Tuesday, October 2, 2012

शिवचरित्रमाला भाग १ ते ५

                        पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं!


उदात्त आणि उत्कट महत्वाकांक्षी गरुडझेपेपुढे आकाशही ठेंगणं ठरलेलं इतिहासानं पाहिलं। साडेतीनशे वर्षांपूवीर् या मराठी मातीवर नांगराला गाढवं जुंपून तो इथं फिरवला। आदिलशाही फौजा घोडे उधळीत चारही वेशींवरून पुण्यात घुसल्या. घरंदारं पेटली. किंकाळ्या उठल्या , सैरावैरा धावणाऱ्यांची प्रेतं पडली. शाही फौजांनी पुण्याचा कसबा बेचिराख केला. फुटक्या कवड्या आणि तुटक्या वहाणांची तोरणं लटकवून अन् एक भली मोठी लोखंडी पहार भर रस्त्यात ठोकून शाही फौजा विजापुरास परतल्या. उरलं कुत्र्यांचं रडणं अन् घारी , गिधाडांचं आभाळात भिरभिरणं. पुण्याचं स्मशान झालं. अशी सहा वर्षं लोटली. शहाजीराजे भोसल्यांच्या पुणे जहागिरीचा उकिरडा झाला आणि सहा वर्षांनंतर पुण्यात शहाजीराजांची राणी आणि मुलगा मावळी घोडेस्वारांच्या तुकडीनिशी प्रवेशले. (इ. स. १६ 3 ७ , बहुदा उन्हाळ्यात) पुणं भकासच होतं. दहा-पाच घरं जीव धरून जगत होती.
पुण्याची ही मसणावट झालेली पाहून आऊसाहेबांचं काळीज करपलं। पुण्याच्या मालकिणीला राहण्यापुरतीही स्वत:ची ओसरी उरली नव्हती. झांबरे पाटलांच्या वाड्यांच्या वळचणीला या राजगृहिणीला बिऱ्हाड थाटावं लागलं. पण त्या क्षणालाच जिजाऊसाहेबांच्या व्याकुळ काळजातून अबोल संकल्प उमलू लागले. या पुण्याचं आणि परगण्याचं रूपांतर आम्ही करू!
चार दिस , चार रात्री उलटल्या आणि आऊसाहेबांनी सण साजरा करावा तशी पहिली ओंजळ वाहिली , ती पुण्यातल्या मोडून-तोडून गेलेल्या कसबा गणपतीच्या देवळात। पहिला जीणोर्द्धार सुरू झाला , तो या गणेशाच्या मंदिरापासून. पुण्यातली भाजून पोळून निघालेली आठ घरं अन् बारा दारं किलकिली झाली. त्यांची आशा पालवली. घरातली माणसं रस्त्यावर आली. कसबा गणपती दुर्वाफुलांनी प्रथमच इतका सजला- पुजलेला पाहून आयाबायांना नक्कीच असं वाटलं की , ही मायलेकरं म्हणजे गौरीगणपतीच पुण्यात आले.
जिजाऊसाहेबांनी आज्ञा करावी अन् सर्वांनी हौसेनं ती झेलावी , असा भोंडला पुण्यात सुरू झाला। पुणं पुन्हा सजू लागलं. आऊसाहेबांच्या खास नजरेखाली एकेक नवानवा सजवणुकीचा डाव मुठेच्या वाहत्या काठावर रंगू लागला. पुण्यातली लोखंडी शाही पहार केव्हाच उखडली गेली आणि एक दिवस हलगी-ताशांच्या कडकडाटात नांगराने बैल सजले. नांगर जुंपण्यात आला. नांगराला फाळ लावला होता , सोन्याचा. खरं खरं सोनं