शिवचरित्रमाला भाग ६
तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला!
शहाजीराजे पकडले गेले होते। त्यांच्या हातापायात बेड्या होत्या. त्यांना मदुराईहून विजापूरला आणलं अफझलखानानं शहाजीराजांना मकई दरवाजाने विजापूर शहरांत आणलं. अन् भर रस्त्याने त्यांना हत्तीवरून मिरवित नेलं. त्यांच्या हातापायात बेड्या होत्याच. या अशा अपमानकारक स्थितीतच अफझलखान शहाजीराजांची या भर वरातीत कुचेष्टा करीत होता. तो मोठ्याने शहाजीराजांना उद्देशून म्हणत होता. ‘ ये जिंदाने इभ्रत है!
‘ खान हसत होता। केवढा अपमान हा! राजांना ते सहन होत नव्हतं. पण उपाय नव्हता. राजे स्वत:च बेसावध राहिले अन् असे कैदेत पडले. जिंदाने इभ्रत! म्हणजे मोठ्या मानाचा कैदी. शिवाजीराजे स्वराज्य मिळविण्याचा उद्योग करीत होते. त्यांनी बंड मोडले होते. म्हणून त्यांचे वडील हे मोठ्या मानाचे कैदी! आता शिक्षाही तशीच वाट्याला येणार. हे उघड होतं. सत् मंजिल या एका प्रचंड इमारतीत राजांना कडक बंदोबस्तात मोहम्मद आदिलशहाने डांबलं. आता भविष्य भेसूर होतं. मृत्यू!
आणि उमलत्या कोवळ्या स्वराज्याचाही नाश! जिजाऊसाहेब यावेळी राजगडावर होत्या। शहाजीराजांच्या कैदेची बातमी त्यांना समजली , त्याक्षणी त्यांच्या मनात केवढा हलकल्लोळ उडाला असेल! गुन्हा नसतानाही अनेक कर्तबगार मराठ्यांची मुंडकी शाही सत्तांनी उडविलेली त्यांना माहीत होती. प्रत्यक्ष त्यांचे वडील आणि सख्खे भाऊ एका शाही सत्ताधीशाने असेच ठार मारले होते. आता शहाजीराजांना जिवंत सोडवायचं असेल , तर एकच मार्ग होता.
आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं! स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं। नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं.! शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ , पुरंदर गड , बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्यादीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं. (दि. ८ ऑगस्ट १६४८ )
अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते। कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता , नाही का ?
पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती , अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता। राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता ? मुघल बादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी , असा आदिलशाहला शह टाकण्याकरता.
राजांचा डाव अचूक ठरला। दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की , शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं.
हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वषीर्चं कृष्णकारस्थान होतं। अचूक ठरलं। विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल! शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे , त्याच्याच अंगाशी आला. कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती.
मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली. मनगटातलं पोलादी सार्मथ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरुपचं. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं. अन् ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या.
शिवचरित्रमाला भाग ७
तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ!
विजापूरच्या बादशाही विरुद्ध झडलेल्या पहिल्याच रणधुमाळीत शिवाजीराजांनी अस्मानी यश मिळविलं। पण राजे वडिलांच्यावर रागावले , चिडले अन् संतापलेसुद्धा। का ? कारण शहाजीराजे बेसावध राहिले , पकडले गेले अन् भयंकर संकट स्वराज्यावर आले. जिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांना मानसिक यातना असह्य झाल्या. हे सारं शहाजीराजांच्या गाफिलपणामुळं झालं.
