Wednesday, March 28, 2012

प्रतापगड

  प्रतापगड


 नीरा आणि कोयनेच्या काठावर शिवाजी महाराजांनी जी सत्ता मिळविली होती, ती सत्ता अबाधित ठेवण्यासाठी  एक मजबूत किल्ला निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आणि हा किल्ला म्हणजे प्रतापगड होय.  प्रतापगडाची निर्मिती इ.स. १६५७ झाल्याचे नोंद इतिहासात मिळते. उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी  तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन  गावांमधल्या डोप-या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे.
          महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. गड चढताना त्रास होतोच. या गडाच्या संदर्भात कवी गोविंदानी सुंदर काव्यपंक्ती केल्या आहेत त्याची आठवण हमखास होते.

जावळिचा हा प्रांत अशानिच्या वेलांची जाळी
भयाण खिंडी बसल्या पसरुनि आ रानमोळी
अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरु होतो.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

           त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफकडे जाण्याची वाट अशी पाटी दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजुला वरुन आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पाय-या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वार रक्षकांची ठिकाणे दिसतात. हा बुरुज सोमसुत्री प्रदक्षिणा करुन पाहता येतो.
             अफजलखानाने दगा केल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला मारले त्याप्रसंगी संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरु केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवित असे. या भवानीमंदिरात सभामंडप, नगारखाना आहे.

            मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनच बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्याच्यापुढे पडित चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फूलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट लांबी एवढा त्याचा विस्तार आह इतर गडापेक्षा या गडाला विशेष तटबंदी आहे. पश्चिमोत्तर कडे ८०० फूटाहून अधिक उंच आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरपूर्व किल्याला दोन तळी लागतात. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि ही किल्ल्याची फेरीही पूर्ण होते.

इतिहास

            १६५७ साली शिवाजी महाराज विजापूरच्या दरबाराला अगदी असह्य झाले होते. महाराजांची शक्ती वाढत होती. नवनवे मुलुख काबिज करुन आदिलशाहाचे लचके तोडले जात होते. यासाठी अफजलखानाला महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविले. महाराजांच्या हुशारीमुळे अफजलखानचा वध झाला. त्याचे सुंदर वर्णन इतिहासात आले आहे. आजही अफजलखानाची कबर तिथे दिसते. सपाट जागी माचीच्या तीन उतरण्या सभोवताली वृक्ष मध्य चौकोनात ही कबर आहे. प्रतापगडावर प्रेक्षणिक काय तर इथला निसर्ग. प्रतापगडाला विशेष असे महत्त्व आहे.

         प्रतापगडाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे अफजलखानचा वध. शिवराय-अफजलखान भेटीत अफजलखानाने दगाफटका केला. त्याचा परिणाम म्हणून महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा यांने तलवार उगारली परंतु जिवा महाल हा सावध असल्याने त्याने सय्यद बंडाला मारले. होता जिवा म्हणून वाचला शिवा या म्हणीच्या रुपाने या गडाचा इतिहास अजरामर झाला. जावळीत दडून बसलेल्या शिवप्रभुच्या सैन्याने खानाच्या १५०० लोकांची ससेहोलपट केली. असा हा शिवरायांचा प्रताप आजही महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे.

कसे जाल

           महाड,पोलादपूरकडून किव्वा वाई ,महाबळेश्वरकडून आलं कि ,कुंभरेशी किंवा वाद नावाचे छोटुकल गाव लागतं .गडाच्या आग्नेयेस पारं नावच खेडं आहे .दोन्ही गावांमधून प्रतापगडावर जाता येतं.