बावनकशी. आणि पुण्याच्या भुईवर सोन्याचा नांगर पाचपन्नास पावलं नांगरण्यासाठी फिरला. याच भुईवर सहा वर्षांपूवीर् विजापूरच्या वजीर खवासखानाच्या हुकुमानं गाढव जुंपलेला नांगर फिरला होता. तरुणांच्या महत्वाकांक्षा जणू ढोल-लेझिमीच्या तालावर सहा वर्षांच्या शिवबाच्या आणि आऊसाहेबांच्या सोन्याच्या नांगराभोवती फेर धरून उसळत नाचत होत्या. ती सुखावलेली मराठी जमीन जणू म्हणत होती , ‘ पोरांनो मनांत आणा , तुम्ही वाट्टेल ते करू शकाल. या मातीत मन मिसळलंत की , मोती पिकतील ‘.
अन् खरंच पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं। माणसं आपण होऊन कामाला लागली. बारा बलुतेदार अन् गावकामगार स्वत:चा संसार सजवावा तसं घाम गाळीत काम करू लागले. न्यायनिवाडे करायला स्वत: आऊसाहेब जातीनं सदरेवर बसू लागल्या. न्याय अगदी समतोल. तराजूच्या काट्यावर माशीही बसत नव्हती. आऊसाहेबांनी या काळात दिलेल्या न्यायनिवाड्याचे दस्तऐवज गवसलेत!
पुण्याच्या पर्वती गावालगतचा आंबिल ओढा फारच बंडखोर। पावसाळ्यात असा तुफान भरून वाहायचा की , अवतीभवतीची शेती अन् झोपड्या , खोपटं पार धुवून घेऊन जायचा। हे दुखणं पुण्याला कायमचंच होतं. आऊसाहेबांनी पर्वतीच्याजवळ (सध्याच्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याच्या पश्चिमेस) या ओढ्याला बांध घातला. चिरेबंदी , चांगला सहा हात रुंद , सत्तर हात लांब अन् पंचवीस हात उंच. आंबोली ओढ्याचा प्रवाह कात्रजच्या घाटातून थेट उत्तरेला पुणे शहराला खेटून नदीला मिळत असे. हा प्रवाह या बांधामुळे वळवून घेऊन पश्चिमेकडे ( सध्याच्या दांडेकर पुलाखालून) मुठा नदीत सोडण्यात आला.
पुण्याच्या अवतीभवती सगळे मावळी डोंगर। जंगल अफाट। गेल्या सहा वर्षांत वाघांचा , बिबट्यांचा अन् लांडग्या- कोल्हांचा धुमाकूळ बादशाही सरदारांच्यापेक्षाही थैमान घालीत होता. ही रानटी जनावरं मारून काढून शेतकऱ्यांना निर्धास्त करायची फार गरज होती. आऊसाहेबांच्या लालमहालानं लोकांकरवी ही कामगिरी करवून घेतली. रानटी जनावरांचा धुमाकूळ थांबला.
पण प्रतिष्ठित गावगंडांचा धुमाकूळ थांबविणं जरा अवघडच होतं. आऊसाहेबांच्याच हुकुमानं कृष्णाजी नाईक , फुलजी नाईक , बाबाजी नाईक पाटील , इत्यादी दांडग्यांना जबर शिक्षा करून जरबेत आणलं , कुणाकुणाचे हातपायच तोडले. काय करावं ? प्रत्येकाला कुठे अन् किती शहाणं करीत बसावं ? तोही मूर्खपणाचं ठरतो. लालमहालातील मायलेकारांची स्वप्न आणि आकांक्षा गगनाला गवसण्या घालीत होत्या.!