खरंच होतं ते। याची खंत शहाजीराजांना स्वत:लाही निश्चितच होती. पण पेच सोडविण्यासाठी शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या हाती असलेला स्वराज्यातला कोंढाणा किल्ला आणि कर्नाटकातील शहाजीराजांचं महत्त्वाचं ठाणं शहर बंगळूर हे बादशहाला देऊन टाकायचं कबूल केलं. आणि हे पाहून शिवाजीराजे रागावले. राजकारणात अक्षम्य ठरणारी गाफिलपणाची चूक स्वत: महाराजसाहेब शहाजीराजे यांनी केली. परिणाम मात्र या लहानग्या स्वराज्याला भोगायची वेळ आली. तळहातावरती भाग्याचा तीळ असावा तसा कोंढाणागड बादशहाला फुकट द्यावा लागतोय , याचं दु:ख राजांना होत होतं. स्वराज्यातील तळहाताएवढी भूमीही शत्रूला देताना यातना होण्याची गरज असते!
कोंढाणा आदिलशाहीत परत देऊन टाकण्याची आज्ञापत्रं राजगडावर आली। आणि महाराज व्यथीत झाले. ते गडावर कुठंतरी एकांतात एकटेच अस्वस्थ होऊन बसले.
मिळालेल्या यशामुळे राजगड आनंदात होता। एकटे शिवाजीराजे खिन्न होते , कोंढाण्यावर. राजे कुठंतरी जाऊन एकटेच बसले आहेत ही गोष्ट वयोवृद्ध सोनो विश्वनाथ डबीर यांच्या लक्षात आली. सोनोपंत म्हणजे आजोबा शोभावेत अशा वयाचे वडिलधारे मुत्सद्दी. भोसले घराण्यावर त्यांची अपार माया. ते चरण चालीने शिवाजीराजांकडे गेले. महाराज गंभीर आणि उदास दिसत होते. सोनो विश्वनाथांनी वडिलकीच्या सुरात त्यांना पुसलं. ‘ महाराज , आपण चिंतावंत का ? आता काळजी कशाची ? तीर्थरुपसाहेब शहाजीमहाराज शाही कैदेतून मुक्त झाले. आपले राज्यही आपण वाचविले. मग चिंता कशाची ?
‘ राजांनी गंभीर शब्दात म्हटलं , ‘ काय सांगावं! आमचे तीर्थरुपसाहेब बेसावध राहिले आणि शाही जाळीत अडकले। आम्ही हरहुन्नर करून त्यांस सोडविण्यास आदिलशहास भाग पाडले. सुटले. पण वडिलांनी बादशहाच्या मागणीवरून आपला स्वराज्यातील कोंढाणागड परत देऊन टाकण्याचे कबूल केले. काय म्हणावं या गोष्टीला ? आमच्या कामाचे मोल वडिलांस समजलेच नाही. ते स्वत:स मोठे जाणते म्हणवितात. पण वर्तन मात्र अजाणते केले.
‘ हे शब्द शिवाजीराजे व्याकुळतेने बोलत होते , पण ते ऐकताच सोनो विश्वनाथ अधिकच गंभीर होऊन जरा कठोर वडिलकीचे शब्दात म्हणाले , ‘ महाराज , काय बोलता हे ? वडिलांच्याबद्दल असं विपरित बोलणं आपणांसारख्या सुपुत्रांस शोभा देत नाही.
‘ शिवाजीराजे अधिकच गंभीर होऊन ऐकू लागले। ‘ महाराज वडील चुकले तर खासच. शंकाच नाही. पण वडिलांबद्दल असं बोलणं बरं नव्हे. कोंढाण्यासारखा मोलाचा गड विनाकारण हातचा जातोय. खरं आहे पण वडिलांच्याकरिता हे सोसावेच महाराज! वडिलांचा मान राखावा.
‘ शिवाजीराजे एकदम स्वत:स सावरीत बआदब म्हणाले , ‘ नाही , आमचं चुकलं। वडिलांचा अपमान करावा म्हणून आम्ही बोललो नाही. स्वराज्याचे नुकसान , मनाला मानवले नाही म्हणून बोललो. कोंढाणा गेला म्हणून बोललो.
