Tuesday, December 1, 2015

रघुनाथ बल्लाळला दंडा



शिवकालीन महाराष्ट्र ( सन १६५७- सन १६५८ )
सांभार : http://www.marathaempire.in/
भाग १४५

शिवाजी राजे दंडा-राजापुरी जिंकतात
जावळी घेतल्यानंतर शिवरायांना थेट कोकणाला हात घालता येत होता. जंजीऱ्याचा सिद्दी आता त्याचा शेजारी झाला होता. १३ ऑगस्ट १६५७ ला शिवरायांनी रघुनाथ बल्लाळला दंडा राजापुरीवर धाडले. ह्या घटनेचा उल्लेख शिवापूर शकावली देते. रघुनाथने ह्या मोहिमेसाठी पाच सहा हजार घोडदळ घेतले होते असे त्यातून कळते.
रघुनाथने आधी तळे-घोसाळे हे दोन किल्ले व त्यांचा परिसर जिंकला. एक दोन ठिकाणी त्याने सिद्दीच्या सैन्याला पळवून लावले. त्यानंतर त्यांच्यात तह झाला. शिवभारतातही ह्या घटनेची पुष्टी मिळते. अफजलखानने सन १६५९ मधे वाईला पोहोचल्यावर लिहीलेल्या पत्रातही ह्याचा उल्लेख आहे. शिवरायांनी सिद्दीच्या प्रदेशात केलेले आक्रमण थांबवून ते भाग सिद्दीला परत देण्याची आज्ञा त्यात केली आहे.
सिद्दीला जंजीऱ्यावरून हुसकावून लावायला त्यावेळी मराठ्यांकडे नावीक बळ नव्हते. त्यामुळे रघुनाथ बल्लाळने फक्त दंडा-राजापुरीचा भाग जिंकून घेतला.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८५४-८५५

Wednesday, March 4, 2015

स्वराज्यासाठी कामी आलेल्या थोरांची समाधीस्थळे


स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे.
१) लखुजी जाधवराव (जिजाबार्इंचे वडील)-सिंदखेड राजा
२) मालोजीराजे (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर,जि. पुणे
३) विठोजीराजे (शिवरायांचे चुलते)- भातवडी
४) शहाजीराजे – होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.दावनगेरे
(कर्नाटक)
५) जिजाबाई – पाचाड(रायगडाच्या पायथ्याला)
६) छत्रपती शिवाजी महाराज – रायगडावर
७) सईबाई (शिवरायांच्यापत्नी) – राजगड पायथा पाली
८) पुतळाबाई व सोयराबाई(शिवरायांच्या पत्नी) – रायगड
९) संभाजीराजे (शिवरायांचे थोरले बंधू)कनकगिरी, ता.
गंगावटी, जि. कोप्पल
१०) छत्रपती संभाजी (शिवरायांचे थोरलेपुत्र)- वढू कोरेगाव
११) सखुबाई (शिवरायांच्या कन्या)माळशिरस, जि. सोलापूर
१२) सूर्यराव काकडे (शिवरायांचे जवळचेमित्र)-
साल्हेरच्या किल्ल्याजवळ.
१३) रामचंद्रपंत अमात्य(अष्टप्रधानमंडळातील मंत्री)-
पन्हाळगडाच्या पायथ्याशी
१४) मकूबाई (शिवरायांच्या भावजयी) – जिती,ता.करमाळा,
जि. सोलापूर
१५) शिवरायांचे सेनापतीनेताजी पालकर- तामसा, ता. हदगाव,
जि. नांदेडप्रतापराव गुजर – नेसरी, ता. गडहिंग्लज,जि.
कोल्हापूर हंबिरराव मोहिते- तळबीड, ता.कराड
१६) धनाजी जाधव – वडगाव (कोल्हापूरजवळ)
१७) रामाजी पांगेरा – कन्हेरगड, ता. दिंडोरी, जि.नाशिक
१८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप(सासवड, जि. पुणे)
१९) तानाजी मालुसरे आणिशेलारमामा -उमरठ
२०‹) रायबा (तानाजीचा मुलगा)- पारगड
२१) बहिर्जी नाईक – भूपाळगड मौजे बाणूर, ता.आटपाटी, जि.
सांगली
२२) हिरोजी फर्जंद आणि शिवरायांचे सावत्रभाऊ –
परळी (रायगडाजवळ)
२३) शिवा काशिद – पन्हाळगड
२४) कान्होजी जेधे आणि जिवा महा-कारी अंबवडे, ता. भोर,
जि. पुणे
२५) मुरारबाजी देशपांडे -पुरंदर
२६) संभाजी कावजी – कोंडावळे, ता. मुळशी, जि.पुणे
२७) फिरंगोजी नरसाळा- संग्रामदुर्ग .(चाकण)पुणे
२८) सिदोजी निंबाळकर – पट्टागड (संगमनेर)
२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू – विशाळगड

शिवाजी महाराज

भगव्या आकाशावरी झळाळी
अन भगवाच माथा
ना भीती कुणाची ना कुठली भ्रांत आता
आमुचे शिवराय असे शक्तिदाता

चंदेरी किल्ल्यावरील शिवरायांची हि मूर्ती. मूर्ती चे आकर्षण असे कि त्याला जसे असायला हवे तसेच "छत्र" आहे , उगाच करायचे म्हणून केलेले तसले छत्र नाही आणि मूर्ती सिंहासनारूढ असून पायत मोजडी नाही.
शिवरायांचे हे रूप जणू 'सह्याद्रीवर अजून माझेच स्वराज्य आहे' हेच दर्शिविते.......
इथे जेव्हा शिवरायांचा जय-जयकार केला तेव्हा अखंड सह्याद्री 'जय...जय...'' च्या प्रतिध्वनित दुम-दुमून निघाला....
मूर्तीच्या मागे प्रबळगड आणि कलावंतीणीचा बुरुज स्पष्ट पणे दिसत आहेत....


तव तेजाचा अंश दे...

Gateway समोरील शिवरायांची अश्वारूढ मूर्ती....
राहाता येथील शिवस्मारक

|| क्षत्रियकुलावतंस ||

कात्रज येथील तलावात कृत्रिम बेटावर राज्यांची हि राजबिंडी प्रतिमा उभारली आहे. या मूर्तीचे वैशिष्ट म्हणजे घोड्याचे चारही पाय हवेत आहेत.


जुन्नर येथील शिवरायांची मूर्ती....
|| शिवराय केवढे, आभाळा एवढे ||





Saturday, December 28, 2013

“लंडन गॅझेट”


संशोधकांना शिवाजी महारांजांबद्दलचा संदर्भ “लंडन गॅझेट” या पत्राच्या १६७२ च्या आव्रुत्तीत सापडला
मराठ्यांनी जेव्हा सुरतेवर हल्ला चढवला तेव्हा जे पत्र तत्कालीन ब्रिटीश अधिकार्याने त्याच्या वरिष्ठांना लिहिले ते अगदी तंतोतंत मी इथे देत आहे, यावरून आपल्या शिवछत्रपतींचा त्याकाळी मुघलावरती आणि इंग्रजामध्ये असलेला दबदबा लक्षात येईल.. ओळी कमीच आहेत पत्राच्या परंतु अर्थ भलताच मोठा आहे….
ते पत्र :-

Two days since we received Letters from
India, written by the English President residing
at Suratte, who acquaints us with
the daily fears they have there, from Sevagee
the Rebel, who having beaten the
Mogul in several Battels, remains almost Master of
that Countrey

हिंदुस्थानच्या इतिहासात अठरावे शतक हे मराठ्यांचे शतक आहे….
शिवरायांची अभेद्य नजर कोणाही शत्रूवर पडल्यावाचून कधीही राहिली नाही, भविष्याचा अंदाज शिवरायांनी कधीच ओळखून ठेवला होता हे आपण सर्व जाणताच, शिवछत्रपतींचे मावळे, शिवछत्रपतींचे गनिमी युद्ध, शिवरायांचे अनुमान, शिवरायांचे ध्येय या सगळ्या गोष्टी किमान आपल्या समजण्याच्या पलीकडच्याच होत्या..
उपरोक्त पत्रावरून स्पष्टपणे दिसून येते कि ज्यांनी हिंदुस्थानावर इतकी वर्षे राज्य केली त्यांच्यामध्ये शिवरायांचा किती दरारा होता..