                                                           शिवचरित्रमाला भाग २ 


                                                      संजीवनी लाभू लागली…
आदिलशहाने पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांच्या नावाने दिली होती. शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे केली. त्याचवेळी शहाजीराजांनी पुणे जहागिरीचा सर्व कारभार ‘ शिवाजीराजे यांसी अर्जानी मोकास ‘ दिला. शिवाजीराजे पुणे जहागिरीचे पोटमोकासदार झाले. म्हणजेच प्रत्यक्ष कारभार जरी शिवाजीराजांच्या नावाने झाला , तरी वडीलकीच्या नात्यानं तो कारभार जिजाऊसाहेब पाहू लागल्या. त्यांची मायाममता मोठी. जरबही मोठी. स्वप्नही मोठे. जी माणसं कारभार पाहण्याकरता म्हणून पुणे जहागिरीकडे शहाजीराजांनी नेमून दिली तीही फार मोठ्या योग्यतेची दिली.
शिस्तीनं , काटेकोरपणे हुकुमांत वागणारी. कारभार चोख करणारी. निष्ठावंत आणि प्रामाणिक. अशी माणसं असली की , उत्कर्षच होत असतो. मग ते छोटे संसार असोत की मोठी साम्राज्ये असोत. उत्तम अनुशासन ही हुकमी शक्तीच असते. पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी , भारदस्त , वयानेही बहुतेक साठी-सत्तरी ओलांडलेले. बाजी पासलकर , दादोजी कोंडदेव , गोमाजी नाईक , पानसंबळ नूरखानबेग , बंकीराव गायकवाड , येसबा दाभाडे , नारोपंत मुजुमदार आणि असेच तजरुबेकार आणखी काही. ‘ ज्यास जे काम सांगितले , ते त्याने चोख करावे ‘ ऐश्या ताकदीचे आणि युक्तीबुद्धीच्या ऐपतीचे हे सारे होते.
जिजाऊसाहेबांची तडफ वेगळीच होती. कर्तबगारीचे आणि समतोल न्यायबुद्धीचे संस्कार त्यांच्यावर नेमके कुणी केले ? इतिहासाला त्यांची नावे माहीत नाहीत. पण कथा कीर्तनातील पौराणिक स्त्रियांची चरित्रं सर्वांप्रमाणे त्यांच्याही मनावर नक्कीच संस्कार करीत होती. प्रत्यक्ष नजिकच्या काळात शाही घराण्यात कर्तृत्व गाजविलेल्या स्त्रियांची एकेक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्याही कानांवर जात असणारच. आदिलशाहीतील बेगम बबुवाजीखानम , अहमदनगरची शाहजादी चाँदबिब्बी अन् त्यापेक्षाही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळमुलुखातील कितीतरी मराठ्यांच्या लेकीसुना त्यांना दिसत होत्या ना ! कारीच्या कान्होजी जेध्यांची आई अनसाऊ जेधे ही त्यातलीच.
आसवलीच्या ढमाळपाटलांची आई रुपाऊ अन् अशा अनेक कितीजणी यमदूतांच्या नजरेला नजर भिडवून जगत आलेल्या बायका आऊसाहेबांना दिसत होत्या. आपणहून माणसांनी शिकायचं असतं ते हेच! असंच. मराठी रक्तात जन्मता:च असणार शौर्य आणि धैर्य आऊसाहेबांच्या रक्तात होत. एका बखरकारांनी लिहून ठेवलंय की , ‘ जिजाऊ सारखे कन्यारत्न ईश्वरानेच निर्माण केले ‘ कितीही कठीण संकटं पुढं आली , तरी तिळमात्रही न डगमगता धैर्यानं तोंड देणारी होती ही मराठ्याची मुलगी. आऊसाहेबांना आपला शिवबा उदात्त , उत्कट आणि उत्तुंग यशाचा मानकरी करायचा होता. याचं द्योतक म्हणजे शिवाजीराजांची तयार झालेली राजमुदा.