‘ ‘ महाराज कोंढाण्याचे काय एवढे वडिलांपुढे ? हा अतिमोलाचा गड देऊन टाकावा। महाराज , आपण तर अवघा मुलूख काबीज करा. उदास होऊच नका. ‘ महाराजांना हा विवेक फार मोलाचा वाटला. पटला. त्यांनी जरा तीव्र शब्दांत म्हटलं. ‘ होय ‘ जरुर. पण वडिलांचा झालेला हा अपमान ती कैद. त्या अफझलखानाचं वागणं बोलणं आम्हाला सहन होत नाही. ज्यांनी ज्यांनी आमच्या तीर्थरुपांचा असा हीन अपमान केला , त्यांचा त्यांचा सूड आम्ही आमच्या हातानं घेऊ. तो अफझलखान , बाजी घोरपडे , ते वझीर मुस्तफाखान , मनसब ई कार ई मुलकी या साऱ्यांचे वेढे आम्ही घेऊ.
‘ सोनो विश्वनाथ या राजवचनांनी सुखावले। अवघं पावलं असं वाटलं असावं त्यांना. आई आणि वडिलांच्याबद्दल आमचा राजा असं पोटतिडीकेनं बआदब वागतो. साऱ्या मराठी मुलुखापुढं सूर्यफुलाचा आदर्श ठेवतो. एक चारित्र्यसंपन्न करारी पण नम्रही नेतृत्त्व मराठ्यांच्या मुलुखाला लाभलेलं पाहून कोणाच्याही डोळ्यांत अभिमानाचे आनंदाश्रू तरळावेत असंच बोलणं राजा बोलला.
हा सारा संवाद पुढे कवींद परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहून ठेवला। त्याचा हा आशय.
कोंढाणागड आदिलशाहीत राजांनी देऊन टाकला. बादशहाच्या हुकुमावरून नव्हे. वडिलांच्या आज्ञेवरून!
शिवचरित्रमाला भाग ८
‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस!’
शहाजीराजे विजापूरात स्थानबद्धच होते। (दि. १६ मे १६४९ पासून पुढे) या काळात शिवाजीराजांना आदिलशाहच्या विरुद्ध काहीही गडबड करणं शक्य नव्हतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षा थबकल्या होत्या. पण गप्प बसणं हा त्यांचा स्वभावधर्मच नव्हता. त्यांनी ओळखलं होतं की , आदिलशाह , जंजिऱ्याचा सिद्दी , गोव्याचे फिरंगी , अन् दिल्लीचे मोघल हे आपले वैरी. पण यांच्यापेक्षाही दोन भयंकर शत्रू आपल्या जनतेच्या मनात घुसून बसलेले आहेत. त्यांना कायमचं हुसकून काढलं पाहिजे. त्यातील एका शत्रूचं नाव होतं आळस. आणि दुसऱ्याचं नाव होतं अज्ञान.
या दोन्ही शत्रूंना शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्याच्या सीमापार पिटाळलं होतं। ते स्वत: अखंड परिश्रम करीत होते. विश्रांती म्हणजेच आळस. ती त्यांना सोसवतच नव्हती. त्यांचे हेर कोकणातील दऱ्याखोऱ्यांत आणि सागरी किनाऱ्यावर हव्या आणि नको अशा गोष्टींचा शोध घेत होते. कारण पुढची मोठी झेप कोकणावर घालायची होती. याच काळात त्यांचं लक्ष पुण्याच्या आग्नेयेस अवघ्या दहा मैलांवरती असलेल्या कोंढवे गावावर गेले. कोंढाणा ते भुलेश्वर या डोंगररांगेच्या उत्तरणीवर हे कोंढवं वसलेलं होतं. तेथूनच बोपदेव घाटातून कऱ्हे पठारात जाण्याचा प्राचीन रस्ता होता. या घाटाच्या पायथ्याशीच कोंढवे गावाला प्यायला पाणी नाही अशी ल्हायल्हाय अवस्था उन्हाळ्यात कोंढण्याची होत होती.
