Saturday, February 6, 2016

शिवकालीन महाराष्ट्र भाग १३८


सन १६४९ मधे शिवरायांनी दख्खनच्या मुघल सुभेदारला, म्हणजे शहजादा मुरादबक्षला काही पत्रे लिहीली होती. ह्यानंतर सन १६५६ पर्यंत त्याने मुघलांना काही लिहील्याचे पुरावे मिळत नाहीत. जुलै १६५६ मधे शिवरायांनी मुल्तफखान नावाच्या अहमदनगरच्या किल्लेदाराला पत्र लिहीले होते. हे पत्र आज उपलब्ध नाही पण ऑगस्ट १६५६ मधे औरंगजेबने मुल्तफखानला लिहीलेल्या पत्रात त्या पत्राचा संदर्भ येतो.२२ डिसेंबर १६५६ ला लिहीलेल्या औरंगजेबच्या दुसऱ्या पत्रातून असे लक्षात येते की शिवरायांनी मुघलांशी हा पत्रव्यवहार आदिलशाहीविरुद्ध त्याच्या आक्रमणांना पाठींबा मिळवण्यासाठी केला होता. ह्या पत्रात औरंगजेबने शिवाजी राजा व शाहजी राजाला लिहीलेल्या पत्रांचाही उल्लेख आहे पण ती कुठलीच पत्रे आज उपलब्ध नाहीत. सन १६५७ मधे फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरवातीला शिवरायांचा वकील औरंगजेबला भेटला होता. शिवरायांनी उत्तरादाखल दिलेले पत्र आज उपलब्ध नाही पण १५ मार्च १६५७ ला औरंगजेब ने मुल्कफखानला लिहीलेल्या पत्रात ही घटना दिला आहे. त्यानंतर औरंगजेबने शिवरायांना एक निशाण पाठविले व शिवरायांनी त्यालाही उत्तर दिले. ही दोन्ही पत्र आज उपलब्ध नाहीत पण २३ एप्रिल १६५७ ला औरंगजेबने शिवरायांना लिहीलेल्या पत्रात त्यांचा उल्लेख आहे. ह्यातील शेवटच्या पत्राच्या एका आठवड्यानंतरच शिवरायांनी जुन्नर व अहमदनगर ही मुघलांची ठाणी लुटली.

संदर्भग्रंथ

 • श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ८१७-८२५

No comments:

Post a Comment

Website Security Test