प्रतिश्चंदालेखे वधिर्र्ष्णुविश्ववंदिता साहसूनो शिवस्येषा मुदा भदाय राजते
केवढा उत्तुंग आणि उदात्त ध्येयवाद सांगितलाय या राजमुदेत! सदैव प्रतिपदेच्या चंदासारखी विकसित होत जाणारी ही शिवमुदा विश्वाला वंद्य आणि लोककल्याणकारी ठरो. संजीवनी नावाचा एक विलक्षण मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी कचाने मिळविला म्हणे! तोच हा मंत्र असेल का ? शिवाजीराजांच्या आज्ञापत्रांवर हाच मंत्र राजमुदा म्हणून झळकू लागला आणि शिवाजीराजांचा वावर सुरू झाला. मावळातल्या शेतकरी सवंगड्यात कुणी मराठा , कुणी माळी , कुणी साळी , कुणी तेली , कुणी रामोशी , कुणी महार , कुणी धनगर , कुणी ब्राह्माण तर कुणी मुसलमानही. अन् आदिलशहाच्या कानाशी कुजबुजत तक्रारी जाऊ लागल्या की , हा शहाजीराजाचा पोरगा हलक्या लोकांच्यात वावरतो. मुहम्मद आदिलशहाने ही कुजबुज हसण्यावारी नेली. त्याचा विश्वासच बसेना की , शहाजीराजाचा एवढासा पोरगा मावळी डोंगरात बंड पुकारील! या आदिलशाही विरुद्ध ? कसं शक्य आहे ? पण ते सत्य होतं. खरोखरच बंडाची राजकारणं शिवबाच्या डोक्यात घुमत होती.
पण खरंच शक्य होतं का ? अशक्यच होतं. शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का ? नाही. दीडदोन लाखाची फौज सहज उभी करू शकणाऱ्या आदिलशहाशिवाय पलीकडे गोवळकोंड्याचा कुतुबशहाही होता. भीमा नदीच्या उत्तरेला भीमेपासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य आपल्या तळहातावर नाचवणारा मुघल बादशहा शाहजहान दिल्लीत होता. कोकणच्या किनाऱ्यावर खाली पोर्तुगीज होते. वर जंजिऱ्याचा सिद्दी होता. अन् शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्या कामाल कडाडून विरोध करीत या सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोकही होतेच.
एवढ्या मोठ्या बळाला तोंड देण्याइतका शिवाजीराजांपाशी काय होतं ? सैन्य ? तोफखाना ? आरमार ? खजिना ? काहीच नव्हतं. पण या सर्वांहुनही एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळजांत होती. कोणती ? आत्मविश्वास! कठोर ध्येयनिष्ठा! अन् नितांत श्रद्धा! अंधश्रद्धा नव्हे. भाबडी अश्रद्धाही नव्हे. बुध्दीनिष्ठ श्रद्धा. अभ्यासपूर्ण श्रद्धा. अन् याच भावनांनी भारावलेली मावळी भावंडे. अशाच असंख्य भावंडांना ते हाका मारीत होते. न बोलत्या शद्बांत. कारण त्यांचे शद्ब इतिहासाच्या कागदपत्रांवर फारसे उमटलेच नाहीत. पण ते नक्की एकेकाला बोलावत होते. त्यांचा एकेक शब्द मंतरलेला होता. महाराजांचं मनुष्यबळ बोटं मोजावीत इतक्याच मोजमापात वाढत होतं. शत्रू परातभर होता. मावळे चिमूटभर होते. पण वडिलांनी वापरलेला अन् सह्यादीने शिकवलेला एक महामंत्र महाराजांच्या मस्तकात सदैव जागा होता. कोणता ? गनिमी कावा!
शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीतकमी फौजेनिशी आणि कमीत कमी युद्धसाहित्यानिशी , कमीतकमी वेळांत पूर्ण पराभव करण्याची शक्ती होती या गनिमी काव्यात।

