Sunday, July 15, 2012

छत्रपती शिवाजी महाराज-जीवन रहस्य-भाग ३



हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला. राजे धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते. साहसी होते पण आततायी नव्हते. त्यांची राहणी वैभव संपन्न होती पण उधळी नव्हती. राज्याचे सिंहासन ३२ मणाचे बनवणारा राजा सूती वस्त्रात, लाकडी पलंगावर झोपत असे. चित्र, शिल्प आणि संगीत ह्यांना आश्रय देणे यासाठी ना त्यांच्याकड़े वेळ होता ना पैसा. त्यांना मोठ्या मोठ्या ईमारती बांधण्याची फुरसत देखील नव्हती. दुष्काळात लाखो लोक अन्न-अन्न करीत मरत असताना २० कोट रुपये खर्चुन ताजमहाल बांधण्यात त्यांना रस नव्हता किंवा त्यांच्या मनाचा तो कल देखील नव्हता. अकबराने हिंदूंना औदार्याने वागवले, तर राजांनी मुसलमानांना औदार्याने वागवले. त्यांच्याकडून आक्रमणाची भिती होती तरीही. हिंदूंकडून अशी भीती कधीच नव्हती. राजांनी सर्वांना समान वागवले ते भोवतालच्या मुस्लिम राज्यांच्या भीतीने नव्हे तर स्वयंभू औदार्य म्हणुन.



ते कुशल सेनानी होते, युद्धतज्ञ होते. या खेरीज ते मुलकी कारभाराचे तज्ञ होते. प्रजेच्या ईहलौकिक कल्याणाची जबाबदारी आपली आहे, हे त्यांना पुरेपुर माहीत होते. प्रजेवर निरर्थक कर त्यांनी कधी लादले नाहीत. (सिंहासनपट्टी हा जादा कर सुद्धा त्यांनी वतनदारांवर लावला.) 'मी शत्रूंना दगा दिला, पण मित्रांना दगा दिल्याचे एक तरी उदहारण दाखवा' असे जाहिर आव्हान त्यांनी दिले होते. त्या आव्हानाला आजतागायत उत्तर आलेले नाही. कौल देऊन गावे बसवणे, बीघे-चावर जमीन मोजणे, जमीन लागवडीखाली आणणे, बी-बियाणे - नांगर-बैल यासाठी कर्ज देणे, शेतसारा निश्चित करणे असे विधायक उपक्रमही त्यांनी केले. त्यांच्या काळात उत्पन्नाच्या ४० टक्के कर होता. आजही हा कर लहान नाही. तरी सुद्धा लोकांनी २/५ ही वाटणी आनंदाने स्विकारली. कारण कर दिल्यावर पक्षपात न होता संपूर्ण संरक्षण आणि न्याय याचे आश्वासन मिळायचे. 'पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी' हे त्यांच्या राजवटीचे एक गमक आहे. कारण त्यांनी हक्क वतनदारांकडे न ठेवता स्वतःकडे घेतले.



भाषा सुधारण्यासाठी 'राज्यव्यवहार को', पंचांग सुधारण्यासाठी 'करण-कौस्तुभ', धर्मात शुद्ध करून घेणे हे सुद्धा त्यांनी केले. स्त्रीची अब्रू निर्धोक केली. त्यासाठी स्वतःचा निष्ठावान सरदार सखोजी गायकवाड ह्याचे हातपाय तोडण्यास कमी केले नाही. फौजेला शिस्त लवली. गावातून काही फुकट घेऊ नये असा दंडक केला. आपल्या फौजेतल्या ३०० लोकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडले. कारण बळकटपणे तलवारी हातात घेणारे हात ह्यापेक्षा शासनामागे उभा राहणारा जनतेचा हात त्यांना जास्त महत्वाचा होता. 'मुलकी सत्ता ही लश्करी सत्तेपेक्षा श्रेष्ठ असली पाहिजे' हे सांगणारा आणि त्यावर वाटचाल करणारा असा माणूस भारताच्या इतिहासात एकमेव आहे. म्हणुनच तर सर्व त्यांना 'शिवकल्याण राजा' म्हणतात.
स्त्रियांचे व गुलामांचे आठवडी विक्री बाजार त्यांनी बंद करवले. तर विरोधकांच्या धर्मग्रंथांचा व पूजास्थानांचा त्यांनी सदैव आदर केला. अतिशय संयमी आदर्श गृहस्थजीवन ते जगले. निर्दोष व सुखी राज्यकारभार केला. स्वतः शुन्यातून राज्य निर्मिती करून हे 'श्रींचे राज्य' आहे अशीच त्यांची वागणूक राहिली. म्हणुन तर ते श्रीमंत योगी झाले.
त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे आपला आत्मविश्वास जागा करणाऱ्या एका युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास असतो.


No comments:

Post a Comment

Website Security Test