दिनेश सूर्यवंशी , तुळजापूर
 

Saturday, December 21, 2013

शिवछत्रपतींची वंशावळ

शिवछत्रपतींची वंशावळ :-

छत्रपती शिवाजी महाराज राजपूत सिसोदिया कुळाचे होत.
काही इतिहासकारांच्या मते चितोडच्या भोसाजीराणा या राजाच्या नावावरून या कुळाला भोसवंत अर्थात भोसले हे नाव मिळाले.
तर काही इतिहासकारांच्या मते हजार वर्षापूर्वी दक्षिणेकडील राजांना भोज ही संज्ञा होती या भोजसंज्ञक राजाचे वंशज ते भोसले होय.
मालोजीराजे भोसलेंनी शहाशरीफ नावाच्या नगरजवळील पिरास पुत्र व्हावा म्हणून नवस केला होता.
पुत्र झाल्यावर त्या पिराची नावे शहाजी व शरीफजी आपल्या पुत्रास ठेवली.शहाजीराजेंचे थोरले पुत्र संभाजीराजे लढाईत मारले गेले,
तर व्यंकोजीराजेंनी तामीळनाडूतील तंजावर येथे मराठ्यांचे राज्य स्थापन केले.
बेंगलोर हे मराठ्यांचे कर्नाटकातील मुख्य ठिकाण होते.पण शहाजीराजेंच्या मृत्युनंतर व्यंकोजीराजेंनी तामीळनाडूतील तंजावर येथे
राज्य हलविल्यामुळे मराठ्यांचे खुप मोठे नुकसान झाले.

हिच ती जागा जिथे


हिच ती जागा जिथे ओशाळला मृत्यू ……


तुळापुर ला गेल्यावर तिथे भिमा-भामा-इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावरून नावे ने पलीकडील तीरावर जाता येते.
नदी पार केल्यावर समोरच्या झाडी झुडपातून वाट काढत पुढे गेल्यावर हे बांधकाम नजरेस पडते. ह्याच ठिकाणी क्रूर औरंग्याने शंभू राजांना साखळ दंडानी बांधून ठेवले होते. याच ठिकाणी त्यांच्यावर अमानुष अत्त्याचार करण्यात आले. इथेच होती त्या औरंगजेबाची छावणी.
आणि ह्याच भूमीवर रक्ताभिषेक घातला माझ्या राजानं …. हीच ती भूमी आणि इथलीच झाडे झुडपे ज्यांनी पाहिले माझ्या राजाचे बलिदान…
याच ठिकाणी शंभूराजांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून नदीभोवती टाकले होते. रात्री येथील गावकऱ्यांनी ते जमा करून तुळापुर आणि वढू येथे गुपचूप पणे त्या तुकड्यांना अग्नी दिला होता.
काही वर्षांपूर्वी तिथे शंकराचे मंदिर बांधावे या हेतूने काही जणांनी शंकराची पिंड आणि नंदी ची स्थापना केली होती परंतु काही कर्म दरीद्र्यांनी त्याची हि नासधूस केली. बाजूलाच पडलेली नंदी ची मूर्ती याची साक्ष अजूनही देत आहे.
(तुळापुर - आळंदी गावातून तुळापुर १० किमी वर आहे)

साभार - अमोल तावरे

Friday, July 26, 2013

प्रस्तावना

 मराठ्यांची युद्धपद्धति :
सतराव्या शतकात महाराष्ट्रात मराठे सरदारांनी व विशेषत: शिवछत्रपतींनी एक अभिनव युद्धतंत्र प्रचारात आणले.ते मराठ्यांची युद्धपद्धती या नावाने परिचित आहे. अशा प्रकारच्या भारतीय युद्धतंत्राचा उल्लेख रामायण, महाभारत, अर्थशास्त्रादी प्राचीन भारतीय वाङ्‌यात आढळतो. संस्कृतमध्ये यास वृकयुद्ध म्हटले आहे. हीच परंपरा मध्ययुगीन महाराष्ट्रात शत्रूशी मुकाबला करण्यासाठी मराठ्यांनी वापरलेल्या युद्धतंत्रात दिसून येते.

त्कालीन परिस्थिती : या युद्धपद्धतीला महाराष्ट्राची भौगोलिक, राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थिती प्रामुख्याने कारणीभूत होती. महाराष्ट्राच्या काही भागाची भौगोलिक रचना डोंगरदऱ्याची आहे. सह्याद्री व सातपुडा यांना समांतर अशा पूर्व-पश्चिम व दक्षिणोत्तर पर्वत रांगा आडव्या उभ्या पसरल्या आहेत. घाटमाथ्यावर किल्ले बांधण्यासाठी या भूरचनेचा शिवछत्रपतींनी उपयोग करून घेतला आणि घाटमाथा, मावळ व कोकणपट्टी यांतील महत्त्वाची स्थळे आपल्या स्वराज्य विस्तारासाठी निवडली. देशातील मैदानी मुलूख शत्रूच्या आक्रमणास सुलभ होता, याचा विचार करूनच त्यांनी भोरजवळील तोरणा- राजगडावर व पुढे कोकणातील रायगड, प्रतापगड येथे आपली प्रमुख आश्रयस्थाने केली. पुढे राज्य थोडे स्थिरस्थावर झाल्यावर कोकणात किनारपट्टीलगत छोटी बेटे व दंतुर किनारा यांचा शोध घेऊन जलदुर्ग बांधले आणि छोट्या जहागिरीची वाढ पूर्वेकडे सपाट प्रदेशात न करता पश्चिमेकडे दुर्गम प्रदेशात प्रथम केली, हे अत्यंत सूचक होते.

या काळात महाराष्ट्राची राजकीय स्थिती अस्थिर होती. निजामशाही व आदिलशाही यांच्या अंमलाखाली महाराष्ट्राचा भूप्रदेश होता आणि त्यांत संघर्ष असून मोगलांचेही या प्रदेशावर वर्चस्व स्थापण्याचे प्रयत्‍न चालू होते. त्यांना मातब्बर मराठा घराणी वतन व जहागिरींच्या मोबदल्यात मदत करीत होती. शिवाजी महाराजांनी आधिलशाहीवरील मोगली दडपणाच्या संधीचा फायदा घेऊन आधिलशाही प्रदेशांवर प्रथम हल्ले केले आणि विरोध करणाऱ्या देशमुख वतनदारांचे पारिपत्य करण्याचे काम हाती घेतले. तसेच मराठी सरदारांना स्वातंत्र्याऱ्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आणि साम, दान, दंड व भेद या नीतीचा अवलंब करून जावळीच्या चंद्रराव मोरे याचा उच्छेद केला आणि हेच धोरण स्वराज्य उभारण्यासाठी पुढे चालू ठेवले. सामान्य समाजही या सुमारास सतत होणाऱ्या सत्तेतील बदलांमुळे हैराण झाला होता. त्याला स्थिर आणि कार्यक्षम शासनाची नितांत गरज होती. आर्थिक दृष्ट्या देशमुख जहागीरदारसरंजामदार शेतकऱ्याना वेठीला धरीत. त्यामुळे शेतीचे नुकसान होऊन ग्रामीण प्रदेशावर अधिक परिणाम होई. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिवछत्रपतींनी गनिमी युद्धतंत्राचा प्रारंभी उपयोग केला.

