शके ११५९ (इ.स.
१२३७) मध्ये सर्व देसायांच्या संमतीने जनार्दन प्रधान गादीवर आला. मात्र तो फार काळ सत्ता उपभोगू शकला नाही. अवघ्या ४ वर्षात घणदिवीचा राजा नागरशा ठाण्यावर चालून आला. ह्यावेळेस मात्र जनार्दन प्रधान युद्ध जिंकू शकला नाही. नागरशाने युद्ध जिंकले आणि
जनार्दनासच आपला मुख्य प्रधान बनवले. अशा तर्हेने बिंब राजघराण्याची सत्ता
संपुष्टात आली. नागरशाने सर्व देसायांना एकत्र जमवून देशाचे कागद तपासले आणि ज्यांच्याकडे केशवदेवाचा शिक्का असलेला कागद होता त्यांच्या वृत्या तशाच पुढे चालू ठेवल्या.
केशवदेव बिंबाचा शिक्का असा होता -
बकदालभ्य यदा गोत्र प्रभावती कुलदेवता
ठाणे स्थाने कृतं राज्य मम मुद्रा विराजते
ह्याच दरम्यान नागरशाला पुत्र प्राप्ती झाली. त्याचे नाव त्रिपुरकुमर ठेवले. नागरशाने पुढील ३० वर्षे विनासायास राज्य केले. शके ११९३ मध्ये (इ.स. १२७१) पुन्हा एकदा उत्तर कोकण ढवळून निघाले. झाले असे की नागरशाचे ३ मेव्हणे नानोजी, विकोजी, बाळकोजी हे नागरशाकडे ठाणे, मालाड आणि मरोळ ही गावे बक्षिस मागत होते. त्रिपुरकुमर वयात येतोय हे पाहून त्यांना त्यांची स्वतंत्र व्यवस्था लावावीशी वाटली असेल. अर्थात ही मागणी नागरशाने नाकारली. ह्यावरून नाखूष होऊन ते ३ मेव्हणे देवगिरीला रामदेवराय यादव याच्याकडे आश्रयाला गेले. रामदेवराय नुकताच सम्राट पदावर आरूढ झालेला होता. त्याने तिघांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नागरशाला जेरबंद करतो असे सांगितले. रामदेवरायाने आपला प्रधान हेमाडपंडित याला तिघांबरोबर सैन्य देऊन रवाना केले. हे सैन्य कळवा येथे पोचले असता ठाणे-चेंदणी येथील पाटलाने पिटाळून लावले. त्रिपुरकुमर ह्या सैन्याचा पाठलाग करू लागला. हे सैन्य माहुली किल्ल्याच्या आश्रयास गेले असताना तिथे त्यांच्याबरोबर युद्ध करून त्रिपुरकुमर विजयी झाला.
नागरशाने विजयानंतर विशेष हालचाल केली नाही म्हणून रामदेवरायदेखील शांत होता. रामदेवराय कोकणासाठी एक योजना मात्र निश्चितपणे आखत होता. त्याचे ४ पुत्र होते. शंकरदेव, केशवदेव, बिंबदेव आणि प्रतापशा. त्याने शंकरदेव यास स्वतःजवळ पैठण येथे ठेवून घेतले. केशवदेवास देवगिरी दिली, बिंबदेवास उदगीर प्रांत दिला तर प्रतापशाला अलंदापूरपाटण दिले. केशवदेव काही काळात वारला आणि त्याचा पुत्र रामदेवराय (दुसरा) हा देवगिरीच्या गादीवर आला. हाच तो रामदेवराय ज्याच्या काळात फक्त कोकणच नव्हे तर संपूर्ण दक्षिणपट हादरवणारी एक घटना घडली. ती म्हणजे नर्मदा ओलांडून अल्लाउद्दिन खिलजी देवगिरीवर चाल करून आला. साल होते शके १२१६ (इ.स.१२९४)
ह्यावेळी बिंबदेव यादव हा उदगीरहून गुजरातेकडे सरकला. बहुदा माळव्याच्या बाजूने अल्लाउद्दिनला पायबंद करायचा त्याचा डाव असावा पण तो फसला कारण जितक्या वेगाने अल्लाउद्दिन देवगिरीवर आदळला तितक्याच वेगाने तो परत गेला. देवगिरीला जाण्याऐवजी बिंबदेवाने ठाणे-कोकणच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. ह्या संपूर्ण प्रदेशावर त्याकाळी नागरशाची सत्ता होती. बिंबदेवाकडे नागरशाच्या तिप्पट-चौपट सैन्य होते. त्या जोरावर पुढच्या काही काळात बिंबदेव यादव याने नागरशाला हरवून त्याच्याकडून केळवे-माहीम, साष्टी, मुंबई हिसकावून घेतले आणि त्याला पेन - पनवेल - चेउल प्रांतात पिटाळून लावले. त्याने माहीम बेटात प्रमुख १२ सरदारांची नेमणूक केली. या शिवाय ४२ सूर्यवंशी, १२ सोमवंशी असे ५४ सरदार त्याने नेमले. हे सर्व ५४ सरदार म्हणजे कोकणात आलेले पातेणे उर्फ पाठारे प्रभू होय. प्रांताचे त्याने १५ मुख्य भाग केले आणि त्यावर फौज नेमून दिली. अशा प्रकारे देशाची व्यवस्था लावून तो महिकावती उर्फ माहीम येथे राहू लागला.
प्रतापबिंब - महीबिंब हे बिंब घराण्याचे राजे आणि बिंबदेव यादव हा यादव घराण्याचा राजा यातील फरक वाचकांच्या लक्ष्यात आला असेलच. नाव साधर्म्यामुळे गोंधळ होवू नये म्हणून इथे तसे स्पष्ट करीत आहे. शके १०६० साली प्रताप - मही बिंबाबरोबर ६६ सूर्य-सोम-शेषवंशी कुळे उत्तर कोकणात आली होती. त्यानंतर १५६ वर्षांनी शके १२१६ मध्ये बिंबदेव यादव याच्याबरोबर अजून ५४ सूर्य-सोमवंशी कुळे उत्तर कोकणात येऊन वसली.
क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ६ : नागरशाचा प्रतिहल्ला ...

No comments:
Post a Comment