सैन्याची संरचना
या युद्धपद्धतीमध्ये शिवछत्रपतींनी महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीचे
विशेषत: किल्ल्यांचे महत्त्व ओळखून अनेक नवीन किल्ले बांधले व जुन्यांची
डागडुजी केली; तसेच प्रत्येक किल्ल्यावर हवालदार नेमून त्याच्या हाताखाली
एक सरनोबत, एक सबनीस, एक फडणीस आणि एक कारखानीस असे भिन्न जातींचे अधिकारी
नेमले. याशिवाय किल्ल्याच्या अगदी लगतच्या परिसरात बंदोबस्तासाठी रामोशी,
परवारी, महार, मांग, बेरड वगैरे मेटकरी नेमलेले असत. प्रत्येक किल्ल्यावर
दारूखाना, अंबारखाना व पाण्याची टाकी किंवा क्वचित विहीर असे. किल्ल्यावर
दारूगोळा, दाणागोटा व पाणी आहे की नाही, या व्यवस्थेकडे कटाक्षाने लक्ष
दिले जाई. किल्ल्यावर दोन प्रकारचे सैन्य असे : पायदळ व घोडदळ. शिवाजीच्या
पायदळात घाटमाथ्यावरील मावळे आणि घाटाखालील कोकणातील हेटकरी असत. प्रत्येक
शिपायाजवळ ढाल, तलवार वा बंदूक असे. किल्लेदार शिपायांची हत्यारे स्वत:ची
असत व दारूगोळा सरकारातून मिळे. पायदळात दहा माणसांचा दाहिजा ( समूह ) असून
हवालदार, जुम्लेदार, एक हजारी, पंच हजारी, सरनोबत असे अधिकारी असत.
घोडदळात, बारगीर व शिलेदार असे दोन प्रकार होते. शिलेदारांचे घोडे स्वत:चे
असून त्याला सरकारातून याबद्दल जादा वेतन मिळे. बारगिरांची घोडी मात्र
सरकारी पागेतील असत. सरकारी घोड्यांवर खुणेकरिता शिक्के मारीत.
घोडेस्वाराजवळ भाला किंवा बंदूक असे. पंचवीस बारगीर वा शिलेदार, यांवर एक
हवालदार असे. पुढे त्याचप्रमाणे जुम्लेदार, सुभेदार, पंचहजारी, सरनोबत असे
अधिकारी असत. याशिवाय महाराजांबरोबर स्वत:चे असे पाच हचार निवडक लोक
असत व हुजुरपागाही असे. नोकरीस नवीन लागणाऱ्या इसमाला जुन्या शिपायाचे
खात्रीपत्र वा जामीन हजर करावा लागे. शिवाय शिवछत्रपती शिपाई निवडताना
तपासणी करीत. सैन्यात सर्व जातींचे लोक असत. मराठ्यांचे सैन्य अगदी
सुटसुटीत असे. त्यांच्याजवळ कधाकधी तोफा, बंदुका किंवा तंबू वा राहुट्याही
नसत. डोक्याला पगडी, अंगात बंडी व पायात चोळणा असा त्यांचा वेश असे. ते एका
दमात घोड्यावरून ६० –
७० किमी.मजल मारीत. हे सैन्य वर्षातील आठ महिने मुलूखगिरीवर जाई व चार
महिने छावणीस असे. सैन्याची शिस्त कडक असे. आणलेली लूट सरकारात भरावी.
लागे, तसेच मुलूखगिरीवर असताना स्त्रियांना नेण्यास मज्जाव होता आणि
धार्मिक स्थाने , स्त्रिया, मुलेबाळे यांना किंवा प्रजेला उपद्रव दिल्यास
कडक शासन केले जाई.
पायदळ
व घोडदळाप्रमाणेच मराठ्यांच्या आरमाराकडे शिवछत्रपतींनी लक्ष दिले व ते
सुसज्ज केले. मराठ्यांचे आरमार प्रथम छ. शिवाजीनीच सुरू केले.
