
खिंडीतील गाडीमार्गावर यायचे.
थोड पुढे गेल्यावर लगेचच
एक गाडीमार्ग डावीकडे वर चढतो. या मार्गाने वर चढल्यावर लगेच आपल्या
लक्षात येते की हा मार्ग तटबंदीच्या फांजीवरुन जाणारा गाडीमार्ग डांबरी
केलेला आहे. या रस्त्याने तटबंदीच्या कडे कडेने दीपगृहापर्यंत जाता येते.
दीपगृह हे सायंकाळी ४ ते ५ या वेळेत पहाण्यासाठी खुले असते. येथे ५ तोफा
असून येथिल बुरुजाला सिद्ध बुरुज म्हणतात. हा परिसर पाहून आपण पुन्हा मुळ
रस्त्यावर येतो. या रस्त्याने वस्तीतून किलोमिटरभर पुढे गेल्यावर डावीकडील
भागात सुशोभीकरणाचे काम चाललेले दिसते. समोरच असलेल्या बालेकिल्ल्याकडे
डांबरी तडकेनेच चालत जावे लागते.
बालेकिल्ल्याचे
प्रवेशद्वार सकाळी ८ वाजता उघडते. सायंकाळी ६ वाजे पर्यंत ते खुले असते.
प्रवेशव्दाराजवळच उपहारगृह असून तेथे चहापानाची व्यवस्था होऊ शकते. काही
पायर्या चढून आपण दारामधून आत शिरतो. दोन्ही बाजुंना दोन मंदिरांचया घुमटी
आहेत. येथेच किल्ल्याचा नकाशाही लावलेला आहे. तो पाहून आपण
बालेकिल्ल्यामधे प्रवेश करतो.
समोर भगवतीचे देखणे
मंदिर आहे. शिवकालीन असलेल्या या मंदिराचा आतापर्यंत तीन वेळा जिर्णाद्धार
केलेला आहे. मंदिराच्या दारात सररवेल कान्होजी आंग्रे यांचा पुतळा आहे.
भगवतीचे मंदिर पाहून गडदर्शनाला निघावे. बालेकिल्ला आटोपशिर आकाराचा असून
फारसे वास्तुविशेष नसल्यामुळे अर्ध्यातासात गडफेरी पुर्ण होऊ शकते.
तटबंदीवरुन पुर्ण फेरी मारता येते. पश्चिम अंगाला असलेल्या खंडकावर
आदळणार्या सागरलाटा आणि त्यातुन उंच उडणारे तुषार पहाताना मौज वाटते.
गडावर दोन मंदिरे, विहीर, भुयार इत्यादी पहायला मिळतात. गडावरुन अथांग
पसरलेल्या सागरात विहरत असलेल्या बोटी आपले लक्ष वेधून घेतात.
बहामनी राजवटीत बांधणी
करण्यात आलेला हा किल्ला पुढे आदिलशहीच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी
महाराजांनी तो शिवशाहीमधे आणला. त्याची डागडुजी उत्तम करुन तो
लष्करीदृष्टय़ा भक्कम केला. छत्रपती संभाजीराजांनी रत्नदुर्गास भेट दिली
होती. करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात असलेल्या रत्नदुर्ग पुढे आंग्रे
घराण्याच्या ताब्यात होता. पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने रत्नदुर्गावर
ताबा मिळवला. पुढे पंतप्रतिनिधी कडून १८१८ मधे हा किल्ला इंग्रजांच्या
ताब्यात गेला.
रत्नदुर्गाचा देखणा बालेकिल्ला आणि दूरपर्यंत दिसणारा सागर किनारा आपल्या स्मरणात रहाण्यासारखाच आहे.
No comments:
Post a Comment