                                 शिवचरित्रमाला भाग ३

                                स्वराज्य हवे की बाप हवा?


जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे शहाजीराजांना भेटण्यासाठी बंगळुरास गेले। शहाजीराजांचा मुक्काम तिथं होता। तेथूनच ते आपल्या कानडी मुलुखातील जहागिरीचा कारभार पाहात होते।
पुण्याहून ही मायलेकरे बंगळुरास आली। शहाजीराजांचे सर्वच कुटुंबीय एकत्र येण्याचा आणि सुमारे दोन वषेर् एकत्र राहण्याचा हा योग होता. हाच शेवटचा योग. या दोन वर्षातच हंपी विरुपाक्ष आणि विजयनगरच्या कर्नाटकी स्वराज्याची राजधानी विजयनगर पाहण्याचा योग शिवाजीराजांना आला. विरुपाक्ष हे तीर्थक्षेत्र होते. विजयनगर हे उद्ध्वस्त झालेले एका हिंदवी स्वराज्याचे राजधानीचे नगर होते. या प्रवासात शिवाजीराजांना खूपच पाहायला अन् शिकायला मिळाले. एवढे बलाढ्य साम्राज्य एका राक्षसतागडीच्या लढाईत धुळीला कसे काय मिळाले ? हा शेवटचा रामराजा कुठे चुकला ? त्याच्या राज्यकारभारात आणि लष्करात अशा कोणत्या जबर उणिवा झाल्या की अवघ्या एका मोठ्या पराभवाने त्याचे साम्राज्यच भुईसपाट व्हावे ?
या साऱ्या गोष्टींचा शोध आणि बोध शिवाजीराजांच्या मनात घुसळून निघत होता। त्यातून मिळालेले विवेकाचे नवनीत राजांना आपल्या भावी उद्योगात उपयोगी पडणार होते. पडले. हे वैचारिक समुदमंथन राजांच्या मनात या दोन वर्षात (इ.स १६४० ते ४२ ) घडले. राजे आणि जिजाऊसाहेब पुन्हा पुण्याकडे परतले , ( इ. स. १६४२ ) ते मराठी स्वराज्य सह्यादीच्या हृदयात निर्माण करण्याच्या निश्चयानेच! आणि शिवाजीराजांनी कानद खोऱ्यातील प्रचंड सह्यशिखरावरती बंडाचा झेंडाच उभारला. हा गड तोरणा. लगेच पुढे कोरीगड , सुभानमंगळ आणि कोंडाणा राजांनी कब्जात घेतला. आदिलशाही थक्कच झाली. एक मराठी कोवळा पोरगा सुलतानी विरुद्ध बंड करतो ? कुठून आलं हे बळ ? हे मोडलंच पाहिजे. या विचाराने महंमद आदिलशहाने एक अत्यंत धूर्त डाव सहज टाकला. या शिवाजी भोसल्याच्या बापालाच जर आपण अचानक छापा घालून कैद केलं तर हे बंड जागच्या जागी संपले. शिवाजी रुमालाने हात बांधून आपल्यापुढे शरण येईल. अन् मग पुन्हा कुणीही बंडाचा विचारही करणार नाही. याकरिता शिवाजीवर फौजही पाठवायची. जरूर तेवढा रक्तपात आणि बेचिराखी करायचीच. बस् ठरलंच.
पण याचवेळी शहाजीला कैद करायचं गरज पडली तर ठारही मारायचं। ठरलं आणि दिनांक २५ जुलै १६४८ या दिवशी शहाजीराजांवर वजीर मुस्तफाखानाचा विश्वासघातकी छापा पडला. आपल्यावर काही तरी घातकी संकट येणार आहे , आणि ते वजीराकडूनच येणार आहे हे आधी समजलेले असूनसुद्धा शहाजीराजे गाफील राहिले. झोपले. आणि वजीर मुस्तफाने त्यांना कैद केले. हातापायात बेड्या ठोकल्या. राजांची रवानगी कैदी म्हणून विजापुरास झाली. ही घटना तामिळनाडमध्ये मदुरेजवळ घडली.
शहाजीराजांना अपमानास्पदरीतीने विजापुरात आणण्याची कामगिरी अफझलखानाने केली. राजांना ‘ सत्मंजिल ‘ या हवेलीत आदिलशहाने कैदेत ठेवले.
या बातम्या पसरायच्या आतच आदिलशहाने पुण्याकडे मोठी फौज दिमतीला देऊन फत्तेखान या सरदारास रवानाही केले। शिवाजीराजा आणि त्याचं लहानसं नवं राज्य कब्जात घेण्याकरता.
राजगडावर शिवाजीराजांना ही भयंकर बातमी समजली की , तीर्थरूप साहेब शाही कैदेत पडले आणि आपल्यावर फत्तेखान चाल करुन येतोय। बादशहाचा आता उघड उघड सवाल होता की , बोल पोरा , स्वराज्य हवे की बाप हवा ? शहाजीला आम्ही कोणत्याही क्षणी ठार मारू शकतो। तरी मुकाट्याने शरण ये। जे बळकावलं आहे ते तुझं नखाएवढं स्वराज्य आमच्या स्वाधीन कर माफी माग. तर बाप सुटेल. नाहीतर अवघं भोसल्यांचं खानदान मुरगाळून टाकू. हा सवाल भयंकर होता वडलांचे प्राण की स्वराज्याचे रक्षण ? काय वाचवायचं ? आईच सौभाग्य की स्वराज्य ?
दोन्हीही तीर्थरुपच! मग दोन्हीही वाचवायचे। हा शिवाजी महाराजांच्या मनातला विचारही तेवढाच क्रांतीकारक होता. असा विचार करणारा विचारवंत योद्धा इतक्या लहान वयात ज्ञानेश्वरांच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी प्रथमच मराठी मातीत उगवत होता. येणाऱ्या शाही फौजेशी झंुज द्यायची असा ठाम निश्चय राजांनी केला. राजांच लष्करी बळ चिमूटभर होतं. आक्रमण परातभरून येत होतं. नक्कीच श्ाी तुकारामांचे विचार युवा शिवाजी राजांच्या मनात दुमदुमत होते. ‘ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! अंगी निश्चयाचे बळ , तुका म्हणे तेचि फळ! ‘
राजे अतिशय विचारपूर्वक आणि योजनाबद्ध आराखडा आपल्या आखाड्यात रेखित होते. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी पूर्ण पराभव करायचा हाच डाव , हाच संकल्प आणि हाच क्रांतीसाठी सिद्धांत.