शिवाजीराजांनी या कोंढव्याच्या जवळ अचूक जागा शोधून धरण बांधायचं ठरविलं। जो काही पाऊस थोडाफार पडतो. त्याचं पाणी बंधारा घालून अडवायचं. कमीतकमी खर्चात अन् उत्तम अभ्यासपूर्वक केलं , तर हे होतं. राजांनी तसंच करायचं ठरविलं. स्वत: जाऊन धरणाच्या जागेची पाहणी केली. जागा निवडली. उत्तमच पण जिथं बंधारा घालायचा तिथंच एक प्रचंड धोंड उभी होती. ही धोंड फोडणं आवश्यकच होतं. हे अतिकष्टाचं काम राजांनी कोंढाण्यातल्याच येसबा कामठे नावाच्या एका तरुण मराठ्याला सांगितलं आणि त्यानं ही धोंड फोडून काढली.
धरणाचं काम सुकर झाले। खर्चही बचावला. राजे स्वत: धरणाच्या जागी आले आणि निहायत खूश झाले. येसबानं जीव तोडून धोंड फोडली होती. राजांनी येसबाला कौतुकाची शाबासकी दिली. कौतुकानं ते येसबाला रोख रक्कम बक्षिस म्हणून देऊ लागले. राजा सुखावला होता. माझ्या स्वराज्यातली तरुण पोरं जीवापाड कष्ट करीत आहेत याचा त्याला आल्हाद वाटत होता. पण तो येसबा! राजांची रोख बक्षिसी घेईचना. तो म्हणाला , ‘ पैसे खर्च होऊन जातील. मला कायमची धान्य पिकवायला जरा जमीन द्याल का ?
‘ राजे अधिकच भारावले। येसबाला आलेली ही दृष्टी फारंच चांगली होती. घरसंसार चांगला फुलावा यासाठी चार दिवसांची चंगळबाजी न करता कायम कष्टाचं साधन येसबा पसंत करीत होता. राजांनी ताबडतोब होकार दिला. त्यांनी येसबाला चारवीत जमीन दिली. येसबाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या मनात एक नवाच अभिमान फुलला की , माझ्या स्वराज्यात , माझ्या राजानं , माझ्या कुटूंबाच्या कायम हितासाठी मला वावर दिलं. आता कष्ट करू. भरल्या कणगीला टेकून पोटभर हक्काची भाकर खाऊ.
राजा अशा नजरेचा होता। दिवाळीत उटणं लावून आंघोळ घालावी अन् मळ धुवून काढावा तसा राजानं कोणाला काही , कोणाला काही काम सांगून त्यांचा आळस आणि अज्ञान धुवून काढायचा दिवाळसणच मांडला. राजानं माणसं कामाला लावली. ज्यांना ज्याची गरज असेल , त्यांना राजानं ‘ ऐन जिनसी ‘ मदत चालू केली. रोख रक्कम उधळली जाते. ज्या कामासाठी रक्कम घ्यायची ते काम करण्याऐवजी माणसं नको तिथं उधळपट्टी करतात. कामं बोंबलतात. अविवेकी माणसं उगीच लगीन करतात. उगीच देवळं बांधत सुटतात. देवाला काय हे असलं आवडतंय व्हय ? राजांनी रोकड कर्ज आणि वतनं इनामं देणं कधी सुरूच केलं नाही. जिजाऊसाहेबांनी पुण्यात प्रथम आल्यावेळी गरजवंतांना आपले संसार आणि उद्योगधंदे सजविण्यासाठी ‘ ऐन जिनसी ‘ मदत केली. तोच हा पायंडा राजे चालवित होते.
