शिवचरित्रमाला भाग ११
राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे!
शिवाजीराजे फार बारकाईने अभ्यास करून योजना आखीत असत , असे ठाईठाई दिसून येते। लहानमोठ्या कामात त्यांना येत गेलेलं यश पाहिलं की लक्षात येतं , की या राजानं या प्रश्नांचा सर्वांगीण अभ्यासपूर्वक आराखडा तयार केला होता. योजनाबद्धता हा शिवकार्याचा आत्मा. हा अभ्यास त्यांनी कोणत्या साधनांनी केला हे सांगता येत नाही. पण महाभारतातील श्रीकृष्णापासून ते शकुनीपर्यंत साऱ्या राजनीतीवाल्यांची त्यांना अगदी दाट ओळख होती असे वाटते. कृष्णाच्या राजनीतीचा त्यांच्या मनावर फार मोठा परिणाम होता यांत शंका नाही. कृष्णनीतीचा राजकारणात अचूक उपयोग करणारा हा शेवटचा राजा. बाकीचे सारे कृष्णाचं भजन करणारे , देवळं बांधणारे , अन् नवस करणारे भाबडे भक्त!
यावेळी (इ। स. १६५६ अखेर) मोगल राज्याची स्थिती उगीचच चिंताजनक झाली होती. सार्मथ्य प्रचंड होतं. पण राजपुत्रांच्या स्पधेर्मुळे आणि शाहजहानच्या नाजूक प्रकृतीमुळे सर्व दरबारी संभ्रमात पडले होते. भयंकर पाताळयंत्री आणि महत्त्वाकांक्षी आणि तेवढाच ढोंगी औरंगजेब दक्षिणेत बीदर- नांदेड या महाराष्ट्राच्या सरहद्दीवरील भागात ससैन्य होता. त्याचे लक्ष बापाच्या आजारपणाकडे अन् म्हणूनच त्याच्या मरणाकडे अत्यंत आस्थेने लागलेले होते. कोणत्याहीक्षणी दक्षिणेतून दिल्लीकडे दौडावे लागेल हे औरंगजेब ओळखून होता. आणि हेच औरंगजेबाचे वर्म शिवाजीराजांनी अचूक हेरले होते. राजांना उत्तरेतून शाहजहानच्या तब्येतीच्या बातम्या येत होत्या. अशाच गंभीर बातम्या राजांना मिळाल्या. त्यांना खात्रीच पटली की , हा औरंगजेब आत्तापासूनच दिल्लीकडे जाण्याच्या अधीर तयारीत आहे. आपल्याला हीच संधी आहे या मोगलांवर झडप घालण्याची!
शिवाजीराजांनी गंमतच केली। त्यांनी आपले वकील सोनो विश्वनाथ डबीर यांना बीदरकडे औरंगजेबाच्या भेटीसाठी नजराणे देऊन पाठविले. हेतू कोणाचा ? औरंगजेबाला बनविणे! सोनोपंत औरंगजेबाला दरबारी रिवाजाप्रमाणे अदबीने भेटले. खरं म्हणजे अजूनपर्यंत राजांनी मोगली सत्तेला लहानसा ओरखडाही काढला नव्हता , भांडण तर नाहीच ते शक्यही नव्हते. मग सोनोपंतांचा नेमका मनसुबा कोणता ? ते औरंगजेबाशी साळसूदपणे बोलले की , ‘ कोकणातील आणि देशावरील विजापुरी आदिलशाहीचा जो मुलूख आमच्या कब्जात आम्ही घेतला आहे , त्याला तुमची राजकीय मान्यता असावी.
‘ म्हणजे राजांनी मुलुख घेतला होता आदिलशाहचा अन् ते मान्यता मागत होते मोगल औरंगजेबाची! फुकटची निष्ठा राजे औरंगजेबापाशी वकीलांमार्फत व्यक्त करीत होते। औरंगजेबाचं यात काय जाणार होतं ? फुकटचं मोठेपण! सोनोपंत हा जणू मैत्रीचाच बहाणा करीत होते.
