गोवेकर पोर्तुगीज यांच्याविरुद्ध लढाई
गोव्याच्या पोर्तुगीजांना समजावून सांगूनही त्यांनी औरंगजेबाला मदत करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र संभाजी महाराजांना स्वतःच गोव्यावर चाल करून जावे लागले.पोर्तुगीज गोव्यावर गेली एक शतक राज्य करत होते. त्यांनी पणजी शहराच्या सभोवती मजबूत तटबंदी उभी केली होती. गोव्याचा गव्हर्नर “काउंटी दि अल्वोरे” याने बऱ्याचश्या तोफा स्वसंरक्षणासाठी सज्ज ठेवल्या होत्या. त्यामुळेच संभाजी महाराजांना माहित होते कि गोव्यात शिरून पोर्तुगीजांवर आक्रमण करणे फार मोठे धाडस होईल. त्यामुळेच या गव्हर्नर ला गोव्याच्या बाहेर काढून त्याच्यावर हल्ला करण्याचा बेत संभाजी राजे अखात होते. गोव्याजवळील फोंडा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. संभाजी राजांनी ठरवले कि गोव्याच्या पोर्तुगीजांना याच किल्ल्यावर येणे भाग पाडायचे.
ठरलेल्या बेतानुसार शंभूराजांनी स्वतःच्या माणसांकडून गोव्यात अफवा पसरवण्यास सुरुवात केली कि “गोव्या जवळील फोंडा किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी ५ कोटींचा खजिना आणून ठेवला आहे, त्याच बरोबर बराचसा दारुगोळा हि जमा करून ठेवला आहे.” या वेळी संभाजी महाराज रायगड किल्ल्यावर होते. गव्हर्नर ला हि बातमी माहित होती. गव्हर्नर ला माहित होते कि फोंडा किल्ल्याची तटबंदी मजबूत नाहीये. आणि किल्ल्यावर जास्त सैन्य सुद्धा नाहीये. त्याने विचार केला कि फोंडा किल्ल्यावर थोडेच मावळे आहेत, आणि मराठ्यांचा छत्रपती पण जवळ नाहीये. त्यामुळेच त्याला जोर आला आणि तो फोंडा किल्ल्यावर आक्रमण करायला निघाला. गव्हर्नर संभाजी राजांच्या गनिमी काव्यात बरोबर अडकला. त्याने आपल्या बरोबर ५ हजाराचे पोर्तुगीजी सैन्य घेतले आणि फोंडा किल्ल्यावर आक्रमण केले.
गव्हर्नर आपले पोर्तुगीजी सैन्य घेवून किल्ल्याजवळ पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. अंधार पडला होता. पण त्याने ठरवले कि सकाळ पर्यंत वाट बघायची नाही, रात्रीच किल्ल्यावर आक्रमण करायचे. त्याने रात्रीच किल्ल्यावर चढाई केली. किल्ल्यावर कृष्णाजी कंक आणि येसाजी कंक हे पिता पुत्र किल्लेदार होते. पोर्तुगीजांनी किल्ल्यासमोरच्या एका टेकडीवर तोफा चढवल्या. या फिरंगी तोफा लांब पल्ल्याच्या होत्या. या टेकडी वरूनच ते मराठ्याच्या फोंडा किल्ल्यावर तोफ तोळे डागत होते. त्याच बरोबर पोर्तुगीजी सैनिक गोळ्या सुद्धा चालवत होते.
दुसऱ्या दिवशी पर्यंत हा मारा सुरु होता, त्या मार्याने फोंडा किल्ल्याच्या तटबंदीचा एक बुरुंज ढासळला होता. ते पाहून गव्हर्नर खुश झाला. त्याने आपल्या सैन्याला किल्ल्यामध्ये शिरण्याचा हुकुम दिला. पण किल्ल्यावरून होणाऱ्या मराठ्यांच्या माऱ्यापुढे एकही पोर्तुगीजी सैनिक पुढे सरकायला तयार नव्हता. पण गव्हर्नर च्या रेट्यापुढे त्याचे काही चालेना. मग काही पोर्तुगीज पुढे झाले आणि किल्ल्याजवळ आले. किल्ल्यावरून दगडांचा मारा झाला. मग मात्र पोर्तुगीज मागे हटले.
पण तरीही सलग ४ दिवस त्या टेकडीवरून किल्ल्यावर तोफांचा मारा चालू होता. खरी परिस्थिती अशी होती कि अजून एखाद्या दिवसात किल्ला पोर्तुगीजांच्या हातात जाणार होता. पोर्तुगिजांचा गव्हर्नर तर याच खुशीत वेडा झाला होता. त्याला तर फोंडा किल्ल्यावर पोर्तुगिजांचा झेंडा दिसू लागला होता. किल्ल्यावरचे मावळे येसाजी कंक यांच्या हुकुमाप्रमाणे प्राणांची शर्थ करून किल्ला लढवत होते.