पोर्तुगीजांच्या एका पत्रावरून ते १६५९ साली अस्तित्वात असल्याचा उल्लेख
मिळतो. १६६४ मध्ये महाराजांनी सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला बांधला व नंतर
कुलावा, सुवर्णदुर्ग विजयदुर्ग, पद्मदुर्ग इ. पाण्यातील किल्ले सुधारून
त्यांतील काही किल्ल्यांवर जहाजे बांधण्यस प्रारंभ केला. त्यांनी १६६५
पर्यत कारवारपर्यतचा कोकण किनारा आपल्या आधिपत्याखाली आणला होता.
त्यांच्याकडे किती जहाजे होती, यांबद्दल विविध बखरी व कागदपत्रांत
मतभिन्नता आढळते. त्यांच्या मृत्यूसमयी ४०० ते ५०० जहाजे आरमारात असावीत,
असे तज्ञांचे मत आहे. गुराबे १५० ते ३०० टनांपर्यत असत. त्यांवर नऊ ते वीस
पौंडी तोफा बसविण्यात येत आणि शंभर ते दीडशे कडवे खलाशी ठेवीत.
गलबते वेगवान असून आरमाराचे प्रमुख अधिकारी इब्राहिमखान, दौलतखान, मायनाक
भंडारी वगैरे होते. इतर सैन्याप्रमाणेच नौदलातील सैन्याचा पगार दरमहा
नियमित होई आणि जहाजांची व गलबतांची व्यवस्था चोख असे.या आरमाराची वाढ पुढे छ. राजारामाच्या कारकीर्दीत ⇨कान्होजी आंग्रे
याने केली आणि परकीय तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कामगार लावून
पाच जहाजबांधणी कारखाने चालविले आणि काही लढाऊ जहाजे निर्माण करून मुंबई ते
गोवा या किनारपट्टीचे संरक्षण केले. नाविक लढायांमधील डावपेचांमुळे त्या
वेळी कान्होजीस एकामागून एक विजय मिळाले. समोरासमोरील हातघाईच्या लढाईवर
त्याची सर्व भिस्त असे ; परंतु कान्होजीनंतर मराठ्यांचे आरमाराकडे दुर्लक्ष झाले आणि पुढे पेशवेकाळात अंतर्गत वैरभावामुळे मराठ्यांचे आरमार प्राय: संपुष्टात आले.
शिवछत्रपतींच्या वेळी मराठ्यांचे सैन्य सुटसुटीत होते आणि त्यांना वेतनही दरमहा वेळेवर मिळे;
पण शाहूच्या वेळी त्याला अस्ताव्यस्त स्वरूप प्राप्त झाले. शाहूने लष्करी
अधिकाऱ्याना व सचिवांना अनुक्रमे मोकासा व साहोत्रा वाटून दिला. त्यामुळे
सरदारांनी स्वत:
सैन्य बाळगून लढाईच्या वेळी यावे, असे करार झाले. त्याच्या स्वारीत
घोड्यांबरोबर हत्तीही असत आणि काही प्रसंगी बरोबर गोषाही असे. खास, सरदार,
दरकदार, मनमरातबवाले डुलत येत. छत्रपतींच्या पुढे तोफखाना, त्यामागे झेंडा,
झेंड्याभोवती घोडेस्वार, सरदारांची पथके आणि इतर संरक्षक असत. आघाडीला
बिनीवाले आणि त्यांच्या मागे रणवाद्ये व चाकर लोक असत. त्यांच्या मागून
हत्ती, घोडे, रथ, उंट, वगैरे जात. त्यानंतर सशस्त्र फौज असे. तोफखाना व
खाशा स्वाऱ्या यांच्या दरम्यान भालदार, चोपदार व हुजरे असत. स्वारी