यातील मराठी डाव औरंगजेबाच्या लक्षात आला नाही। त्याने ही मैत्री मंजूर केली. या दिवशी तारीख होती २ 3 एप्रिल १६५७ . सोनोपंत बिदरहून परतले. राजगडला पोहोचले. राजांशी बोलले आणि फक्त सातच दिवसांनी शिवाजीराजांनी आपलं भरधाव घोडदळ घेऊन , भीमा ओलांडून मोगली मुलखांत मुसंडी मारली. त्यांनी औरंगजेबाच्या ताब्यातील जुन्नर ठाण्यावर एकदम झडप घातली. गडगंज खजिना , शेकडो घोडे आणि युद्धसाहित्य पळविले. (दि. 3 ० एप्रिल १६५७ ) सोनोपंतांनी मैत्रीच्या तहाचं लग्न सातच दिवसांत पार उधळलं. तड्क तड्क तड्क… लगेच राजांनी श्रीगोंदे , पारनेर आणि प्रत्यक्ष अहमदनगर या ठिकाणी असलेल्या मोगली ठाण्यांवर भयंकर घाव घातले. भरपूर लूट मिळविली.
या साऱ्या बातम्या औरंगजेबाला बिदरला समजल्या। त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. या मराठी कोल्ह्यांनी आपल्याला निष्ठेची हूल दाखवून आपल्यावर उघडउघड हल्ले केले याचा अर्थ काय ? आपण तहानं गाफील झालो. सिवानं लोणी पळविलं. गाफील का जो माल है , वो अकलमंदका खुराक है!
पण औरंगजेब यावेळी स्वत: काहीही करणार नाही याची अचूक खात्री राजांनी ठेवूनच त्याला निष्ठेच्या तहाचे आमिष दाखविले अन् डाव साधला.
औरंगजेबाला घाई होती दिल्लीकडे जाण्याची। कारण बाप अतिशय गंभीर आजारी होता. केव्हा ना केव्हा महाराष्ट्रातून ही मोगलाई सत्ता आपल्याला उखडून काढायचीच आहे. नक्कीच. आत्ता हीच संधी आहे , हे ओळखून ही संधी अचूकपणे राजांनी टिपली. पण पुढची धूर्त नाटकबाजी पाहा. राजांनी हे छापे घालीत असतानाच रघुनाथ बल्लाळ कोरडे या आपल्या बिलंदर वकिलाला औरंगजेबाकडे नजराण्याची चार ताटे देऊन रवानाही केले होते. कशाकरता ? जुन्नर , नगर , श्रीगोंदे इत्यादी मोगली ठाण्यांवर आमच्याकडून ‘ चुकून ‘ झालेल्या दांडगाईबद्दल पश्चाताप आणि क्षमेची याचना व्यक्त करण्याकरिता! या वकिलाने चिडलेल्या औरंगजेबाची भेट घेऊन भरपूर पश्चाताप व्यक्त केला. केलेल्या गोष्टीची खोटी माफी मागितली. हेतू असा की , दिल्लीची घाई लागलेल्या औरंगजेबानं जाताजातादेखील शिवाजीराजांवर लहानमोठासुद्धा घाव घालू नये.
ही सारी कोल्हेबाजी औरंगजेबाला समजत नव्हती काय ? होती। पण तो अगतिक होता. शत्रूच्या अगतिकतेचा असाच फायदा घ्यायचा असतो , हे कृष्णानं शिकविलं. शिवाजीराजांनी सतराव्या शतकात ओळखलं. ज्या दिवशी आम्ही भारतीय कृष्णनीती विसरलो , त्या दिवसापासून आमची घसरगुंडी चालू झाली.
शिवाजीराजांच्या दिशेने संतापाने पाहात अन् फक्त हात चोळीत औरंगजेबाला दिल्लीकडे जाणे भागच होते.
शिवचरित्रमाला भाग १२
पुढचे पाऊल पुढेच पडेल.
शिवाजीराजांनी यावर्षी (दि। २ 3 ते 3 ० एप्रिल १६५७ ) एका अत्यंत अवघड अशा धाडसी राजकारणात हात घातला. मोगलांसारख्या दैत्य बळाच्या सत्तेविरुद्ध पहिला हल्ला केला. मोगली ठाणी मारली. औरंगजेबानं सर्व पाताळयंत्री डाव आणि ढोंगबाजी करून दिल्ली कब्जात घेतली. त्याने बापाला आग्ऱ्याला कैदेत ठेवले. तो ‘ आलमगीर ‘ बनला. म्हणजे जगाचा सत्ताधीश! या त्याच्या आलमगीर पदवीचा शिवाजीराजांवर काय परिणाम झाला ? राजांवर दहशत बसली का ? छे! पण ते खिन्नतेने बहुदा हसले असावेत राजपुतांच्या राजनिष्ठेला.