मैदानी लढाया

मैदानी लढाया

मैदानी लढायांचे तंत्र मराठ्यांना नवीन नव्हते. छ. शिवाजींनी अखेरच्या काही वर्षात अशी युद्धे केली. त्यांपैकी साल्हेर ( १७६१ ), दिंडोरीची लढाई ( १७७० ) आणि बागलाण वऱ्हाडातील मोहिमा या लक्षणीय आहेत. छ. शाहूच्या वेळी युद्धाची भूमी बदलली. महाराष्ट्रावर चालून आलेल्या शत्रूला जेरीस आणणे किंवा स्वसंरक्षण करणे, हा उद्देश मागे पडून नवीन भूप्रदेश जिंकणे हे उद्दिष्ट निर्माण झाले; शिवाय तोफा-बंदुकांचा वापर युद्धात अधिक वाढल्यामुळे मराठ्यांना युद्धपद्धतीत आक्रमक पवित्रा द्यावा लागला. छ. शाहूच्या कारकीर्दीत मराठी सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन पेशव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले. पेशवे शाहूच्या आज्ञेने मोठ्या लढाईच्या वेळी सरदारांच्या सैन्याची जुळवाजुळव करीत व नंतरच संयुक्तरीत्या शत्रूपक्षावर हल्ला करण्यात येई. अशा बहुतेक लढाया मैदानात व क्वचित गनिमी युद्धतंत्राचा आवश्यक तेवढा उपयोग करून लढण्यात आल्या. यात घोडदळाच्या चपळ हालचालींद्वारे मोगली सैन्याचा त्यांनी समोरासमोरच्या युद्धात पराभव केला. याच पद्धतीचा अवलंब पहिला बाजीराव ( कार. १७२० – ४० ) याने पायदळापेक्षा घोडदळावर भर देऊन अनेक युद्धांत केला. या युद्धतंत्रात बाजीरावाने तत्कालीन इतर कोणत्याही सेनापतींपेक्षा अधिक प्रभुत्व मिळविले होते. आपल्या वीस वर्षाच्या कारकीर्दीत बाजीरावाला पराभव असा क्वचित माहीत होता. त्याच्या लढायांपैकी मुंगी – शेगांव ( पालखेड )व भोपाळ या निजाम – उल्-मुल्कबरोबरच्या लढायांना डावपेच, युद्धनीती, सैन्याची हालचाल आणि व्यूहरचना या सर्व दृष्टीनी विशेष महत्त्व आहे. पालखेडचे युद्ध ( १७२७ – २८) हे शाहूच्या छत्रपतिपदास आव्हान देणाऱ्या संभाजी ( कोल्हापूर ) व निजाम यांच्या मैत्रीतून उद्‍भवले. निजामाने कोल्हापूरकर संभाजीसह पुण्याच्या आसपासचा भाग पादाक्रांत करून खुद्द पुणे घेतले. त्यावेळी शाहू महाराजांना आपल्या स्वकीयांसह पुरंदर किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला. बाजीरावाने या आक्रमणास बऱ्हाणपूर आणि औरंगाबाद या निजामाच्या मूळ स्थांनांवर हल्ला करून प्रतिटोला दिला. सैन्याची चपळ हालचाल आणि शत्रूची रसद तोडणे या मार्गाचा अवलंब करून त्याने खानदेश मराठवाड्यातील अनेक गावे पादाक्रांत केली. बाजीराव त्याच्या औरंगाबाद या राजधानीजवळ पोहोचला आहे, असे समजताच निजाम द्रुतगतीने औरंगाबादकडे माघारी फिरला. बाजीरावाने गुप्तहेरांमार्फत त्याच्या हालचालींची माहिती मिळवून त्याला वाटेत अडथळे करण्याविषयी आधिकाऱ्याना लिहिले; तेव्हा निजामाने आपली बोजड शस्त्रास्त्रे विशेषत: तोफखाना मागे ठेवून गोदावरी पार केली. तो औरंगाबादच्या पश्चिमेस तीस किमी. वर पालखेड येथे डोंगराळ भागात आला असता, बाजीरावाच्या सैन्याने त्याला चोहोबाजूंनी वेढले. त्यामुळे त्याचा इतर सैन्याशी असणारा संपर्क तुटला आणि या निर्जन टेकडीवर पाणी व दाणा- वैराण नसल्यामुळे सैन्याचे अतोनात हाल होऊ लागले. बाजीरावाच्या सैन्याची फळी मोडून सुरक्षित जागी जाणे त्याला आत्माघातकी होऊन बसले. या वेळी बाजीरावाने लिहिलेल्या पत्रातील मजकुरावरून त्याच्या या धडाडीचे आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडते. अखेर निजामाला त्याने मुंगी शेगांवचा ( २५ फेबुवारी १७२८ ) अपमानास्पद तह करावयाला लावला. या युद्धाविषयी ए हिस्टरी ऑफ वॉरफेअर (१९६८) या ग्रंथात दुसऱया महायुद्धातील प्रसिद्ध सेनानी फिल्डमार्शल मंगमरी म्हणतो, बाजीरावाने सर्व बाबतीत निजामाच्या नेतृत्वावर मात केली. ही लढाई गतिशीलतेच्या डावपेचांचे सर्वात्कृष्ट उदाहरण आहे.

भोपाळची लढाई ही बाजीराव व निजाम यांच्या लष्करी सामर्थ्याची कसोटी ठरणारी दुसरी महत्त्वाची लढाई होय. याही सुमारास बाजीरावाने मोठी फौज घेऊन डिसेंबर १७३७ मध्ये नर्मदा ओलांडली आणि शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आपले गुप्तहेर धाडले. निजाम उत्तरेकडून भोपाळजवळ आला. मराठी सैन्याने तोफखान्यापासून अलिप्त राहून मोगलांच्या सैन्यास गनिमी युद्धतंत्राने बेजार केले. त्यावेळी निजामाने मराठी फौजांपासून संरक्षण मिळावे, म्हणून भोपाळच्या तटबंदीयुक्त किल्ल्यात आश्रय घेतला आणि संरक्षणाच्या दृष्टीने खबरदारी घेतली. तीच गोष्ट बाजीरावाला हवी होती. त्याने भोपाळला वेढा दिला आणि सर्व बाजूंनी रसद तोडली. निजामाच्या तोफखान्यामुळे मराठ्यांचे सैन्य दूरवर राहिले; पण भोपाळ सोडून निजामाला फार दूरवर जाता येईना व मराठ्यांनी घातलेल्या वेढ्याची फळी फोडता येईना. शिवाय त्याचा मुलगा बऱहाणपूरपर्यंतही पोहोचला नव्हता. तेव्हा नाईलाजाने निजामाने तहाची बोलणी सुरू केली. शेवटी दोराहसराई या ठिकाणी तह होऊन निजामाने बाजीरावाच्या सर्व अटी मान्य केल्या ( ७ जानेवारी १७३८ ). देवगिरीचे यादवांचे राज्य रसद तुटल्यामुळे पडले, या गोष्टीपासून मराठ्यांनी घडा घेतला. याचे उदाहरण म्हणजे पहिल्या बाजीरावची रणनीती होय.