किल्ले पुरंदर

३) किल्ले पुरंदर

 किल्ल्याची उंची : १५०० मीटर
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांगः पुणे
जिल्हा : पुणे
श्रेणी : सोपी
सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत. त्यापैकी एका फाटावर सिंहगड आहे. तोच फाटा तसाच पूर्वेकडे अदमासे २४ कि. मी. धावून भुलेश्र्वर जवळ लोप पावतो. याच डोंगररांगेवर पुरंदर, वज्रगड वसलेला आहे. कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे तीन घाट ओलांडून पुरंदरच्या पायथ्याशी जाता येते. किल्ल्याला चौफेर माच्या आहेत. किल्ल्याचे स्थान १८.२८ अंश अक्षांश व ७४.३३ अंश रेखांश वर स्थित आहे. किल्ला पुण्याच्या आग्रेय दिशेला अंदाजे २० मैलांवर तर सासवडच्या नैऋत्येला ६ मैलांवर आहे. गडाच्या पूर्वेला बहुतांशी प्रदेश सपाट आहे तर पश्चिमेला डोंगराळ प्रदेश आहे. वायव्येला १३-१४ मैलांवर सिंहगड आहे तर पश्चिमेला १९-२० मैलांवर राजगड आहे. पुरंदर किल्ला तसा विस्ताराने मोठा आहे. किल्ला मजबूत असून बचावाला जागा उत्तम आहे. गडावर मोठी शिबंदी राहू शकते. दारूगोळा व धान्याचा मोठा साठा करून गड दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे. एक बाजू सोडली तर गडाच्या इतर सर्व बाजू दुर्गम आहेत. गडावरून सभोवारच्या प्रदेशावर बारीक नजर ठेवता येते.

इतिहास

          अल्याड जेजुरी पल्याड सोनोरी मध्ये वाहते कर्‍हा पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा । असे पुरंदर किल्ल्याचे वर्णन केलेले आढळते. पुरंदरच्या पायथ्याशी नारायणपूर नावाचे गाव आहे. या गावात यादवकालीन धाटणीचे महादेवाचे मंदिर आहे. यावरून हा किल्ला साधारण १००० ते १२०० वर्षांपूर्वीचा आहे असे अनुमान निघते. पुरंदर म्हणजे इंद्र. ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ तसाच हा पुरंदर. पुराणात या डोंगराचे नाव आहे ‘इंद्रनील पर्वत’. हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला, तोच हा इंद्रनील पर्वत. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातील महादजी निळकण्ठ याने कसोशीने हे काम पूर्ण केले. येथील शेंदर्‍या बुरूज बांधताना तो सारखा ढासळत असे. तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी दोन मुले त्यात गाडण्यासाठी दिली. त्यांचा बळी घेतल्यावरच हा बुरूज उभा राहिला. हा किल्ला सन १४८९ च्या सुमारास निजामशाही सरदार मलिक अहंमद याने जिंकून घेतला. पुढे शके १५५० मध्ये तो आदिलशाहीत आला. इ. स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठांच्या ताब्यात नव्हता. महादजी निळकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये शिवाजी राजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके १५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर झाला. शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदरला वेढा घातला. या युद्धाचे वर्णन सभासद बखरी मध्ये असे आढळते. ‘तेव्हा पुरंधरावरी नामजाद लोकांचा सरदार राजियाचा मुरारबाजी परभु म्हणून होता. त्याजबराबर हजार माणूस होते. याखेरीज किल्ल्याचे एक हजारे असे दोन हजारे लोक होते. त्यात निवड करून मुरारबाजी याने सातशे माणूस घेऊन ते गडाखाली दिलेरखानावरी आले. दिलेरखान तालेदार जोरावर पठाण पाच हजार याखेरीज बैल वैगरे लोक ऐशी फौज गडास चौतर्फा चढत होती. त्यात होऊन सरमिसळ जाहले. मोठे धोरंदर युद्ध जाहले. मावळे लोकांनी व खांसा मुरारबाजी यांनी निदान करून भांडण केले. पाचशे पठाण लष्कर ठार जाहले. तसेच बहिले मारले.’ मुरारबाजी देशपांडे चे हे शौर्य पाहून दिलेरखान बोलिला, ‘अरे तू कौल घे. मोठा मर्दाना शिपाई तुज नावजितो.’ ऐसे बोलिता मुरारबाजी बोलिला ‘तुजा कौल म्हणजे काय? मी शिवाजी महाराजांचा शिपाई तुझा कौल घेतो की काय?’ म्हणोन नीट खानावरी चालिला. खानावरी तलवरीचा वार करावा तो खानाने आपले तीन तीर मारून पुरा केला. तो पडला. मग खानाने तोंडात आंगोळी घातली, ‘असा शिपाई खुदाने पैदा केला.’ खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला. यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले.
त्यांची नावे अशी, १. पुरंदर २. रुद्रमाळ किंवा वज्रगड ३. कोंढाणा ४. रोहीडा ५. लोहगड ६. विसापूर ७. तुंग ८. तिकोना ९. प्रबळगड १०. माहुली ११. मनरंजन १२. कोहोज १३. कर्नाळा १४. सोनगड १५. पळसगड १६.भंडारगड १७. नरदुर्ग १८. मार्गगड १९. वसंतगड २०. नंगगड २१. अंकोला २२. खिरदुर्ग (सागरगड) २३.
          मानगड ८ मार्च १६७० मध्ये निळोपंत मुजुमदाराने किल्ला स्वराज्यात आणला. संभाजी राजांच्या मृत्यूनंतर किल्ला औरंगजेबाने जिंकला व त्याचे नाव ‘आजमगड’ ठेवले. पुढे मराठांच्या वतीने शंकराजी नारायण सचिवांनी मोगलांशी भांडून पुरंदर घेतला. शके १६९५ मध्ये छत्रपती शाहू यांनी किल्ला पेशवे यांस दिला. अनेक दिवस किल्ल्यावर पेशव्यांची राजधानी होती. शके १६९७ मध्ये गंगाबाई पेशवे यांना गडावर मुलगा झाला, त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात आले. इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांनी गड आपल्या ताब्यात घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