पण इराणच्या बादशाहवर मात्र परिणाम झाला. याचे नाव होते शहा अब्बास सानी. त्याला औरंगजेबाचा राग आला. तिरस्कार वाटला आणि कीवही. पण त्याने एक पत्र औरंगजेबाला लिहिले. त्यांत शहा अब्बास लिहितो : ‘ अरे! तू आलमगीर केव्हा झालास ? जगाचा सत्ताधीश! आलमगीर ? तो दक्षिणेकडे ( म्हणजे महाराष्ट्रात) असलेला शिवाजी तुला हैराण करतोय. त्याचा बंदोबस्त तुझ्याने होईना आणि तू आलमगीर ?’ म्हणजे या आणि पुढच्या काळात शिवाजीराजांच्या धुमाकुळाची रणधुमाळी इराणच्या तेहरान राजधानीपर्यंत पोहोचली.
शिवाजीराजांच्या राज्यकराभारात आणि रणकारभारात एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने दिसून येते। ती म्हणजे स्वावलंबन. कुठेही , कुणाकडेही मदतीच्या-भिक्षेच्या आशाळभूतपणाने ते बघत नाहीत. अन्नधान्य , युद्ध साहित्य , गडकोटांची बांधणी , दारूगोळा आणि आथिर्क खजिना सदैव समृद्धच असला पाहिजे , हा त्यांचा कडक आग्रह होता. स्वराज्याला कधीही आथिर्क कर्ज काढण्याची वेळ आलीच नाही. यात अनेक गोष्टी प्रकर्षानं नजरेत भरतात. आवश्यक तेवढा खर्च , आवश्यक ती काटकसर , उधळपट्टीला पुरता पायबंद , शिस्त चिरेबंद , भ्रष्टाचारी , गुन्हेगारी पक्की जेरबंद. एकदा का सरकारी सेवकांना लाच खायची सवय लागली की , रयतेची दु:खे आणि तेवढेच शाप राज्यर्कत्याला सोसावे लागतात हे राजांनी पक्कं जाणलं होतं. ‘ रयतेस आजार देऊ नये. रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावू नये. रयत दु:खी झाली तर म्हणू लागेल की , यापेक्षा मोगल बरे! मग मराठीयांची इज्जत वाचणार नाही. ‘ हा महाराजांचा राज्यकारभार. राज्यसंसार. एखाद्या दक्ष पण तेवढ्याच प्रेमळ अशा गृहिणीसारखा राज्यकारभार महाराज करीत होते. न्याय चोख होता. अन्याय करणाऱ्यांना कडक शिक्षा होत होत्या. कामगिरी करणाऱ्यांना ते पोटाशी मायेनं घेऊन कौतुक करीत होते.
म्हणूनच जुन्या पत्रांत राजांच्याबद्दल शब्द येतात बेलाफुलासारख्या भक्तीचे , तुळशी- दवण्यासारख्या अन् चाफा-बकुळीसारख्या सुगंधांचे। हे बघा ना! ‘ राजश्रींचे राज्य म्हणजे देवताभूमी ‘, ‘ हे श्रींचे राज्य आहे ‘, ‘ हे श्रींच्या वरदेचे राज्य आहे.
‘ शिवाजी महाराज फार फार प्रेमळ होते। गुणी आणि कष्टाळू परमार्थवंत आणि चारित्र्यवंत संतसज्जनांचे ते नम्र भक्त होते. कोणत्याही धर्माच्या , पंथांच्या वा जातीच्या ईश्वरभक्तापुढे ते हात जोडून होते. पण कोणत्याही राजकारणात वा राज्यकारभारात त्यांनी या संतांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही. त्याही संतांनी फक्त देवभक्ती , लोकजागृती आणि लोकसेवाच केली. यात कोणीही सरकारी संत नव्हताच.
शिवाजीराजा एक माणूस होता। तो अवतार नव्हता. आपण शिवाजीराजांच्या दैदिप्यमान पराक्रमी कृत्यांनी आणि उदात्त आचरणाने दिपून जातो. आपले डोळे भक्तीभावाने मिटतात. नको! ते डोळे उघडण्याची आवश्यकता आहे.
शिवाजीमहाराजांनी अचूक संधी साधून , आपल्या कर्दनकाळासारख्या महाभयंकर असलेल्या सत्तेवर जुन्नर , नगर , श्रीगोंदे इत्यादी ठाण्यांवर हत्यार चालविले , हे पाहून औरंगजेबाचे डोळे खाडकन उघडले. वटारले गेले. तो या गोष्टीचा बदला नक्कीच घेणार होता। पण दिल्ली ताब्यात आल्यावर स्थिरस्थावर व्हायला वेळ लागणार होता. त्यावेळचाही फायदा घेणार होते. शिवाजीराजे! त्यांनी औरंगजेबी सत्तेखालचे कोकणातले उत्तर ठाणे जिल्ह्यातले काही किल्ले घेतलेच. राजांच्यासारखा अचूक संधीसाधू राष्ट्राला नेहमीच हवा असतो.