बाळाजी बाजीरावामध्ये ( कार. १७४० १७६१ ) पित्याची धडाडी वा पराक्रम नव्हता. त्यामुळे त्याने मुत्सहद्देगिरीने सरदारांकरवी शासनावर व शत्रूंवर आपला वचक बसविला आणि निजामविरूद्ध सिंदखेड ( १७५७ ) व उदगीर ( १७६० ) या दोन लढायांत विजय मिळविले. छ. शाहूच्या मृत्यूनंतर ( १७४९ ) मराठ्यांची सत्ता प्रत्यक्षात छत्रपतीकडून पेशव्यांकडे गेली आणि पुणे हेच राज्यकारभाराचे मुख्य स्थान झाले. पानिपतचे तिसरे युद्ध ( १७६१ ) हे मैदानी लढाईचे आदर्श उदाहरण असून या युद्धात मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली ; परंतु शत्रूपक्षाच्या हालचाळींचा अचूक अंदाज न आल्यामुळे ऐन लढाईच्या वेळी भाऊसाहेब बुणगे पाठीमागे घालून पुढे तोफखाना देऊन चालून गेले. इब्राहीमखान गार्दीच्या कवायती तुकड्यांनी समोरिल रोहिल्यांचा खुर्दा उडविला आणि हुजुरातीच्या मध्यभागी असलेल्या फौजेनेही पराक्रमाची शर्थ केली आणि दुराणीची मोड केला; परंतु अब्दालीने पुन्हा जोर केला आणि आपल्या राखीव सैन्यानिशी मराठी फौंजावर हल्ला केला. त्यावेळी त्यांची वाताहत झाली. हे युद्ध मराठी इतिहासातील एक शोकांतिका आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर ग्‍वाल्हेरकर शिंद्यांनी यूरोपियनांच्या धर्तीवर शिस्तबद्ध फौज असावी, म्हणून फ्रेंच सेनापती डी. बॉइन याच्या मदतीने २० हजार पायदळ, १० हजार नजीब ( विशिष्ट पोशाखी ) व तीन हजार तुर्कस्वार शिपाई आणि मोठा तोफखाना तयार केला. या कवायती फौजेवरील अधिकाऱ्याना मोठे तनखे असत. काहींना जहागिरीही दिल्या होत्या. पेऱॉ या फ्रेंच अधिकाऱ्याला दरमहा ५, ००० रू. पगार असे पुढे कवायती फौजांत यूरोपियनांचा अधिक भरणा होऊ लागला. त्यामुळे इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज आदींबरोबर लढताना हे यूरोपियन कुचराईचे धोरण अंगीकारत; परंतु शिंद्यांनी मात्र या फौजेच्या जोरावर बादशाहवर पूर्ण वर्चस्व मिळविणे आणि दिल्लीच्या राजकारणाची सूत्रे आपल्या हाती ठेवली.

हिल्या माधवरावाने पहिल्या बाजीरावाच्या युद्धपद्धतीचे अनुकरण करून कर्नाटकातील काही युद्धे जिंकली आणि निजाम, नागपूरकर भोसले आदींना नमविले. राक्षसभुवनची ( १७६३ ) लढाई ही त्याच्या जीवनातील अत्यंत शिस्तबद्ध व युद्धशास्त्रदृष्ट्या संस्मरणीय लढाई होय; पण गृहकलह आणि त्या निमित्ताने इंग्रजांचा मराठी राज्यात झालेला चंचूप्रवेश यामुळे एकोफ्याची भावना पुढे नष्ट झाली आणि अल्पवयी माधवरावच्या मृत्यूनंतर हरिपंत फडके, परशुरामभाऊ पटवर्धन, बापू गोखले अशी दोन चार पराक्रमी सेनापतींची उदाहरणे सोडली, तर धडाडीचा नेता मराठी सेन्याला लाभला नाही. अठराव्या शतकाच्या अखेरीस पेशवे, शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले यांची स्वतंत्र सैन्यपथके निर्माण झाली. खर्ड्याची लढाई ( १७९५ ) यांसारख्या एखाद्या प्रसंगी या सर्व फौजा एकत्र आल्या एवढेच.

Thursday, July 25, 2013

गनिमी युद्धतंत्र


निमी युद्धतंत्र

  शिवछत्रपतींच्या युद्धनीतीचे विश्वासू सवेतन सुसज्‍ज सेना, हे मुख्य सूत्र होते. अपुरी शस्त्रास्त्रे, थोडे सैनिक आणि मऱ्यादित साधन संपत्ती यांमुळे परंपरागत आमने –सामने युद्धपद्धती मोगलांसारख्या बलाढ्य शत्रुशी मुकाबला करण्यास निरूपयोगी ठरेल, एवढेच नव्हे तर हानिकारक ठरेल, हे लक्षात घेऊन शिवछत्रपतींनी आपल्या युद्धपद्धतीला गनिमी युद्धतंत्राची जोड दिली. प्रसंगोचित सेनेची व्यूहरचना, अनुकूल रणांगणाची निवड, सैन्याच्या शिस्तबद्ध, अनपेक्षित व वेगवान हालचाली आणि प्रसंगावधान या मूलभूत सिद्धांतांवर महाराजांचे हे युद्धतंत्र आधारित होते. गनिमी युद्धतंत्राविषयी मुसलमानांचा दृष्टिकोण मल्हार रामराव चिटणीस या बखरकारांने सांगितला आहे ( १८११ ). तो म्हणतो, ‘अकस्मात यावे, बक मच्छ उचलून नेतो तसा घाला घालावा, शिपायीगिरीची शर्थ करावी; प्रसंग पडल्यास माघारे पळून जावे. मराठे खाण्यापिण्याचा दरकार बाळगीत नाहीत. पाऊस, ऊन, थंडी, अंधार इ. काही न पाहता घोड्यावरच हुरडा, भाकरी –चटणी–कांदे खाऊन धावतात. त्यास कसे जिंकावे? एक्या मुलकांत फौज आली म्हणोन त्याजवर रवानगी करावी, तो दुसरीकडे जाऊन ठाणी घेतात. मुलख मारतात, हे आदमी नव्हत, भूतखाना आहे’. यावरून मराठ्यांनी या युद्धतंत्राने शत्रूला कसे जेरीस आणले होते, हे लक्षात येते. या कामी मोरो त्र्यंबक पिंगळे, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, नेताजी पालकर, सूऱ्याजी पिसाळ, प्रतापराव गुजर, बाजी प्रभू व मुरारबाजी देशपांडे इ. शूर साथीदारांचे त्यांना प्रसंगोपात्त सहकार्य लाभले. काहींनी युद्धप्रसंगी जीवाची पर्वा न करता आत्माहुती दिली. शत्रूंची मर्मस्थळे शोधून काढण्यात शिवछत्रपतींचा हातखंडा होता. अशा प्रकारच्या गनिमी काव्याच्या युद्धतंत्राला गुप्तहेरखात्याची रचना खोलकर माहिती गोळा करणारी आणि हल्ले करताना व माघार घेताना आवश्यक ती माहिती त्वरित पुरविणारी असते. त्यांचे गुप्तहेर खाते त्या दृष्टीनी उत्तम प्रकारे शत्रूची माहिती मिळवीत असे. लहान- सहान विजयांनीसुद्धा सैनिकांचे नीतिधैर्य वाढते, हे जाणून त्यांनी कल्याण – भिंवडी ही ठाणी सुरूवातीस काबीज केली. युद्धातील यशापयश कधीकधी सेनापतीच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. हे ध्यानी घेऊन महत्त्वाच्या लढायांत तसेच आणीबाणीच्या प्रसंगी शिवछत्रपतींनी स्वत: नेतृत्व केले. अफझलखान व शायिस्तेखान यांबरोबरची युद्धे ही याची उत्तम उदाहरणे आहेत. उंबरखिंडींचे युद्ध ( १६६१ ), मिरे डोंगर युद्ध ( १६६२ ) इ. गनिमीयुद्धे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रतापगडचे युद्ध हे शिवछत्रपतींच्या एकूण युद्धतंत्राचे आदर्श उदाहरण असून या युद्धातील सैन्याची मांडणी, व्यूहरचना, शत्रूपक्षाचा बेत, प्रसंगावधान इ. तांत्रिक गोष्टी अभ्यसनीय आहेत. अफझलखानाला प्रतापगडच्या पायथ्याशी जंगली – डोंगराळ भागात आणून छत्रपतींनी त्याच्या बेसावध सैन्यावर योग्य वेळी इशाऱ्याबरोबर छापे घालून व मारा करून अमाप लूट मिळविली व दहशत बसविली. भवानी मातेची प्रेरणा व आशिर्वाद महाराजांना यश देतो, ही समजूत तत्कालीन देवभोळेपणामुळे मराठ्यांची सुप्तशक्ती जागृत करण्यास समर्थ ठरली. एवढेच नव्हे तर प्रसंगोपात महाराजांनी केलेली लूट आणि कावेबाजपणा या बाबी स्वराज्य प्राप्तीच्या उदात्त उद्देशासाठी कुशल नेतृत्वामुळे समर्थनीय ठरल्या, हे विशेष. गनिमी काव्यामुळे आदिलशाह व मोगल यांच्या बलाढ्य सैन्याला मराठ्यांच्या लहानसहान तुकड्या बेजार करीत. पावनखिंडीत बचावात्मक लढाई किंवा मिर्झा राजा जयसिंगसारख्या बलाढ्य सेनापतीबरोबर केलेला पुरंदरचा तह, ही रणनीतीची उल्लेखनीय उदाहरणे होत.

