Wednesday, March 14, 2012

निर्धार

निर्धार
समरभूमिचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||ध्रु.||

घोरपडीला दोर लावुनी पहाड़ दुर्घट चढलेले,
तुटून पङता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले,
खंदकांतल्या अंगारावर हासत खेळत पडलेले,
बाप असे कळिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,
पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

करवत कानस कुणी चालतो पिकवो कोणी शेतमळा,
कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा,
करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधतिळा,
शिंग मनोय्रावरी वाजता उभी छावणी घरोघरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे,
स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचुन अंत नसे,
श्रद्धा ह्रदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे,
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी ?
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

भरतभुमिचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो,
रक्त दाबुनी उरांत आम्हा आर्त स्वराने पुकारतो,
हे सह्याचल, हे सातपुडा, शब्द अंतरा विदारतो,
त्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

जंगल जाळपरी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे,
वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे ?
तळातळतुनि ठेचुनी काढू हा गनिमांचा घाला रे,
स्वतंत्रतेचे निशान भगवे अजिंक्य राखू धरेवरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी ? ||||

- श्री. कविवर्य कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment

Website Security Test