युद्धाला निघाली की रस्ते पाण्याने शिंपीत. साहजिकच साधारणत: दिवसाला पंधरा ते वीस किलोमीटर एवढीच मजल सैन्याची होई. शिवाजी महाराज चौथाई वसूल करीत. शाहू छत्रपतींनी स्वराज्य, चौथाई –
सरदेशमुखी हे हक्क मोगलांकडून मान्य करून घेतले व त्याच्या सनदा दिल्लीहून
आणल्या आणि मोगलांच्या मदतीसाठी मराठ्यांनी पंधरा हजार सैन्यानिशी मदत
करण्याचे ठरले. एवढेच नव्हे, तर मोगली साम्राज्य टिकविण्याची आणि
चालविण्याची जबाबदारी काही अटींवर मराठ्यांनी पतकरली. साहजिकच सरंजामशाही
वाढीस लागली. मराठ्यांनी खडी फौज कमी होती. खंबीर नेतृत्वाअभावी मराठे
सरदारांचे छोटे गट तयार झाले. शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले यांच्याजवळ २० –
२५ हजारपर्यत सैन्य असे. या फौजेच्या खर्चापोटी प्रत्येक सरदाराला जहागीर
दिलेला असे. बाकीच्या सरदारांजवळ यापेक्षाही कमी फौज होती. अर्थातच त्यांना
त्यांच्या फौजेच्या प्रमाणात जाहागिरीही कमीअधिक प्रमाणात देण्यात आल्या
होत्या.मैदानी
लढायांमुळे किल्ल्यांचा उपयोग मुख्यत्वे अडचणीच्या वेळी आश्रयस्थान व
राजकीय तुरूंग म्हणून होऊ लागला. सरदारांच्या पथकाशिवाय खुद्द पेशव्यांची
काही खास पथके असत. मोठ्या सैन्यासाठी ते सरदारांवर अवलंबून राहू लागले;
पण त्यांना सरदार सरंजामाच्या अटीप्रमाणे सैन्य पुरवीत नसत. शिवाय
पेशव्यांनीही पवार, रास्ते, पटवर्धन आदी वतनदारांची अनेक घराणी निर्माण
करून आपल्याजवळील जबाबदारी त्यांच्यात विभागून टाकली. शिवाजींच्या सैन्यात
मुख्यत्वे मराठे व काही मुसलमान असत;
पण पेशवे काळात सैन्यात शीख, राजपूत, सिंधी, कानडी, रोहिले, अरब,
अँबिसिनियन, पोर्तुगीज वगैरे नाना प्रकारचे सैनिक समाविष्ट झाले.
मराठ्यांपेक्षा त्यांना पगार व तनखा जास्त मिळत असे. पेशव्यांकडे खाजगी
फौजेत अरब जास्त तर होळकर –
शिंदे यांच्या सैन्यात पेंढारी, फ्रेंच आदी अन्य लोकांचा भरणा होता.
त्यामुळे आत्मीयता जाऊन राजकीय निष्ठांना गौण स्थान प्राप्त झाले.
पेशवाईत स्वत:च्या
प्रदेशाच्या रक्षणाची खास चिंता न राहिल्याने इतर मुलूखात स्वाऱ्या करून
पैसा जमविणे शक्य आहे, हे लक्षात घेऊन मुलूखगिरी वाढली आणि घोडदळाला
महत्त्व प्राप्त झाले. पेशव्यांचे घोडदळ सरकारी ( खासा ), शिलेदारी, एकांडे
व बुणगे असे चतुरंग असे. पानिपतच्या लढाईच्या वेळी पेशव्यांचे खुद्द असे
६,००० घोडदळ होते. शिवाय सैन्यात लढाऊ दलाशिवाय इतर कामगारांचा भरणाही
पुष्कळ असे. घोडेस्वारांजवळ तोड्यांची बंदूक, ढाल, तलवार, भाला, बर्ची,
खंजीर व तीरकामटा अशी शस्त्रे असत.गोफण गुंड्याचाही उपयोग ते करीत. दारूचे
बाणही वापरीत. हत्ती पळवून लावण्यास त्यांचा उपयोग होई.