शिवछत्रपतींच्या स्वाऱ्यांचा हेतू राज्यविस्ताराबरोबर लूट मिविणे आणि आपला खजिना व साधनसंपत्ती विशेषत: दारूगोळा वाढविण्यावर केंद्रित केला गेला होता. सैन्याचा पगार त्यांनी कधी मागे पडू दिला नाही; तद्‌वतच सैन्यास कसलीही ददात पडू दिली नाही. किल्ले, दारूगोळा, धान्य, गलबते यांचा खर्च सज्‍ज कोशबलावर अवलंबून होता. या राज्यांगाकडे त्यांनी सर्वात अधिक लक्ष पुरविले.

संभाजी आणि राजाराम यांच्या कारकीर्दीत अनुक्रमे गृहकलह, अंतर्गत तंटे, औरंगजेबाचे दक्षिणेतील प्रदीर्घ वास्तव्य इत्यादींमुळे राज्यकर्त्याना सरंजामशाहीचा पाठपुरावा करावा लागला; तथापि त्याही काळात छ. संभाजीने पराक्रम दाखवून काही लढाया जिंकल्या आणि मोगल तसेच पोर्तुगीज यांवर दहशत बसविली. नंतर राजारामाने बचावात्मक भूमिका स्वीकारून आपल्या संताजी घोरपडे, धनाजी जाधव यांसारख्या पराक्रमी सेनापतींद्वारे गनिमी युद्धतंत्राचा वापर करून औरंगजेबास जेरीस आणले. मोगलांशी जोपर्यत युद्ध चालू होते, तोपर्यत मराठ्यांना गनिमी युद्धतंत्राचे धोरण उपयुक्त ठरले.