          पुरंदर आणि वज्रगड जरी एकाच डोंगरसोंडेवर वसलेले असले तरी ते दोन स्वतंत्र किल्ले आहेत.
बिनी दरवाजा : पुरंदर माचीवरील हा एकमेव दरवाजा. आपण नारायणपूर गावातून किल्ल्यावर जातांना हा दरवाजा लागतो. दरवाजा आजही चांगल्या स्थितीत आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर पहारेक-यांच्या देवडा आहेत. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच पुरंदरचा खंदकडा आपले लक्ष वेधून घेतो. दरवाज्यातून आत शिरल्यावर दोन रस्ते लागतात, एक सरळ पुढे जातो तर दुसरा डावीकडे मागच्या बाजूस वळतो. आपण सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर उतारावर लष्कराच्या बराकी आणि काही बंगले दिसतात. माचीची एकंदर लांबी एक मैल आहे, तर रुंदी १०० ते १५० फूट आहे. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी एक मंदिर दिसते त्याचे नाव’पुरंदरेश्र्वर’.
रामेश्र्वर मंदिर : पुरंदरेश्र्वर मंदिराच्या मागील कोप-यात पेशवे घराण्याचे रामेश्र्वर मंदिर आहे. हे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते. या मंदिराच्या थोडे वरती गेल्यावर पेशव्यांच्या दुमजली वाडांचे अवशेष दिसतात. पेशवाईच्या आरंभी बाळाजी विश्र्वनाथाने तो बांधला. या वाडातच सवाई माधवरावांचा जन्म झाला. वाडाच्या मागे विहीर आहे. आजही ती चांगल्या अवस्थेत आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दोन वाटा लागतात. एक वाट बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाते तर दुसरी खाली भैरवखिंडीच्या दिशेने जाते. आपण प्रथम बालेकिल्ल्याच्या दिशेने वर जाऊया. यावाटेने वर गेल्यावर १५ मिनिटातच आपण दिल्ली दरवाजापाशी पोहचतो.
खंदकडा : या तीस-या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे एक कडा थेट पूर्वेकडे गेलेला दिसतो हाच तो खंदकडा. या कडाच्या शेवटी एक बुरूज आहे. बुरूज पाहून आल्यावर परत तीस-या दरवाज्यापाशी यावे. येथून एक वाट पुढे जाते. वाटेतच आजुबाजूला पाण्याची काही टाकी लागतात. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक उंचवटा लागतो. त्याच्या मागे पडक्या जोत्यांचे अवशेष आहेत. येथेच अंबरखाना असल्याचे अवशेष दिसतात. थोडे वर चढून पाहिल्यास वाडाचे अवशेष दिसतात. हे सर्व पाहून पुन्हा आपल्या वाटेला लागावे. वाटेवरून पुढे गेल्यावर काही पाण्याचे हौद लागतात. या वाटेवरून पुढे जातांना एक वाट डावीकडे खाली गेली आहे. या वाटेवरून खाली गेल्यावर केदार दरवाजा लागतो. पडझडी मुळे आज हा दरवाजा वापरात नसला तरी पूर्वी या दरवाजाला फार महत्त्व होते.
पद्मावती तळे : मुरारबाजींच्या पुतळ्या पासून थोडे पुढे गेल्यावर पद्मावती तळे लागते.