शिवचरित्रमाला भाग ४

झडप बहिरी ससाण्याची…

विजापूरचा आदिलशाही सरदार फत्तेखान हा मोठ्या फौजेनिशी कऱ्हेपठारात (पुरंदर तालुका) शिरला। त्याचा तळ जेजुरीजवळच्या बेलसर गावाजवळ पडला। त्याला खात्रीच होती की , शिवाजीराजांचं बंड आपण लौकरात लौकर साफ मोडून काढू। त्यांनी आपल्या सैन्याचा एक विभाग शिरवळवर पाठविला. नीरा नदीच्या काठी शिरवळला एक भुईकोट किल्ला नव्या स्वराज्यात राजांनी कब्जा केलेला होता. त्याचं नाव ‘ सुभानमंगळ ‘. शाही फौज मोठी होती. तिने सुभानमंगळ एका घावातच जिंकला. मराठ्याचा हा स्वराज्यातील पहिला पराभव. शहाजीराजे विजापुरात कैदेत पडलेले. कोणत्याही क्षणी बादशहा शहाजीराजांना ठार मारू शकतो अशी परिस्थिती. पूवीर् असे सगळ्याच बादशहांनी अनेक लोक मारून टाकल्याच्या आठवणी ताज्या होत्या. कोणाचाही पाठिंबा नाही.
अशा परिस्थितीत शिवाजीराजांची आणि जिजाऊसाहेबांची मन:स्थिती कशी झाली असेल ? लक्षात येते ती एकच गोष्ट की , इतक्या भयंकर आणि भीषण मृत्युचे तांडव दिसत असूनही ही मायलेकरं थोडीसुद्धा कचरली नाहीत। त्यांचा आत्मविश्वास जबर होता. राजे राजगडावर आपला डाव आखीत होते. त्यांनी फार-फार तर हजारभर मावळी सैन्यानिशी पुरंदरचा किल्ला गाठला. तो दिवस होता ८ ऑगस्ट १६४८ . पावसाचे दिवस. नीरेला पाणी. पुरंदरपासून अवघ्या बारा कि. मी. वर इशान्येला बेलसर गावाजवळ फत्तेखानाची छावणी होती. याच पुरंदरच्या दक्षिणेला दहा कि. मी. वर सुभानमंगळ होता. हा किल्ला अगदी नुकताच , कालपरवा एवढ्यात फत्तेखानी सैन्याने जिंकून घेतला होता. त्यावर आदिलशाही निशाण लागले होते.
शिवाजीराजांनी रात्रीच्या काळोखात बेलसरजवळच्या शाही छावणीवर अचानक छापा घालण्याचा आणि शिरवळच्या सुभानमंगळावरही हल्ला करून तो किल्ला जिंकून घेण्याचा डाव आखला। प्रथम हल्ला सुभानमंगळवर , कावजी मल्हार या सरदाराबरोबर थोडं सैन्य देऊन त्याला पुरंदारावरून थेट शिरवळवर राजांनी सोडलं. या पावसाळ्यात कावजी वाटेत आडवी येणारी नीरा नदी ओलांडून सुभानमंगळवर हल्ला चढविणार होता. नदीला पूल नव्हता. नावा नव्हत्या. पोहूनच दक्षिणतीरावर जायचे होते. गेले. सुसरीसारखे मराठे गेले . किल्ला बेसावध होता , नव्हे निर्धास्त होता. कावजीने या किल्यावर मावळ्यांनिशी हल्ला चढविला. ते तटावर चढले. घुसले. प्रतिकार होत होता , पण मराठ्यांचा जोश आणि उग्र निर्धार किल्ल्यावरच तुटून पडला होता. युद्ध पेटले. हलकल्लोळ उसळला. मराठ्यांचा मारा भयानक होता. युद्धात शाही किल्लेदारच कावजी मल्हारने कापून काढला. आदिलशाही फौजेची अक्षरश: दाणादाण उडाली. मध्यरात्रीच्या अंधारात मराठ्यांनी प्रचंड विजय मिळविला. पुन्हा भगवा झेंडा सुभानमंगळवर फडकला. आधी झालेल्या पराभवानं खचून न जाता मावळ्यांनी शत्रूवर आग पाखडली. अचानक केलेल्या हल्ल्याचा हा परिणाम. किल्ला मिळाला.