सैन्याची संरचना

सैन्याची संरचना 

या युद्धपद्धतीमध्ये शिवछत्रपतींनी महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीचे विशेषत: किल्ल्यांचे महत्त्व ओळखून अनेक नवीन किल्ले बांधले व जुन्यांची डागडुजी केली; तसेच प्रत्येक किल्ल्यावर हवालदार नेमून त्याच्या हाताखाली एक सरनोबत, एक सबनीस, एक फडणीस आणि एक कारखानीस असे भिन्न जातींचे अधिकारी नेमले. याशिवाय किल्ल्याच्या अगदी लगतच्या परिसरात बंदोबस्तासाठी रामोशी, परवारी, महार, मांग, बेरड वगैरे मेटकरी नेमलेले असत. प्रत्येक किल्ल्यावर दारूखाना, अंबारखाना व पाण्याची टाकी किंवा क्वचित विहीर असे. किल्ल्यावर दारूगोळा, दाणागोटा व पाणी आहे की नाही, या व्यवस्थेकडे कटाक्षाने लक्ष दिले जाई. किल्ल्यावर दोन प्रकारचे सैन्य असे : पायदळ व घोडदळ. शिवाजीच्या पायदळात घाटमाथ्यावरील मावळे आणि घाटाखालील कोकणातील हेटकरी असत. प्रत्येक शिपायाजवळ ढाल, तलवार वा बंदूक असे. किल्लेदार शिपायांची हत्यारे स्वत:ची असत व दारूगोळा सरकारातून मिळे. पायदळात दहा माणसांचा दाहिजा ( समूह ) असून हवालदार, जुम्लेदार, एक हजारी, पंच हजारी, सरनोबत असे अधिकारी असत. घोडदळात, बारगीर व शिलेदार असे दोन प्रकार होते. शिलेदारांचे घोडे स्वत:चे असून त्याला सरकारातून याबद्दल जादा वेतन मिळे. बारगिरांची घोडी मात्र सरकारी पागेतील असत. सरकारी घोड्यांवर खुणेकरिता शिक्के मारीत. घोडेस्वाराजवळ भाला किंवा बंदूक असे. पंचवीस बारगीर वा शिलेदार, यांवर एक हवालदार असे. पुढे त्याचप्रमाणे जुम्लेदार, सुभेदार, पंचहजारी, सरनोबत असे अधिकारी असत. याशिवाय महाराजांबरोबर स्वत:चे असे पाच हचार निवडक लोक असत व हुजुरपागाही असे. नोकरीस नवीन लागणाऱ्या इसमाला जुन्या शिपायाचे खात्रीपत्र वा जामीन हजर करावा लागे. शिवाय शिवछत्रपती शिपाई निवडताना तपासणी करीत. सैन्यात सर्व जातींचे लोक असत. मराठ्यांचे सैन्य अगदी सुटसुटीत असे. त्यांच्याजवळ कधाकधी तोफा, बंदुका किंवा तंबू वा राहुट्याही नसत. डोक्याला पगडी, अंगात बंडी व पायात चोळणा असा त्यांचा वेश असे. ते एका दमात घोड्यावरून ६० ७० किमी.मजल मारीत. हे सैन्य वर्षातील आठ महिने मुलूखगिरीवर जाई व चार महिने छावणीस असे. सैन्याची शिस्त कडक असे. आणलेली लूट सरकारात भरावी. लागे, तसेच मुलूखगिरीवर असताना स्त्रियांना नेण्यास मज्‍जाव होता आणि धार्मिक स्थाने , स्त्रिया, मुलेबाळे यांना किंवा प्रजेला उपद्रव दिल्यास कडक शासन केले जाई.
पायदळ व घोडदळाप्रमाणेच मराठ्यांच्या आरमाराकडे शिवछत्रपतींनी लक्ष दिले व ते सुसज्‍ज केले. मराठ्यांचे आरमार प्रथम छ. शिवाजीनीच सुरू केले. पोर्तुगीजांच्या एका पत्रावरून ते १६५९ साली अस्तित्वात असल्याचा उल्लेख मिळतो. १६६४ मध्ये महाराजांनी सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला बांधला व नंतर कुलावा, सुवर्णदुर्ग विजयदुर्ग, पद्मदुर्ग इ. पाण्यातील किल्ले सुधारून त्यांतील काही किल्ल्यांवर जहाजे बांधण्यस प्रारंभ केला. त्यांनी १६६५ पर्यत कारवारपर्यतचा कोकण किनारा आपल्या आधिपत्याखाली आणला होता. त्यांच्याकडे किती जहाजे होती, यांबद्दल विविध बखरी व कागदपत्रांत मतभिन्नता आढळते. त्यांच्या मृत्यूसमयी ४०० ते ५०० जहाजे आरमारात असावीत, असे तज्ञांचे मत आहे. गुराबे १५० ते ३०० टनांपर्यत असत. त्यांवर नऊ ते वीस पौंडी तोफा बसविण्यात येत आणि शंभर ते दीडशे कडवे खलाशी ठेवीत. गलबते वेगवान असून आरमाराचे प्रमुख अधिकारी इब्राहिमखान, दौलतखान, मायनाक भंडारी वगैरे होते. इतर सैन्याप्रमाणेच नौदलातील सैन्याचा पगार दरमहा नियमित होई आणि जहाजांची व गलबतांची व्यवस्था चोख असे.या आरमाराची वाढ पुढे छ. राजारामाच्या कारकीर्दीत कान्होजी आंग्रे याने केली आणि परकीय तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कामगार लावून पाच जहाजबांधणी कारखाने चालविले आणि काही लढाऊ जहाजे निर्माण करून मुंबई ते गोवा या किनारपट्टीचे संरक्षण केले. नाविक लढायांमधील डावपेचांमुळे त्या वेळी कान्होजीस एकामागून एक विजय मिळाले. समोरासमोरील हातघाईच्या लढाईवर त्याची सर्व भिस्त असे ; परंतु कान्होजीनंतर मराठ्यांचे आरमाराकडे दुर्लक्ष झाले आणि पुढे पेशवेकाळात अंतर्गत वैरभावामुळे मराठ्यांचे आरमार प्राय: संपुष्टात आले.
शिवछत्रपतींच्या वेळी मराठ्यांचे सैन्य सुटसुटीत होते आणि त्यांना वेतनही दरमहा वेळेवर मिळे; पण शाहूच्या वेळी त्याला अस्ताव्यस्त स्वरूप प्राप्त झाले. शाहूने लष्करी अधिकाऱ्याना व सचिवांना अनुक्रमे मोकासा व साहोत्रा वाटून दिला. त्यामुळे सरदारांनी स्वत: सैन्य बाळगून लढाईच्या वेळी यावे, असे करार झाले. त्याच्या स्वारीत घोड्यांबरोबर हत्तीही असत आणि काही प्रसंगी बरोबर गोषाही असे. खास, सरदार, दरकदार, मनमरातबवाले डुलत येत. छत्रपतींच्या पुढे तोफखाना, त्यामागे झेंडा, झेंड्याभोवती घोडेस्वार, सरदारांची पथके आणि इतर संरक्षक असत. आघाडीला बिनीवाले आणि त्यांच्या मागे रणवाद्ये व चाकर लोक असत. त्यांच्या मागून हत्ती, घोडे, रथ, उंट, वगैरे जात. त्यानंतर सशस्त्र फौज असे. तोफखाना व खाशा स्वाऱ्या यांच्या दरम्यान भालदार, चोपदार व हुजरे असत. स्वारी युद्धाला निघाली की रस्ते पाण्याने शिंपीत. साहजिकच साधारणत: दिवसाला पंधरा ते वीस किलोमीटर एवढीच मजल सैन्याची होई. शिवाजी महाराज चौथाई वसूल करीत. शाहू छत्रपतींनी स्वराज्य, चौथाई सरदेशमुखी हे हक्क मोगलांकडून मान्य करून घेतले व त्याच्या सनदा दिल्लीहून आणल्या आणि मोगलांच्या मदतीसाठी मराठ्यांनी पंधरा हजार सैन्यानिशी मदत करण्याचे ठरले. एवढेच नव्हे, तर मोगली साम्राज्य टिकविण्याची आणि चालविण्याची जबाबदारी काही अटींवर मराठ्यांनी पतकरली. साहजिकच सरंजामशाही वाढीस लागली. मराठ्यांनी खडी फौज कमी होती. खंबीर नेतृत्वाअभावी मराठे सरदारांचे छोटे गट तयार झाले. शिंदे, होळकर, नागपूरकर भोसले यांच्याजवळ २० २५ हजारपर्यत सैन्य असे. या फौजेच्या खर्चापोटी प्रत्येक सरदाराला जहागीर दिलेला असे. बाकीच्या सरदारांजवळ यापेक्षाही कमी फौज होती. अर्थातच त्यांना त्यांच्या फौजेच्या प्रमाणात जाहागिरीही कमीअधिक प्रमाणात देण्यात आल्या होत्या.मैदानी लढायांमुळे किल्ल्यांचा उपयोग मुख्यत्वे अडचणीच्या वेळी आश्रयस्थान व राजकीय तुरूंग म्हणून होऊ लागला. सरदारांच्या पथकाशिवाय खुद्द पेशव्यांची काही खास पथके असत. मोठ्या सैन्यासाठी ते सरदारांवर अवलंबून राहू लागले; पण त्यांना सरदार सरंजामाच्या अटीप्रमाणे सैन्य पुरवीत नसत. शिवाय पेशव्यांनीही पवार, रास्ते, पटवर्धन आदी वतनदारांची अनेक घराणी निर्माण करून आपल्याजवळील जबाबदारी त्यांच्यात विभागून टाकली. शिवाजींच्या सैन्यात मुख्यत्वे मराठे व काही मुसलमान असत; पण पेशवे काळात सैन्यात शीख, राजपूत, सिंधी, कानडी, रोहिले, अरब, अँबिसिनियन, पोर्तुगीज वगैरे नाना प्रकारचे सैनिक समाविष्ट झाले. मराठ्यांपेक्षा त्यांना पगार व तनखा जास्त मिळत असे. पेशव्यांकडे खाजगी फौजेत अरब जास्त तर होळकर शिंदे यांच्या सैन्यात पेंढारी, फ्रेंच आदी अन्य लोकांचा भरणा होता. त्यामुळे आत्मीयता जाऊन राजकीय निष्ठांना गौण स्थान प्राप्त झाले.
पेशवाईत स्वत:च्या प्रदेशाच्या रक्षणाची खास चिंता न राहिल्याने इतर मुलूखात स्वाऱ्या करून पैसा जमविणे शक्य आहे, हे लक्षात घेऊन मुलूखगिरी वाढली आणि घोडदळाला महत्त्व प्राप्त झाले. पेशव्यांचे घोडदळ सरकारी ( खासा ), शिलेदारी, एकांडे व बुणगे असे चतुरंग असे. पानिपतच्या लढाईच्या वेळी पेशव्यांचे खुद्द असे ६,००० घोडदळ होते. शिवाय सैन्यात लढाऊ दलाशिवाय इतर कामगारांचा भरणाही पुष्कळ असे. घोडेस्वारांजवळ तोड्यांची बंदूक, ढाल, तलवार, भाला, बर्ची, खंजीर व तीरकामटा अशी शस्त्रे असत.गोफण गुंड्याचाही उपयोग ते करीत. दारूचे बाणही वापरीत. हत्ती पळवून लावण्यास त्यांचा उपयोग होई.