रहाटवड्याच्या रामाजी चोरघ्याला शेतात विहीर बांधायला नाही का अशीच मदत केली। यातनं रयतेत कुणाकुणाच्या पूवीर्च्या जखमा राजे भरूनही काढीत होते. तुम्हास्नी ठाऊ नसल. मी सांगतो. कोंढण्याच्या या येसबा कामठ्याच्या संसाराला फार मोठी जखम झाली होती ती कशी ? पूवीर् कोंढाण्याच्या किल्लेदारानं बादशाहीत या येसबाच्या थोरल्या भावावर खोटे नाटे आळ घेऊन त्याला ठार मारलं होतं. कामठ्यांच्या घरातली लक्ष्मी विधवा झाली होती. काही गुन्हा नसताना असं आभाळ कोसळलं. कसं सावरायचं ? कुणी सावरायचं ?
शिवाजीराजांनी सावरायचं। येसबा कामठ्याचं कोसळलेलं घरकुल शिवबानं सावरलं. हे असं सावरलं किसनदेवानं गोवर्धन पर्वत सावरला तसं सावरलं. आपल्या बोटावर सावरलं. पण अवघ्या गवळ्यांच्या काठीचा आधार त्या पर्वताला मिळालाच की!
शिवचरित्रमाला भाग ९
चंदग्रहण
शहाजीराजे प्रत्यक्ष तुरुंगातून सुटले , तरीही ग्रहणकाळ संपला नाही. मोहम्मद आदिलशाहने शहाजीराजांना कैदेतून मुक्त केलं. पण त्यांना हुकूम केला की , आमची परवानगी मिळेपर्यंत तुम्ही विजापूर शहरातच राहायचं. बाहेर कुठेही अजिबात जायचं नाही.
अतिशय धूर्तपणानं आणि सावधपणानं शहानं हा हुकूम दिला. म्हणजे शहाजीराजांना त्यानं विजापुरात स्थानबद्ध केलं. याचा परिणाम शिवाजीराजांच्या उद्योगांवर आपोआप झाला. शहानं या मार्गानं शिवाजीराजांना धाकच दाखविला की बघ , तुझा बाप मुक्त असला तरीही विजापूरात तो आमच्याच पंजाखाली आहे. जर तू सह्यादीच्या पहाडात गडबड करशील , तर अजूनही तुझ्या बापाचे प्राण जातील याद राख.
धूर्त शहाने शिवाजीराजांच्या हालचाली साखळबंद करून टाकल्या.
पण गप्प बसणं हा शिवधर्मच नव्हता. ते एक तुफान होतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षेला विजेचे पंख होते. राजांचं भीमा नदीच्या उत्तरेकडे थेट दिल्लीपर्यंत लक्ष होतं. आज ना उद्या पण लवकरात लवकर आपल्याला भीमा ओलांडून मोगलाई सत्तेवर नक्कीच चढाई करायची आहे , हे लक्षात घेऊन महाराज वागत होते. भीमेच्या उत्तरेला थेट काश्मीरपर्यंत शहाजहानचं मोगली साम्राज्य होतं. तसंच केव्हातरी सह्यादी ओलांडून मावळतीला असलेल्या कोकणपट्टीवर आपल्याला उतरायचं आहे आणि कोकणचा समुद आपल्या ओंजळीत घ्यायचाय हीही महत्त्वाकांक्षा त्यांची होतीच. कोकणात सत्ता विजापूरकरांची होती. पण त्यातही सिद्दीनं आपली जबरदस्त सत्ता जंजिऱ्याच्या सागरी किल्ल्यावर थाटली होती. एखाद्या बेटांवर आणि गोमांतकात पोर्तुगीज फिरंगी जुलूम गाजवत होते. एकूण अवघं कोकण काबीज करणं म्हणजे सुसरी- मगरींशी झुंज देण्याइतकं अवघड काम होतं. अशक्यप्राय!