शेंद-या बुरूज : पद्मावती तळ्याच्या मागे बालेकिल्ल्याच्या वायव्येस, तटबंदीच्या बरोबरीने एक बुरूज बांधला आहे त्याचे नाव शेंद-या बुरूज.
पुरंदरेश्र्वर मंदिर : हे मंदिर महादेवाचे आहे. मंदिरात इंद्राची सव्वा ते दीड फूटापर्यंतची मूर्ती आहे. हे मंदिर साधारणपणे हेमाडपंथी धाटणीचे असावे. थोरल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
दिल्ली दरवाजा: हा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाज्याच्या वळणावर श्री लक्ष्मी मातेचे देवालय आहे. दरवाजा ब-यापैकी सुस्थितीत आहे. या दरवाज्यातून आत गेल्यावर उजवी कडे आणखी एक दरवाजा दिसतो. डावीकडची वाट बालेकिल्ल्याच्या दुस-या टोकापर्यंत जाते. या वाटेने पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी लागतात. याशिवाय या भागात बघण्यासारखे काही नाही. आल्या मार्गाने दिल्ली दरवाज्यापाशी यावे. समोरच उजवी कडे असणा-या दरवाज्याने पुढे जावे. येथून पुढे गेल्यावर आणखी एक दरवाजा लागतो. या दरवाज्यावर दोन्ही बाजूस सिंहाच्या प्रतिकृती आढळतात.
केदारेश्र्वर : २० मिनिटात केदार दरवाजा पाहून आपण आपल्या मूळ वाटेला लागू शकतो. यावाटेने १५ मिनिटे चालून गेल्यावर काही पायया लागतात. त्या आपल्याला थेट केदारेश्र्वराच्या मंदिरा पर्यंत घेऊन जातात. पुरंदरचे मूळ दैवत म्हणजे केदारेश्र्वर. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. महाशिवरात्रीला हजारो भाविक याच्या दर्शनाला येतात. मंदिराच्या समोरच एक दगडी दीपमाळ आहे. सभोवती दगडी फरसबंदी आहे. केदारेश्र्वराचे मंदिर म्हणजे किल्ल्यावरील अत्युध भाग. येथून राजगड, तोरणा, सिंहगड, रायरेश्र्वर, रोहीडा, मल्हारगड, कहेपठार हा सर्व परिसर दिसतो. या केदार टेकडीच्या मागे एक बुरूज आहे त्याला कोकण्या बुरूज असे नाव आहे.
पुरंदर माची : आल्या वाटेने माघारी फिरून दिल्ली दरवाज्यातून जाणा-या वाटेने थेट पुढे यावे. म्हणजे आपण माचीवरील भैरवखिंडीत जाऊन पोहचतो. वाटेत वाडांचे अनेक अवशेष दिसतात.
भैरवखिंड : याच खिंडीतून वज्रगडावर जाण्यासाठी वाट आहे. खिंडीत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. या खिंडीपर्यंत गाडी रस्ता आलेला असल्याने त्या रस्त्यावरून चालत गेल्यावर वाटेतच उजवीकडे राजाळे तलाव लागतो. सध्या पुरंदरमाचीवर याच तलावाचे पाणी वापरले जाते.
वीर मुरारबाजी : बिनीदरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे गेल्यावर समोरच वीर मुरारबाजीचा पुतळा दिसतो. इ.स. १९७० मध्ये हा पुतळा उभा केला आहे. संपूर्ण गड फिरण्यास एक दिवस लागतो. पुरंदर सोबत वज्रगड देखील पहायचा असल्यास दीड दिवस लागतो.