याचवेळी ( इ। स. १६५७ उत्तरार्ध) राजांनी कोकणात आपला घोडा उतरविला. कारण त्यांना संपूर्ण कोकण समुदासकट स्वराज्याच्या कब्जात हवे होते. राजांनी दादाजी रांझेकर आणि सखो कृष्ण लोहोकरे यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर कल्याण आणि भिवंडी जिंकावयास रवाना केले , जिंकले. या दोघांनीही एकाच दिवशी कल्याण , भिवंडी काबीज केली. या दिवशी दिवाळीतील वसुबारस होती. (दि. २४ ऑक्टो. १६५७ ) दुर्गाडी किल्ल्यावर झेंडा लागला. इथे भूमीगत धन हंडे भरून राजांना मिळाले. लक्ष्मीपूजन सार्थ झाले. कल्याणच्या खाडीत मराठी आरमाराचा शुभारंभ झाला. आगरी , भंडारी आणि कोळी जवान सागरलाटेसारखे महाराजांच्याकडे धावत आले. आरमार सजू लागले. पैशात किंमतच करता येणार नाही , हिऱ्यामाणकांनी तुळा करावी अशी ही कोकणची जवान आगरी , कोळी , भंडारी माणसं आरमारावर दाखल झाली. कोकणची किनारपट्टी हळूहळू स्वराज्यात येऊ लागली. आंबा पिकत होता , रस गळत होता पण कोकणचा राजा उपाशीपोटीच झोपत होता. आता स्वराज्यात आमराया बहरणार होत्या. नारळी सुपारी चवरीसारख्या डुलणार होत्या. कोकणचा हा उष:काल होता.
कल्याण भिवंडीपासून दक्षिणेकडे कोकणवर महाराजांची मोहीम सुरू झाली. एकेक ठाणं भगव्या झेंड्याखाली येऊ लागलं.
शिवचरित्रमाला भाग १३
आलं उधाण दर्याला.
मोगली ठाण्यांवर शिवाजीराजांनी अचानक हल्ले केल्यामुळे औरंगजेब
संतापलेलाच होता। पण आत्ता यावेळी काहीच करता येत नाही. हे लक्षात घेऊन तो
दिल्लीला गेला. पण त्याच्या मनात शिवाजीराजांचा पुरेपूर काटा काढायचा हे
नक्कीच झालं. विस्मय वाटतो , तो राजांच्या कमालीच्या धाडसाचा. एका कर्दनकाळ
सत्तेच्या विरुद्ध आपणहून बेमुर्वत हे असलं लष्करी राजकारण करायचं राजांनी
साहस केलं ही अत्यंत मोठी झेप होती. पण ती अतिशय विचारपूर्वक म्हणजेच
अभ्यासपूर्वक होती. तो वेडेपणा नव्हता. तो मिळत असलेल्या संधीचा अचूक अन्
हमखास फायदा घेणं होतं. तो फायदा राजांना झालाच.
अशा अनेक संधी पुढच्या इतिहासात पेशव्यांना लाभल्या। पण त्याचा फायदा
क्वचितच एखाद्या प्रसंगी घेतला गेला. तसा प्रत्येक संधीचा फायदा इंग्रजांनी
आमच्याविरुद्ध अचूक टिपला. लहान वयात आणि आपल्या लहानशा सैन्यानिशी
राजांनी अनेकदा अवघड डाव धाडसानं जिंकले. ज्याला नेतृत्त्व करायचं आहे ,
त्याने शिवचरित्राचा बारकाईने अभ्यास करावा. काळजांत अचूक कल्पनेची कळ
येईल. बुद्धीत बळ येईल अन् पदरात फळ पडेल. आता आपण शिवाजीराजांचा नुसताच
जयजयकार जरा कमीच करावा!
