महिकावतीची बखर - भाग ८ : ठाणे - कोकणचे मुसलमानी राज्य ...
नागरशा राज्यभ्रष्ट
झालेला पाहून भागडचुरी अर्थात आनंदला होता. प्रांताचा संपूर्ण
कारभार मलिक भागडचुरीवर सोपवून होता त्यामुळे भागडचुरी आता अधिकच उद्दाम
झाला होता. त्याने पुन्हा सोम देसायाशी असलेले जुने वैर उकरून काढले आणि
जिच्यावर भागडचुरीची वाईट नजर होती त्या स्त्रीच्या माहेरच्या लोकांवर म्हणजे
भाईदरच्या पाटलावर आरोप केले. सरकारच्या ३२ हजार सजगणी (सजगणी हा नाण्याचा
प्रकार असून त्याचे मूल्य २ पैसे असे) पाटलाने खाल्याचा
खोटा आरोप भागडचुरीने पाटलावर केला आणि त्यास कैद करून टाकले. शेवटी
सोम देसला याने ते पैसे सरकारात जमा करून पाटलास सोडवून आणले. आता भागडचुरीने
मलिकांचे काम भरले की हा सोम देसला लुच्चा असून त्यास दस्त करावयास
हवे. मलिकने निष्कारण सोम देसला याला १६ हजार दाम दंड भरावयास सांगितले.
ह्यावर सोम देसलाने नाराजी व्यक्त करून तो भरायला नकार दिला.बास.. इतके कारण पुरे होऊन मालिकाने त्याची देसाई काढून भागडचुरीला देऊ केली. पण भागडचुरीला देसायाला संपवायचेच होते. त्याने सोम देसला किंवा त्याचा भाऊ पायरुत याला जीवे मारल्याखेरीज देसाय पद घेणार नाही असे मलिकला कळवून टाकले. झाले.. ह्यावरून मालिकाने सोम देसला आणि त्याचा भाऊ पायरुत ह्यांना दिल्ली येथे नेऊन बादशहाकरवी त्यांचे जीव घेतले. बखर म्हणते की, बादशहाने पायरुताची चामडी सोलून त्यास ठार केले तर सोम देसल्याचे पोट चिरून, त्याच्या आतड्याची वात वळून आणि चरबीचे तेल जाळून, त्याचा दिवा लाविला. ही असली क्रूर आणि भयानक शिक्षा सोम देसल्याला आणि त्याच्या भावाला मिळाल्याने संपूर्ण भागात भागडचुरीची दहशत बसली. पण पायरुतचा मुलगा दादरुत ह्याला मात्र भागडचुरीचा बदला घ्यायचा होताच. त्याने पुन्हा विश्वासातील लोक जमवून भागडचुरी आणि कमळचुरी यांवर हल्ला चढवला. कमळचुरी जागीच ठार झाला पण भागडचुरी पुन्हा पळू लागला. ह्यावेळी मात्र तो फार पळू शकला नाही. कोणा गोम तांडेलाने कोयती हाणून त्याचा वध केला आणि दादरुतची वाहवा मिळवली.
भागडचुरीचा असा अंत झाल्याचे पाहून मलिक देखील सावध झाला. लोकांच्या कलेने घेतल्याखेरीज निभाव लागणार नाही हे त्याला ठावूक होते. त्याने नागरशा दुसरा याचा पुत्र लाहुरशा याला पुन्हा माहीमच्या गादीवर बसवले आणि कारभार हाकावयास सांगितले. हे सर्व अवघ्या वर्षभराच्या कालावधीत झाले. लाहूरशा याने ९ वर्ष माहीम वरून राज्यकारभार पाहिला. पुढे शके १२७९ (इ.स. १३५७) मध्ये मलिकने राज्य नायते राजांच्या हाती दिले. नायते हे शक १११६ पासून सामान्य देसाई होते. पुढे ते मुसलमान झाले आणि मलिकच्या दरबारात बहुदा त्यांनी वजन प्राप्त केले असेल. त्यांच्या कारकिर्दीत इतर देसाई आपापली कामे पाहून होते. कोणीही कुठलाही उठाव करण्याचा प्रयत्न केला नाही. लाहूरशा नंतर त्याच्या घराण्याचा कोणीही इतका बलशाली झाला नाही की तो पुन्हा उठाव करून राज्य हस्तगत करू शकेल. नायते याने मलिकच्या आणि पर्यायाने दिल्लीच्या पातशहाच्या आशीर्वादाने तब्बल ४० वर्षे राज्य केले. पुढे कोणी भोंगळे म्हणून राजे आले त्यांनी २० वर्षे राज्य केले. जव्हार येथे असणारा वाडा बहुदा ह्यांनीच बांधला. (मला खात्री नाही पण खूप वर्ष आधी गेलो होतो तेंव्हा पाहिल्याचे स्मरते) पुन्हा शके १३५१ मध्ये राज्य अमदाबादचा सुलतान (ह्यांचा नायते राजांशी जवळचा संबंध होता.) ह्याने घेतले. राज्य कोणाचेही असो, सर्वोच्च सत्ता दिल्लीची होती. पुढे अनेक वर्ष (अंदाजे ८०) अमदाबादचा सुलतान ठाणे -साष्टी आणि महिकावती भागावर राज्य करून होते.
नर्मदा ओलांडून अल्लाउद्दिन खिलजी दख्खनेत येणे ही जशी धक्कादायक घटना होती तशीच अजून एक घटना शके १४२२ मध्ये घडली. ती महिकावती प्रांतात घडली नसली तरी पुढच्या २०० वर्षात ह्या घटनेचा संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मोठाच परिणाम झाला. ती घटना म्हणजे २ तरावे घेऊन पोर्तुगीझ कोची बंदरात उतरले. आपण सर्वांनी वास्को-द-गामा हा भारतात आलेला पहिला पोर्तुगीझ दर्यावर्दी असल्याचे शाळेत वाचले आहे. पण बखरीत त्याचा उल्लेख येत नाही. कप्तान लोरेस लुईस देत्राव ह्याच्या नेतृत्वाखाली सिनोर देस्कोर आणि बोजीजुझ अशी २ जहाजे कोची बंदरात दाखल झाली होती. वास्को-द-गामा हा बहुदा यात असावा आणि त्याने फक्त नोंदी करून ठेवल्या असाव्यात.
No comments:
Post a Comment