Friday, July 26, 2013

प्रस्तावना

 मराठ्यांची युद्धपद्धति :
सतराव्या शतकात महाराष्ट्रात मराठे सरदारांनी व विशेषत: शिवछत्रपतींनी एक अभिनव युद्धतंत्र प्रचारात आणले.ते मराठ्यांची युद्धपद्धती या नावाने परिचित आहे. अशा प्रकारच्या भारतीय युद्धतंत्राचा उल्लेख रामायण, महाभारत, अर्थशास्त्रादी प्राचीन भारतीय वाङ्‌यात आढळतो. संस्कृतमध्ये यास वृकयुद्ध म्हटले आहे. हीच परंपरा मध्ययुगीन महाराष्ट्रात शत्रूशी मुकाबला करण्यासाठी मराठ्यांनी वापरलेल्या युद्धतंत्रात दिसून येते.

त्कालीन परिस्थिती : या युद्धपद्धतीला महाराष्ट्राची भौगोलिक, राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती प्रामुख्याने कारणीभूत होती. महाराष्ट्राच्या काही भागाची भौगोलिक रचना डोंगरदऱ्याची आहे. सह्याद्री व सातपुडा यांना समांतर अशा पूर्व-पश्चिम व दक्षिणोत्तर पर्वत रांगा आडव्या उभ्या पसरल्या आहेत. घाटमाथ्यावर किल्ले बांधण्यासाठी या भूरचनेचा शिवछत्रपतींनी उपयोग करून घेतला आणि घाटमाथा, मावळ व कोकणपट्टी यांतील महत्त्वाची स्थळे आपल्या स्वराज्य विस्तारासाठी निवडली. देशातील मैदानी मुलूख शत्रूच्या आक्रमणास सुलभ होता, याचा विचार करूनच त्यांनी भोरजवळील तोरणा- राजगडावर व पुढे कोकणातील रायगड, प्रतापगड येथे आपली प्रमुख आश्रयस्थाने केली. पुढे राज्य थोडे स्थिरस्थावर झाल्यावर कोकणात किनारपट्टीलगत छोटी बेटे व दंतुर किनारा यांचा शोध घेऊन जलदुर्ग बांधले आणि छोट्या जहागिरीची वाढ पूर्वेकडे सपाट प्रदेशात न करता पश्चिमेकडे दुर्गम प्रदेशात प्रथम केली, हे अत्यंत सूचक होते.

या काळात महाराष्ट्राची राजकीय स्थिती अस्थिर होती. निजामशाही व आदिलशाही यांच्या अंमलाखाली महाराष्ट्राचा भूप्रदेश होता आणि त्यांत संघर्ष असून मोगलांचेही या प्रदेशावर वर्चस्व स्थापण्याचे प्रयत्‍न चालू होते. त्यांना मातब्बर मराठा घराणी वतन व जहागिरींच्या मोबदल्यात मदत करीत होती. शिवाजी महाराजांनी आधिलशाहीवरील मोगली दडपणाच्या संधीचा फायदा घेऊन आधिलशाही प्रदेशांवर प्रथम हल्ले केले आणि विरोध करणाऱ्या देशमुख वतनदारांचे पारिपत्य करण्याचे काम हाती घेतले. तसेच मराठी सरदारांना स्वातंत्र्याऱ्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आणि साम, दान, दंड व भेद या नीतीचा अवलंब करून जावळीच्या चंद्रराव मोरे याचा उच्छेद केला आणि हेच धोरण स्वराज्य उभारण्यासाठी पुढे चालू ठेवले. सामान्य समाजही या सुमारास सतत होणाऱ्या सत्तेतील बदलांमुळे हैराण झाला होता. त्याला स्थिर आणि कार्यक्षम शासनाची नितांत गरज होती. आर्थिक दृष्ट्या देशमुख जहागीरदारसरंजामदार शेतकऱ्याना वेठीला धरीत. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊन ग्रामीण प्रदेशावर अधिक परिणाम होई. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिवछत्रपतींनी गनिमी युद्धतंत्राचा प्रारंभी उपयोग केला.

No comments:

Post a Comment

Website Security Test