महाराजांची सावध महत्त्वाकांक्षा सह्यादीवरून पश्चिम पायथ्याशी पसरलेल्या कोकणावरती डोकावून डोकावून फिरत होती. झडप घालयाची होती. पण शहाजीराजे जोपर्यंत विजापूर शहरात शाही पंजाखाली स्थानबद्ध आहेत , तोपर्यंत काहीही करता येत नाही. याची जाणीव त्यांना होती. गप्प बसवत नव्हतं. पण काहीच करता येत नव्हतं. पण आपल्याच लहानग्या स्वराज्याचं बळ ते वाढवित होते. पायदळ , घोडदळ , हेरखातं , परराष्ट्रवकील खातं , जमीन महसूल , रयतेच्या अडीअडचणी इत्यादीत ते अविश्रांत गुंतले होते. हेरगिरी करणारं नजरबाज खातं , बहिरी ससाण्यासारखं स्वराज्याभोवती शत्रूच्या मुलखांत भिरभिरत होतं. नानाजी विश्वासराव दिघे , बहिजीर् नाईक जाधव आणि असेच चतुर हेर त्यात होते. पुढे संुदरजी परभुजी आणि वल्लभदास या नावाचे दोन चतुर गुजराथी हेरागिरीसाठी महाराजांना गवसले. निवडून निवडून आणि पारखून पारखून महाराज माणसं मिळवत होते. घडवत होते. यात जातीधर्माचं बंधन नव्हतं. सामान्य माणसांतून असामान्य माणसं घडविण्याचा हा शिवप्रकल्प होता अत्रे , बोकील , पिंगळे , आवीर्कर राजोपाध्ये , हणमंते , पतकी अन् अशाच कुळकर्ण करीत खडेर्घाशी करणाऱ्या किंवा हातात दर्भाची जुडी अन् पळीपंचपात्री घेऊन गावोगांव श्राद्धपक्षाची पिंडं पाडणाऱ्या वा लग्नमुंजीच मंगलाष्टक तारस्वरात ओरडत हिंडणाऱ्या…. पण तल्लख बुद्धी , काळजात हिम्मत आणि मनगटात तलवारीची हौस असलेल्या निवडक भटाभिक्षुकांचे गुण अचूक हेरून त्यांनाही राजकारणाच्या आणि रणांगणांच्या आखाड्यात उतरविणारे महाराज अठरापगड अवघ्या मऱ्हाठी जातीजमातीलाही आपल्या हृदयाशी धरीत होते ; स्वराज्याच्या कामाला गुंफीत होते. हे राज्य एक आहे , आम्ही सारे एक आहोत अन् श्रींच्या इच्छेप्रमाणे हे राज्य आम्ही वैभवशाली करणार प्रतिपद्चंदलेखेव आहोत ही गगनालाही ठेंगणी बनविणारी महत्त्वाकांक्षा धरीत होती. महाराजांचा पहिला पायदळ सेनापती होता नूरखान बेग सरनोबत , बहिजीर् नाईक जाधव हा रामोशी होता. महार , प्रभू , धनगर , सोनार , शिकलगार , कहार , चांभार , भांग , किती जाती जमातींची नावं घेऊ ? शहाण्णव कुळीच्या मराठ्यांपासून ते चंदपूर गोंडवनातील उघड्यावाघड्या गोंडांपर्यंत अवघ्यांचा भोंडला सह्यादीच्या भोवती महाराज मांडीत होते. त्यांना ‘ अवघ्या मऱ्हाठी यांचे गोमटे करावयाचे ‘ होते. त्यासाठी हा स्वराज्याचा मनसुबा त्यांनी मांडला होता. शहाजीराजांच्या स्थानबद्धतेमुळे ते सह्यादीच्या शिखरांपाशीच थबकले होते. खोळांबले होते. कोकणात डोकावून डोकावून बघत होते. त्यांना कोकणचं वैभव दिसत होतं. अन् गरीब रयतेचे हालही दिसत होते. कोकणात आंबा पिकत होता. रस गळत होता , कोकणचा दर्या राजा झिम्मा खेळत होता. शेतकरी राजा अर्धपोटी राहत होता , तरीही जगत होता.