आणि इतक्यात…. दुरून, काही अंतरावरून धुळीचे लोट दिसू लागले, ललकाऱ्या ऐकू येवू लागल्या, “हर हर महादेव, शिवाजी महाराज कि जय, संभाजी महाराज कि जय”
फोंडा किल्ल्यावरचे सगळे मावळे तत्बाडीवर आणि बुरुंजावर उभे राहून तिकडे पाहू लागले… क्षणा क्षणाला तो आवाज वाढत होता. खुद्द शंभू राजे येसाजी कंकांच्या मदतीसाठी आले होते. ते पाहून किल्ल्यावारूनही त्यांना प्रतिसाद दिला गेला, किल्ल्यावरून घोषणा उठू लागल्या, “संभाजी महाराज कि जय ||”
संभाजी महाराज, त्यांचे घोडदळ, पायदळ, सारी सेना आली होती फोंडा किल्ला राखायला, पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चाखवायला. पोर्तुगीजांना पण हे लक्षात आले, मग मात्र त्यांचे धाबे दणाणले, भीतीने त्यांची गाळण उडाली. आत्ता पर्यंत गव्हर्नर ने संभाजी महाराजांचे पराक्रमाचे किस्से फक्त ऐकले होते, आज साक्षात त्यांनाच समोर बघून गव्हर्नर पूरता घाबरून गेला, खचून गेला. त्याने लगेच आपल्या सैन्याला मागे फिरण्याचा आदेश दिला. पोर्तुगीजी सैन्य देखील याच आदेशाची वाट बघत होते, आदेश मिळताच तेही पाठीला पाय लावून पळत सुटले. किल्ल्यावरील मावळे हे दृश्य पाहून फारच आनंदित झाले.
गोव्याचा गव्हर्नर Count De Alwore याला मराठ्यांनी जेरीस आणून सोडले होते.
मराठ्यांचे गोव्यावरील आक्रमण इतके जबरदस्त होते कि, गोव्याच्या गव्हर्नर ला त्याची राजधानी पणजी पासून खाली मार्मा गोव्याला हलवावी लागली.
संभाजी महाराज यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी गोवेकर पोर्तुगीजांची केलेली वाताहत पाहून गोव्यातील मराठी लोक खूप आनंदित झाले. गोव्यातील कित्येक लोक वर्षानुवर्षे पोर्तुगिजांचा जाच, त्रास छळ आणि अत्याचार सहन करत होते. कित्येक वर्षानंतर आज ते स्वातंत्र्याचा आनंद घेत होते. मागील काही वर्षात पोर्तुगीजांनी गोव्यातील कित्येक देवळे उध्वस्त केली होती, याचाच सूड घेण्यासाठी गोव्यातील काही हिंदू लोक एकत्र आले आणि त्यांनी गोव्यातील ख्रिश्चनांच्या एका चर्चवर हल्ला केला, त्या चर्च ची तोडफोड आणि जाळपोळ सुरु केली. हि बातमी शंभू राजांच्या कानावर आली, परंतु स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान आणि परधर्माबद्दल आदर असलेले संभाजी राजे यांना हि बातमी आवडली नाही. ते म्हणाले, “आमच्या आबासाहेबांनी स्थापन केलेले हे स्वराज्य कोणाच्या धर्माच्या द्वेषावर उभे राहिलेले नाहीये.” छत्रपती संभाजी महाराज यांनी हुकुम दिला कि, “ताबडतोब चर्च ची जाळपोळ थांबवा”. शंभू राजांच्या आज्ञेचे पालन केले गेले. संभाजी महाराज यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या काही हिंदु लोकांना धर्मात परत घेतले.
गव्हर्नर आधीच पणजी सोडून गेला होता, त्याला खात्री होती कि संभाजी महाराजांना पराभूत करणे अश्यक्य आहे. त्याला भीती होती कि शंभूराजे एक न एक दिवस पूर्ण गोवा जिंकून घेतील. म्हणूनच त्याने ठरवले कि संभाजी महाराज यांच्या बरोबर तह करून आपला जीव वाचवायचा. यासाठीच गव्हर्नरने आपला वकील शंभू राजे याच्याकडे पाठवला होता. यानंतर काही दिवसातच संभाजी राजे यांनी पोर्तुगिजांबरोबर तहाची बोलणी केली. आणि ते रायगड ला परत आले.