Thursday, June 21, 2012

अजिंक्य रामशेज किल्ला

६ वर्ष अजिंक्य राहिलेला रामशेज किल्ला

नाशिक जवळ दिंडोरी पासून १० मैलाच्या अंतरावर रामशेज नावाचा किल्ला आहे. प्रभू श्रीराम या किल्ल्यावर विश्रांतीला जायचे, आणि तिथे त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव पडले. सिंहगड, प्रतापगड असे सह्याद्रीच्या रांगेतील बरेचसे  किल्ले  घनदाट  जंगलात  आहेत, डोंगर  दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. परंतु रामशेज हा किल्ला एका सपाट आणि मोकळ्या  मैदानावर आहे. किल्लाच्या जवळपास झाडी, जंगल देखील नव्हते. डोंगर दऱ्यादेखील नव्हत्या. रामशेज किल्ल्याजवळचा एकमेव किल्ला म्हणजे त्र्यंबकगड परंतु तो देखील ८ कोस अंतरावर होता. हि सर्व परिस्थिती पाहता किल्ला अगदी एकाकी होता.
Ramshej Fort near Nashik

शहाबुद्दीन खान ह्याच किल्ल्यावर चांदसितारा  फडकवावा आणि त्या नंतर त्र्यंबक, अहिवंत, मार्कंडा, साल्हेर असे किल्ले जिंकून घ्यावेत असा औरंगजेबाचा मनसुबा होता. औरंगजेबाने आपला सरदार शहाबुद्दीन खान याला हा किल्ला जिंकण्यासाठी पाठवले. शहाबुद्दीन किल्ला घेण्यासाठी चालून आला. त्याच्या सोबत १० हजाराची फौज होती आणि अफाट दारुगोळा आणि तोफा होत्या. त्यामुळेच औरंगजेबाच्या सरदाराला वाटले कि हा किल्ला आपण ताबडतोब काबीज करू. त्याने औरंग्याला सांगितले होते कि, मी एक  दिवसात किल्ला घेतो म्हणून.
किल्ल्यावर फक्त ६०० मावळे होते. किल्ल्यावर सूर्याजी जेधे नावाचे किल्लेदार होते. हे मुळचे मावळातले. ते धाडसी, हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. सूर्याजी जेधे रामशेज च्या तटावरून फिरत राहायचे. दिवसा आणि रात्रीही. ते कधी झोपायचे हेच कोणाला माहित नव्हते. किल्ल्यावर तोफा नव्हत्या.
संभाजी राजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता. किल्ल्यावरच्या किल्लेदाराने आणि मावळ्यांनी लाकडाच्या तोफा बनवल्या. लाकडाच्या तोफांना जनारावरांचे कातडे लावून तोफा बनवल्या. आणि किल्ल्यावरून खाली तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. या आक्रमणाने शहाबुद्दीन खान पार गांगारून गेला. ५ महिने झाले पण तरीही किल्ल्या काही जिंकता आला नाही.   
मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण किल्ला तर जिंकायचा होता. मग त्याने आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील झाडे तोडायला सांगितली. सगळी लाकडे जमा केली. आणि लाकडी बुरुंज बनवला (याला लाकडी दमदामा असेही म्हणतात) तोही इतका उंच कि किल्ल्याच्या उंचीचा. हा लाकडी बुरुंज कशासाठी ? तोफा या लाकडी बुरुंजावर नेवून ठेवायच्या आणि मग तिथून किल्ल्यावर तोफा डागायच्या. ५० तोफा आणि ५०० सैनिक बसतील एवढा मोठा बुरुंज बनवला. या लाकडी बुरुंजावरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले. मराठे सुद्धा या लाकडी बुरुंजावर तोफगोळे डागत होते. मोठे घनघोर युद्ध चालू होते. मराठे मागे सारायला तयार नव्हते. शहाबुद्दीन च्या हाती यश येत नव्हते.
२ वर्षे झाली, इतके करूनही रामशेज किल्ला अजिंक्यच राहिला.   
फतेह खान
मग मात्र औरंग्या ने शहाबुद्दीन ला परत बोलावून घेतले. त्याने रामशेज ची हि मोहीम सोपविली फतेह खान नावाच्या जिगरबाज सरदारावर. आणि मग फतेह खान २० हजारीची फौज घेवून आला. आणि त्याने रामशेज वर जोरदार आक्रमण चढवले. पण तरीही मराठे काही माघार घेईनात. मोगल सेना किल्ल्याच्या जरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्यांच्या गोफणीतून धडाधड दगड गोटे सुटायचे, हे दगड इतके जोरात यायचे कि बरेचसे सैनिक जागेवरच ठार  व्हायचे. त्या फतेह खानाला मावळे तसूभरहि पुढे सरकू देईनात. फतेह खानच्या सैन्याला सळो कि पळो करून सोडले या मरहट्ट्यान्नी. इतका खटाटोप करूनही किल्ला काही शरण येईना. फतेह खान हाती फक्त निराशा अपमान आणि माघारच आली.
फतेह खानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते, पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे. त्या तोफ्याच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुंजाची पडझड होत असे. ते पाहून फतेह फार खुश व्हायचा. पण रात्र सारून सकाळ झाली कि ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरुंज परत बांधून झालेला असायचा. ते  दृश्य पाहून फतेह खान  आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता. किल्ल्यावरचे मावळे, लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच हि पडलेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे. परंतु फतेह खानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला, त्याला वाटू लागले कि या मरहट्ट्यानां जादूटोना येतो, भुताटकी येते, आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची.   