हबश्यांच्या अन् फिरंग्यांच्या अत्याचारांचे फटके खात होता तरीही नवी आशेची स्वप्न पाहत , दु:ख उशाखाली झाकून झोपत होता. कोकणातल्या त्या आगरी , कुणबी , कोळी , भंडारी , मालवणी अन् गांवकर ‘ मंडलींना ‘ पहाटेच्या स्वप्नात शिवाजीराजे दिसत असल्यास काय ?
अन् याच काळात (इ। स. १६४९ – १६५२ ) महाराजांच्या चाणाक्ष हेरांनी कोकणपट्टी हेरली. सुख , दु:ख , अपमान , अत्याचार आणि आशेचे किरणही हेरले. समिंदर हेरला , किनारा हेरला. लबाड हेरले , वैरी हेरले. इमानी अन् कष्टाळूही हेरले.
महाराजांची झेप पडणार होती .कोकणपट्टीवर उद्या ? परवा ? ते अवलंबून होतं. शहाजीराजांच्या पुढच्या परिस्थितीवर. पण याच काळात महाराजांचं बळ त्यांच्या तळहाताएवढ्या स्वराज्यात सुपाएवढं वाढत चाललं होतं.
पण नियती मोठी द्वाड. एका बाजूनी पंखात बळ वाढवित होती , तर दुसऱ्या बाजूनी तीच नियती पंखांवर भयंकर आघात करीत होती. याच काळात (इ. स. १६४९ फाल्गुन) जगद्गुरू तुकाराम महाराज अचानक हे जग सोडून गेले.
शिवचरित्रमाला भाग १०
क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.
मोहम्मद आदिलशाहची प्रकृती चांगली नव्हती। शाह अर्धांगवायूसारख्या विकारानं लुळापांगळा झाला होता. त्याची तबियत ढासळत होती. त्याचवेळी गोलघुमट या प्रचंड इमारतीचं बांधकाम उंचउंच चढत होतं. लवकरच ते पूर्ण होणार होतं.
आपल्याला हे माहिती आहे ना ? की गोलघुमट ही इमारत म्हणजे याच मोहम्मद आदिलशाहची कबर. मोहम्मद आदिलशाह तक्तनशीन बादशाह झाला त्याचवेळी त्यानं स्वत:साठी स्वत:च हे कबरस्तान बांधावयास सुरुवात केली. निष्णात वास्तुकारागिरांनी ही इमारत बांधली. उच्चारलेल्या वा उमटलेल्या ध्वनीचे अनेक प्रतिध्वनी या घुमटात घुमत होते. पण आजारी बादशाहच्या मनात एकच ध्वनी आणि असंख्य प्रतिध्वनी उमटत होते मऱ्हाठ्यांच्या बंडाचे. बादशाह बेचैन होता.
एक गोष्ट त्यानं केली त्याने चार वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर शहाजीराजांची मुक्तता केली. शहाजीराजे दक्षिण कर्नाटकात आपल्या जहागिरीवर रवानाही झाले. म्हणजेच शिवाजीराजांच्यावरचं असलेलं दडपण आणि चिंता एकदम भिरकावली गेली. स्वैर संचार करावयास हे ‘ शिवाजीराजे ‘ नावाचे वादळ मुक्त झाले अन् सुसाट सुटले. गेल्या चार वर्षांत राजांनी आदिलशाही विरुद्ध बोटही उचलले नव्हते. ते एकदम पाच हजार स्वारांचं लष्कर घेऊन स्वराज्यातून म्हणजेच राजगडावरून थेट कर्नाटकाच्या दिशेनं सुटले. कर्नाटकाच्या उत्तर भागात मासूर या नावाचं एक जबर लष्करी ठाणं होतं. शिवाप्पा नाईक देसाई हा शाही ठाणेदार मासूरच्या किल्ल्यात होता.