मूल्यमापन : मराठ्यांनी आपल्या परंपरागत सैन्यात, युद्धपद्धतीत व शास्त्रस्त्रांत यूरोपियनांच्या आगमनानंतरही विशेष असा बदल केला नाही. यूरोपीय लोक कवायती फौज, तोफा, बंदुका व दारूगोळा यांचा युद्धात सर्रास वापर करीत; परंतु मराठ्यांनी शिस्तबद्ध पलटणी आणि दारूगोळा, तोफा व बंदुका यांच्या निर्मितीकडे आवश्यक तेवढेच लक्ष दिले नाही. ते या साहित्यासाठी प्रथम पोर्तुगीजांवर व नंतर इंग्रजांवर अवलंबून राहिले. खुद्द शिवछत्रपतींनी हा माल यूरोपीय व्यापाऱ्याकडून घेतल्याचे उल्लेख कागदोपत्री सापडतात. फ्रेंचांना राजापूर येथे बखार घालण्यात शिवछत्रपतींनी याच कारणास्तव परवानगी दिली होती आणि त्यांच्याकडून काही तोफाही खरेदी केल्या होत्या ; तथापि त्या वेळी यूरोपियनांचा व्यापारापुरताच मऱ्यादित संचार महाराष्ट्रात होता. पुढे पेशवाईच्या वेळी यूरोपियनांनी राजकारणात प्रत्यक्ष प्रवेश केला.
हिल्या बाजीरावाने तोफांचा कारखाना घातला होता. तो पाहण्यास कॅप्टन गॉर्डन आल्याचा उल्लेख आहे. सदर तोफखान्यात गरनाळा व तोफाचे गोळे ओतण्यात येत. पहिल्या माधवरावाने तर  
घरातील सोन्यारूप्यांची भांडी मोडून आंबेगाव व पुणे येथे कारखाने काढले होते; परंतु त्यांतून उत्तम प्रतीची माल क्वचित निघत असे. साहजिकच पेशवे दारू , तोफा, बंदुकीच्या गोळ्यांबाबत पाश्वात्यांवर अवलंबून असत. शिंद्यांनी यूरोपियनांच्या देखरेखीखाली तोफा बनविण्याचा एक कारखाना काढला होता ; परंतु या सर्वास कच्चा माल परकीयांकडून द्यावा लागे व तो हिणकस मिळे. मराठ्यांच्या तोफखान्यांवर कधीकधी यूरोपीयांची नेमणूक करण्यात येई. नोरोना नावाचा पोर्तुगीज अधिकारी व त्याच्या हाताखालील काही यूरोपियनांची नावे प्रसिद्ध आहेत. पेशवाईत पानसे हे काही वर्षे तोफखान्यांवर मुख्य अधिकारी होते. इंग्रज- मराठे युद्धांत लढताना मराठ्यांचा तोफखाना टिकाव धरू शकला नाही. या शस्त्रास्त्रातील अज्ञानामुळे तोफखाना इ. दारूगोळ्यांबाबतीत मराठे मागे पडले. तसेच परकीयांशी लढण्यासाठी सुसज्‍ज आरमाराची गरज होती. उत्तर पेशवाईत मराठ्यांनी आरमाराकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले नाही. त्याचप्रमाणे राजकीय मर्मदृष्टी असलेले आणि भोवतालची परिस्थिती हेरून त्याप्रमाणे सैनिकी नेतृत्व करणारे सरदार आणि सेनापती निर्माण झाले नाहीत. त्यामुळे अवनत स्थितीला आलेले सरंजामशाही स्वरूपाचे मराठ्यांचे सैनिकी नेतृत्व इंग्रजांसारख्या समर्थ लष्करी नेतृत्वाशी तुल्यबळ ठरू शकले नाही.

पहा : इंग्रज मराठे युद्धे; पेशवे; मराठा अंमल; मराठा निजाम संबंध.

संदर्भ : 1. Apte, B. K. A History of the Maratha Navy and Merchantships, Bombay, 1973.
            2. Deopujari, M. B. Shivaji and Maratha Art of War. Nagpur, 1973.
            3. Sarkar, J. N. Military History of India. New Delhi, 1970 .
            4. Sen, S. N. The Military System of the Marathas, New Delhi, 1958.
            5. Sharma, Major Gautam, India Army Through the Ages, Bombay, 1966.
            6. Shcrwani, H. K.; Joshi, P. M. Early History of the Mediaeval Deccan, Vols. I &II, Hyderabad. 1973 – 1974 .

