Friday, July 26, 2013

मैदानी लढाया

मैदानी लढाया

मैदानी लढायांचे तंत्र मराठ्यांना नवीन नव्हते. छ. शिवाजींनी अखेरच्या काही वर्षात अशी युद्धे केली. त्यांपैकी साल्हेर ( १७६१ ), दिंडोरीची लढाई ( १७७० ) आणि बागलाण वऱ्हाडातील मोहिमा या लक्षणीय आहेत. छ. शाहूच्या वेळी युद्धाची भूमी बदलली. महाराष्ट्रावर चालून आलेल्या शत्रूला जेरीस आणणे किंवा स्वसंरक्षण करणे, हा उद्देश मागे पडून नवीन भूप्रदेश जिंकणे हे उद्दिष्ट निर्माण झाले; शिवाय तोफा-बंदुकांचा वापर युद्धात अधिक वाढल्यामुळे मराठ्यांना युद्धपद्धतीत आक्रमक पवित्रा द्यावा लागला. छ. शाहूच्या कारकीर्दीत मराठी सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन पेशव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले. पेशवे शाहूच्या आज्ञेने मोठ्या लढाईच्या वेळी सरदारांच्या सैन्याची जुळवाजुळव करीत व नंतरच संयुक्तरीत्या शत्रूपक्षावर हल्ला करण्यात येई. अशा बहुतेक लढाया मैदानात व क्वचित गनिमी युद्धतंत्राचा आवश्यक तेवढा उपयोग करून लढण्यात आल्या. यात घोडदळाच्या चपळ हालचालींद्वारे मोगली सैन्याचा त्यांनी समोरासमोरच्या युद्धात पराभव केला. याच पद्धतीचा अवलंब पहिला बाजीराव ( कार. १७२० – ४० ) याने पायदळापेक्षा घोडदळावर भर देऊन अनेक युद्धांत केला. या युद्धतंत्रात बाजीरावाने तत्कालीन इतर कोणत्याही सेनापतींपेक्षा अधिक प्रभुत्व मिळविले होते. आपल्या वीस वर्षाच्या कारकीर्दीत बाजीरावाला पराभव असा क्वचित माहीत होता. त्याच्या लढायांपैकी मुंगी – शेगांव ( पालखेड )व भोपाळ या निजाम – उल्-मुल्कबरोबरच्या लढायांना डावपेच, युद्धनीती, सैन्याची हालचाल आणि व्यूहरचना या सर्व दृष्टीनी विशेष महत्त्व आहे. पालखेडचे युद्ध ( १७२७ – २८) हे शाहूच्या छत्रपतिपदास आव्हान देणाऱ्या संभाजी ( कोल्हापूर ) व निजाम यांच्या मैत्रीतून उद्‍भवले. निजामाने कोल्हापूरकर संभाजीसह पुण्याच्या आसपासचा भाग पादाक्रांत करून खुद्द पुणे घेतले. त्यावेळी शाहू महाराजांना आपल्या स्वकीयांसह पुरंदर किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला. बाजीरावाने या आक्रमणास बऱ्हाणपूर आणि औरंगाबाद या निजामाच्या मूळ स्थांनांवर हल्ला करून प्रतिटोला दिला. सैन्याची चपळ हालचाल आणि शत्रूची रसद तोडणे या मार्गाचा अवलंब करून त्याने खानदेश मराठवाड्यातील अनेक गावे पादाक्रांत केली. बाजीराव त्याच्या औरंगाबाद या राजधानीजवळ पोहोचला आहे, असे समजताच निजाम द्रुतगतीने औरंगाबादकडे माघारी फिरला. बाजीरावाने गुप्तहेरांमार्फत त्याच्या हालचालींची माहिती मिळवून त्याला वाटेत अडथळे करण्याविषयी आधिकाऱ्याना लिहिले; तेव्हा निजामाने आपली बोजड शस्त्रास्त्रे विशेषत: तोफखाना मागे ठेवून गोदावरी पार केली. तो औरंगाबादच्या पश्चिमेस तीस किमी. वर पालखेड येथे डोंगराळ भागात आला असता, बाजीरावाच्या सैन्याने त्याला चोहोबाजूंनी वेढले. त्यामुळे त्याचा इतर सैन्याशी असणारा संपर्क तुटला आणि या निर्जन टेकडीवर पाणी व दाणा- वैराण नसल्यामुळे सैन्याचे अतोनात हाल होऊ लागले. बाजीरावाच्या सैन्याची फळी मोडून सुरक्षित जागी जाणे त्याला आत्माघातकी होऊन बसले. या वेळी बाजीरावाने लिहिलेल्या पत्रातील मजकुरावरून त्याच्या या धडाडीचे आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडते. अखेर निजामाला त्याने मुंगी शेगांवचा ( २५ फेबुवारी १७२८ ) अपमानास्पद तह करावयाला लावला. या युद्धाविषयी ए हिस्टरी ऑफ वॉरफेअर (१९६८) या ग्रंथात दुसऱया महायुद्धातील प्रसिद्ध सेनानी फिल्डमार्शल मंगमरी म्हणतो, बाजीरावाने सर्व बाबतीत निजामाच्या नेतृत्वावर मात केली. ही लढाई गतिशीलतेच्या डावपेचांचे सर्वात्कृष्ट उदाहरण आहे.

