Tuesday, July 10, 2012

सरसेनापती हंबीरराव मोहिते


सरसेनापती हंबीरराव मोहिते

 

कर्नाटक मोहिमेवर असताना महाराजांनी व्यंकोजीराजाकडे कर्नाटकातील शहाजीराजांच्या जहागीराचा अर्धा वाटा मागितला पण वाटा न देताच त्यांनी हंबीररावांच्या सैन्यावर आक्रमण केले.व्यंकोजीराजांकडे ४००० घोडदळ व १०००० पायदळ होते.तर हंबीररावांच्या कडे ६००० घोडदळ व ६००० पायदळ होते.दोन्ही सैन्यात जोरदार लढाई होऊन हंबीररावांच्या सेनेचा पराभव झाला.विजय मिळाल्यामुळे व्यंकोजीराजे व त्यांचे सैन्य आराम करू लागले.याप्रसंगी हंबीररावांनी व संताजी भोसले यांनी मराठी सैन्यास एकत्र करून मध्यरात्रीच व्यंकोजीराजांच्या तळावर हल्ला करून त्यांच्या फौजेची दाणादाण उडविली.प्रचंड असा खजिना,हत्ती,घोडे मराठ्यांच्या हाती लागले.व्यंकोजीराजे सुध्दा हाती लागले होते. पण महाराजांच्या बंधूस कैद कसे करावे असा विचार करून त्यांनी व्यंकोजीराजांस सोडून दिले.हे युध्द १६ नोव्हेंबर,१६७७ साली झाले.यानंतर हंबीररावांनी कर्नाटकातील असा वेलोरचा बुलंद कोट काबीज केला(२२ जुलै, १६७८).

प्रधानांची बंडखोरी मोडिली

छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर अष्टप्रधान मंडळीतील काही जणांनी राजारामास गादीवर बसविण्याचे ठरवून संभाजीराजेंचा गादीवरील हक्क नाकारला.या मंडळीतील मोरोपंत पिंगळे,आण्णाजी दत्तो,प्रल्हाद निराजी या मंडळीना वाटले की राजाराम हा हंबीररावांचा सख्खा भाचा असल्यामुळे,आपल्या कटात हंबीरराव सामील होतील.पण हंबीररावांनी या तिघांना कैद करून कोल्हापूरास पन्हाळा किल्ल्यावर संभाजीराजें पुढे उभे केले.कारण हंबीररावांना माहित होते की मोघलांच्या प्रचंड अशा सेनेशी संभाजीराजांसारखा छावाच लढू शकतो.
पुढे संभाजीराजेंच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांनी मोघलांचे संपन्न असे बुर्‍हाणपूर शहर लुटिले.मोघल इतिहासकार खाफीखान म्हणतो,'देशोदेशीचे जिन्नस, जडजवाहीर,सोने-नाणे,रत्ने असा लक्षावधी रूपयांचा माल बुर्‍हाणपूरातील दुकानांत साठविला होता.तो सर्व मराठ्यांनी लुटला.मराठे अगदी अनपेक्षीतपणे आले. शहराच्या तटबंदीच्या बाहेर बहादूरपुरा आणि इतर सात पुरे होते.त्यांना मराठ्यांनी घेरले.विशेषत: बहादूरपुर्‍यावर ते इतक्या अनपेक्षीतपणे तुटून पडले की त्या पुर्‍यांतून एक माणूस किंवा एक पैसा हलविता आला नाही.'

अनेक लढाया

पुढे मोघल सरदार शहाबुद्दीनखान याच्याबरोबरच्या नाशिकजवळच्या रामसेजच्या लढाईत हंबीरराव जखमी झाले(जुलै १६८२).त्यांनतर मोघल सरदार कुलीच खानाबरोबर भीमा नदीच्या परिसरात लढाई(ऑक्टोंबर,१६८२),शहाजादा आज्जम बरोबर पन्हाळ्याजवळ लढाई(१५ डिसेंबर,१६८२ व जाने-फेब्रु १६८३),मोघल सरदार बहादुरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई(२७ फेब्रुवारी, १६८३),शहाबुद्दीनबरोबर रायगडच्या परिसरात लढाई(जानेवारी,१६८५),मोघली मुलखात चढाया(सन १६८६),अशा अनेक लढाया केल्या.या अशा पराक्रमी सेनानीची शेवटची लढाई वाईच्या परिसरात सर्जाखान या मोघल सरदाराशी झाली(डिसेंबर १६८७).उभयपक्षी निकराची लढाई होऊन सर्जाखानाच्या फौजेची दाणादाण होऊन ती पराभूत झाली.पण लढाईच्या कालात गर्दीमध्ये तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले.अत्यंत पराक्रमी व शूर असलेले हंबीरराव पडल्यामुळे स्वराज्याची फार मोठी हानी झाली.ऐन धामधुमीच्या कालात हंबीरराव पडल्यामुळे संभाजीराजांचा मोठा आधार नाहीसा झाला.

No comments:

Post a Comment

Website Security Test