कावजी मल्हार किल्याचा बंदोबस्त करून पुन्हा पुरंदरावर आला। सारं मराठी सैन्य या विजयानं अधिकच पेटून उठलं. शिवाजीराजांनी पुढच्याच मध्यरात्री बेलसरवर असाच थोड्याशा मावळ्यानिशी लपतछपत जाऊन एकदम हल्ला चढविला. यावेळी भगवा झेंडा एका मावळी तुकडीबरोबर होता. योजनेप्रमाणे राजांनी या मावळी तुकडीला हुकुम दिला होता की , तुम्ही ऐन लढाईत घुसू नका. आम्ही गनिमांवर हल्ला करतो. अजूनही फत्तेखानाचं सैन्य जे आहे ते आपल्यापेक्षा जास्तच आहे. जमेल तसा आम्ही त्यांचा फडशा पाडतो. पण छावणीत झोपलेले शाही हशम जर आमच्यावर मोठ्या बळांनं चालून आले तर आम्ही माघार घेऊ. तुमच्या झेंड्याच्या तुकडीच्या रोखाने येऊ. आपण सारेच पुन्हा पुरंदरवर पोहोचू.
हे छापेबाजीचं म्हणजेच गनिमी काव्याचं तंत्र कायम विजय मिळेपर्यंत चालूच राहणार होतं। राजांनी बेलसरच्या छावणीवर या योजनेप्रमाणे एकदम छापा घातला. कापाकापी एकच कार्यक्रम , अत्यंत वेगानं मावळ्यांनी सुरू केला. शाही छावणीत गोंधळ उडाला. फत्तेखान जातीनं उठून मराठ्यांवर तुटून पडला. मराठे ठरल्याप्रमाणे माघार घेऊ लागले. हा पराभव नव्हेच ही युद्धपद्धती होती. गनिमी काव्याचं युद्ध एकाच लढाईत संपत नसतं. ते विजय मिळेपर्यंत महिनोन महिने सुद्धा चालूच राहतं.
मराठी फौजा माघार घेत दौडीत सुटली। काही मराठेही युद्धात पडले। मराठे परत फिरले पण दुसऱ्या बाजूनं भगव्या झेंड्याची मराठी तुकडी उत्साहाच्या भरात शाही छावणीवर तुटून पडली. ही तुकडी नेमकी शाही सैनिकांच्या तडाख्यात सापडली. खुद्द झेंडेवाल्यावरच घाव पडला. त्याच्या हातातील भगवा झेंडा कोसळण्याचा क्षण आला. झेंडा पडणार ? नाही , नाही! कारण तेवढ्यात याच तुकडीतल्या बाजी कान्होजी जेधे या तरुण पोरानं एकदम पुढे सरसावून तो पडत असलेला झेंडा स्वत:च पकडला. बाकीचे मावळे लढतच होते. बाजी जेध्यानं त्यांना माघार घेण्याचा इशारा देत देत लढाई चालूच ठेवली होती. या शथीर्च्या धुमाळीत काही मावळे पडले. पण झेंडा सावरीत बाजी यशस्वीपणे माघारी फिरला. अन् आपल्या साथीदारांच्यानिशी अंधारात गुडूप झाला. ही झेंड्याची तुकडी रक्ताळली होती. पण झेंडा हातचा न जाऊ देता पुरंदर किल्यावर दाखल झाली.
अपेक्षेप्रमाणे हा हल्ला राजांना चांगला जमला होता. झेंडा जात होता , तोही परत आलेला पाहून राजे हर्षावले. फत्ते झाली. राजांनी बाजी जेध्याचं शाबासकी गर्जून कवतिक केले. त्यांनी तिथेच त्याचा उल्लेख ‘ सर्जाराव ‘ असा केला. हीच बाजी जेध्यांची पदवी ठरली. आता खासा फत्तेेखान तुडवून काढण्याचा राजांचा निर्धार दसपटीनं वाढला. आत्मविश्वास वाढला. पुरंदर किल्ला मराठी युद्धघोषणांनी दणाणत होता.