भोपाळची लढाई ही बाजीराव व निजाम यांच्या लष्करी सामर्थ्याची कसोटी ठरणारी दुसरी महत्त्वाची लढाई होय. याही सुमारास बाजीरावाने मोठी फौज घेऊन डिसेंबर १७३७ मध्ये नर्मदा ओलांडली आणि शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आपले गुप्तहेर धाडले. निजाम उत्तरेकडून भोपाळजवळ आला. मराठी सैन्याने तोफखान्यापासून अलिप्त राहून मोगलांच्या सैन्यास गनिमी युद्धतंत्राने बेजार केले. त्यावेळी निजामाने मराठी फौजांपासून संरक्षण मिळावे, म्हणून भोपाळच्या तटबंदीयुक्त किल्ल्यात आश्रय घेतला आणि संरक्षणाच्या दृष्टीने खबरदारी घेतली. तीच गोष्ट बाजीरावाला हवी होती. त्याने भोपाळला वेढा दिला आणि सर्व बाजूंनी रसद तोडली. निजामाच्या तोफखान्यामुळे मराठ्यांचे सैन्य दूरवर राहिले; पण भोपाळ सोडून निजामाला फार दूरवर जाता येईना व मराठ्यांनी घातलेल्या वेढ्याची फळी फोडता येईना. शिवाय त्याचा मुलगा बऱहाणपूरपर्यंतही पोहोचला नव्हता. तेव्हा नाईलाजाने निजामाने तहाची बोलणी सुरू केली. शेवटी दोराहसराई या ठिकाणी तह होऊन निजामाने बाजीरावाच्या सर्व अटी मान्य केल्या ( ७ जानेवारी १७३८ ). देवगिरीचे यादवांचे राज्य रसद तुटल्यामुळे पडले, या गोष्टीपासून मराठ्यांनी घडा घेतला. याचे उदाहरण म्हणजे पहिल्या बाजीरावची रणनीती होय.

बाळाजी बाजीरावामध्ये ( कार. १७४० १७६१ ) पित्याची धडाडी वा पराक्रम नव्हता. त्यामुळे त्याने मुत्सहद्देगिरीने सरदारांकरवी शासनावर व शत्रूंवर आपला वचक बसविला आणि निजामविरूद्ध सिंदखेड ( १७५७ ) व उदगीर ( १७६० ) या दोन लढायांत विजय मिळविले. छ. शाहूच्या मृत्यूनंतर ( १७४९ ) मराठ्यांची सत्ता प्रत्यक्षात छत्रपतीकडून पेशव्यांकडे गेली आणि पुणे हेच राज्यकारभाराचे मुख्य स्थान झाले. पानिपतचे तिसरे युद्ध ( १७६१ ) हे मैदानी लढाईचे आदर्श उदाहरण असून या युद्धात मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली ; परंतु शत्रूपक्षाच्या हालचाळींचा अचूक अंदाज न आल्यामुळे ऐन लढाईच्या वेळी भाऊसाहेब बुणगे पाठीमागे घालून पुढे तोफखाना देऊन चालून गेले. इब्राहीमखान गार्दीच्या कवायती तुकड्यांनी समोरिल रोहिल्यांचा खुर्दा उडविला आणि हुजुरातीच्या मध्यभागी असलेल्या फौजेनेही पराक्रमाची शर्थ केली आणि दुराणीची मोड केला; परंतु अब्दालीने पुन्हा जोर केला आणि आपल्या राखीव सैन्यानिशी मराठी फौंजावर हल्ला केला. त्यावेळी त्यांची वाताहत झाली. हे युद्ध मराठी इतिहासातील एक शोकांतिका आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर ग्‍वाल्हेरकर शिंद्यांनी यूरोपियनांच्या धर्तीवर शिस्तबद्ध फौज असावी, म्हणून फ्रेंच सेनापती डी. बॉइन याच्या मदतीने २० हजार पायदळ, १० हजार नजीब ( विशिष्ट पोशाखी ) व तीन हजार तुर्कस्वार शिपाई आणि मोठा तोफखाना तयार केला. या कवायती फौजेवरील अधिकाऱ्याना मोठे तनखे असत. काहींना जहागिरीही दिल्या होत्या. पेऱॉ या फ्रेंच अधिकाऱ्याला दरमहा ५, ००० रू. पगार असे पुढे कवायती फौजांत यूरोपियनांचा अधिक भरणा होऊ लागला. त्यामुळे इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज आदींबरोबर लढताना हे यूरोपियन कुचराईचे धोरण अंगीकारत; परंतु शिंद्यांनी मात्र या फौजेच्या जोरावर बादशाहवर पूर्ण वर्चस्व मिळविणे आणि दिल्लीच्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती ठेवली.

हिल्या माधवरावाने पहिल्या बाजीरावाच्या युद्धपद्धतीचे अनुकरण करून कर्नाटकातील काही युद्धे जिंकली आणि निजाम, नागपूरकर भोसले आदींना नमविले. राक्षसभुवनची ( १७६३ ) लढाई ही त्याच्या जीवनातील अत्यंत शिस्तबद्ध व युद्धशास्त्रदृष्ट्या संस्मरणीय लढाई होय; पण गृहकलह आणि त्या निमित्ताने इंग्रजांचा मराठी राज्यात झालेला चंचूप्रवेश यामुळे एकोफ्याची भावना पुढे नष्ट झाली आणि अल्पवयी माधवरावच्या मृत्यूनंतर हरिपंत फडके, परशुरामभाऊ पटवर्धन, बापू गोखले अशी दोन चार पराक्रमी सेनापतींची उदाहरणे सोडली, तर धडाडीचा नेता मराठी सेन्याला लाभला नाही. अठराव्या शतकाच्या अखेरीस पेशवे, शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले यांची स्वतंत्र सैन्यपथके निर्माण झाली. खर्ड्याची लढाई ( १७९५ ) यांसारख्या एखाद्या प्रसंगी या सर्व फौजा एकत्र आल्या एवढेच.

No comments:

Post a Comment

Website Security Test