गडावर जाण्याच्या वाटा :

पुरंदर किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत.
 पुण्याहून : पुण्याहून ३० कि.मी अंतरावर असणा-या सासवड या गावी यावे. सासवड ते नारायणपूर ही अशी एस.टी सेवा देखील उपलब्ध आहे. नारायणपूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावातूनच गाडी रस्ता थेट किल्ल्या पर्यंत गेलेला आहे. पुणे ते नारायणपूर अशी बस सेवा देखील उपलब्ध आहे. नारायणपूर गावातून गडावर जाण्यास दोन मार्ग आहे. एक म्हणजे गाडी रस्ता. या रस्त्याने गड गाठण्यास २ तास पुरतात तर दुसरी म्हणजे जंगलातून जाणारी पायवाट. या पायवाटेने एक तासात आपण पुरंदर माचीवरच्या बिनीदरवाज्यापाशी पोहचतो

सासवडहून : किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट जरा आडमार्गाची आहे. सासवडहून सासवड – भोर गाडी पकडावी. या गाडीने नारायणपूर गावाच्या पुढे असणा-या ‘पुरंदर घाटमाथा’ या थांब्यावर उतरावे. हा घाटमाथा म्हणजे पुरंदर किल्ला आणि समोर असणा-या सूर्यपर्वत यामधील खिंड होय. या थांब्यावर उतरल्यावर समोरच डोंगरावर एक दोन घरे दिसतात. या घरामागूनच एक पायवाट डावीकडे वर जाते. ही वाट पुढे गाडी रस्त्याला जाऊन मिळते. या वाटेने पाऊण तासात पुरंदर माचीवरील बिनीदरवाजा गाठता येतो.

 राहण्याची सोय : किल्ल्यावर मिलिटरीचे बंगले आहेत. यामध्ये राहण्याची सोय होऊ शकते. मात्र त्यासाठी तेथे असणार्‍या त्यांच्या ऑफिसरची परवानगी घेणे आवश्यक आहे

जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ : पायथ्यापासून १ तास.

Tuesday, March 20, 2012

शिवनेरी

 

२) शिवनेरी

        

 जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी. वर आहे. शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे  जन्मस्थान आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते.किल्ला तसा फार मोठा नाही.१६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.
                                                                     इतिहास

          जीर्णनगर, जुन्नेर म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश केला आणि जुन्नर व येथील सर्व परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठा प्रमाणावर वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मीती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर येथे अनेक ठिकाणी त्यांनी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. ११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. नंतर इ. स. १४४३ मध्ये मलिक उल तुजार याने यादवांचा पराभव करून किल्ला सर केला. अशा प्रकारे किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इ. स. १४७० मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. १४४६ मध्ये मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. 

            पुढे १४९३ मध्ये राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. इ. स. १५६५ मध्ये सुलतान मूर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधारावांनी ५०० स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म जाला शके १५५६ क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार. इ. स. १६३२ मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ. स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ. स. १६७८मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे ४० वर्षांनंतर १७१६ मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

                                                        * शिवाई देवी मंदिर
           सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पूढे गेल्यावर शिवाई देवीचे मंदिर लागते. मंदीराच्या मागे असणा-या कडात ६ ते ७ गुहा आहेत.या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे .

                                                           * अंबरखाना
             शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितिस या अंबरखान्याची मोठा प्रमाणात पडझड झाली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात.एक वाट समोरच असणा-या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते.

                                                            * पाण्याची टाकी
              वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात.

                                                             * शिवकुंज 
              हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे.याची स्थापना व उदघाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केली. जिजाउंच्या पुढात असलेला बालशिवाजी , हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आवीर्भावातील मायलेकरांचा पुतळा शिवकुंजा मध्ये बसविला आहे.शिवकुंजासमोरच कमानी मशिद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.