दि. २४ ऑक्टोबर १६५७ या दिवशी शिवाजीराजांनी कल्याणपासून दक्षिण कोकणात
सावंतवाडीपर्यंत वादळी स्वारी मांडली। महिनोन्महिने राजा स्वारीवर आहे ,
त्याला विश्रांती सोसतच नाही. या कोकण मोहिमेत संपूर्ण कोकण महाराजांच्या
कब्जात आलं असं नाही. पण किनाऱ्यावरचे अनेक किल्ले आणि काही जलदुर्ग
महाराजांनी सुसरीनं शेपटाचा फटकारा मारून एकेक भलामोठा मासा मारावा , तसा
एकेक जलदुर्ग राजांनी मटकावला. हरणेचा किल्ला , जयगड , घेरिया , देवगड ,
रेडी अन् थेट तेरेखोल शिवाय सह्यादीच्या अंगाखांद्यावरती असलेले अनेक
गिरीदुर्ग महाराजांनी काबीज केले. केवढं प्रचंड वादळ आहे हे! आमच्या तरुण
मनात असंच काही अचाट कर्तृत्त्व , आजच्या हिंदवी स्वराज्यात आपणही गाजवावं
असं येतंच नाही का ? का येत नाही ? आळस ? अज्ञान ? बेशिस्त ? अभिमानशून्यता
? आत्मविश्वासाचा अभाव ? अल्पसंतुष्टता ? सगळंच काही!
याच काळात इंग्लिश टोपीवाले व्यापारी , बंदुकवाले लष्करी पोर्तुगीज अन्
सारेच अठरा टोपीकर फिरंगी हजारो मैलांवरून सागरी मार्गाने भारतात येत होते।
उंदराच्या कानाएवढे आणि विड्याच्या पानाएवढे यांचे देश. नकाशावर लौकर
सापडतही नाहीत. पण त्यांची महत्त्वाकांक्षा लाटेवर स्वार होऊन आम्हाला
लुटायला आणि कुटायला येत होती.
कोकणातील या स्वारीत ( इ। स. १६५७ ते ५८ ) शिवाजीराजांच्या नजरेस अनेक
गोष्टी आल्या. काही सुखावणाऱ्या तर काही मिरचीसारख्या झोंबणाऱ्या त्यात
राजांना जी कोकणी मनं आणि मनगटं गवसली , ती फारच मोलाची होती. मायनाक
भंडारी , बेंटाजी भाटकर , दौलतखान , सिदी मिस्त्री , इब्राहिमखान , तुकोजी
आंग्रे , लायजी कोळी सरपाटील आणि असे अनेक. आगरी भंडारी , कोळी , कुणबी ,
प्रभू , सारस्वत मंडळी महाराजांच्या या जागर- गोंधळात कर्तृत्त्वाचे पोत
पेटवून राजांच्या भोवती हुकूम झेलायला अधीरतेन गोळा होऊ लागली. हे सारेच
समाजगट खरोखर गुणी होते. शौर्य , धाडस , कल्पकता , निष्ठा पराक्रमाची हौस
आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षा या तरुणांच्या रोमरोमात उसळत होती. राजांनी या
कोकणी चतुर काळसुंद्यांचा अचूक उपयोग करायच्या योजना आखल्या. कृतीतही
आणल्या.
या आगरी , कोळी , भंडारी पोरांचं काय सागरी अप्रूप सांगावं ? जन्मल्यावर
यांना आधी समुदात पोहता येत होतं. अन् मग जमिनीवर रांगता येत होतं.
एकच पुढच्या काळातील इतिहासातील साक्ष सांगू का ? शिवाजीराजांच्या
मृत्युनंतर औरंगजेबानं मराठी राज्य गिळून टाकण्याकरता अमाप दळवादळ घेऊन इथं
स्वारी केली। पंचवीस वर्ष तो मराठी देशावर थैमान घालत होता. पण कोकणात
किनारपट्टीचा एकही सागरी किल्ला अन् कोकणची वीतभर जमिनही औरंगजेबाला पंचवीस
वर्षात जिंकता आली नाही. अजिंक्य! कोकण अजिंक्य , भंडारी अजिंक्य , आगरी
अजिंक्य , कोळी अजिंक्य , समुद अजिंक्य , मराठी राज्य आणि मराठी ध्वज
अजिंक्य. हे कर्तृत्त्व कोणाचं ? हे या कोकणी मर्दांचं.
आणि आज याच माणसांना आम्ही मुंबईत ‘ रामागाडी ‘ म्हणून भंाडी घासायला
लावतोय. मॅक्सी अन् साड्या धुवून वाळत घालायला लावतोय. हॉटेलात कपबश्या
विसळायला लावतोय. वास्तविक यांचा मान भारताच्या आरमारी नौकांवरून शत्रूवर
तोफा बंदुकांनी सरबत्ती करण्याचा आहे. ही सारी मार्शल रेस आहे.
शिवाजीमहाराजांनी तीनशे वर्षांपूवीर् हे ओळखलं. कोकण अजिंक्य बनवलं. आमच्या
लक्षात केव्हा येणार ? ब्रिटीश विल्यम पिप्ससारखा एखादा कान्होजी आंग्रा ,
मायनाक भंडारी किंवा एखादा मराठी दौलतखान आम्हाला आज लाभेल का ?
