शिवाजी राजे पुरंदर ताब्यात घेतात
शिवकालीन महाराष्ट्र ( सन सन १६४७ ते सन १६५६ )
फतहखानने शिवरायांवर चाल केली तेव्हा पुरंदर किल्ला महादजी नीळकंठरावाकडे होता. महादजीचे शाहजीबरोबर चांगले संबंध होते त्यामुळे त्यांनी शिवरायांना संकटकाळी गडाचा वापर करु दिला. साधारण १६२५ पासून महादजीच्या घराण्याकडे पुरंदरचा ताबा होता. २० डिसेंबर १६२५ चा एक महजर आहे ज्यात पुरंदरच्या नीळकंठरावाचा उल्लेख येतो.
त्यातून हे स्पष्ट होते की मीरासदारीने नीळकंठरावांकडे पुरंदरचा ताबा होता. पुण्याच्या कऱ्हेपठार तरफेत पुरंदर किल्ला येतो. हा परगणा शाहजी राजांना मुकासा म्हणून मिळाला होता. त्यामुळे अप्रत्यक्षपणे शाहजी राजांचा ह्या भागावर हक्क होता. तसेच शाहजी राजांचा प्रतिनिधी म्हणून शिवरायांचा त्या भागावर हक्क होता.
७ मे १६५४ च्या सुमारास महादजी नीळकंठरावाचा मृत्यू झाला. ह्या तारखेच्या शाहजी राजांनी महादजीच्या मुलांना लिहीलेल्या पत्रात महादजीच्या मृत्यूविषयी शोक व्यक्त केला आहे. शाहजी राजांनी त्यात म्हटले आहे की महादजी बरोबर जसे सलोख्याचे संबंध होते तसेच त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांशीही चालू राहतील.
ह्यातून असे लक्षात येते की जरी शाहजी राजांकडे पुणे परगणा होता तरी पुरंदरवर त्याचा पूर्णाधिकार नव्हता. ९ ऑगस्ट १६५४ ला शिवरायांनी महादजीच्या थोरल्या मुलाला लिहीलेले एक पत्र उपलब्ध आहे. ह्या पत्रात शिवरायांचा पाठराखणीचा पण अधिकारी सूर दिसून येतो. महादजीच्या दुसऱ्या मुलाला, म्हणजे शंकरजीला गणेश नावाचा मुलगा होता. त्याने २४ मे १७३६ ते २३ मे १७३७ ह्या मधे केलेला एक अर्ज उपलब्ध आहे. त्यात शिवरायांनी पुरंदरचा ताबा घेतल्याची नोंद सापडते.
ह्या सगळ्या साधनातून असे दिसते की महादजीच्या मृत्यूनंतर शिवरायांनी पुरंदरचा ताबा घेतला. महादजीचा मुलगा नीळोपंत ह्याला शिवरायांनी विश्वासात घेऊन त्याला पूर्ण पाठिंब्याचे आश्वासन दिले होते. पुरंदरचे हस्तांतर ९ ऑगस्ट १६५४ ते मे १६५७ च्या मधे कधीतरी झाले असावे.
संदर्भग्रंथ
• श्री राजा शिवछत्रपती खंड १, पृष्ठ ७३५-७४३
No comments:
Post a Comment