                                                             * शिवजन्म स्थान इमारत
            शिवकुंज येथूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथे शिवरायांचा पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच बदामी पाण्याचे टाकं आहे.

                                                             * कडेलोट कडा
           येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दिड हजार फुट उंचीचा ह्या सरळसोट कडाचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.

                                                             गडावर जाण्याच्या वाटा

            गडावर जाण्याचे दोन प्रमुख मार्ग जुन्नर गावातूनच जातात. पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते.

                                                           साखळीची वाट 

            या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टँड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे. येथे चार रस्ते एकत्र मिळतात . डाव्या बाजूस जाणा-या रस्त्याने साधारणतः एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते.भिंतीला लावलेल्या साखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.

                                                        सात दरवाज्यांची वाट 

           शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पाय-यांपाशी घेऊनजातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्तीदरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा .या मार्गेकिल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तासलागतो.


                                                                 कसे जाल ?

           जुन्नरला येतांना माळशेज घाट पार केल्यावर ८ ते९ किलोमीटरवर शिवनेरी १९ कि.मी. अशी एक पाटी रस्त्याच्या कडेला लावलेली दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. या मार्गाने गडावर पोहचण्यास एक दिवस लागतो.

Thursday, March 15, 2012

राजगड

                                        
१) राजगड 
हिंदवी स्वराज्याची राजधानी, गडांचा राजा, राजियांचा गड! शिवतिर्थ रायगड! हिंदवी स्वराज्याची राजधानी गडांचा राजा, राजियांचा गड राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्याच्या नैऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर अन् भोरच्या बायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी नांच्या खो-यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली.राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.शिवतीर्थ रायगड श्री शिवछत्रपतींच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो तर दुर्गराज राजगड त्यांच्या महत्वाकांक्षेची उंची दाखवतो.


                                                             इतिहास

इतिहासातून अस्पष्ट येणा-या उल्लेखांवरुन सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर आहे. ब्रम्हर्षी ऋषींचेयेथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन असावा.राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव हा किल्ला बहमनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरुमदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडीलरुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते.
मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरी बद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिलीमकरांचा नंतर सन्मानही केला. शिवरायांनी मुरुमदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखीत पुरावा आज मात्र उपलब्ध नाही त्यामुळे किल्ला ताब्यात कधी आला हे सांगणे अनिश्चितच आहे.

शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, 'शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.' सभासद बखर म्हणतो की, 'मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे.' मात्र सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाटाने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले.इसवीसन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही ६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले.

सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठांनी किल्ल्यावरुन विलक्षण मारा केल्या मुळे मुगलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे'सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे व निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला.' शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले.

सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी रायगडावरुन राजगडाकडे हलविली. ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारले यानंतर मुगलानी मराठांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र आप संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने 'कानद खो-यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मुगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्या बद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ' असा आदेश दिला होता.

पुढे ११नोहेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून ावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव 'नाबिशहागड'असे ठेवले.

२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहुने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली.पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थिती मध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते - राजवाडे खंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिलीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील या शिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
                                                         सुवेळा माची

पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेलं की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडं वर आलं की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरुज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला तुलनेने ही सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे , एक ब्रम्हर्षी मंदिर आहे.

                                                 पद्मावती तलाव
गुप्तदरवाजा कडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. रामेश्र्वराचे मंदिरःपद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात असणारी मारूतिरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.
                                                                  राजवाडा
रामेश्र्वर मंदिरापासून पाय-यांनी वर जातांना उजवीकडे राजवाडाचे काही अवशेष दिसतात.या राजवाडामध्ये एक तलाव आहे.या शिवाय राजवाडापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो.याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारुकोठार आहे. सदरःही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू. रामेश्र्वर मंदिरापासून पाय-यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाडाचे अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे.अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे. पाली दरवाजाःपाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पाय-या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेश द्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना 'फलिका' असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेक-यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.
                                                          संजीवनी माची:-
सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरुन उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुंज लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरुज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदी कडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा येते. आळु दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पाय-यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात.

दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे. आळु दरवाजा संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात असे. आळु दरवाजा सस्थितीला ब-यापैकी ढासाळलेल्या अवस्थतेत आहे. या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे चित्र या शिल्पात दाखवले आहे. सुवेळा माचीःमुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणा-या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे.

येथे असणारे चौथरे येसाजी कंक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुस-या टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे. दुस-या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुस-या टप्पयाकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेट किंवा 'हत्तीप्रस्तर' असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात.हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे.

                                                                 बालेकिल्ला
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे.ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे.या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाडांचे अवशेष आढळतात. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.

गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात.

गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत.

१.गुप्तदरवाज्याने राजगड : पुणे - राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते.बाबुदा झापा पासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत.यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते.यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.

२.पाली दरवाज्याने राजगडः पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करुन पाली दरवाजा गाठावा.ही वाट पाय-याची असून सर्वात सोपी आहे.यावाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात.

३.गुंजवणे दरवाज्याने राजगङ : पुणे वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते.ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात.माहितगारा शिवाय या वाटेचा उपयोग करू नये.

४.अळु दरवाज्याने राजगडः भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो.

५.गुप्तदरवाजामार्गे सुवेळामाची: गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते.

राहण्याची सोय:

१. गडावरील पद्मावती मंदिरात २० ते २५ जणांची रहाण्याची सोय होते.
२. पद्मावती माचीवर रहाण्यासाठी पर्यटक निवासाच्या खोल्या आहेत.

जेवणाची सोय: आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय: पद्मावती मंदिराच्या समोरच बारामही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ: ३ तास
 

Wednesday, March 14, 2012

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

 

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि- नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगले
परदास्य-पराभविं सारीं । मंगले
या जगति जगूं ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या
                                             हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा                                                                


- स्‍वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

निर्धार

निर्धार
समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||ध्रु.||

घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले,
तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले,
खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले,
बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,
पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा,
कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा,
करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा,
शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे,
स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचुन अंत नसे,
श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे,
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

भरतभुमिचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो,
रक्त दाबुनी उरांत आम्हा आर्त स्वराने पुकारतो,
हे सह्याचल, हे सातपुडा, शब्द अंतरा विदारतो,
त्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

जंगल जाळपरी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे,
वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे ?
तळातळतुनि ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे,
स्वतंत्रतेचे निशान भगवे अजिंक्य राखू धरेवरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

- श्री. कविवर्य कुसुमाग्रज

शिवरायांची आरती


जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला आला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला
... करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१

श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी
ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता
तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२

त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो
साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया
भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३

ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला देशस्वातंत्र्या चा दाता जो झाला
बोला तत् श्रीमत्शिवनृप्की जय बोला..........४