शिवचरित्रमाला भाग १४
मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला
याच कोकण स्वारीतून (इ। स. १६५७ – ५८ ) शिवाजीराजे कुडाळपर्यंत समुद आणि भूमी कब्जात घेत पोहोचले होते. देशावरीलही लोणावळ्याजवळच्या अनेक किल्ल्यांचा कब्जा राजांनी घेतला होता. राजमाची , लोहगड , तुंगतिकोना आणि पूवीर् शहाजीराजांच्यासाठी बादशाहच्या ताब्यात देऊन टाकलेला कोंढाणा राजांनी काबीज केला होता. कोकणातील पण सह्यादीवर असलेले माहुली , कोहजगड , सिद्धगड , मलंगगड , सरसगड , इत्यादी गडही जिंकले होते. स्वराज्य वाढलं होतं.विजापूरचा अर्धांगवायू झालेला बादशाह मोहम्मद आदिलशाह चार नोव्हेंबर १६५६ रोजी मृत्यू पावला होता आणि त्याचा मुलगा अली आता बादशाह झाला होता। हा अली वयाने १७ – १८ वर्षांचाच होता. त्याची आई ताजुल मुख्खदीरात उर्फ बडीसाहेबा हीच सर्व कारभार पाहत होती.
क्वचितच एखाद्या झटापटीत स्वराज्याच्या मावळी सेनेचा पराभव होत होता। नाही असं नाही. पण उल्लेख करावा असा एकही विजय या काळात आदिलशाही सेनेला कुठेही मिळाला नाही. सर्वत्र विजयाचाच घोष उठत होता मराठ्यांचा. त्यामुळे आधीच हादरून गेलेल्या विजापूरच्या शाही दरबारची अवस्था चिंताक्रांत झाली होती. खरं म्हणजे ही विजयाची गगनभेदी गर्जना साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर एकदम उठली होती. हीच शिवक्रांती सगळीकडेच परकीय शत्रू विस्मित आणि बेचैन झाले होते. स्वकीय शत्रूंना काय तोटा ? त्यांचं पोट सततच दुखत होतं. राजांच्या या सुसाट कोकण स्वारीमुळे (इ. स. १६५७ – ५८ ) आदिलशाही गलबलून गेली होती. शिवाजीविरुद्ध काय करावं हेच बड्या बेगमेस आणि शाहास समजत नव्हतं. विचार करीत बसायलाही सवड नव्हती. सतत मराठी वादळाच्या बातम्या येत होत्या.
या मराठी विजयांचं मर्म कोणचं होतं ? का जय मिळत होते ? असं कोणचं ‘ मिसाईल ‘ महाराजांना गवसलं होतं ? आम्ही तरुणांनी आज याचा अभ्यास केला पाहिजे. महाराजांनीच अनेक प्रसंगी स्वत: उद्गारलेल्या शब्दांत ते मर्म सापडले. ते आपल्या मावळ्यांना म्हणताहेत.
‘ आपापले काम चोख करा ‘, ‘ हे राज्य श्रीच्या आशीर्वादाचे आहे ‘, ‘ पराक्रमाचे तमाशे दाखवा ‘, ‘ या राज्याचे रक्षण करणे हा आपला फर्ज (कर्तव्य) आहे , त्यांस चुकू नका। ‘ सिंधू नदीचे उगमापासून कावेरी नदीचे पैलतीरापावेतो अवघा मुलूख आपला. तो मुक्त करावा , ऐसा मानस आहे.
आणि असेच कितीतरी वमीर् भिडवित असे शब्द महाराजांनी आपल्या जिवलगांच्या पाठीवर हात ठेवून आयुष्यभर उच्चारले। हे शब्द हृदयी कोरूनच मावळ्यांनी स्वराज्याकरता सर्वस्व पणाला लावले. अनुशासन , शिस्त , निस्वार्थ सेवा , स्वच्छ राज्यकारभार आणि नेत्यांवरती नितांत विश्वास हे शिवशाहीच्या यशाचे मर्म होते. म्हणूनच हरघडी , हरदिवशी , नित्यनवा दिन जागृतीचा उगवत होता. मावळ्यांच्या आकांक्षापुढति गगन रोज झुकत होतं , ठेंगणं ठरत होतं. त्यातूनच भरत होतं स्वराज्य आणि बहरत होते स्वाभिमानी संसार. आळस , अज्ञान , अन् अहंकार यांची हकालपट्टी झाली होती. अन् लाचारी , फितुरी आणि हरामखोरी यांना स्वराज्यात जागा नव्हती. असं सारं घडलं तरच राष्ट्र उभं राहत असतं. फुलत असतं.
