छत्रपती शिवाजी महाराज-जीवन रहस्य-भाग १
छत्रपति
शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करताना अनेक इतिहासकारांनी त्यांचे व्यक्तिमत्व
वेगवेगळ्या दृष्टीकोनातून मांडले आहे. 'नरहर कुरुंदकर' हे असेच एक प्रभावी लेखक. त्यांनी लिहिलेल्या 'छत्रपति शिवाजी महाराज -
जीवन रहस्य' या पुस्तकात त्यांनी असेच काही वेचक आणि वेधक विचार मांडले
आहेत. इतिहासाच्या वाचकांना 'नरहर कुरुंदकर' माहीत असले तरी सामान्य वाचकांना मात्र ते 'श्रीमान योगी'च्या प्रस्तावानेतून माहीत आहेतचं. रणजीत देसाई यांना लिहिलेल्या विस्तृत पत्रातून त्यांनी
शिवरायांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा
यशस्वीपर्यंत केलेला आहे. या ब्लॉगपोस्ट मधील आमचे लिखाण हे 'छत्रपति शिवाजी महाराज -जीवन रहस्य' या पुस्तकावर आधारित आहे.
समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते आणि अश्या नाट्यमय घटनांमुळे खरे कर्तुत्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो. महाराजांच्या जीवनात अश्या घटना ५-६ पेक्षा अधिक नाहीत. पहिली अद्भुत घटना १६५९ मध्ये अफझलखानवध ही आहे. तर शेवटची १६६६ ला आग्र्याहून सुटका ही आहे. ह्या ७ वर्षात पन्हाळा - बाजीप्रभु, शाहिस्तेखान प्रकरण, सूरतलूट ह्या घटना आहेत. म्हणजे एकुण ५० वर्षाच्या जीवनात पाहिल्या नाट्यमय घटनेपूर्वी २९ वर्षांचा नाट्यशून्य काळ आणि शेवटच्या नाट्यमय घटनेनंतर १४ वर्षांचा कालखंड...!!! ह्या अश्या ५-६ घटनांवर आपल्या कर्त्या पुरुषाचे चरित्र कसे पूर्ण होइल ??? छत्रपतींचे कार्य आणि चरित्र समजुन घेताना ह्या नाट्यमय रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिले.
शिवरायांच्या नेत्रुत्वाचा विचार जेंव्हा जेंव्हा पडतो तेंव्हा २ प्रश्न समोर येतात ...
१. खुद्द औरंगजेब आपली राजधानी सोडून दक्षिणेत का उतरला ???
२. १६९२ नंतर आपण ही लढाई पूर्णपणे जिंकू शकत नाही, हे माहीत असुनही पुढची १५ वर्षे लढत का राहिला ???
त्याच्यासारख्या कसलेल्या युद्धनितीतज्ञ आणि मुत्सद्दी अश्या बादशहाला महाराष्ट्रातल्या पश्चिमेकडील एका कोपऱ्यातल्या डोंगराळ भागात वसलेले छोटेसे राज्य बूडवण्यात अपयश का आले ??? औरंगजेबाने केलेल्या तयारीवरुन हे स्पष्ट दिसते की त्याने ही लढाई साधी - सोपी नक्कीच समजली नव्हती. लाखोच्या फौजा जातीने घेउन उतरणे यावरुनच ते स्पष्ट समजते. लाखोने मुघल फौजा सीमेवर उभ्या असताना अवघ्या ५० व्या वर्षी छत्रपतींना मृत्यू आला. पण तरीही राजधानी पासून दूर राहून, दरवर्षाला कोट्यावधी खर्च करून आणि उत्तर भारतात अव्यवस्था निर्माण होउन देखील औरंगजेब अखेरपर्यंत लढत राहिला. त्याने अनेक लढाया जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता. मराठ्यांना अपुऱ्या साधन-सामुग्रीवर मोघलांचा पराभव करणे शक्य नव्हते. तरीही सर्व प्रतिकूल परिस्थितिमध्ये मराठे लढत राहिले. छत्रपति संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षे आणि त्यांच्या वधानंतर १९ वर्षे जनता लढत राहिली.
पृथ्वीराज चौहान, राणा प्रताप, रामराजा ह्यांनी सुद्धा परकियांविरुद्ध प्रखर लढा दिला. पण जिकडे जनता लढते तिकडे फौजा निकामी होतात. भारताच्या इतिहासात १२०० वर्षांनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी जनता अखंड २७ वर्षे लढली. हयात धर्माभिमान नव्हे तर आपण लढू शकतो हा आत्मविश्वास जास्त महत्वाचा आहे. छापे घालण्याचे नवे तंत्र निर्माण करणे, विरतेच्या खोट्या कल्पनेच्या आहारी जाउन 'लढून मरणे' यापेक्षा - टिकणे, गरज असल्यास पळणे, मग पळवणे, थकवणे आणि अखेर नाश करणे हे जास्त महत्वाचे. यासोबत प्रजेच्या इहलौकिक गरजा सांभाळणे आलेच. यानंतर धर्माभिमान महत्वाचा. एखादे राज्य टिकवण्यासाठी जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा, ही घटनाच हिंदुस्तानच्या इतिहासात सर्वात जास्त रोमांचक आहे... नवखी आहे...
शिवछत्रपतींच्या कार्यपद्धतीचा विचार अधिक तपशीलवारपणे समजुन घेणे महत्वाचे आहे. 'शिवाजी म्हणजे युद्ध नव्हे, तर नव्या व्यवस्थेचा आग्रह ... त्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी युद्ध हे साधन.' सन १६४५ ते १६४९ ही ४ वर्षे बारा मावळची व्यवस्था लावण्याचे काम अखंड सुरू होते. वतनदारांचा बंदोबस्त करणे आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे ही सर्वात महत्वाची कामे ह्या काळात केली गेली. सामान्य असणाऱ्या मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे आणि प्रतापराव गुजर अश्या व्यक्तिंमधून असामान्य कर्तुत्ववान प्रधान, सेनापति, सुभेदार निर्माण करणे हा महाराजांचा आणखी एक पैलू.
शिवरायांचे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्याचे वैशिष्ट्य ह्यात आहे की, जेंव्हा त्यांना माघार घ्यावी लागली, अपयश आले किंवा ताब्यातला प्रदेश होरपळून निघाला; तरीसुद्धा लोकांचा त्यांच्यावरील विश्वास तसूभरही कमी झाला नाही. एखादा चुकार माणूस वगळता त्यांच्या फौजेने कधी बंद पुकारले नाही. १६४९ मध्ये सुद्धा सर्वच अनिश्चित असताना लोक त्यांच्या बाजूने उभे राहिले असे लोकांना त्यांनी दिले तरी काय होते ??? त्यांचे वैशिष्ट्य यात आहे की, ते जेंव्हा-जेंव्हा जिंकत तेंव्हा-तेंव्हा नवा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेत आणि जेंव्हा पड़ती घेत तेंव्हा नव्याने जिंकलेल्या प्रदेशाचा काही भाग सोडून देत असत. म्हणजेच पुढच्या वेळी लढण्याची शक्ती त्यांनी सुरक्षित ठेवलेली असते. जन्मभर त्यांनी ह्याच पद्धतीने कारभार पाहिला. त्यांचे चौरस नियोजन आणि युद्ध आखणीला राज्य विस्तारात रूपांतरित करण्याचे श्रेय अप्रतिम आहे.
पुढील पानावर ......
No comments:
Post a Comment