मूल्यमापन :
मराठ्यांनी आपल्या परंपरागत सैन्यात, युद्धपद्धतीत व शास्त्रस्त्रांत
यूरोपियनांच्या आगमनानंतरही विशेष असा बदल केला नाही. यूरोपीय लोक कवायती
फौज, तोफा, बंदुका व दारूगोळा यांचा युद्धात सर्रास वापर करीत; परंतु
मराठ्यांनी शिस्तबद्ध पलटणी आणि दारूगोळा, तोफा व बंदुका यांच्या
निर्मितीकडे आवश्यक तेवढेच लक्ष दिले नाही. ते या साहित्यासाठी प्रथम
पोर्तुगीजांवर व नंतर इंग्रजांवर अवलंबून राहिले. खुद्द शिवछत्रपतींनी हा
माल यूरोपीय व्यापाऱ्याकडून घेतल्याचे उल्लेख कागदोपत्री सापडतात.
फ्रेंचांना राजापूर येथे बखार घालण्यात शिवछत्रपतींनी याच कारणास्तव
परवानगी दिली होती आणि त्यांच्याकडून काही तोफाही खरेदी केल्या होत्या ;
तथापि त्या वेळी यूरोपियनांचा व्यापारापुरताच मऱ्यादित संचार महाराष्ट्रात
होता. पुढे पेशवाईच्या वेळी यूरोपियनांनी राजकारणात प्रत्यक्ष प्रवेश केला.
पहिल्या
बाजीरावाने तोफांचा कारखाना घातला होता. तो पाहण्यास कॅप्टन गॉर्डन
आल्याचा उल्लेख आहे. सदर तोफखान्यात गरनाळा व तोफाचे गोळे ओतण्यात येत.
पहिल्या माधवरावाने तर
घरातील सोन्यारूप्यांची भांडी मोडून आंबेगाव व पुणे येथे कारखाने काढले होते;
परंतु त्यांतून उत्तम प्रतीची माल क्वचित निघत असे. साहजिकच पेशवे दारू ,
तोफा, बंदुकीच्या गोळ्यांबाबत पाश्वात्यांवर अवलंबून असत. शिंद्यांनी
यूरोपियनांच्या देखरेखीखाली तोफा बनविण्याचा एक कारखाना काढला होता ; परंतु या सर्वास कच्चा माल परकीयांकडून द्यावा लागे व तो हिणकस मिळे. मराठ्यांच्या तोफखान्यांवर
कधीकधी यूरोपीयांची नेमणूक करण्यात येई. नोरोना नावाचा पोर्तुगीज अधिकारी व
त्याच्या हाताखालील काही यूरोपियनांची नावे प्रसिद्ध आहेत. पेशवाईत पानसे
हे काही वर्षे तोफखान्यांवर मुख्य अधिकारी होते. इंग्रज- मराठे युद्धांत
लढताना मराठ्यांचा तोफखाना टिकाव धरू शकला नाही. या शस्त्रास्त्रातील
अज्ञानामुळे तोफखाना इ. दारूगोळ्यांबाबतीत मराठे मागे पडले. तसेच परकीयांशी
लढण्यासाठी सुसज्ज आरमाराची गरज होती. उत्तर पेशवाईत मराठ्यांनी
आरमाराकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले नाही. त्याचप्रमाणे राजकीय मर्मदृष्टी
असलेले आणि भोवतालची परिस्थिती हेरून त्याप्रमाणे सैनिकी नेतृत्व करणारे
सरदार आणि सेनापती निर्माण झाले नाहीत. त्यामुळे अवनत स्थितीला आलेले
सरंजामशाही स्वरूपाचे मराठ्यांचे सैनिकी नेतृत्व इंग्रजांसारख्या समर्थ
लष्करी नेतृत्वाशी तुल्यबळ ठरू शकले नाही.
पहा : इंग्रज – मराठे युद्धे; पेशवे; मराठा अंमल; मराठा – निजाम संबंध.
संदर्भ : 1. Apte, B. K. A History of the Maratha Navy and Merchantships, Bombay, 1973.
2. Deopujari, M. B. Shivaji and Maratha Art of War. Nagpur, 1973.
3. Sarkar, J. N. Military History of India. New Delhi, 1970 .
4. Sen, S. N. The Military System of the Marathas, New Delhi, 1958.
5. Sharma, Major Gautam, India Army Through the Ages, Bombay, 1966.
6. Shcrwani, H. K.; Joshi, P. M. Early History of the Mediaeval Deccan, Vols. I &II, Hyderabad. 1973 – 1974 .