शिवकालात तसं पाहिलं तर रणांगणावर होणाऱ्या जखमांमुळे कण्हण्याचेच क्षण रोज आणि अखंड उठत होते। पण पोरं हसत हसत कण्हत होती. अभिमानानं कण्हत होती , अन् मग कोणी एखादा शाहीर डफावर थाप मारून गर्जत होता. ‘ मराठियांची पोरं आम्ही , भिणार नाही मरणाला
‘ अन् मग माझ्यासारख्या सह्यादीच्या दऱ्याखोऱ्यात भिरभिरणाऱ्या गोंधळ्याला सुचू लागतं की , मऱ्हाठियांची पोरे आम्ही नाही भिणार मरणाला!
सांगुनि गेला कुणी मराठी शाहीर अवघ्या विश्वाला.
तीच आमुची जात शाहीरी मळवट भाळी भवानिचा.
पोत नाचवित आम्ही नाचतो. दिमाख आहे जबानिचा!
शिवचरित्रमाला भाग १५
कठीण नाही ते व्रत कसलं?
अगदी प्रारंभापासून जिजाऊसाहेब , शिवाजीराजे आणि राज्यकारभारी यांनी एक अत्यंत महत्त्वाची पद्धत स्वराज्यात सुरू केली। प्रधानमंडळांपासून ते अगदी साध्या हुज – यापर्यंत प्रत्येक स्वराज्य- नोकराला रोख पगार , वेतन. हे वेतनही प्रत्येकाला अगदी नियमितपणे मिळावे , अशी व्यवस्था कोणालाही नोकरीच्या मोबदल्यात वतन किंवा मिरासदारी दिली जात नसे. संपूर्ण राज्यकारभाराची आथिर्क व्यवस्था वेतनावरच योजिली होती. सरंजामशाही आणि वतनशाही याला इथेच प्रतिबंध घातला गेला.कोणत्याही बादशाहीत हा असा वेतनबद्ध राज्यकारभार दिसत नाही। सामान्य नोकरांना पगार असतील. पण बाकीच्या मोठ्यांना नेमणुका सरंजाम , जहागिऱ्या आणि वतनदाऱ्या होत्या. यामुळे अनुशासन राहतच नव्हते. शिवाजीराजांपाशी हुकमी शक्ती सतत सुसज्ज होती , यातील हे एक प्रबळ कारण होते. पगारी पद्धतीवरती राज्यकारभार करणारा शिवाजीराजा हा अर्वाचीन युगातला एकमेव राज्यकर्ता. त्यामुळे सरंजामशाहीतील दुर्गुण राजांनी अस्तित्त्वातच येऊ दिले नाहीत. आत्तापर्यंत बुडालेल्या बादशाह्या आणि विजयनगरचे राज्य का बुडाले याचा अचूक वेध शिवाजीराजांनी निश्चित घेतला होता. यात शंका नाही. त्या चुका आपल्या स्वराज्यात होता कामा नयेत. याकरिता ते अखंड सावधान होते.
माणसांची परीक्षा होते ती कठोर संकटाच्या आणि भरघोस स्वार्थाच्या वेळी। ती वेळ सामोरी आलीच. कमालीच्या अस्वस्थ आणि संतप्त झालेल्या आदिलशाही दरबारने एक प्रचंड निर्णायक मोहीम राजांच्या विरुद्ध योजिली. इ. स. १६४७ पासून ते आत्ता इ. स. १६५९ प्रारभापर्यंत आदिलशाहीला शिवाजीराजे सतत पराभवाचे फटके देत होते. स्वराज्याचा मुलूख वाढत होता. कोकणातील फार मोठा प्रदेश , बंदरे आणि किल्ले राजांनी काबीज केले होते. स्वराज्याचं आरमार दर्यावर स्वार झालं होतं. आरमाराकडे म्हणजेच सागरी सरहद्दीकडे यापूवीर् वाकाटक राजांपासून ते यादव राजांपर्यंत अगदी शिलाहार आणि कदंब राजांपर्यंतही कोणी महत्त्व ओळखून लक्षच दिले नव्हते. कुणाकुणाचे थोडीशीच गलबते दर्यावर तरंगत होती. पण ती लुटुपुटीच्या पोरखेळासारखीच. पोर्तुगीज आणि अरबांसारख्या महामहत्त्वाकांक्षी शत्रूला अन् चाचेगिरी करणाऱ्या कायमच्या शत्रूला धडक देण्याइतकी ताकद आपल्यात असली पाहिजे हे शिवाजीराजांनी अचूक ओळखलं. त्यांनी आरमार उभे करण्यास गतीने सुरुवात केली.