शिवचरित्रमाला भाग ५

यह तो पत्थरों की बौछार है!

 

बेलसरच्या फत्तेखानी छावणीवर अचानक छापा घालून शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांनिशी पसार झाले। ते पुरंदरावर आले. झेंड्याची तुकडी खरं म्हणजे साफ कापली जाणार होती. भगवा झेंडा शत्रूच्या हातात पडणार होता. पण बाजी जेध्यांच्या बहादुरीमुळे तुकडी आणि झेंडा बचावले. ते ही गडावर आले. रात्रीची वेळ , पूर्ण विजय नव्हे , पण एक यशस्वी धडक महाराजांनी आक्रमक शाही छावणीवर मारली होती.
महाराजांनी लगेच आपल्या सगळ्याच सेनेला हुकुम दिला की , पुरंदर गडाच्या उत्तर तटावर जास्तीत जास्त धोंड्यांचे ढीग जागोजागी गोळा करून ठेवा। मावळे त्वरित कामाला लागले. डोंगरावर धोंड्यांना काय तोटा! उत्तर बाजूच्या तटावर धोंड्याचे लहानमोठे ढिगारे घडीभरात जमले.
महाराजांनी आपल्या मावळ्यांना म्हटले , ‘ आता मार बसल्यामुळे चिडलेला तो फत्तेखान आपल्या या पुरंदरावर याच उत्तर बाजूवर सकाळी चाल करून येईल। तो वर येत असताना आमची इशारत होईपर्यंत तुम्ही कुणीही त्याच्यावर कसलाही मारा करूनका। येऊ द्यात त्याला वर। आम्ही इशारत करू अन् मग तुम्ही शत्रूवर या मोठ्यामोठ्या धोंड्यांचा मारा करा.
‘ सोप्पं काम। स्वस्थ काम. शत्रूच्या सुसज्ज सैन्यावर दारुगोळ्यांचा हल्ला करणं स्वराज्याच्या या शैशववयात महाराजांना परवडणारं नव्हत. युद्ध साहित्यही कमी. मावळी सैन्यही कमी. त्यावर महाराजांनी ही दगडधोड्यांची लढाई अचूक योजली. बिनभांडवली धंदा. पसाभर धोंड्यापासून मिठीभर धोंड्यापर्यंत वेगवेगळ्या आकारांचे , सह्यादीतील हे दगडी सैनिक महाराजांनी तयार ठेवले होते.
महाराजांचा अंदाज अचूक ठरला। उजाडत्या उजेडात फत्तेखान आपलं सार सैन्य घेऊन पुरंदरच्या उत्तर पायथ्याशी दौडत आला. तुफान , प्रचंड पुरंदर त्याच्यासमोर उभा होता. आधीच्या मावळी तडाख्याने खान चिडला होता आणि त्याने आपल्या फौजेला घोड्यावरून पायउतार होऊन एकदम एल्गार करण्याचा हुकुम दिला. सुलतानढवा! म्हणजेच एकदम हल्ला. शाही फौज एकदम पुरंदरावर तुटून पडली. त्यांच्या युद्धगर्जना दणाणू लागल्या. पुरंदरगड आणि पुरंदरगडी एकदम शांत होते. चिडीचिप्प. ते दडलेले होते. फत्तेखानाची फौज गडावर धावून निघाली होती. गडाच्या निम्यापर्यंत चढलीही. अन् ऐन टप्प्यात शत्रू आलेला दिसताच महाराजांनी गडावरच्या मावळ्यांना इशारा केला. अन् गर्जना सुरूझाल्या. शिंगे धुत्कारूलागली. अन् मग ते लहानमोठे धोंडे गडावरून उतारावर धाड् धाड् धाड् उड्या घेत फत्तेखानच्या सैन्यावर तुटून पडले. एका का दोन! पाउसच. शाही सैन्य तो दगडांचा वर्षाव पाहून चकीतच झालं. थडाथडा मार बसू लागला. कुणी मेलं , फारजण जखमी होऊ लागले. हा मारा सोसण्याच्या पलिकडचा होता.
फत्तेखानालाही खालून हा दगडांचा येणारा वर्षाव दिसत होता। तो थक्कच झाला। अन् म्हणाला , ‘ यह तो पत्थरों की बौछार है!
‘ आता ? मावळ्यांना चेव आला होता। केवळ दगड धोंड्यांची पुष्पवृष्टी करून मावळ्यांनी गनिम हैराण केला होता. गनिम आरडत ओरडत तोंड फिरवून गडाच्या पायथ्याकडे त्या उतारावरून धावत सुटला होता. उड्या मारीत , पडत , घसरत , दगडांचा मार खात हे शाही सैन्य उधळलं गेलं होतं. जणू वादळातला पालापाचोळा. या फत्तेखानाची आता फळी फुटली होती. महाराज आपल्या सैन्यानिशी गडावरून बाहेर पडले आणि गनिमावर तुटून पडले. अखेर फत्तेखान सासवडच्या दिशेने पळत सुटला. येथून सासवड फक्त १० कि. मी.वर. गनिम सासवड गावात आश्ायाला घुसला. मावळ्यांनी पाठलाग करून त्यांना झोडपून काढले. फत्तेखान कसाबसा ओंजळभर सैन्यानिशी धूम पळत होता. विजापूरच्या दिशेनं! त्याचं सैन्य आणि स्वप्न मराठ्यांनी एकाचवेळी पार उधळून लावलं होतं.
फत्तेखानाच्या त्या मोठ्या थोरल्या सैन्याचा आपल्या लहानशा सैन्यानिशी कमीतकमी वेळात , कमीत कमी युद्धसाहित्यानिशी , पूर्ण पराभव केला होता. कोणची ही जादू ? कुणाचा हा चमत्कार ? हा गनिमीकाव्याच्या शक्तीयुक्तीचा परिणाम , जादू , चमत्कार. विचारपूर्वक आपल्या लहानशा शक्तिनिशी प्रचंड शाहीशक्तीला कसं हरवायचं याचं महाराजांचे चिंतन इथं दिसून येतं.



No comments:

Post a Comment

Website Security Test