अनेक महिने सरले, हजारो मुगल सैनिक मारले गेले, खुपसारा दारुगोळा हकनाक वाया गेला, तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते. मग एके दिवशी फतेह खानच्या एका सरदाराने फतेह खानाला सांगितले कि युद्ध तर करून बघितले, आता एका मांत्रिकाला बोलावून बघा. फतेह खान ला हे पटले नाही, पण किल्ल्या जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता. मग त्याने आपल्या सरदारा कडून मांत्रिकाला बोलावून घेतले. मांत्रिक आला, तो फतेह खान ला म्हणाला, “हुजूर, चिंता मत करो, मैने तो भूत प्रेत भी वश किये है, ये मरहट्टे क्या चीज है? आप बस मुझे एक सोने का नाग दे दिजीये बाकी मी संभाल लेता हु”  मग त्या मांत्रिकाने मागितल्या प्रमाणे त्याला सोन्याचा नाग बनवून देण्यात आला.
मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्या जवळ जायला निघाला. मांत्रिक पुढे आणि फतेह खानाचे  सैन्य त्याच्या मागे. मांत्रिक किल्ल्याचे दिशेने पुढे सरकत होता. तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्या वरून गोफणीचा एक दगड जोरात मांत्रिकाच्या अंगावर आला. त्याचा तडाखा इतका जोरदार होता कि नाग एकीकडे आणि मांत्रिक दुसरीकडे जावून पडला. फतेह खान चे सैन्य पाठीला पाय लावून छावणीच्या दिशेने जोरात पळत सुटले.
फतेह खानने अजून एक डाव आखला, त्याने मध्य रात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरु केला. या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता. त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुरुंजाजवळ येवून फतेह खानची करामत बघत होते. पण किल्ल्यावर एक पण तोफ गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते. जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या. पण फतेह खान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच. कारण तो होता एका वेगळ्याच बेताच्या तयारीत. त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेने. दबक्या पावलांनी, बिलकुल आवाज न करता. किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेह खानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला, “उपरवाले का नाम लो और उपर किले पार चढो, अगर कामयाब हो जोगे तो तुम्हारा नाम होगा” वर जायला कोणी तयार होत नव्हते, पण फतेह खान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता, मग त्यातले काही सैनिक जीवावर उदार होवून किल्ल्यावर चढाई करायला तयार झाले. अंधाराचा फायदा घेवून झाडा झुडपाच्या सहाय्याने ते हळूहळू वर चढू लागले. त्यांनतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जावू लागले.
एकंदरीत फतेह खानाचा बेत असा होता कि, किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने तोफगोळ्या मध्ये गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे. आणि मग दोरखंड लावून खाली उरलेले सगळ्या सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा. ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेह खानाचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजून चालू होता. किल्ल्यावर किल्लेदार सूर्याजी जेधे पुढच्या बाजूला मुख्य बुरुंजाजवळ होते. ते आणि त्यांचे सर्व मावळे फतेह खानच्या तोफांच्या करामती बघत होते. पण ते संभाजी राजांचे पराक्रमी सरदार होते, अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते. २ गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्या म्हणजे एक तर आज अचानकच फतेह खानाने रात्रीचा मारा सुरु केला आहे आणि दुसरे म्हणजे तोफांचे एकपण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत होते, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतय. मग ते तडक घोड्यावर बसले आणि तडक निघाले, आपल्या सोबतीला त्यांनी २०० मावळे घेतले, त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारे देण्यास सुरुवात केली. ज्या वेळी ते किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला फतेह खान चा डाव समाजाला, तसे ते आणि त्यांचे मावळे बुरुंजावर दबा धरून मोगल सैनिकाच्यावर पळत ठेवून बसले.
वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले, ते आणखी वर येणार इतक्यात मावळ्यांच्या गोफणीत दगड धरले गेले आणि सप्प करून गोफण चालली, त्या मोगल सैनिकाच्या डोक्यात इतक्या जोरात धोंडा बसला कि तो घायाळ झाला आणि गडावरून खाली पडला. मग मात्र सगळे मावळे धावले तटबंदीच्या जवळ. त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर गोफणीने दगडांचा जोरदार मारा केला, किल्ल्यावरच्या मोठ मोठाल्या दगडी शिळा ढकलून दिल्या. इतकेच नव्हे तर तेलात बुडवलेली कपडे आणि पोती पेटवली आणि त्या सैनिकाच्या अंगावर फेकून दिली. अचानक झालेल्या या मृत्यू तांडवा मुले सगळे मोगल सैनिक जीवाच्या आकांताने ओरडू लागले. काही सैनिक दगडांनी घायाळ होवून मेले तर काही पेटत्या कापडांनी भाजून मेले, आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावून उड्या मारल्या. ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले फतेह खान आणि त्याचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. गनीम (शत्रू) पळून जाताना बघून किल्ल्यावर मावळे आनंदित झाले, आणि जोर जोरात आरोळ्या देवू लागले, “हर हर महादेव, जय शिवाजी, जय शंभूराजे!!!!”    
कासम खान
औरंगजेबाने फतेह खानाला परत बोलावून घेतले. आणि कासम खान ला पाठवले. कासाम खान नव्या दमाची फौज घेवून रामशेज वर चालून आला. कासम खान ने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेकोट पहारे लावले. किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही. किल्ल्यावर दारुगोळा आणि अन्न धान्य पोहोचवण्याच्या सगळ्या वाट त्याने रोखून धरल्या होत्या. किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रुपजी भोसले, मानाजी मोरे रसद घेवून तयार होते. पण कासम खानच्या त्या कडक बंदोवस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांना गडावर रसद पोहोचवता येत नव्हती. किल्ल्यावरचे अन्न धान्य संपत आले होते. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते, अन्नावाचून सगळ्यांचे हालहाल होत होते.  हि परीस्थिती पाहता ४ ते ५ दिवसात किल्ला कासम खानच्या हातात जाईल असे वाटत होते. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला. खूप जोराचा पाऊस पडला. हा पाऊस सलग २ दिवस पडत होता. या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी झाले होते. किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावारचे मांस साडू लागले. त्यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरली होती. इतका घाण वास येवू लागला तो बिलकुल सहन होत नव्हता. त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले. मोगल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होवू लागले. मग कासम खानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला. एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले.
तो दिवस सरला, रात्र झाली. रात्रहि सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले. तेवढ्यात कासम खानाने किल्ल्यावर पहिले आणि त्याच्या लक्षात आले कि, किल्ल्यावरील मावळे ताजेतवाने दिसत होते, त्याच्या जीवात जीव आला होता. इतकेच नव्हे तर तिथे काही नवीन मावळे हि दिसत होते. कासम खान चक्रावून गेला. मग त्याला त्याची चूक लक्षात आली. आदल्या रात्री दुर्गंधी मूळे त्याने पहारे दिले केले होते, त्याच्याच फायदा घेवून दाबा धरून बसलेली रुपजी आणि मानाजी यांची फौज नवीन रसद, अन्न धान्य आणि दारुगोळा किल्ल्यावर पोहोचवून आले होते. कासम खानाला कळून चुकले कि रामशेज काबीज करणे हे फक्त स्वप्नच राहणार आहे. दिवसा किल्ल्यावरून मरहट्टे मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी राजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्ला करायची. किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यावर आजूबाजूच्या झाडी मधून अचानक हल्ले व्हायचे. मोगालंना सळो कि पळो करून सोडले होते.
कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही. हा किल्ला ६ वर्ष झुंजत होता.

4 comments:

  1. khupach mahatvachi mahiti dilyabadddal pratham dhanyawad.
    phakt ek durusti suchavu ichchito pahilya vakyat pindori nasun dindori ha shabd asavayas hava.

    aamachya shubhechha aapalya pathishi aahetach pan
    aai bhavani apanas ya shubh karyasathi udand aayuhshya pradan karo hich sadichcha.

    ReplyDelete
  2. जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🚩🚩

    ReplyDelete
  3. Jay shivray dhanya te shur mavale

    ReplyDelete
  4. हीच चमक निष्ठा ठेवून आपण मराठी माणसांसाठी महाराष्ट्र वाचवायला हवा.परप्रांतीय व देशद्रोही/महाराष्ट्रद्रोही स्वराज्य वैरी महाराष्ट्र लुटत आहेत तो वाचवायला हवा.संघटीत व्हा.व्यवसाय करा.देशद्रोह्यांकडुन खरेदी करू नका.त्यांना जमीन विकु नका.भविष्य भयानक आहे.मतभेद विसरा.एक व्हा.

    ReplyDelete

Website Security Test