रायगडची हिरकणी (पोवाडा)–शाहीर खेतर सखाराम चव्हाण


रायगडची सांगतो थोरी--ऐका तुम्ही सारी गोष्ट एक घडली त्या रायगडला----
ऐकताना नवल वाटे मजला--सुरवात करत पोवाडयाला -जी-जी---()
छत्रपती होते गडवरी--पुनव कोजागिरी--समारंभ घनदाट भरला
आनंदाने गड सारा फुलला---किती वर्णावे प्रसंगाला --जी---जी ()
एक खेडे होते शेजारी--गड पायतारी---गौळी लोक रहात होती गावाला---
नित जाती दूध विकण्याला--नेहमीचा परीपाठ त्यान्ला-जी-जी---()
गौळी लोक गेले गडावरी--दूध डोईवरी --हाळी ते देती गिरायकाला --
झटदिशी दूध विकण्याला---विकून ते येती परत घरला जी--जी ()
चाल दुसरी
त्याच गावी होती गौळण -- नाव तिचे हिरा हे जी जी
बेगीबेगी निघाली गडावरी -- काढुनीया धारा हे जी-जी
दुसरी गौळण बोलती तीला--झाल का हिरा हे जी-जी
हिरा म्हणते तुम्ही जा पुढे-येती मी उशीरा हे जी-जी
पाळण्यात बाळ घालूनी --लावीते निजरा हे जी-जी-
चाल तिसरी-हिरा बाळाला झोपविते
हिरा बोले निजनिज बाळा-तुला लागू दे आज डोळा
गडावरी गौळ्याचा मेळा--दूध विकाय झाले गोळा
कोजागिरी पुनवेचा सोहळा-मला जावू दे लडीवाळा
चाल पहिली
हिरा गौळण निघाली गडावरी--चरवी डोईवरी
जाता जाता सांगे म्हातारीला --झोक्यामधे बाळ झोपवीला
उठला तर घेवून बसा त्याला-दिस मावळायला येते घरला जी ()
चाल तिसरी
हिराबाई गेली गडावरी--दूध घेणारी पांगली लोक सारी
दूध घ्या हो म्हणती कुणी तरी-आशी हाळी देती गडावरी
दिस मावळून गेला बगा तरी-हिरा दूध विकण्याची गडबड करी
निघाया घरला जी-जी ()
चौकीदार दरवाज्यावरी-दिस मावळाय दार बंद करी
हीरा आली दरवाजावरी-पहाती हालवून दारे सारी
चौकीदार होते शेजारी-हिरा बोले त्याना सत्वरी
मला जायाच हाय बगा घरी-बाळ माझा तान्हा हाय घरी
कुनी न्हाय घियाला जी-जी ()
चौकीदार तिची समजूत करी-महाराजांचा हुकूम आमच्यावरी
आम्ही हूकमाचे ताबेदारी-आशी गोष्ट गेली त्यांच्या कानावरी
न्हेत्याल टकमक टोका वरी-मुकू प्रानाला जीर हे जी-जी ()
हिराबाई विनंत्या करी--पण ऐकेना पहारेकरी
हिरा मनात कष्टी भारी--बाळ दिसे तीच्या समोरी
हिरा गडावर घिरटया मारी--फिरुनी वाटेचा शोध ती करी
आवरी मनाला जी-जी ()
चारी बाजूला मारुन फेरी-भरली उबळ मायेची उरी
गाय वासराला चुकली पाखरी--पक्षा सारखी मारावी भरारी
पडती डोळ्यातून आसवाच्या सरी-दुध न्हाय तिजला-जी-जी (१०)
ठाम विचार केला अंतरी--हिराबाई गेली बगा कडयावरी
म्हणे देवा तू धाव लौकरी - आले संकट माझ्यावरी
माझे रक्षण तूच आता करी-विनवी देवाला जीर हे जी-जी (११)
कडयावरुन खाली ती उतरी-उतरताना पाय तिचा घसरी
तरी धिरान तोल सावरी-झाडाझुडुपांचा ती आसरा करी
गेली तळाला जीर हे जी-जी (१२)
चाल ली
हिराबाई गेली तेव्हा घरी--बाळ मांडीवरी
शेजारीण घेवून बसली बाळाला-हिराने उचलुन घेतला त्याला
पोटाशी धरुन कुरवाळीला --आईला पाहून बाळ हासला जी-जी (१३)
हीच गोष्ट कळाली गडावरी--लोक नवल करी---
छत्रपती शिवाजी महाराजांन्ला-हकीगत सांगी लोक त्यान्ला
हिराने गड सर केला जीर हे जी-जी (१४)
छत्रपती हिरा सामोरी--उभी दरबारी
महाराजानी बक्षीस दिले तिजला-त्याच कडयावरी बुरुज बांधला
हिराचे नाव दिले बुरजाला-हिरकणीचा बुरुज म्हणती त्याला
हिराचा पोवाडा संपवीला जीर हे जी-जी (१५)
खेतर शाहीर कविता करी-करुनी शाहिरी---
श्रद्धांजली वाहतो हिराबाईला-सीमा नाही तीच्या धाडसाला
मानाचा मुजरा छत्रपतीला-नमस्कार करत मंडळीला जी (१६)
Website Security Test