खरं म्हणजे ही आरमाराची परंपरा शालिवाहनांपासूनच चालू राहिली असती , तर पुढे शिवाजीराजांनी आपले आरमार असे जबर बनवले असते की , खरोखरच मराठ्यांचे लष्करी आणि व्यापारी जहाजे थेट इराणी , अरबी , युरोपी आणि आफ्रिकी किनाऱ्यांपर्यंत जाऊन धडकली असती। खऱ्या अर्थाने रुमशाम पावेतो आमचे आथिर्क आणि लष्करी साम्राज्य निर्माण झाले असते. पण ‘ सागरी पंचक्रोशी ओलांडली तर आपला धर्म बुडतो ‘ अशी खुळचट कल्पना आमच्या धर्मपंडितांनी इथे रुजविली अन् वाढविली. आता शिवाजीराजांना आरमाराच्या श्रीगणेशापासून सुरुवात करावी लागत होती. स्वराज्याचे भाग्य असे की , कोकणातील साऱ्या दर्यावदीर् जमातींनी राजांना काळजापासून मदत केली. हाहा म्हणता दर्यावर दरारा बसला. आरमार हा एक स्वतंत्र लष्करी विभाग झाला. आरमारी सेनापती म्हणजे सरखेल म्हणजे सागराध्यक्ष हे पद राजांनी निर्माण केले.
आता विजापुराहून निघाला होता अफझलखान। आदिलशाहीने आणि राजमाता बड्या बेगमेने या खानाला अगदी स्पष्ट शब्दात हुकूम दिला की , ‘ हम लढाई करना चाहते नही। ‘, ‘ ऐसा बहाना बनाकर सिवाको धोका देना। ‘ स्वराज्यासकट शिवाजीमहाराजांचा आणि त्यांच्या सर्व साथीदारांचा ‘ निर्मूळ फडशा ‘ पाडण्याकरिता ही प्रचंड मोहीम खानासारख्या सर्वार्थाने प्रचंड सेनापतीच्या नेतृत्त्वाखाली निघाली. (इ. स. १६५९ मार्च) एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडदळ , पायदळ , तोफखाना आणि अपार युद्धसाहित्य विजापुराहून निघाले. सार्वभौम मराठी राष्ट्र उभी करण्याची महाराजांची कल्पना आणि महत्त्वाकांक्षा मुळासकट पार पार चिरडून टाकण्याकरता आदिलशाहने मांडलेला हा डाव होता.
जास्तीतजास्त दक्षतापूर्वक आणि योजनापूर्वक खानाने आराखडा आखला। शिवाजीला डोंगरी किल्ल्यांच्या गराड्यातून बाहेर , पूवेर्कडील सपाटीच्या प्रदेशावर यायला भाग पाडावे असा त्याचा पहिला प्रयत्न होता. म्हणूनच त्याने आदिलशाही हद्दीतील देवदेवस्थानांत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. तेथे त्याला कोण अडविणार ? त्याच्या स्वत:च्या सैन्यातही आमचीच माणसे मोठ्या संख्येने होती. जणू त्यांच्याच अध्यक्षतेखाली खान या देवस्थानांचे धिंडवडे काढत होता. यात त्याचा हेतू एकच होता. शिवाजीराजांना चिडविणे. त्यांच्या धामिर्क भावना कमालीच्या दुखविणे. हे केले की , राजा चिडेल. भावनाविवश होईल आणि आपल्या विरुद्ध तो चाल करून येईल , मोकळ्या मैदानी मुलुखात!
यातच शिवाजीराजांच्या राजकीय विवेकाला आणि लष्करी मुत्सद्देगिरीला आव्हान होते। खबरा मिळत होत्या. यावेळी महाराज कुडाळहून राजगडास आले. खान म्हणजे मूतिर्मंत मृत्यूदूतच. राजगडावर साक्षात यमाचे दूत घिरट्या घालीत होते. राजांची अतिशय लाडकी राणी सईबाई क्षयाने अत्यवस्थ होती. खानाच्या बातम्यांनी स्वराज्य अस्वस्थ होते.
अन् मग शिवाजीराजांची मन:स्थिती कशी असेल ? स्वराज्याचं व्रत म्हणजे अग्निदिव्यच कठीण! कठीण नाही , ते व्रत कसलं ?