शिवाजीराजांचा भयंकर वादळी हल्ला या मासूरवर अचानक धडकला। त्या शिवाप्पा नाईकाला स्वप्नातही कल्पना नसेल की , ही मराठी चित्त्यांची झडप आपल्यावर येईल। कारण मासूरपायून शिरवळपर्यंत सर्व मुलुख आदिलशाहीचा होता। या एवढ्या मोठ्या प्रदेशात सर्वच ठाणी आदिलशाहीची. सातारा , कराड , मिरज , कागल , चिकोडी , तेरदळ इत्यादी सर्व ठाण्यांना टाळून शिवाजीराजांनी थेट मासूर गाठलं होतं. शिवाप्पाची अक्षरश: दाणादाण उडाली. त्याची फौज उधळली गेली. तो पळून गेला आणि महाराज हा तडाखा देऊन तेवढ्याच झपाट्यानं पुण्याकडे पसार झाले. मासूर त्यांनी आपल्या ताब्यात ठेवलं नाही ? लुटलं नाही ? मधल्या कोणच्याही ठाण्यावर हल्ला किंवा कब्जा केला नाही ?
नाही!नाही! का ? राजांना आदिलशाहीस हे दाखवून द्यायचं होतं की , हा शिवाजीराजा भोसला विसरभोळा नाही , गाफिल नाही , बावळट नाही। वडिलांच्या स्थानबद्धतेच्या काळात माझं बळ आणि माझी तरबेजी किती आहे हे मी तुम्हाला दाखवून देतो आहे. माझ्या वडिलांचा झालेला अपमान मी विसरलेलो नाही. मासूरवरच्या हल्ल्याने आदिलशाही दरबार थक्क झाला. आता दरबारला चिंता होती पुढे काय काय होणार याची.
महिने उलटत गेले। महाराजांचे हेर मोगलाईतूनही खबरा आणीत होते. दिल्लीचा शाह शहाजहान आग्ऱ्याच्या किल्ल्यात आजारपण भोगीत होता. त्याचा थोरला शाहजादा दारा दिल्लीत होता. दुसरा पुत्र मुराद हा गुजराथेत सुभेदार होता. तिसरा पुत्र औरंगजेब हा दक्षिणेत बिदरला होता. आणि चौथा बंगालच्या बाजूस होता. त्याचं नाव सुजा.
शाहजानला इतर कोणच्याही वैऱ्यांपेक्षा आपल्याच मुलांची भीती वाटत होती. त्यातला थोरला पुत्र दारा हा सुसंस्कृत होता. बाकीचे सगळे क्रूर श्वापदाहूनही क्रूर प्राणी होते. सगळे टपले होते दिल्लीच्या तख्तावर. बहुतांशी सर्व राजपूत सरदार औरंगजेबाला अनुकूल होण्याची शक्यता होती. शाहजहान मरण्याचीही कुणी वाट पाहणार नव्हता. बंडासाठी जो तो तोफा बंदुका ठासून तयार होता. खरं म्हणजे परिस्थिती अशी होती की , दारूगोळ्याचं कोठारच उडवावं तसं बंड करून राजपुतांना दिल्लीच ताब्यात घेता आली असती. क्रांती! पण या राजपुतांना क्रांतीपेक्षा बादशाहाशी असलेली आपली नाती जास्त मोलाची वाटत असावीत. राजपुतांच्या मनात क्रांतीचे म्हणजेच स्वातंत्र्याचे विचार येतच नव्हते. त्यांच्या अंत:करणात क्रांतीचे विचार प्रेरित करणारी एकही जिजाबाई राजस्थानात जन्माला आलेली नव्हती. इतर कुठून ही क्रांती यावी ? क्रांतीची आयात आणि निर्यात कधी करता येत नाही. ती उगवावी लागते स्वत:च्याच मेंदूत मग ती उतरते हृदयात , मग ती शिरते मनगटात , अन् मग ती प्रकट होते तलवारीच्या पात्यातून. शिवाजीराजांना ही उत्तरेची ओळख पुरेपूर झालेली होती.
No comments:
Post a Comment