Sunday, July 7, 2013

भूषणगड

भूषणगड(Bhushangad) किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग किल्ल्याची ऊंची : 2970 डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा : सातारा श्रेणी : मध्यम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडचा एकमेव डोंगर आपले दुरुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाइ देवी, या मुलुखात प्रसिध्द आहे. गावकर्‍यांनी गडाला पायर्‍या बांधल्या आहेत व गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवागार केलेला आहे. यात पिवळ्याजर्द फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गडाला वेगळीच शोभा आली आहे. तसेच अनेक छोटे पक्षी व फुलपाखर यांनी गड गजबजून गेला आहे. इतिहास : देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दूसरा (१२१०-१२४७) याने हा किल्ला बांधला. इ.स. १६७६ मध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव ‘‘इस्लामतारा’’ ठेवले. पेशवेकाळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. इ.स १८४८ मध्ये इंग्रजांनी सातार्‍याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला. पहाण्याची ठिकाणे : भूषणगडवाडीतून पायर्‍यांची वाट गडावर जाते. पायर्‍यांच्या सुरुवातीला सिमेंटमध्ये बांधलेली आधुनिक कमान आहे. पायर्‍यांची रचना अशी केलेली आहे की, गड चढतांना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस रहातात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरुन मार्‍याच्या टप्प्यात रहातो.. गडाची प्रवेशद्वाराची कमान आज शाबूत नाही. पण त्याच्या बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून त्याची बांधणी ‘‘गोमुखी’’पध्दतीची आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. प्रवेशद्वारासमोरील वाट तटबंदीच्या बाजूने जाते, या मार्गावर आपल्याला एक खोल विहीर पाहायला मिळते. गडाची तटबंदी आजही सुस्थितीत असल्यामुळे त्यात जागोजागी आपल्याला जंग्या पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडील पायर्‍यांची वाट मोठ्या बुरुजाकडे जाते. या बुरुजाला तोफेसाठी जंग्या आहेत. या बुरुजावरुन गडाचा मधला उंचवटा दिसतो. बुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना, उजव्या हाताला भव्य बांधीव कुंड दिसते. या कुंडाजवळच महादेवाचे छोटे मंदीर आहे. या मंदिरावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या हरणाइ देवीचे उत्तराभिमुख मंदिर दिसते. या जिर्णोध्दारीत मंदिरात हरणाई देवीची दिड फूट उंचीची मुर्ती आहे. मूर्तीवर पितळी मुखवटा बसविलेला आहे. हरणाई देवीच्या उजव्या बाजूस सिध्दनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिरासमोर दिपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत. मंदिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरुन आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. याशिवाय भूषणगडची तटबंदीच्या खालच्या अंगाला असलेली दक्षिणोत्तर पसरलेली लांब सोंड दिसते.तटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरुन आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणाकरुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो. प्रवेशद्वारातून बाहेर पडून काही पायर्‍या उतरल्यावर डाव्याबाजूला एक रुंद मळलेली पायवाट दिसते. ही तटबंदी व बुरुजाखालुन जाणारी पायवाट भूयारी देवी मंदिराकडे जाते. वाटेत आपल्याला तटबंदीवरुन दिसणारी भूषणगड डोंगराची सोंड लागते. भूयारी देवीचे मंदिर भूयार बुजवून नविनच बनविण्यात आलेले आहे. भूषणगडची गडफेरी येथे पूर्ण होते; ती करण्यास १ तास लागतो. पोहोचण्याच्या वाटा : भूषणगड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात येतो. दहीवडी - कराड मार्गावरील वडूज या मोठ्या गावातून भूषणगडला जाण्यासाठी बसेस आहेत. खाजगी वाहानाने भूषणगडला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. १) पुणे - फलटणमार्गे - भुषणगडला जाण्यासाठी : अ) दहीवडी - कराड मार्गावर वडूज पासून २० किमी अंतरावर पुसेसावळी गाव आहे. या गावात शिरल्यावर उजव्याबाजूला जाणारा रस्ता भूषणगडच्या पायथ्याशी जातो. या ५ किमी रस्त्यापैकी अर्धा रस्ता कच्चा आहे. आ) दहीवडी - वडूज - उंबर्डेफाटा - शिरसेवाडी - होळीचेगाव - भूषणगड हा छोट्या गावांमधून जाणारा रस्ता खराब आहे. तसेच चुकण्याची शक्ययता जास्त आहे २) पुणे - सातारा मार्गे भुषणगडला जाण्यासाठी : क) पुणे - सातारा - कोरेगाव - रहिमतपुर - पुसेसावळी - भुषणगड. २) पुणे - सातारा - कोरेगाव - पुसेगाव रहिमतपुर पुसेसावळी - रहाटणी - भुषणगड. राहाण्याची सोय : गडावरील हरणाई देवीच्या मंदिरासमोरील शेडमध्ये रहाण्याची व्यवस्था होऊ शकेल. जेवणाची सोय : गडावर जेवणाची व्यवस्था नाही.आपण स्वत: करावी. पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे. जाण्यासाठी लागणारा वेळ : भूषणगडवाडीतून गडावर जाण्यास ३० मिनीटे लागतात. सूचना : वर्धनगड , भूषणगड, महीमानगड हे तीन किल्ले खाजगी वाहानाने एका दिवसात पाहून होतात.

Tuesday, July 2, 2013

किल्ले पारगड

किल्ले पारगड 

 

सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. कोल्हापूर जिल्ह्यात चंद्रगड तालूका आहे. चंदगड तालुक्यामध्ये पारगड किल्ला मोडतो.


चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर पारगड आहे. पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे. पारगडापर्यंत गाडीमार्ग आहे. पारगडापर्यंत चंदगडहून एस.टी. बसची सोय उपलब्ध आहे. ही बस गडाच्या पायर्यांपर्यंत जाते. खाजगी वाहन गडाला वळसा घालून गडाच्या माथ्यावर नेता येते.


चंदगडाहून निसर्गरम्य परिसरातून प्रवास करीत आपण तासाभरात पारगडाच्या पायर्यांशी पोहोचतो. तिनशे पायर्या चढून जाव्या लागतात. यात नव्याने केलेल्या पायर्यांबरोबर शिवकालीन पायर्याही आपल्याला आढळतात. गडाचा दरवाजा नष्ट झालेला आहे. गडप्रवेश करताच समोर तुटक्या तोफांचे काही तुकडे मांडलेले दिसतात. बाजूलाच हनुमानाच्या मंदिराचा कायापालट करण्याचे काम सुरु आहे. मंदिरासमोर अनामिक असे स्मारक आहे. हे घडीव दगडामध्ये बांधलेले स्मारक कोणातरी महत्वाच्या व्यक्तीचे असावे. येथून थोडे वर चढल्यावर पारगडावरील वस्ती लागते.
दुतर्फा असलेल्या वस्तीमधून रस्ता गेला आहे. या वस्तीमध्येच रस्त्याच्या डाव्या बाजूला शाळा आहे. शाळेच्या आवारातच छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा पण पुर्णाकृती पुतळा चौथर्यावर बसविलेला आहे. या पुतळ्याच्या परिसरातच पुर्वी गडावरची सदर होती.


येथून समोरच आपल्याला भवानीमातेचे मंदिर दिसते. या मंदिराचा कायापालटच करण्यात आला आहे. शिवकालीन मंदिर तसेच ठेवून त्याभोवती नविन इमारत उभी करण्यात आली आहे. बांधलेले मंदिर भव्य असून नव्याने शिखर व सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदिरात भवानीमातेची देखणी मुर्ती आहे. मंदिराच्या सभामंडपात शिवकालातील अनेक प्रसंग चितारलेली चित्रे लावली आहेत.


सिहंगड किल्ला माघ वद्य नवमी इ.स. १६७१ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी जिंकला. या वेळी झालेल्या युद्धात तानाजींना मृत्यु पत्करावा लागला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगड किल्ला बांधला व त्याची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. बहुदा हे १६७६ साल असावे. त्यावेळेस काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला होता.


त्यावेळी महाराजांनी किल्लेदार आणि तेथील मावळ्यांना आज्ञा केली की, जो पर्यंत आकाशात चंद्र, सूर्य आहेत तो पर्यंत हा गड जागता ठेवा. ही आज्ञा राजाज्ञा होती. गडावरच्या मावळ्यांनी आणि किल्लेदारांनी आजतागायत पारगड जागता ठेवला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे अकरावे वंशज बाळकृष्ण मालुसरे तसेच शेलार मामांचे वंशज कोंडीबा शेलार आणि त्या काळातील मावळ्यांचे वंशज आजही अनंत अडचणींना तोंड देत गडावर वास्तव्य करुन आहेत.


इ.स. १६८९ मध्ये औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम याने पारगड जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्याला या मावळ्यांनी दाद लागू दिली नाही.
पारगड किल्ल्याच्या गडफेरीमध्ये आपल्या दृष्टीला निसर्गाची विविध रूपे, दिसतात. गडावर अनेक तलाव, विहीरी, तटबंदी, स्मारके पहाता येतात. गडावर पोहोचण्यासाठी असलेली सुविधा, निसर्गरम्य परिसर, ऐतिहासीक महत्व, ऐतिहासीक घराणी, जेवणाची व रहाण्याची सोय यामुळे पारगडाला पुन्हा यावेसे वाटले तर नवल नाही.
Website Security Test