गनिमी युद्धतंत्र
शिवछत्रपतींच्या युद्धनीतीचे विश्वासू सवेतन सुसज्ज सेना, हे मुख्य सूत्र
होते. अपुरी शस्त्रास्त्रे, थोडे सैनिक आणि मऱ्यादित साधन –संपत्ती
यांमुळे परंपरागत आमने –सामने युद्धपद्धती मोगलांसारख्या बलाढ्य शत्रुशी
मुकाबला करण्यास निरूपयोगी ठरेल, एवढेच नव्हे तर हानिकारक ठरेल, हे लक्षात
घेऊन शिवछत्रपतींनी आपल्या युद्धपद्धतीला गनिमी युद्धतंत्राची जोड दिली.
प्रसंगोचित सेनेची व्यूहरचना, अनुकूल रणांगणाची निवड, सैन्याच्या
शिस्तबद्ध, अनपेक्षित व वेगवान हालचाली आणि प्रसंगावधान या मूलभूत
सिद्धांतांवर महाराजांचे हे युद्धतंत्र आधारित होते. गनिमी
युद्धतंत्राविषयी मुसलमानांचा दृष्टिकोण मल्हार रामराव चिटणीस या
बखरकारांने सांगितला आहे ( १८११ ). तो म्हणतो, ‘अकस्मात यावे, बक मच्छ
उचलून नेतो तसा घाला घालावा, शिपायीगिरीची शर्थ करावी; प्रसंग पडल्यास
माघारे पळून जावे. मराठे खाण्यापिण्याचा दरकार बाळगीत नाहीत. पाऊस, ऊन,
थंडी, अंधार इ. काही न पाहता घोड्यावरच हुरडा, भाकरी –चटणी–कांदे खाऊन
धावतात. त्यास कसे जिंकावे? एक्या मुलकांत फौज आली म्हणोन त्याजवर रवानगी
करावी, तो दुसरीकडे जाऊन ठाणी घेतात. मुलख मारतात, हे आदमी नव्हत, भूतखाना
आहे’. यावरून मराठ्यांनी या युद्धतंत्राने शत्रूला कसे जेरीस आणले होते, हे
लक्षात येते. या कामी मोरो त्र्यंबक पिंगळे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक,
नेताजी पालकर, सूऱ्याजी पिसाळ, प्रतापराव गुजर, बाजी प्रभू व मुरारबाजी
देशपांडे इ. शूर साथीदारांचे त्यांना प्रसंगोपात्त सहकार्य लाभले. काहींनी
युद्धप्रसंगी जीवाची पर्वा न करता आत्माहुती दिली. शत्रूंची मर्मस्थळे
शोधून काढण्यात शिवछत्रपतींचा हातखंडा होता. अशा प्रकारच्या गनिमी
काव्याच्या युद्धतंत्राला गुप्तहेरखात्याची रचना खोलकर माहिती गोळा करणारी
आणि हल्ले करताना व माघार घेताना आवश्यक ती माहिती त्वरित पुरविणारी असते.
त्यांचे गुप्तहेर खाते त्या दृष्टीनी उत्तम प्रकारे शत्रूची माहिती मिळवीत
असे. लहान- सहान विजयांनीसुद्धा सैनिकांचे नीतिधैर्य वाढते, हे जाणून
त्यांनी कल्याण – भिंवडी ही ठाणी सुरूवातीस काबीज केली. युद्धातील यशापयश
कधीकधी सेनापतीच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. हे ध्यानी घेऊन
महत्त्वाच्या लढायांत तसेच आणीबाणीच्या प्रसंगी शिवछत्रपतींनी स्वत:
नेतृत्व केले. अफझलखान व शायिस्तेखान यांबरोबरची युद्धे ही याची उत्तम
उदाहरणे आहेत. उंबरखिंडींचे युद्ध ( १६६१ ), मिरे डोंगर युद्ध ( १६६२ ) इ.
गनिमीयुद्धे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रतापगडचे युद्ध हे शिवछत्रपतींच्या
एकूण युद्धतंत्राचे आदर्श उदाहरण असून या युद्धातील सैन्याची मांडणी,
व्यूहरचना, शत्रूपक्षाचा बेत, प्रसंगावधान इ. तांत्रिक गोष्टी अभ्यसनीय
आहेत. अफझलखानाला प्रतापगडच्या पायथ्याशी जंगली – डोंगराळ भागात आणून
छत्रपतींनी त्याच्या बेसावध सैन्यावर योग्य वेळी इशाऱ्याबरोबर छापे घालून व मारा करून अमाप लूट मिळविली व दहशत बसविली. भवानी मातेची प्रेरणा
व आशिर्वाद महाराजांना यश देतो, ही समजूत तत्कालीन देवभोळेपणामुळे
मराठ्यांची सुप्तशक्ती जागृत करण्यास समर्थ ठरली. एवढेच नव्हे तर
प्रसंगोपात महाराजांनी केलेली लूट आणि कावेबाजपणा या बाबी स्वराज्य
प्राप्तीच्या उदात्त उद्देशासाठी कुशल नेतृत्वामुळे समर्थनीय ठरल्या, हे
विशेष. गनिमी काव्यामुळे आदिलशाह
व मोगल यांच्या बलाढ्य सैन्याला मराठ्यांच्या लहानसहान तुकड्या बेजार
करीत. पावनखिंडीत बचावात्मक लढाई किंवा मिर्झा राजा जयसिंगसारख्या बलाढ्य
सेनापतीबरोबर केलेला पुरंदरचा तह, ही रणनीतीची उल्लेखनीय उदाहरणे होत.
शिवछत्रपतींच्या स्वाऱ्यांचा हेतू राज्यविस्ताराबरोबर लूट मिळविणे आणि आपला खजिना व साधनसंपत्ती विशेषत: दारूगोळा वाढविण्यावर केंद्रित केला गेला होता. सैन्याचा पगार त्यांनी कधी मागे पडू दिला नाही;
तद्वतच सैन्यास कसलीही ददात पडू दिली नाही. किल्ले, दारूगोळा, धान्य,
गलबते यांचा खर्च सज्ज कोशबलावर अवलंबून होता. या राज्यांगाकडे त्यांनी
सर्वात अधिक लक्ष पुरविले.
संभाजी
आणि राजाराम यांच्या कारकीर्दीत अनुक्रमे गृहकलह, अंतर्गत तंटे,
औरंगजेबाचे दक्षिणेतील प्रदीर्घ वास्तव्य इत्यादींमुळे राज्यकर्त्याना
सरंजामशाहीचा पाठपुरावा करावा लागला;
तथापि त्याही काळात छ. संभाजीने पराक्रम दाखवून काही लढाया जिंकल्या आणि
मोगल तसेच पोर्तुगीज यांवर दहशत बसविली. नंतर राजारामाने बचावात्मक भूमिका
स्वीकारून आपल्या संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांसारख्या पराक्रमी
सेनापतींद्वारे गनिमी युद्धतंत्राचा वापर करून औरंगजेबास जेरीस आणले.
मोगलांशी जोपर्यत युद्ध चालू होते, तोपर्यत मराठ्यांना गनिमी युद्धतंत्राचे
धोरण उपयुक्त ठरले.
No comments:
Post a Comment